श्रीराम जोग – बहुरंगी नाट्यकलावंत

1
40
carasole

श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत. ते गेल्या छत्तीस वर्षांपासून इंदूर येथे ‘नाट्यभारती इंदूर’ या संस्थेशी संलग्न राहून काम करत आहेत.

कमी उंची आणि मध्यम बांधा असलेले श्रीराम जोग प्रथमदर्शनी सर्वसाधारण व्यक्ती वाटतात. मात्र ते बोलू लागले, की त्यांचा खर्जाकडे झुकणारा आवाज ऐकणाऱ्याचे चित्त वेधून घेतो. पांढरी दाढी, डोळ्यांवर असलेला चष्मा आणि त्यापलीकडील करारी नजर समोरच्याच्या नकळत त्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात गुंतवून ठेवते आणि त्यानंतर त्यांचे मृदू बोलणे त्याला आपलेसे करून टाकते. जोग यांच्याशी बोलताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक – त्यांचा प्रांजळपणा. आणि दोन – त्यांचे कलेशी जुळलेले नाते.

श्रीराम जोग यांनी अभिनयात, दिग्दर्शनात नावाजलेली पारितोषिके मिळवली. त्यांच्या कामाचे थोरामोठ्यांकडून कौतुक झाले आहे. तरीही ते त्यांच्या कामाबद्दल सांगत असताना त्यांच्या आवाजात नम्रता असते. त्यांच्या बोलण्यात सतत एक वाक्य येते, ‘कदाचित हा आमच्या माळव्याच्या पाण्याचा गुण असावा.’ माळवा म्हणजे इंदूरमधील धार, रतलाम, राजगड, देवास, शाजपूर हा प्रदेश. जोग यांच्या बोलण्यात माळव्याचे पाणी, तेथील माती यांबद्दल आपुलकी असते.

श्रीराम जोग यांचा वारसा कोकणस्थ ब्राह्मणाचा. त्यांचे पूर्वज पाच पिढ्यांपूर्वी मध्यप्रदेशात स्थलांतरित झाले. तेव्हापासून त्यांचा महाराष्ट्राशी संबंध तुटला. जोग यांचा जन्म रतलाम येथे झाला. ते शिक्षणाच्या निमित्ताने इंदूर येथे स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण हिंदी भाषेतून पार पडले. घरात आई-वडील मराठी बोलत असत. त्यामुळे मराठी भाषेचे संस्कार त्यांच्यावर होत राहिले. त्यांनी महाविद्यालयीन काळात इंदूरमध्येे राहून कॉमर्स शिकणाऱ्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचे मंडळ तयार केले. तेथे सर्वजण आग्रहपूर्वक मराठी बोलत. त्यांनी मित्रांच्या संगतीत काही महाविद्यालयीन नाटकांमध्ये कामे केली. ती त्यांच्या नाट्यक्षेत्रातील भावी प्रवेशाची नांदी होती.

श्रीराम जोग यांनी बँकेत नोकरी करण्यास १९८० साली सुरूवात केली. पुढे ते बाबा डीके यांच्या ‘नाट्यभारती इंदूर’ या नाट्यसंस्थेच्या संपर्कात आले. बाबांनी श्रीराम जोग यांच्या ठायी असलेल्या अभिनयशक्तीला व्यक्त होण्याची वाट करून दिली. जोग यांचे मराठी वाचन नाटकाच्या निमित्ताने वाढत गेले. बाबा डीके यांनी जोग यांना नाटकाचे दिग्दर्शन करण्याची सूचना १९९४ च्या सुमारास केली. त्या नुसार जोग यांनी ‘रायकरवाडी’ या बाबांनी लिहिलेल्या शोकान्त नाटकाचा प्रयोग पहिल्या प्रथम बसवला. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दयर्शन केले. जोग म्हणतात, की ‘बाबा असेपर्यंत मी त्यांनी दिलेली नाटके बरहुकूम अभिनित केली. दिग्दर्शित केली. ते माझे शिकणे होते. त्यांच्या पश्चात माझ्यातील दिग्दर्शकाची स्वतंत्र वाढ होत गेली.’

श्रीराम जोग यांना त्यांनी बसवलेल्या ‘महंत’ या शिरवाडकरांच्या नाटकाचा प्रयोग त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न वाटतो. पुढे, त्यांनी अरविंद लिमये यांनी लिहिलेल्या ‘तो येणार’ या नाटकाचा प्रयोग बसवला. त्यांनी त्या नाटकात चार नवी दृश्ये टाकली. त्यांनी नाटकात केलेला तो बदल नाटककरालाही विशेष वाटला. त्या प्रयोगास स्वतः अरविंद लिमये उपस्थित राहिले. त्यांनी तो प्रयोग पाहून श्रीराम जोग यांचे कौतुक केले. जोग यांनी राजन खान यांच्या ‘दुर्फळ’ आणि ‘डहूळ’ या कथांना नाट्यरुपात रंगभूमीवर सादर केले आहे. त्यांनी ‘डहूळ’ सादर करत असताना त्यास दिलेला ‘डिरेक्शन टच’ वाखाणण्यासारखा आहे. त्या नाटकाचा प्रयोग पाहून राजन खान म्हणाले, ‘मी या कथेचा असा विचार कधीच करू शकलो नसतो.’

श्रीराम जोग यांनी बाबा डीके यांच्या पश्चात ‘नाट्यभारती इंदूर’ची धुरा सांभाळली आहे. जोग २०१३ सालापर्यंत बँकेत नोकरीस होते. ते २०१३ साली व्हिआरएस घेऊन पूर्णवेळ नाटकांमध्ये रमून गेले.

श्रीराम जोग यांना अभिनय आणि दिग्दर्शन या प्रवासात स्वतःतील नव्या कौशल्याचा शोध लागला आहे. तो म्हणजे पेपर कोलाज. ते त्यांच्या फावल्या वेळात कागदांच्या तुकड्यांतून अर्थपूर्ण चित्र तयार करण्याच्या प्रयत्नांत असतात. त्यांनी तशी चित्रे वर्तमानपत्रांना पाठवली. वर्तमानपत्रांना तो प्रकार त्यांच्याकडे येणाऱ्या नेहमीच्या रेखाचित्रांपेक्षा वेगळा वाटला. त्यांनी ते चित्र प्रसिद्ध केले. जोग पेपर कोलाज बनवत राहिले. त्यांची तशी पाचशेहून अधिक चित्रे इंदूरमधील वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली आहेत. जोग यांनी ती चित्रे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीकडे पाठवली होती. तेथील अधिका-यांना ती चित्रे आवडली. त्यांनी जोग यांना कोणताही पूर्वानुभव नसताना गॅलरी प्रदर्शनासाठी देण्याचा निर्णय घेतला. ती घटना जोग यांना विशेष वाटते. ते म्हणतात, ‘मी कोण्या एका परदेशी प्रसिद्ध चित्रकाराचे आत्मकथन वाचले होते. त्यात त्या‍ने लिहिले होते, की आयुष्यात यशस्वी झालो असलो तरी एक खंत राहून गेली. मी माझ्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरवू शकलो नाही.’ जोग यांची ‘जहांगीर’ येथे प्रदर्शन दोन वेळा भरली आहे. तसेच त्यांच्या चित्रांना परदेशातील प्रदर्शनांमध्ये स्थान मिळाले आहे.

श्रीराम जोग त्यांच्या इंदूर येथील कलावंत संघाला घेऊन ठिकठिकाणच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यांनी देशभरातील विविध ठिकाणी आठशेहून अधिक नाट्यप्रयोग साकारले आहेत. त्यात नव्वद पूर्ण लांबीची नाटके आणि एकपात्री प्रयोग समाविष्ट आहेत. ते त्यांच्यासारख्या इतरही अनेक संस्था इंदूर येथे असल्याचे सांगतात. ते त्यात हौशी मामला मोठा असल्याचे नमूद करतात. नाटकात रुजले-वाढलेले श्रीराम जोग लघुपट, चित्रपट, टि.व्ही. मालिका अशा इतर माध्यमांकडे आकर्षित झाले नाहीत. मात्र त्या माध्यमांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. ‘जे आपलं आहे ते आपल्याला मिळतंच.’ असा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांनी त्या विश्वासाच्या जोरावर नाट्यक्षेत्रातील त्यांची वाटचाल सुरू ठेवली आहे.

श्रीराम जोग, jog.shriram@gmail.com, ९७६७५ ८८६९१

– किरण क्षीरसागर

Last Updated On – 09th Nov 2017

About Post Author

1 COMMENT

  1. माळव्याच्या या मावळ्याला सलाम
    माळव्याच्या या मावळ्याला सलाम . मी बँकेत असताना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्य लाभले . नाटक कोलाज बरोबरच आपल्या कामात ते इतके प्रामाणिक असल्याचे मी अनुभवले आहे. अर्जेंट काम असेल तेंव्हा ते सुट्टीत देखील काम करायचे. त्यांच्या उज्वल भविष्या साठी शुभेछया .

Comments are closed.