अण्णा हजारे अजूनही आपल्या विचार विश्वात व्यापलेले आहेत. उपोषणाच्या घटनेनंतर सत्याग्रहाच्या संकल्पनेवर जी चर्चा घडली, ती पाहून सत्याग्रहाची कल्पना आणि शास्त्र काळानुरूप बदलत गेले पाहीजे, असे वाटते. हे आंदोलन मिडीयाने मॅनेज केले. अशी चर्चा ऐकण्यास मिळाली. जर एखादी व्यक्त्ती एखाद्या प्रश्नासाठी लढत असेल, तर तो लढा आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मिडीयाचा आधार घेणे गैर नाही. गांधींच्या काळातही वर्तमानपत्रे आणि रेडीओ ही माध्यमे होती. मग आताच माध्यमांवर एवढा आक्षेप का?
सध्याचा मिडीया हा व्यापक आहे आणि त्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यावे लागणारच. मिडीयाचासुध्दा सोशल आणि एज्युकेटीव्ह रोल असला पाहिजे. मिडीयामार्फत हजारे आणि विनायक सेन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. या प्रकारे मिडीयाला हिणवण्यापेक्षा सत्याग्रही आणि मिडीया दोघेही एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?
अण्णांच्या सत्याग्रहानंतर विविध माध्यमांमधून जी चर्चा झाली त्यात हा सत्याग्रह म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ किंवा नैतिक दहशतवाद’ असा सूर उमटला. तुम्ही ज्या तत्वाचा आग्रह धरला आहे, तो आम्हास मान्य नाही, म्हणून हा दहशतवाद, असे म्हणणे चुकीचे आहे. सत्याग्रहात, सत्य सगळ्यांना मान्य असले पाहिजे आणि त्यासाठीच सत्याचा आग्रह धरावा, हे अभिप्रेत असते, पण याप्रमाणे गोष्टीस दहशत म्हटले जाऊ लागले, तर जगणेच कठीण होऊन जाईल. विशेष म्हणजे या विधानातून महात्मा गांधी हे सुध्दा नैतिक दहशतवादी होते, असा अर्थ ध्वनित होतो.
– शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख
दिनांक – 18/04/2011
{jcomments on}
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.