सतीश पाटील यांचे खगोलशास्त्र संग्रहालय

7
29
carasole1

सतीश पाटील सतीश पाटील यांचा जन्म नाशिकचा, पण त्यांचे पालनपोषण जळगाव येथे झाले. आईवडील शिक्षक. त्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण. अभ्यासाला आणि इतर कलागुणांना पोषक असे. त्यांच्याजवळ छोटी दुर्बीण होती. आठवीत असताना, ती दुर्बीण खेळता खेळता फुटली. फुटलेली दुर्बीण दुरूस्त करता करता त्यांनी मोठी दुर्बीण तयार केली! त्यांच्या त्या खटाटोपाला घरातून प्रोत्साहनच मिळाले. कारण छोट्या सतीशचे अभ्‍यासातही तितकेच लक्ष होते. सतीश त्या दुर्बिणीतून सुरुवातीला पक्षी पाहायचे. एकदा, त्यांनी दुर्बीण चंद्रावर रोखली. चंद्रावरील खड्डे, विवरे त्यांना दिसली. चंद्राच्या त्या निरीक्षणानंतर त्यांच्यामध्ये ग्रह-तारे पाहण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या दुर्बिणी जमा केल्या. त्यांचा तो छंद केवळ दुर्बीणीपुरता मर्यादित राहिला नाही. ते विशेषत: ग्रामीण भागातील मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, त्यांना तंत्रज्ञानाबद्दल समज असावी, याकरता प्रयत्न करू लागले. सतीश पाटील सध्या शिरसोली येथील ‘बारी समाज माध्यमिक विद्यालया’त इंग्रजी, भूगोल विषय शिकवतात.

पाटील म्हणतात, “शालेय अभ्यासक्रमात खगोलशास्त्राचा समावेश नाही. पुण्यात इंटर ‘युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)’ ही खगोलशास्त्राविषयी शिक्षण देणारी स्वायत्त संस्था आहे. इतर कोठे त्या विषयाबाबत शिक्षण दिले जात नाही. तो विषय भारतातील विद्यापीठातदेखील मोजक्या ठिकाणी शिकवला जातो. भारत प्राचीन काळात त्या विषयातील संशोधन-अभ्यासात आघाडीवर होता. आता मात्र नाही. शिवाय, खगोलशास्त्र अंधश्रद्धेशी जोडले जाते! (उदाहरणार्थ, ग्रहताऱ्यांचा मानवी आयुष्यावरील प्रभाव) ही वेगळीच व्यथा.”

एकूणच, खगोलशास्त्राबाबत असलेल्या अनास्थेमुळे पाटीलसरांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना त्या बाबत ज्ञान देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याजवळ खगोलशास्त्राशी संबंधित सुमारे आठ ते दहा हजार वस्तू आहेत. खगोलीय छायाचित्रे काढण्यासाठी उपयुक्त अठ्ठ्याहत्तर कॅमेऱ्यांसह इतर साडेतीनशेहून अधिक कॅमेरे आहेत. आकाशदर्शन घडवणाऱ्या दहा प्रकारच्या दुर्बीणी, काचांचे-भिंगांचे विविध प्रकार, ग्रहताऱ्यांची छायाचित्रे आहेत. लोणारच्या सरोवरातील उल्का, दगड, देशभरातील पाचशे प्रकारच्या खडकांचे नमुनेही त्यांच्याजवळ आहेत. त्याशिवाय दुर्मीळ शंख-शिंपले, मोती, दुर्मीळ वनस्पतींची छायाचित्रे, देशी-विदेशी नाणी, बंदुकांचे प्रकार, औषधी फळेदेखील आहेत. खगोलशास्त्र, भूगोलविषयक पुस्तके, ग्रहताऱ्यांच्या चित्रफिती असे साहित्य त्यांच्या संग्रही आहे.

पाटीलसरांनी त्यांच्या घरातील संग्रह सर्वसामान्यांसाठी खुला करून दिला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे पाटील यांनी घरात तारांगणही उभे केले आहे. तेथे मुलांना आकाशदर्शन घडवले जाते.

पाटीलसर सांगतात, “गेल्या वीसेक वर्षांमध्ये उभी केलेली ही मिळकत आहे.” त्यांच्या घरी खगोल-विज्ञान प्रेमींची ये-जा असते. विद्यार्थ्यांना शंका अनेक असतात. पाटीलसर त्यांचे पूर्ण निरसन करतात. पाटीलसरांनी खगोलशास्त्राचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. ते नसतील तेव्हा मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांची पत्नी सुनीता व मुलगा तेजस निभावतात. तेजस भूगर्भशास्त्राचा अभ्यास करतो. त्यालाही खगोलशास्त्रात रूची आहे.

पाटीलसर दुर्बीणी बनवण्याचा वर्गही घेतात. त्यात परावर्तित, अपरावर्तित, हायब्रीड, सीसीडी टेलिस्कोप, बायनॅक्युलर, मोनोक्युलर फाईंडर अशा भिंगांचे ज्ञान देण्यापासून दुर्बीण तयार करण्यापर्यंत सारे शिकवले जाते. मुलांना तीन प्रकारच्या दुर्बीणी शिकवल्या जातात. पक्षी पाहण्यासाठी, ग्रहतारे पाहण्यासाठी व ट्रीपला जाण्यासाठीच्या दुर्बीणी. त्याशिवाय त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला पाटीलसर, जंगलात फिरायला नेण्यापासून त्यांना वैज्ञानिक उपकरणे बनवायला शिकवण्यापर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान मोफत देतात.

पाटीलसरांनी 26/11च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी उपयुक्त हायटेक हेल्मेट तयार केले आहे. त्या सोबत त्यांनी व्ह्यू स्कोप हे उपकरणही बनवले आहे. त्यांनी बनवलेल्या हेल्मेटवर नाइट व्ह्यू व्हिडिओ कॅमेरा आणि व्हिडिओ ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. कॅमेरा आणि ट्रान्समीटरची जोडणी जवानांजवळ असते. कॅमेऱ्यामुळे दहशतवादी मागून हल्ला करत असेल तरी त्याचे छायाचित्र जवानाला दिसू शकेल, अशी हेल्मेटची रचना करण्यात आली आहे. त्याची कल्पना शाळेत शिकवत असताना सुचल्याचे पाटील सांगतात.

ते म्हणतात, “शाळेत फळ्यावर लिहीत असताना मागे बोलत असलेली मुले दिसावी याकरता काहीतरी उपकरण तयार करायला हवे असे वाटले. त्यातूनच मग कपाळावर बांधता येईल अशी पट्टी तयार करून त्यावर उजव्या व डाव्या बाजूला दोन आरसे बसवले. त्या आरशांमधून फळ्यावर लिहिताना मागे मुले काय करताहेत ते दिसायचे. 26/11 हल्ल्यानंतर आरशांसोबत त्या पट्टीवर व्हिडिओ कॅमेरे बसवले आणि तयार झाले हेल्मेट. बहिऱ्या व्यक्तींना मागून येणाऱ्या गाडीच्या वाहनचालकाने वाजवलेला हॉर्नही ऐकू येत नाही. त्यांनादेखील असे उपकरण उपयुक्त ठरू शकते.

पाटीलसरांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर पवनचक्कीही बसवली आहे. ती बनवण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये इतकाच खर्च आला. त्यांनी पवनचक्कीसाठी लागणारी सारी उपकरणे घरातील व भंगारातील वापरली. जसे पाईप (पवनचक्कीच्या ब्लेडसाठी), भंगारातील अँगल, जुने बंद पडलेले जनरेटर, तांब्याच्या तारा, चुंबक. त्या सर्वांची योग्य जोडणी केली तर पवनचक्की घरीच तयार होऊ शकते. पवनचक्कीपासून मिळणाऱ्या वीजेचा वापर घरात केला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नेहमीचे वीज बिल निम्म्याने कमी झाल्याचेही ते नमूद करतात.

पाटीलसरांनी अनेक प्रयोग केले आहेत. इलेक्ट्रॉनिक जॅक, कैरी फोडण्याचा विशिष्ट सुरा, पीव्हीसी पाईपचा तराफा हे त्यांपैकी काही. ते धूमकेतूवर संशोधन करत आहेत. त्यांनी घशाच्या ऑपरेशनसाठी तयार केलेल्या ब्रांकोस्कोपला पेटंट मिळाले आहे. त्या उपकरणासाठी त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा आणि भारत सरकारच्या नॅशनल डिस्कव्हरी फाऊंडेशनतर्फे (अहमदाबाद) दिल्या जाणाऱ्या सृष्टी फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते सातपुडा जंगलात मुलांच्या सहली आयोजित करतात. ते मुलांना सहलींच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांबाबत माहिती देतात.

सतीश पाटील म्हणतात, “आपल्या आयुष्याला मर्यादा आहेत. त्यामुळे जितके शक्य होईल तितके आपल्याजवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, नवे शिकावे. इतरांमध्ये शिकण्याची ऊर्मी निर्माण करावी, हाच माझा ध्यास आहे.”

सतीश पाटील
09422618324
astrosatish@gmail.com

– अर्चना राणे

About Post Author

Previous articleमोहोळचे भैरवनाथ मंदिर
Next articleविदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

7 COMMENTS

 1. mala subha khagolshastrachi
  mala subha khagolshastrachi khup aavad aahe ani ha lekha atishay chan aahe mi itarana sudha agrah karel ha lakha vachnya sathi, mala satish patil sir ani tyanchya durbini khup avdatat

 2. सर तुम्ही मला आदरणीय आहात व
  सर तुम्ही मला आदरणीय आहात व माझ्या वडिलांचे गुरु आहात.
  आमची व समाजातील गरीब लोकांची एकच इच्छा आहे.व गरीब लोकांच्या मुलांना व मला पुढील आयुष्या करता
  चागले मार्गदर्शन करावे. मो ९७६७८०४०३० मला खूप शिकून तुमचे व माझ्या आई वडिलांचे नाव कमवायचे आहे.
  मला चागले मार्गदर्शन करावे.

 3. खुप चांगला उपक्रम …जेणेकरून
  खुप चांगला उपक्रम …जेणेकरून गरजू गरिब मुलाना निरिक्षणासाठी उपयोग होईलच…शिवाय ग्रह तारे बद्दलची उत्सुकता आणखीन वाढेल ….धन्यवाद पाटील साहेब…

 4. नमस्कार मी निलेश खलसे मी…
  नमस्कार मी निलेश खलसे मी सरां सोबत काम केलय दहावी मध्ये असताना सरानीं दोन मुल आणि दोन मुली पुणे येथे होणाऱ्या “वेध अवकाशाचा या प्रदर्शन घेऊन गेलेत नशिबाने त्यात मुलांन मध्ये मी होतो माझ्या आयुष्यात पहले पुणे दर्शन सरांनी घडवल धन्यवाद सर मी तुमचा सैदव आभारी राहील

Comments are closed.