संवेदनांचा शुद्ध अनुभव – कोबाल्ट ब्लू

0
29
_Kobalt_Blue_1.jpg

दर्दभरी गझल ऐकताना हवी-नकोशी अस्वस्थता मनाला जशी वेढून राहते, तोच अनुभव ‘कोबाल्ट ब्लू’ ही कादंबरी वाचताना येतो. ‘मौज’ने प्रकाशित केलेली सचिन कुंडलकर या लेखकाची ती पहिलीच कादंबरी. ‘तो’, तनय आणि अनुजा या प्रमुख तीन व्यक्तिरेखा. कादंबरीभर कोवळ्या आणि हलक्या हाताने घातलेल्या शब्दांच्या छोट्या छोट्या ठिपक्यांच्या रांगोळीतून त्या तीन व्यक्तिरेखा वाचकाच्या मनात आकार घेतात. त्या जितक्या धुसर भासतात, तितक्याच त्या कादंबरी संपताना कोरीव आणि ठसठशीत आकार घेतात.

कादंबरीत पुण्यासारखे शहर, आधुनिक पुणेरी सुखवस्तु कुटुंब, त्या कुटुंबात आधुनिक जीवनशैलीत, पण परंपरागत मूल्यांसह जगणारी जशी माणसे आहेत, तशी चित्रे, संगीत, साहित्य, निसर्ग आणि पर्यावरण या विषयांत मनस्वीपणे जगणारी तरुण मुले-मुली आहेत. त्या तरुणांचे जगणे इतके स्वाभाविक आहे, की ती सभोवतालच्या चौकटबद्ध जीवनात ‘मिसफिट’ आहेत. स्वाभाविक जगणे याचा अर्थ त्यांच्या स्वाभाविक संवेदनांना न्याय आणि अर्थ देण्याचा व त्या संवेदना शुद्ध रूपात जगण्याचा प्रयत्न.

ती कथा ‘तो’, तनय आणि त्याची बहीण अनुजा या तिघांची आहे. कादंबरीत प्रथमपुरुषी निवेदन आहे. प्रथम तनय स्वतःबद्दल म्हणजे, ‘तो’ आणि तनय यांच्यातील संबंधाबद्दल बोलतो. नंतर अनुजा तिची डायरी लिहिते. ती त्या डायरीत ‘तो’ आणि ती स्वतः यांच्यातील संबंधांविषयी लिहिते.

‘तो’ तनयच्या घरी पेईंगगेस्ट आहे. आईवडील नसलेला, बरीच संपत्ती नावावर असलेला, हातात गिटार आणि ब्रश घेऊन दरक्षणी नवा जन्म घेऊन जगणारा ‘तो’ हा तनयच्या आकर्षणाचा विषय आहे. त्याचे दिसणे, उठणेबसणे, त्याचे सगळे भावविभाव, त्याचे कपडे, त्याचा वास, त्याची प्रत्येक गोष्ट तनयला आकर्षित करते. तो एखाद्या प्रेयसीसारखा प्रेम करतो. त्या प्रेमाला कामवासनेचे प्रबळ परिमाणही लाभलेले असते. ‘तो’ उन्मत्त प्रियकरासारखा तनयला स्वतःशी बांधून ठेवतो. पण त्याच वेळी अनुजाही ‘तो’च्या प्रेमात पडलेली आहे. तिचेही जगणे चौकटीच्या पलीकडले, मनस्वी असे आहे. ती ट्रेकिंगला जाते. तिला मुलींच्या कपड्यात गुदमरते. तिला हिंदी सिनेमे हास्यास्पद वाटतात आणि लग्न म्हणजे मुले तयार करण्याची संस्था वाटते. तिला विवाह आणि कुटुंब यांच्या चौकटीबाहेर तिचे स्वाभाविक जगणे खरे जगणे वाटते.

_Kobalt_Blue_2.jpgअनुजा आणि ‘तो’ स्वतःच्या उत्कट संवेदना शुद्धरूपात भोगण्यासाठी घर सोडून निघून जातात. समुद्रकिनारा, रात्र रात्र भटकणे, त्याचे तिला स्वयंपाक करून खाऊ घालणे, तिचे एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करणे वगैरेंच्या आठवणी म्हणजे तिची डायरी. अनुजा सहा महिने ‘तो’सह राहून एक दिवस घरी परत येते. बरीचशी विमनस्क. तिचे आईवडिलांशी सतत खटके उडतात. तिला मूलबाळ नसलेली शरयू मावशी जवळची वाटते. डॉक्टरच्या कॉऊन्सिलिंग ट्रिटमेंटचा एक भाग म्हणजे तिची डायरी! या डायरीतून तिचे लहानपण, मनस्वी स्वभाव, अनुभव नावाचा जवळचा मित्र, ‘तो’च्या शारीर आकर्षणातून भोगलेले क्षण, त्याची पेंटिंग्ज, त्याचे मित्र यांच्यासह हॉटेलात बिअर वगैरे घेऊन घालवलेले भन्नाट प्रसंग, तिचा भाऊ असीम यांचे लग्न जुळणे, पाहुण्यांसमोर तरी अनुजाने किमान पंजाबी ड्रेस घालावा अशा विनवण्या घरून होतात. अखेर तिची निवड ‘ग्रीन अर्थ’ या एनजीओत मोठ्या पदावर होते आणि शरयू मावशीच्या रिकाम्या फ्लॅटवर ती एकटी राहू लागते. हा सगळा कथाभाग फ्लॅशबॅक पद्धतीने येतो.

शब्दांच्या मातीचा थापलेला गोळा समोर घेऊन नाजूक हातांनी व्यक्तिरेखा कोरून काढाव्यात अशी ती शैली मराठी वाचकांना नवीन नाही. पण लेखक कादंबरीत संवेदना आणि भावना यांना दृश्यरूप देताना अतिशय तरल अशा प्रतीकांचा वापर करतो. कामभावना, वासना व्यक्त करणारे सूक्ष्म वर्णन… वाचकाला लहान लहान प्रसंगांतून रंग, गंध, स्पर्श आणि सूर या संवेदनांचा अनुभव नितळ रूपात येतो. त्या सगळ्या वर्णनाला भावकवितेसारखी लय आहे.

‘तो’ अनुजासह निघून गेल्यावर तनय सतत ‘तो’चाच विचार करतो. तनय ‘तो’ला म्हणतो, ‘‘आपले लगेच जमले. कारण भावगीते गाणाऱ्या मुली आणि बाह्यांचे बनियन घालणारी मुले आपल्या दोघांनाही आवडत नसत. त्याशिवाय मला आणखी एक गोष्ट आवडत नसे, ती म्हणजे, लग्न. त्या एका गोष्टीमुळे तयार होणारे असंख्य विषयांवर चर्चा करणारे नातेवाईक. तुला ते नव्हतेच.’’
कादंबरीचे नाव आहे, ‘कोबाल्ट ब्लू’. तसेही निळा रंग कामवासनेचा संकेत आहे. कादंबरीत रंगाच्या संदर्भात येणारी वर्णने मुळातून वाचण्यासारखी आहेत. तनयच्या घरी वरच्या खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहणारा ‘तो’. ‘तो’च्या प्रत्येक हालचाली न्याहाळताना तनय कामलालसेने आतून विद्ध झालेला आहे. ‘तो’च्या हालचालींचे बारीकसारीक वर्णन करताना त्यांच्या नात्यातील तरलता आणि त्याच वेळी वासनेचे तापलेपण जाणवते. रंग, गंध व स्पर्श या संवेदना शब्दातीतपणे वाचकांच्या मनात अनुभवसिद्ध होतात. एका प्रसंगी तनय ‘तो’च्या खोलीत जातो, त्या प्रसंगाचे वर्णन करताना तनय लिहितो, ‘‘मंद सोनेरी प्रकाश खिडक्यांमधून गॅलरीत झिरपत होता. इक्बाल बानोची ठुमरी ऐकू येत होती. खोलीच्या मध्यभागी मातीच्या वाडग्यात केवडा ठेवलेला होता. बाथरूममध्ये शॅावर थांबल्याचा आवाज झाला. टॉवेल गुंडाळून ओल्या केसांनी तू बाहेर आलास. तू हसून दार उघडलेस तेव्हा पाण्याने भिजलेले तुझे ओठ मला फारच गार गार लागले. तू चटईवर बसून हळू हळू काळजीपूर्वक नखे कापलीस. मग हाताचे कोपर, चेहरा, मान, यांना मंद वासाचे मॉईश्चराइजर लावलेस. कपाटातून स्वच्छ इस्त्री केलेला टी शर्ट आणि तशीच करकरीत शॉर्ट काढून गादीवर ठेवलीस. कमरेभोवतीचा टॉवेल काढून तो बाथरूममध्ये फेकलास तेव्हा बाथरूममधून अजूनही वाफा येत होत्या. मग एक माउंट केलेला पांढरा स्वच्छ कॅनव्हास इजलवर ठेवलास. ग्लासमध्ये ब्रश निवडून मांडून ठेवलेस. मग गादीवरचे कपडे अंगावर घातलेस. लेडीज हॉस्टेलसमोरची खिडकी उघडून पडदा सारलास. तू अनेक वास घेऊन माझ्या शेजारी बसलास. तुला तसेच बघत बसावे यापलीकडे कोणतीही पुढची इच्छा माझ्या मनात आली नाही. तू काही वेळाने उठलास, निळ्या रंगाचा वळणदार फटकारा कॅनव्हासवर ओढलास, आणि माझ्याजवळ येऊन, मांडीवर डोके ठेवून गाढ झोपी गेलास.’’

_Kobalt_Blue_3.jpg‘तो’ निघून गेल्यानंतर ती खोली तनयचा भाऊ असीम याच्या लग्नाच्या निमित्ताने पाणी टाकून साफ केली जाते, तेव्हा ‘तो’ ने चित्र काढताना अनेकदा वापरलेल्या निळ्या रंगाचे ओहोळ/ (ओघळ) पायऱ्यावरून वाहत खाली येते. तनय ‘तो’ कडे आकर्षित झालेला असतो आणि लैंगिक आकर्षणाचे प्रतीक म्हणून लेखकाने निळ्या रंगाचे ओघळ वापरले आहे.

दोन पुरूषांमधील अशा नात्यांचे अनुभव मराठी साहित्यात नवीन नाहीत. पण काही कादंबऱ्यात तो विषय बटबटीतपणे आला आहे. येथे सचिन कुंडलकर या लेखकाने ‘तो’, तनय आणि अनुजा यांच्यांतील नात्याचा तिहेरी गोफ कौशल्याने विणला आहे. ते नवे आहे. तरुण पिढीची, मध्यमवर्गीय जीवनापलीकडे जाणारी खास अनुभवसृष्टी आणि जीवनाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन या गोष्टी अत्यंत ताज्या भाषेत लेखकाने मांडल्या आहेत.

‘कोबाल्ट ब्लू’
लेखक – सचिन कुंडलकर
मौज प्रकाशन
पृष्ठ संख्या 90
किंमत ₹ 150

– प्रमोद मुनघटे, pramodmunghate304@gmail.com

About Post Author

Previous articleनिराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप
Next articleकुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!
प्रमोद मुनघाटे हे नागपूरच्या 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते कादंबरी, आदिवासी साहित्य, लोककला व लोकनाट्य या क्षेत्रांचे संशोधक आहेत. त्यांनी पूर्वविदर्भातील लोकरंगभूमी व खडीगंमत या विषयांवर संशोधन प्रकल्प राबवले आहेत. मुनघाटे यांनी ‘१८५७: सत्य आणि कल्पित’, ‘लंकेची पार्वती’, ‘आदिवासी साहित्य: स्वरूप व समस्या’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मययनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अमेरिकेतील पहिल्या 'विश्व मराठी साहित्य संमेलना'त विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते. लेखकाचा दूरध्वनी 7709012078