सचिन आशा सुभाष – पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र! (Sachin Asha Subhash)

2
52
_Sachin_Asha_Subhash_1.jpg

सचिन मूळ सोलापूरचा. तो सध्या पुण्यात वकिली करतो. त्याची कमाल म्हणजे तो विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकी जोपासतो! त्याने तो रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उघड्याने झोपलेल्या लोकांसाठी काय करू शकतो या विचाराने ‘समाजबंध’ या नावाने कपडे संकलन आणि वाटप करणारी पहिली भिंत पुण्यात सुरू केली. भिंत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवादल कार्यालयाजवळ होती. त्या अभिनव संकल्पनेला समाजातून आणि माध्यमांतून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘फिरते समाजबंध’ या त्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यातून ‘समाजबंध’ पुण्याबाहेरील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पोचले.

स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न आदिवासी पाड्यांवर गंभीर आहे. त्यामुळे सचिनने कपडे जमा-वाटपाच्या पुढे जात त्यांच्यासाठी कापडी आशा पॅड तयार केली. भारतात बावन्न टक्के महिला मासिक पाळीमध्ये पॅड वापरत नाहीत. महिलांना त्यांनी मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार होतात! परिणामी, आजारी महिलेचे गर्भाशय काढावे लागते. त्यामुळे सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे दुष्परिणाम त्या महिलेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ शकतात. सचिनच्या स्वतःच्या आईला तशा जंतुसंसर्गामुळे तरुण वयात गर्भाशय काढावे लागले होते. त्यामुळे त्या आजाराचे गांभीर्य त्याला माहीत आहे. महिला पाळीत योग्य काळजी का घेत नाहीत? याचा अभ्यास करताना ‘समाजबंध’ टीमला जाणवले, की एकतर ग्रामीण आदिवासी महिलांना मासिक पाळीत वापरण्यासाठी महागडे पॅड विकत घेणे परवडत नाही आणि जरी ते गावात ‘केमिस्ट’कडे उपलब्ध असले तरी त्या ते घेण्यास सामाजिक लज्जेमुळे दुकानात जात नाहीत. घरातील पुरुषही ते आणून देत नाहीत. ‘समाजबंध संस्थे’ने देशभरातील उपलब्ध पॅडचा अभ्यास करून, चाचण्या घेऊन अखेर कापडी ‘आशा पॅड’ विकसित केले आहे.

सचिन म्हणाला, “मला हे काम करण्याची प्रेरणा माझ्या आईमुळे मिळाली. आईला मी धरून तीन मुले. मी तिच्या स्वत:च्या वेदना लहानपणापासून बघितल्या होत्या. तिला अनेक त्रास आहेत. पूर्वी साड्या प्युअर कॉटनच्या असायच्या. त्या कापडाचे पॅड घडी करून घेतले तरी त्रास होत नसे. टेरिकॉटचे कापड आले. त्याची शोषणक्षमता कमी, ते आरामदायक नाही. पॅडचे मोठमोठे ब्रँड आहेत, त्या ब्रँडचे पॅड प्लास्टिकचे असतात. त्यात जी जेल लावलेली असते तीच जेल गर्भाशयाच्या रोगाचे मुख्य कारण बनते. त्या पॅडची आणखी एक खुबी म्हणजे कंपन्या त्या पॅडची शोषणक्षमता खूप जास्त असते असा दावा करतात. ते पॅड त्यात प्लास्टिक असल्याने बारा-बारा तास जरी लावले तरी कोरडे राहते वगैरे वगैरे जाहिराती करतात, पण… पण पॅडची शोषणक्षमता ते सात-आठ तास लावून बसले तर संपते आणि पॅडमध्ये शोषले गेलेले दूषित रक्त पुन्हा योनिमार्गामध्ये पसरते. त्या प्रमुख कारणामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण गेल्या दहा-पंधरा वर्षांत वाढले आहे.”

_Sachin_Asha_Subhash_2.jpgसचिनची ‘समाजबंध’ भिंत ही संस्था झाली आहे. तो घटस्फोटित, गरजू, विधवा महिलांचा कात्रज येथे चालणारा स्वयंसिद्ध, स्वयं अर्थ-सहाय्यीत पुनर्वसन प्रकल्प आहे. त्यानंतर पुण्यातील भिंतीचा उपक्रम बंद झाला. सचिनच्याच शब्दात सांगायचे झाले तर “घरातील जुन्या कपड्यांपासून साध्या शिलाई मशीनवर स्वतःच्या घरात बनवता येतील असे पर्यावरणपूरक, पुनर्वापर करण्यायोग्य, जमिनीत विघटित होऊ शकतील असे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केमिकल जेल किंवा प्लास्टिक घटकविरहित कापडी पॅड म्हणजे ‘समाजबंध’चे आशा पॅड! ते पॅड बाजारात मिळणाऱ्या बाकी प्लास्टिक पॅडपेक्षा जास्त रक्त शोषून घेते आणि जास्त वेळ वापरले गेले तरी शरीरास अपाय करत नाही. त्या पॅडला अंतर्वस्त्राला पकडून ठेवता येईल असे लॉक आहे. ते पॅड बाहेरून जणू रुमाल आहे असे दिसते. त्यामुळे ते न लाजता, बिनधास्त बाहेर, सूर्यप्रकाशात वाळत टाकता येते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया मरून जातात आणि योनीला संसर्ग होण्याची शक्यता दुरावते. आशा पॅड घरी बनवता येते. एक पॅड तीन-चार महिने वापरले जाऊ शकते.”

आशा पॅड शहरातून जमा केलेल्या जुन्या कपड्यांपासून ‘समाजबंध’च्या पुण्यातील कात्रज येथील प्रकल्पामध्ये बनवली जातात. तेथे काही स्थानिक गरजू महिलांना रोजगारही मिळाला आहे.
‘समाजबंध’ संस्थेचे स्वयंसेवक मासिक पाळीविषयी महिला व किशोरवयीन मुलींचे समुपदेशनदेखील करतात. त्यामध्ये मुलींना मासिक पाळी कशी व का येते येथपासून ते मासिक पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कशी निगा राखावी इत्यादी सर्व विषयांची माहिती दिली जाते. महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन, आदिवासी व ग्रामीण भागात जाऊन महिला-मुलींचे समुपदेशन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तशा एक तासाच्या समुपदेशनानंतर महिलांना वापरून पाहण्यासाठी ‘आशा पॅड’चे मोफत वाटप करण्यात येते. त्यानंतर पॅड कसे बनवावे याचे प्रशिक्षण शिलाई मशीनवर देण्यात येते. भारतातील पॅड बनवणाऱ्या सर्व कंपन्या, सर्व संस्था, बचत गट यांची गोळाबेरीज केली तरी देशातील फक्त अठ्ठेचाळीस टक्के महिलांना तशी पॅड देणे शक्य झाले आहे; म्हणून ‘समाजबंध’ पॅड निर्मितीचे तंत्रच महिलांना उपलब्ध करून देते. ‘समाजबंध’चे काम सध्या पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पुरंदर व मावळ या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये सुरू आहे. पालघरमधील जव्हार, डहाणू, रत्नागिरी, चंद्रपूर, मेळघाट या दुर्गम भागांतही प्राथमिक समुपदेशन व पॅडवाटप कार्यक्रम घेतले गेले आहेत. त्या ठिकाणी स्थानिक टीम बांधणी व्हावी असे प्रयत्न आहेत.

कात्रज येथील प्रकल्पात जमा झालेल्या जुन्या कपड्यांवर प्रक्रिया करून महिला आरोग्य, पर्यावरण, पुनर्वापर आणि स्वयंरोजगार या चार घटकांवर प्रामुख्याने काम होते. मनोरुग्ण, अनाथालय, पुनर्वसन प्रकल्प, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटकांवर काम करणाऱ्या संस्थांना जमा झालेल्या कपड्यांतील वापरण्यायोग्य कपडे दिले जातात. ज्या कपड्यांची पॅड बनत नाहीत; तसेच, जे कपडे वापरताही येत नाहीत अशा कपड्यांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या तयार केल्या जातात. त्या पिशव्यांच्या विक्रीतून प्रकल्पाच्या खर्चाला हातभार लागतो.

सचिन स्वत:च्या पैशांवरच सर्व काम करत आहे. सचिन म्हणाला, ”माझ्या संस्थेचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील महिलांपर्यंत पोचून, समुपदेशन करून त्यांना शरीरातील महत्त्वाचा अवयव असणारे गर्भाशय निकामी होण्यापासून रोखणे व गर्भाशय काढण्याच्या शस्त्रकियेच्या ग्रामीण भागात पसरलेल्या रॅकेटचा पायबंद करणे हे आहे. ‘समाजबंध’ची युनिट जास्तीत जास्त गावांमध्ये सुरू करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत आशा पॅड पोचवणे व संपूर्ण महाराष्ट्र पॅडयुक्त व आजारमुक्त करणे यासाठी प्रयत्न आहेत”.

_Sachin_Asha_Subhash_3.jpgState Bank of India Branch: Kettur Acc No: 35915354850 IFSC: SBIN0018713 Phone No.: 7709488286 याच फोन नंबरला गुगल पे सुद्धा ॲटॅच आहे.

सचिन आशा सुभाष यांनी बीए राज्यशास्त्र, बीए जर्नलिझम, एल. एल. बी. या पदवी मिळवल्या आहेत. त्यांची वकिली इंटर्नशीप सुरू आहे. त्यांचे लग्न 26 जानेवारी 2019 रोजी होत आहे. तिचे नाव शर्वरी सुरेखा अरुण असे आहे. पत्नी प्राथमिक शिक्षक आहेत. तसेच, त्या ‘समाजबंध’सोबत समुपदेशनाचे काम पाहतात.सचिन-सुरेखा यांचे लग्न सत्यशोधक पद्धतीने होत आहे. सचिन म्हणाले, की तशा लग्नात धार्मिक विधी नसतात आणि अनावश्यक खर्चाला फाटा मिळतो. सचिन यांची विचारधारणा पुरोगामी आहे. ते म्हणाले, की मी माझ्या पूर्ण नावातील आडनाव बारावीत असताना अॅफेडेविट करून काढून टाकले, कारण ते जातिदर्शक असते. आणि आईचे नाव समाविष्ट केले, कारण स्त्रीला तिचे योग्य समान स्थान कुटुंब व्यवस्थेत मिळाले पाहिजे असे मला वाटते. सचिन पुढे म्हणाले, की या गोष्टी त्यांच्या त्यांनी स्वतःच्या विचाराने केल्या. पुढे मात्र मी राष्ट्र सेवा दलात सामील झालो. माझ्यावर साने गुरुजी व बाबा आमटे यांच्या कार्याचा प्रभाव आहे.

– अंजली झरकर, adv.anjalizarkar@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. मानाचा त्रिवार मुजरा!
    मानाचा त्रिवार मुजरा!

  2. शब्दांकन ज्या आत्मीयतेने…
    शब्दांकन ज्या आत्मीयतेने केलेय ती आत्मीयता भावली.सचिनचे कार्य आणि त्याचे महत्त्व याचे कौतूक करायला तर शब्द अपुरे आहेत

Comments are closed.