श्री.पु. आणि पुलं

0
28

–  दिनकर गांगल

   आपले पर्यटक इंग्लंडमध्ये गेले की ‘स्ट्रॅटफर्ड’ला जाऊन शेक्सपीयरचे जन्मगाव पाहतात, ‘वर्डस्वर्थ’च्या लेक डिस्ट्रिक्टचा दौरा. वेगवेगळ्या साहित्यिक-कलावंतांची नीटपणे जपलेली स्मृती पाहून, आपल्याकडे असे नाही म्हणून हळहळ व्यक्त करतात. त्यामध्ये ‘आपण कसे सुसंस्कृत’ अशी एक मिजासदेखील असते! त्यांची ही ‘सुसंस्कृती’ मराठी लेखक-कलावंतांच्या वाट्याला का येत नाही?


–  दिनकर गांगल

     श्री.पु.भागवत हे मराठीतील नामवंत संपादक होऊन गेले. त्यांचे निधन 21 ऑगस्ट 2007 रोजी झाले. त्यांच्या मृत्यूला एक वर्ष झाले तेव्हा त्यांचा मुलगा अशोक यांच्या साहाय्याने आणि अचला जोशी व रुईया कॉलेजचे प्रिन्सिपल सुहास पेडणेकर यांच्या पुढाकाराने रुईया कॉलेजच्या ग्रंथालयात श्री.पु.भागवत अभ्यासदालन निर्माण करण्यात आले. श्रीपुंच्या पहिल्या स्मृतिदिनी उदघाटन समारंभ श्रीपुंच्या प्रकृतीला साजेल अशा संयम-शांततेत आणि सुसंस्कृत पध्दतीने झाला. त्यावेळी मराठीतील जेष्ठ साहित्यिक, साहित्यशास्त्राचे अभ्यासक आणि विद्यार्थिगण औत्सुक्याने उपस्थित होते.

     ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रतिनिधी या दालनात केव्हा केव्हा चक्कर मारत असतो. त्याशी संबंधित प्राध्यापक व ग्रंथपाल यांची क्वचित भेटही घेतो. ती मंडळी हौसेने व उत्साहाने बोलतात. श्रीपुंच्या प्रत्येक स्मृतिदिनी त्यांच्या कार्याला आणि विचाराला अनुरूप अशा पध्दतीचे कार्यक्रम योजण्याकडे त्यांचा कल असतो. या वर्षीचा कार्यक्रम मात्र अजून ठरलेला नाही! प्रतिनिधीच्या मनावर ठसा उमटला आहे तो असा, की या दालनात विशेष काही घडत नसावे, तिथे अभ्यासालाही फार विद्यार्थी अथवा अभ्यासक जात नसावेत. चार वर्षांमध्ये थोर, बहुधा तशा प्रकारचा साक्षेप असलेल्या एकमेव मराठी संपादकाच्या वाट्याला उपेक्षा यावी? श्रीपुंबरोबर वावरलेल्या, त्यांना जणू देव मानणार्‍या साहित्यिकांचेही तिकडे दुर्लक्ष व्हावे?

     पुलं हयात असतानाच, त्यांचे प्रिय गाव जे विलेपार्ले तेथील लोकमान्य सेवा संघात त्यांच्या नावाने त्यांच्या छायाचित्रांची गॅलरी सुरू करण्यात आली. तेथे बसवण्यासाठी त्यांच्या पसंतीने एका बंगाली शिल्पकाराकडून त्यांचा अर्धपुतळा घडवून घेण्यात आला. पुलंच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचे अनावरण व गॅलरीचे उदघाटन झाले.

     लोकमान्य सेवा संघाने तेथील व्यवस्था चोख ठेवली होती. गॅलरी दिवसा पूर्ण वेळ उघडी असे. गॅलरीच्या दारात शिपाई बसलेला असे. असे काही महिने गेले. गॅलरीत फोटो प्रदर्शन पाहण्यास येणार्‍या लोकांची संख्या रोडावली. ती इतकी कमी झाली, की गॅलरीला कुलुप लावून ठेवावे लागले. कोणी पुलंप्रेमी चुकून तिकडे आलाच व त्याने चौकशी केली तर कुलुप उघडून गॅलरी दाखवण्यात येई.

     लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख पदमाकर नागपूरकर यांच्याकडे विषय काढला असता ते खिन्नपणे म्हणाले, की महाराष्ट्रात ‘पुलंइतका लोकप्रिय लेखक झालेला नाही. त्यांच्या एकपात्री कार्यक्रमांनी मराठी माणूस वेडा झाला होता. अजूनही त्यांच्या पुस्तकांची, ध्वनिफितींची विक्री उत्तम होत असते. परंतु पार्ल्याच्या पुलं प्रदर्शनास मुंबईत गावोगावाहून येणारे पाहुणे काही कधी भेट देत नाहीत!

     आपले पर्यटक इंग्लंडमध्ये गेले की ‘स्ट्रॅटफर्ड’ला जाऊन शेक्सपीयरचे जन्मगाव पाहतात, ‘वर्डस्वर्थ’च्या लेक डिस्ट्रिक्टचा दौरा करतात आणि अशी अनेक स्थळे पाहून महाराष्ट्रात परतल्यावर आपले तेथील फोटो मिरवतात. वेगवेगळ्या साहित्यिक-कलावंतांची नीटपणे जपलेली स्मृती पाहून, आपल्याकडे असे नाही म्हणून हळहळ व्यक्त करतात. त्यामध्ये ‘आपण कसे सुसंस्कृत’ अशी एक मिजासदेखील असते! त्यांची ही ‘सुसंस्कृती’ मराठी लेखक-कलावंतांच्या वाट्याला का येत नाही? येथे मात्र ते टिव्हीस्टार्सच्या मागे दौडत असतात आणि ‘मराठी वाचवा’ असेही म्हणत असतात.

दिनकर गांगल – इमेल : thinkm2010@gmail.com

दिनांक: 27-07-2011

संबंधित लेख –

माहोल पुलोत्सवाचा!

{jcomments on}

About Post Author

Previous articleतुळशीचे लग्न
Next articleमाहोल पुलोत्सवाचा!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.