सत्शक्तीच्या जागरणासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास

तंत्रज्ञानाने मनुष्यजीवनावर एकविसाव्या शतकात एवढा प्रभाव टाकला आहे, की गतिमान या जगात तत्त्वज्ञानासारखे विषय संदर्भहीन झाले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक ज्ञानशाखा या विकासाकरता आवश्यक समजल्या जातात. समाजाचा ऐहिक व्यवहार चालवण्याकरता व्यावसायिक शाखा आणि त्या संबंधातील ज्ञानशाखांची उपयुक्तता ही नेहमीच्या जीवनात जाणवणारी गोष्ट आहे. त्या तुलनेत तत्त्वज्ञानासारखा विषय मात्र कोणताही उपयोग नसलेला निरुपद्रवी किंवा रिकामटेकड्या अभ्यासकांचा विषय असा मानला जात आहे.

‘मी कोण आहे? माझे इतर माणसांशी नाते काय आहे? माझे निसर्गाशी नाते काय आहे? माझी विश्वव्यापारात कोणती भूमिका आहे? असे अनेक प्रकारचे माणसाला पडलेले प्रश्‍न यातच मानवी जाणिवेच्या विकासाचे मूळ आहे. म्हणजे, माणसाने त्याच्या अस्तित्वाचा शोध घेत विचारांची जी निर्मिती केली, त्या विचारांची तर्कशुद्ध मांडणी केली, त्याचेच दुसरे नाव म्हणजे तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा माणसाच्या जाणिवेच्या कक्षा विस्तारत जातो, त्याने लावलेला जीवनाचा अर्थ अधिक व्यापक करतो. जीवनात केवळ गतिमानता असून उपयोगी नाही, तर जीवनाची दिशा हरवायची नसेल, जीवन निरर्थक बनायचे नसेल तर जीवनाचा अर्थ समजून घेण्याची जी प्रकि‘या आहे, ती खंडित होऊन चालणार नाही. तिच्यात स्थितिशीलता येऊन चालणार नाही. मानवी संस्कृतीच्या कालखंडात कधीतरी लावला गेलेला त्यासंबंधीचा अर्थ, तोच अंतिम आहे असे समजून, संस्कृतीच्या वाहत्या प्रवाहाला उलटे फिरवून चालणार नाही. तसे घडत असल्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्‍न तयार झाले आहेत.

तत्त्वज्ञान विश्‍वाच्या उत्पत्तीचे कारण काय? त्या उत्पत्तीत माणसाची भूमिका नेमकी कोणती आहे? विश्‍व आणि मानव यांच्या परस्परसंबंधांचा उलगडा कसा करायचा? माणसाच्या अस्तित्वाचे कारण कोणते? त्याचे जीवनसाफल्य कशात आहे? असे अनेक प्रश्‍न निर्माण करते आणि त्याची उत्तरे शोधत जाते. तशी उत्तरे शोधण्याचे प्रयत्न अनेक झालेले आहेत. त्यातून काही विचारप्रवाह निर्माण झालेले आहेत. त्या विचारप्रवाहांतून स्पष्टता येण्याबरोबरच; ते विचारप्रवाह संदिग्धता, संभ्रम, संघर्ष यांनाही कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे तत्त्वज्ञानविषयक विचारांचा एकत्रित आणि समग्र आढावा घेणे हे कोणाच्याही आवाक्याच्या बाहेरचे काम आहे. तरीही सर्व प्रयत्नांची विभागणी तीन प्रमुख प्रवाहांत करता येईल.

त्यांतील पहिला प्रवाह हा ईश्‍वराधिष्ठित विचार परंपरेचा आहे. परमेश्‍वराने हे जग  निर्माण केले आहे, तोच माणसाच्या निर्मितीलाही कारणीभूत आहे, त्यानेच माणसाने कसे वागावे याचे नियम घालून दिले आहेत. तो ते नियम लोकांना समजावून सांगण्याकरता प्रेषितांना जगात पाठवत असतो, हा पहिला विचारप्रवाह होय. ईश्‍वराधिष्ठित समाजाची ती संकल्पना आहे. या इहलोकाच्या पलीकडे एक परलोक आहे, ईश्‍वराची सत्ता त्या परलोकावर चालते. जे ईश्‍वरी आज्ञांचे पालन या जगात करतात, त्यांनाच परलोकात ईश्‍वरी कृपेचा लाभ होतो. म्हणजे ते स्वर्गसुख अनुभवू शकतात! ईश्‍वराधिष्ठित समाजाचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या दृष्टीने इहलोकातील जीवन म्हणजे ईश्‍वराची कृपा प्राप्त करून परलोकात स्वर्गसुख मिळवण्याची एक संधी आहे. या जीवनधारणेमुळे ईश्‍वराधिष्ठित जीवन तत्त्वज्ञानावर श्रद्धा असणार्‍या श्रद्धावानांची विचारसृष्टीच बदलून जाते. ईश्‍वरी कायद्याशी विसंगत असलेले कोणतेही कायदे, नीतिनियम पाळणे म्हणजे पापकर्म आहे अशी त्यांची धारणा असते. ईश्‍वर आणि माणूस यांमध्ये मध्यस्थी करणारे जे धार्मिक नेते असतात, त्यांना अशा समाजात महत्त्वपूर्ण स्थान मिळते.

विज्ञानवादी आणि इहवादी दृष्टिकोन गेल्या चार-पाचशे वर्षांत विकसित झाला आहे, त्याची मूलतत्त्वे ईश्वरी अस्तित्व मानणाऱ्या विचारापेक्षा मूलत: वेगळी आहेत. ही सृष्टी निर्माण करणारा कोणी ईश्‍वर आहे आणि त्याने काही विशिष्ट हेतूने ती निर्माण केली आहे ही गोष्ट इहवादी विचारवंतांना मान्य नाही. सृष्टीमध्ये घडणार्‍या घडामोडींना कोणतीही विशिष्ट दिशा नसते आणि त्याचा कोणताही आराखडा कोणीही निर्माण केलेला नसतो. अनेक ऐहिक घडामोडींचा परिणाम म्हणून जगाचा व्यापार चालला आहे. त्या चालणार्‍या घडामोडींचा अर्थ लावण्याचे आव्हान मनुष्यप्राण्यासमोर आहे. जगातील कोणतीही गोष्ट मानवी आकलनशक्तीच्या बाहेरची नाही. त्यातील अज्ञात असणार्‍या गोष्टी आहेत, त्या योग्य प्रयत्नांनी उद्या किंवा परवा त्याच्या कक्षेत येऊ शकतील. त्यामुळे परमेश्वराची प्रार्थना, धर्मश्रद्धा, धार्मिक तत्त्वज्ञाने ह्या माणसाच्या बौद्धिक विकासाआड येणार्‍या गोष्टी आहेत. त्यामुळेच समाजाची बौद्धिक प्रगती व्हायची असेल, तर त्या बंधनांपासून समाजाची मुक्तता होणे आवश्यक आहे. त्यामुळे इहवादी आधुनिक विचारवंतांचा जो वर्ग निर्माण झालेला आहे, तो या मध्ययुगीन अंधश्रद्धांच्या विरूध्द उभा राहिलेला असल्याने त्यातून संघर्षाची बीजे पेरली जात आहेत.

या संबंधातील भारतीय दृष्टिकोन वेगळा आहे. विश्व हे मूलत: चैतन्यस्वरूप असून, त्या चैतन्यातून मायेची निर्मिती झाली आहे. ब्र‘ह्म आणि माया यांचा परस्परसंघर्ष आणि समन्वय यांतून जगाच्या घडामोडी घडत असतात. ब्र‘ह्म आणि माया यांच्या परस्परसंबंधातून या घडामोडी घडतात, त्याचे आकलन फक्त मनुष्यप्राण्याला होते. त्यातील ब्र‘ह्माचे स्वरूप हे अचल, निर्विकार असून माया ही बदलणारी, चंचल असे तिचे स्वरूप असते. जर कोणत्याही व्यक्तीला ब्रह्माच्या स्वरूपाची जाणीव झाली, तर तिच्या जीवनामध्ये वैचारिक, नैतिक, मानसिक स्थिरता येते. त्याला ती जाणीव नसेल, तर ती मायेच्या मायावी स्वरूपामुळे भटकत राहते. त्यातूनच अनैतिकता, षड्विकार, हिंसात्मकता आदी गोष्टींच्या मार्गावर व्यक्ती  चालू लागते. हे तत्त्वज्ञान ईश्‍वरवादी धर्माप्रमाणे ईश्‍वर नावाच्या कोणत्या तरी अतिमानवी शक्तीने हे जग निर्माण केले आहे असे मानत नाही. तसेच, ती संकल्पना जगाच्या निर्मितीला कोणताही हेतू नसून केवळ चालणार्‍या ऐहिक घडामोडींचा परिणाम म्हणून माणूस जगत असतो, याही इहवादी तत्त्वज्ञानाला मान्यता देत नाही. माणसामध्ये आत्म्याच्या रूपाने असलेली चैतन्याची जाणीव ही त्याला मानवतेच्या मार्गावरून दूर जाऊ देत नाही. जेव्हा जेव्हा असत्य, अनैतिकता, हिंसात्मकता यांनी मानवी जीवन झाकोळून जाण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा मानवी मनाची ती सद्प्रेरणाच प्रभावी ठरते व मानवी जीवनाला विनाशापासून वाचवते. भारतात या तिन्ही विचारप्रवाहांचे सहअस्तित्व आहे. परंतु ते समन्वयात्मक आहे असे म्हणता येणार नाही, त्याचे कारण या तिन्ही विचारांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्यातून अनेक संघर्षबिंदू तयार झाले आहेत. त्या संघर्षबिंदूंचा शोध घेऊन त्याची कारणमीमांसा करून त्यावर चर्चा घडवली जात नाही, तोवर या संघर्षबिंदूंचे निराकरण होणे अवघड आहे.

मार्क्सवादाप्रमाणे, अनुभवाला येणारी कोणतीही गोष्ट ही तीन पायर्‍यांवर उभी असते. सिद्धान्त ही त्याची पहिली पायरी आहे. त्यातून निर्माण होणारी व्यवस्था ही त्याची दुसरी पायरी असते आणि त्यातून निर्माण झालेले बाह्याविष्कार ही त्याची तिसरी पायरी असते. प्रसारमाध्यमे अत्यंत प्रभावी झाली आहेत. समाजमन निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु ती प्रसारमाध्यमे केवळ बाह्याविष्काराचा विचार करत असतात. ज्या मूळ सिद्धान्तांच्या पायर्‍यांवर ते बाह्याविष्कार उभे आहेत, त्या सिद्धान्तांवर विचारमंथन न झाल्याने या सर्व चर्चाकल्लोळातून भरपूर आवाज निर्माण होतो, परंतु त्यातून अंतर्दृष्टी निर्माण होत नाही. मानवी इतिहासाच्या आरंभकाळात जेव्हा माणसाच्या दृष्टीने निसर्ग हा गूढ होता आणि त्याचे जीवन निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होते, त्या वेळी निसर्गाला चालवणारी कोणीतरी ईश्‍वर नावाची देवता असली पाहिजे, या विचाराने तिला प्रसन्न करून घेण्यासाठी ईश्‍वराधिष्ठित विचारसंकल्पना निर्माण झाल्या. एकदा ईश्‍वराची त्याच्यावर कृपा झाली तर या सर्व संकटांतून त्याची मुक्तता होईल, या भावनेतून ईश्‍वरसंबंधी श्रद्धा जोपासणे हा समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रमुख धागा बनला. परंतु त्यात अडचण अशी, की प्रत्यक्ष जीवनात श्रद्धावानापेक्षा ताकदवान माणसे व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होत असताना दिसत होती. त्यामुळे ईश्‍वराची प्रार्थना आणि त्याचे ऐहिक जीवनात झालेले परिणाम यांची संगती लावणे अशक्य झाल्याने परलोकाच्या आणि स्वर्गाच्या संकल्पनेने जन्म घेतला. ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून काम केल्याने या जन्मात जरी सुख लाभले नाही, तरी ते परलोकात लाभेल असे सांगितले जाऊ लागले. त्यातच त्याच्या प्रेषिताचा शब्द हाच जगातील अंतिम शब्द आहे असे सांगितल्यामुळे त्या धार्मिक संकल्पना काळानुसार विकसित होण्याची प्रकि‘या थांबली. त्यातच धार्मिक संघर्षाचे मूळ आहे.

निसर्गाचे गूढ जसजसे वैज्ञानिक नियमांच्या शोधांमुळे उलगडायला सुरुवात झाली, तसतशी माणसाच्या मनातील सृष्टीबद्दलची किंवा निसर्गाबद्दलची भीती कमी होऊन त्याची जागा उत्सुकतेने घेतली. एक काळ असा होता, की रोगांची साथ आली, की लोक देवाची पूजा करत. ते आता डॉक्टरांकडे जातात. जसजशी विज्ञानाची कक्षा वाढण्यास सुरुवात झाली, तसतसे हे जग कोणी एका ईश्‍वराने निर्माण केलेले आहे ही त्यांची श्रद्धा डळमळीत होऊ लागली. जगातील सर्व घडामोडी काही विशिष्ट नियमांनुसार तयार झाल्या आहेत आणि कारण व परंपरा यांची तर्कसाखळी जोडून ते नियम समजावून घेता येऊ शकतात हा बौद्धिक आत्मविश्‍वास माणसाच्या मनात तयार झाला. तेव्हा त्याला त्याचा विकास करण्याकरता, परमेश्‍वराची प्रार्थना करण्यापेक्षा, या वैश्‍विक नियमांना समजावून घेण्याकरता प्रयोगशाळा उघडणे अधिक महत्त्वाचे वाटू लागले. तोपर्यंत ईश्‍वरावरील श्रद्धा ही समाजधारणेकरता महत्त्वाची मानली जात असे. ती श्रद्धा जर तुटली तर समाज एकत्रित राहू शकणार नाही या भावनेने जो श्रद्धाहीन असेल त्याला देहदंडाची शिक्षा देणे हेही स्वाभाविक व नैसर्गिक मानले जात असे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजाच्या ईश्‍वरी श्रद्धेवर परिणाम झाला, तेव्हा चांगले आणि वाईट याचे संदर्भ बदलले. ईश्‍वराच्या भीतीने माणसाने पुण्यकारक किंवा चांगली कृत्ये केली पाहिजेत, या नैतिक गुणांचाही धार्मिक श्रद्धेबरोबर र्‍हास होऊ लागला. त्यातूनच मानवतेचे नवे मूल्य तयार झाले आणि धर्मश्रद्धेऐवजी राजसत्ता ही मानवतेच्या मूल्याची संरक्षक बनली पाहिजे अशी भावना निर्माण झाली. धर्मग्रंथांचे महत्त्व कमी झाले, तेथे प्रत्येक देशाची घटना महत्त्वाची मानली जाऊ लागली. धर्मसत्तेचा प्रभाव कमी झाला व राजसत्तेचा प्रभाव वाढला. धार्मिक परंपरांपेक्षा कायद्याला महत्त्व आले. ईश्‍वराच्या साक्षात्कारापेक्षा ज्याच्या मागे लोकांचे बहुमत अधिक आहे अशा नेत्यांच्या हाती समाजाच्या भविष्याची सूत्रे आली. परंतु हे परिवर्तन मान्य नसलेला व आजही मध्ययुगीन धार्मिक ग्रंथांवर श्रद्धा असलेला मोठा वर्ग या प्रकि‘येत न आल्याने तो या विकासकामात सहभागी होऊ शकला नाही आणि त्यामुळे शस्त्रबळाच्या जोरावर हिंसाचाराच्या मार्गाने काळाचा ओघ उलटा फिरवता येईल असे त्याला वाटते. जोवर या हिंसाचारामागील सैद्धान्तिक भूमिकेला आव्हान दिले जात नाही, तोवर केवळ वरवरच्या निषेधाने किंवा एखादी संघटना नेस्तनाबूत करण्याने तो प्रश्‍न सुटण्यासारखा नाही. त्याबाबत इहवादी विचारांना स्वत:च्या मर्यादा आहेत. इहवादी समाजरचना कायद्याच्या आधारावर राज्य करते. जर कायदा तोडला, तर त्याची शिक्षा म्हणून त्याला तुरुंगात डांबून त्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध टाकता येतात, त्याला फाशीची शिक्षा देऊन त्याचे जगण्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणता येऊ शकते. परंतु, धर्मश्रद्धेमुळे त्याच्या जीवनात असे घडले तर परलोकात त्याचा त्याला लाभ होणार आहे अशी एखाद्याची श्रद्धा असेल, तर त्यावर या शिक्षा परिणाम करू शकत नाहीत. जगभरात वाढलेले जे आत्मघातकी हल्ले आहेत, ते कठोर कायदा करून कसे संपवता येणार? कारण ते हल्ले करणार्‍यांची प्रेरणा कायद्याच्या कक्षेच्या बाहेरील आहे. त्यामुळे धार्मिक हिंसाचार केवळ शस्त्रबळाने, कायद्याच्या कठोर अंमलबाजवणीने संपवता येणार नाही. त्याकरता त्यांच्या मानसिक परिवर्तनाची गरज आहे आणि असे मानसिक परिवर्तन तर्कनिष्ठ, श्रद्धाहीन तत्त्वज्ञानातून घडू शकत नाही असा मानवी इतिहास सांगतो. नास्तिक तत्त्वज्ञानाच्या आधारावर; काही व्यक्ती त्यांचे जीवन व्यतीत करू शकतात, परंतु सर्व समाज नास्तिक बनू शकत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे या मध्ययुगीन धर्मश्रद्धा अधिक प्रगल्भ बनवणे आणि मानवतेच्या मूल्यावर त्या विकसित करणे एवढाच पर्याय त्याच्यासमोर राहतो.

भारतीय संस्कृतीने ब्र‘ह्म आणि माया हा जो सिद्धान्त मांडला, त्याचेही अनेक बरे-वाईट परिणाम भारतीय समाजाला भोगावे लागले. त्या सिद्धान्तामुळे भारतीय समाजाने त्याच्या ऐहिक जीवनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागला. ऐहिक जीवन हे मायारूप आहे आणि त्यामुळे त्यात न गुंतता ब्र‘ह्मरूपाची प्राप्ती करून घेणे हेच जीवनाचे एकमेव लक्ष्य असले पाहिजे या व्यक्तिनिष्ठ; मोक्षवादी सिद्धान्तामुळे ऐहिक जीवनाबद्दलचा तुच्छतागंड निर्माण झाला. ऐहिक जीवन जगल्याशिवाय इलाज नाही, परंतु त्या जीवनावर विश्‍वास नाही अशा भूमिकेत जो दांभिकपणा येतो, तो दांभिकपणा या संस्कृतीमध्ये निर्माण झाला. त्याचे परिणामही भोगावे लागले. एका बाजूने सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्‍वराचा अंश आहे असे म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला अनेक जातिगटांना प्राण्यापेक्षाही हीनतेची वागणूक द्यायची व हे दोन्ही विचार एकाच वेळी धर्मविचार म्हणून सांगायचे, त्यात काही विसंगती आहे असेही वाटायचे नाही अशी एकेकाळची परिस्थिती होती. ती परिस्थिती हळूहळू बदलत आहे; परंतु, त्या बदलण्यालाही जो एक सुस्पष्ट सैद्धान्तिक आशय यायला हवा, तो पुरेशा प्रमाणात आलेला नाही. अशा तऱ्हेने ते तिन्ही विचारप्रवाह भारतीय समाजात अस्तित्वात असले, तरी त्यातून वैचारिक जीवन समृद्ध होण्याऐवजी त्याचा परिणाम समाजजीवनात तणाव निर्माण होण्यात झालेला आहे. सेमेटिक ईश्‍वराधिष्ठित धर्मगट समाजाला मध्ययुगीन काळात नेऊ पाहत आहेत, इहवादी विचार सामाजिक जीवनाला जो उदात्त आणि विशाल अर्थ लागतो तोच देऊ शकत नाहीत आणि एकविसाव्या शतकाला कवेत घेऊन जाण्याइतका भारतीय विचार पुरेसा विकसित झालेला नाही अशा सीमेवर भारतीय समाज उभा आहे. त्या कोंडीतून बाहेर पडायचे असेल, तर मूलभूत सैद्धान्तिक आशय आणि त्याचे व्यावहारिक उपयोजन यांवर मुक्त चर्चा घडून आली पाहिजे. त्याकरता तत्त्वज्ञानविषयक चर्चेची ओढ निर्माण केली गेली पाहिजे. तशा चर्चेची एक वैचारिक शिस्त असते, तिचे पालन झाले पाहिजे. हेतूंचा आरोप न करता परस्परसंवादातून मानवी जीवनाचे आकलन अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने तिची दिशा असली पाहिजे. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानात्मक समृद्धी वाढत असताना जर जीवनाचा अर्थ लावणारी तत्त्वज्ञानात्मक समृद्धी निर्माण झाली नाही, तर होणारे संघर्ष अधिक हिंसक व प्रलयंकारी होतील. परंतु मानवी इतिहासात जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले, तेव्हा मानवी मनातील सत्शक्तीने त्याच्या विकारबुद्धीवर मात केली आहे. मात्र त्यासाठी समाजात खुल्या विचारचर्चेची गरज आहे.

– दिलीप करंबेळकर

About Post Author