संतोष हुलावणे आणि त्‍याचा ह्युमेनॉइड रोबोट

carasole

मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या व हार्डवेअर नेटवर्क इंजिनीयर असलेल्या संतोष हुलावले या पस्तीस वर्षांच्या तरुणाने भारतातील पहिला साडेसहा फुटी ह्युमेनॉइड रोबोट बनवण्याची किमया केली आहे! ‘इंड्रो’ची उंची साडेसहा फूट असून, तो पंचावन्न किलो वजनाचा आहे. त्याची वजन उचलण्याची क्षमता दीडशे किलोपर्यंत आहे. त्याला बनवण्यासाठी वीस लाख रुपयांचा खर्च आला. ‘इंड्रो’ची निर्मिती ही वर्कशॉप वा लॅबोरेटरी येथे झालेली नाही, तर अवघ्या शंभर फुटांच्या खोलीमध्ये ह्युमेनॉइड रोबोट साकार केला गेला. स्क्रू-ड्रायव्हर, सोल्डर मशीन, हॅण्ड कटर, हातोडी, वेगवेगळ्या पकडी अन चार-पाच पाने अशा प्राथमिक साधनांच्या सहाय्याने ‘इंड्रो’ सिद्ध केला गेला! एखादा सुतार घरात वापरेल अशी सर्वसामान्य साधने ती! संतोषने एकट्याने असे असामान्य ध्येय गाठले! नऊ वर्षांच्या ध्यासातून व चौदा महिन्यांच्या मेहनतीतून ती साकारली.

‘इंड्रो’ बनवण्यासाठी संतोषला कोणाकडूनही आर्थिक मदत झालेली नाही. त्याने सर्व पैसा त्याच्या कम्प्यूटर रिपेअरिंगच्या छोटेखानी व्यवसायातून उभारला. ‘इंड्रो’ला बनवण्यासाठी अॅल्युमिनियम, लाकूड, स्टील, विनायल, प्लास्टिक, कार्डबोर्ड व कपडे यांचा वापर करण्यात आला आहे. संतोषने त्यासाठीचे इलेक्ट्रिक मोटर व गिअर वगळले, तर इतर सर्व भाग स्वत: हाताने बनवले आहेत. त्यातही गिअर त्याने मॅन्युअली मॉडिफाइड करून वापरले आहेत.

‘इंड्रो’ स्वत:ची ओळख सांगतो. ऐकतो, बोलतो, बघतो, हालचाल करतो, त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला दहा बोटे आहेत व त्याचा सेन्सर आहे. त्याद्वारे तो कोणतेही सामान सहज उचलतो. त्याच्या बोटांची हालचाल हुबेहूब माणसाच्या बोटांसारखी होते. सध्या ‘इंड्रो’ला कंट्रोल रूममधून ऑपरेट केले जाते; पण लवकरच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो त्याचे त्याला ‘सेल्फ ऑपरेट’ करू शकेल. त्यासाठी संतोषला एका वर्कशॉपची गरज असून सरकार व उद्योजक यांपैकी कोणाच्या मदतीची त्याला अपेक्षा आहे.

संतोषला रोबोटिक्स विषयाची आवड लहानपणापासून आहे. त्याने वयाच्या सहाव्या वर्षांपासून रोबोट बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले. संतोषने अकराव्या वर्षी पहिला, तर तेराव्या वर्षी दुसरा रोबोट बनवला. त्यात त्याचे वडील वासुदेव हुलावले हे त्याचे प्रेरणास्थान व पहिला गुरू होते. टेक्सटाइल मिलमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांनी स्वत: रोबोट बनवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. वडिलांचा विचार संतोषने शिक्षणावर व अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगली नोकरी मिळवावी असा सर्वसामान्य पालकांप्रमाणे होता. संतोषच्या वडिलांचे आकस्मिक निधन २००७ मध्ये झाले. संतोष त्या धक्क्यातून सावरत असतानाच त्याच्या मनात दडून राहिलेली इतक्या दिवसांची सुप्त इच्छा उफाळून पुन्हा वर आली. तो छंद त्याला स्वस्थ बसू देईना. काहीतरी अचाट बनवावे; जे आव्हानात्मक आहे ते पहिले करावे, या निर्धाराने त्याने रोबोट बनवण्याच्या कामाला २००८ मध्ये सुरुवात केली. संतोषने सुरुवातीच्या काळात अभ्यास, संशोधन करत मशीनची डिझाइन्स करणे, प्रोटोटाइप्स बनवणे असे करता-करता सोळा मोठी प्रोटोटाइप डिझाइन्स, तर अठ्ठावीस छोटी डिझाइन्स तयार केली. त्यामध्ये एक प्रोटोटाइप होता ह्युमेनॉइड रोबोट.

संतोष हुलावले याचे कुटुंब मध्यमवर्गीय असल्यामुळे एवढी सगळी डिझाइन्स बनवून दाखवावी एवढी त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यातील एक डिझाइन निवडून ते बनवावे व लोकांना दाखवावे असे त्याने ठरवले. त्यामध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याचा विचार होताच. आजवर जे भारतामध्ये बनलेले नाही असे, पूर्णत: ‘मेड इन इंडिया’ असलेले काहीतरी बनवावे, ज्यामुळे आपल्या देशाचे नाव व्हावे असे संतोषला वाटले. अन् त्यातूनच ‘इंड्रो’चा जन्म झाला.

‘इंड्रो’च्या वाटचालीत संतोषला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यासाठी त्याचा आधारवड ठरला तो म्हणजे त्याची आई. त्याच्या आईने त्याला सावलीसारखी पडत्या काळात साथ दिली; त्याच्या प्रयत्नांवर अढळ विश्वास ठेवला, तर पत्नीने अपयशात कधी मानसिक खच्चीकरण होऊ दिले नाही. तिने संतोषला अपयशापासून यशाच्या शिखरापर्यंत पोचण्यास प्रोत्साहित केले. संतोष ‘कुटुंबाच्या आधारामुळेच यश संपादित करू शकलो’ अशी प्रांजळ कबुली देतो.

संतोषला ‘इंड्रो’ निर्मितीच्या प्रवासात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. त्याला स्वत:चा छंद जोपासण्याबरोबरच व्यवसाय सांभाळायचा, घर सांभाळायचे, रोबोटसाठी पैसाही उभा करायचा आणि त्या सगळ्या कसरतीतून मिळणारा मर्यादित वेळ रोबोट बनवण्यासाठी द्यायचा हे सहजशक्य झाले नाही. संतोषचे तीन प्रोटोटाइप्स २००८ ते २०१२ या कालावधीत अयशस्वी ठरले; चौथ्या वेळीही तसेच झाले तर कोलमडून पडण्याची, लक्ष्यापासून विचलित होण्याची भीती संतोषच्या मनात होती. कारण त्याचा बराचसा वेळ व पैसा आधीच वाया गेला होता. संतोषने चौथ्या वेळी यशस्वी व्हायचेच असा निर्धार करून, चौथा प्रोटोटाइप बनवणे हाती घ्यायच्या आधी बराच अभ्यास, संशोधन व वेगवेगळे प्रयोग केले. “ह्युमेनॉइड रोबोट बनवणे हे एक गणित आहे. ते गणित शिकण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे मी ते गणित आत्मसात करून, आधीचे प्रोटोटाइप्स बनवताना ज्या चुका झाल्या त्याचा लेखाजोखा मांडला. त्यातून बरेच काही शिकता आले आणि पुढे प्रत्येक वेळी त्यात सुधारणा होत गेल्या. त्याची फलश्रुती झाली ती ‘इंड्रो’च्या रूपात,” असे संतोष अभिमानाने सांगतो.

संतोष हुलावले याच्यासाठी त्याच्या वडिलांप्रमाणे शिवाजी महाराजांचे शौर्य, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगाढ अभ्यास, डॉ. होमी भाभा यांचे संशोधनातील झपाटलेपण व मेहनत, रतन टाटांचा दृष्टिकोन, अब्दुल कलाम यांची देशभक्ती, नरेंद्र मोदींची सहनशीलता व शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द हे गुण आदर्शवत आहेत. संतोषला परदेशी कंपन्यांकडून अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत; पण ‘माझे आदर्श डोळ्यांसमोर आल्यावर परदेशात जाऊन पैसा कमावण्याला काहीच अर्थ उरत नाही’ असे त्याचे म्हणणे आहे. संतोषला त्याची मेहनत व संशोधन देशासाठीच वापरायचे आहे.

संतोषला भविष्यात आधुनिक रोबोट बनवायचे आहेत. ते कार्य केवळ ‘इंड्रो’पर्यंत सीमित नसून त्यात बरीच सुधारणा करण्याची त्याची इच्छा आहे. ‘इंड्रो’ हा बेसिक रोबोट आहे. सध्या त्याचा वापर एंटरटेन्मेंट वा इव्हेंट यांसाठी होऊ शकतो. लवकरच त्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रोग्रामिंग केले जाईल. संतोष त्याने रोबोटिक्समधील आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकेन एवढा अभ्यास व संशोधन केले असल्याचे सांगतो. त्यासाठी त्याला अॅडव्हान्स मेकॅनिकल काम करता येऊ शकेल अशा वर्कशॉपची गरज आहे. त्याने कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यासाठी खूपच वेळ लागतो असा त्याचा अनुभव आहे. सरकार राबवत असलेल्या ‘स्किल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे हे सरकार त्याच्यासारख्या युवकांसाठी काहीतरी नक्की करेल अशी आशा त्याला आहे. संतोषला त्याच्या प्रोटोटाइप्सचे पेटेंट करायचे आहे. साधारण, एका प्रोटोटाइपसाठी दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एकदा पेटेंट झाले, की ते प्रोटोटाइप्स सुरक्षित होतील. जे प्रोटोटाइप्स आहेत त्यांचा वापर संरक्षण, शेती, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन (जसे – आग लागणे, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला) यांसारख्या क्षेत्रांत, तसेच विकलांगांना मदतीसाठी होऊ शकतो असे संतोष सांगतो. रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांना एक लाखात गाडी (नॅनो) देण्याचे स्वप्न पाहिले आणि सत्यात उतरवले. तसेच संतोषने सखोल अभ्यास व संशोधन यांच्या जोरावर चोवीस-पंचवीस लाखांचे प्रोटोटाइप सत्तर ते नव्वद हजारांच्या दरम्यान द्यावे व ज्यांना ते परवडणार नाहीत अशा लोकांसाठी एक संस्था काढून, त्यासाठी डोनर बघून ते मोफत उपलब्ध करून द्यावे असे स्वप्न पाहिले आहे!

– वृंदा राणे-परब

Last Updated on – 3rd Dec 2016

About Post Author

3 COMMENTS

  1. खूपच छान. संतोष तुला खूप खूप
    खूपच छान. संतोष तुला खूप खूप शुभेच्छा.

  2. खूप छान…keep it up…
    खूप छान…keep it up…

  3. khup chan lekh ahe…. vrinda
    khup chan lekh ahe…. vrinda tula khup khup shubhecha…tuz lekhan asach baharu de….

Comments are closed.