संवत्सर – अर्थात वर्ष

0
51
_sanvatsar.jpg

संवत्सर – काळाचा एक भाग. वर्ष. संवत्सराची व्याख्या अशी – ‘सम्यग् वसन्ति मासादयोसमिन्’ (ज्यात मास आदी कालविभाग व्यवस्थित सामावतात, त्याला संवत्सर असे म्हणतात). बारा महिन्यांच्या (मासांच्या) कालखंडाला संवत्सर असे नाव आहे. महिन्यांचे चांद्र, सावन व सौर असे भेद आहेत; तसेच, संवत्सराचेही चांद्र, सावन व सौर असे तीन प्रकार आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येअखेरचा जो काळ, त्याला चांद्र संवत्सर असे म्हणतात. चांद्र संवत्सर तीनशेचौपन्न दिवसांचे मानलेले आहे. तीनशेसाठ दिवसांच्या कालखंडाला सावन संवत्सर असे नाव आहे. सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्या दिवसापासून तो मीन राशीतून बाहेर पडण्याच्या दिवसाअखेरपर्यंतचा जो कालखंड, ते सौर वर्ष होय. सौर वर्ष तीनशेपासष्ट दिवसांचे असते.

संवत्सराचे बार्हस्पत्य व नाक्षत्र असे आणखी दोन प्रकार क्वचित सांगितले जातात. मानलेले आहेत. बार्हस्पत्य संवत्सरात तीनशेएकसष्ट दिवस असतात. नाक्षत्र संवत्सर तीनशेचोवीस दिवसांचे असते.

भारतीय पंचांगात शालिवाहन शकाबरोबर एक संवत्सर दिलेले असते. ते चक्र साठ वर्षांचे एक आहे. त्या साठ संवत्सरांची नावे अशी –

प्रभव, २. विभव, ३. शुक्ल, ४. प्रमोद, ५. प्रजापती, ६. अंगिरा, ७. श्रीमुख, ८. भाव, ९. युवा, १०, धाता, ११. ईश्वर, १२. बहुधान्य, १३. प्रमाथी, १४. विक्रम,१५. वृष, १६. चित्रभानू, १७. सभानू, १८. तारण, १९. पार्थिव, २०. व्यय, २१. सर्वजित्, २२. सर्वधारी, २३. विरोधी, २४. विकृती, २५. खर, २६. नंदन, २७. विजय, २८. जय, २९. मन्मथ, ३०. दुर्मुख, ३१. हेमलंब, ३२. विलंबी, ३३. विकारी, ३४. शर्वरी, ३५. प्लव, ३६. शुभकृत् , ३७. शोभन, ३८. क्रोधी, ३९. विश्वावसू, ४०. पराभव, ४१. प्लवंग, ४२. कीलक, ४३. सौम्य, ४४. साधारण, ४५. विरोधकृत, ४६. परिधावी, ४७. प्रमाधी, ४८. आनंद, ४९. राक्षस, ५०. अनल, ५१. पिंगल, ५२. कालयुक्त, ५३. सिद्धार्थी, ५४. रौद्र, ५५. दुर्मती, ५६. दुंदुभी, ५७. रुधिरोद्गारी, ५८. रक्ताक्ष, ५९. क्रोधन व ६० क्षय.

भारताच्या नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील भागांत कलियुगाचे प्रथम वर्ष प्रमाथी संवत्सर होते असे मानतात व दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून संवत्सराचा आरंभ धरतात. अशा रीतीने क्रमश: क्षय संवत्सरापर्यंत येऊन एक चक्र पूर्ण झाले, की पुन्हा प्रभव संवत्सरापासून आरंभ करतात.

कलियुगाच्या आरंभी कोणते संवत्सर मानावे याबद्दल नर्मदेच्या उत्तरेकडे वेगळे मत आहे. वहारमिहिराच्या मते, ते विजय मानावे असे आहे, तर ‘ज्योतिषतत्त्व’ या ग्रंथाचा कर्ता ते प्रभव मानावे असे सांगतो. त्या मतानुसार संवत्सराचा आरंभ तत्त्वत: गुरूच्या संक्रमणापासून मानतात. पण व्यवहारात मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सर सुरू होते असे समजतात.

(संस्कृतिकोश – खंड नववा)

About Post Author