शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे

1
33

माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची आख्खी आयुष्ये पालथी पडतात. स्वधर्म जर गवसला नाही तर आयुष्य म्हणजे अनेक अपयशी प्रयत्नांचे जणू गाठोडे होऊन बसते. पण हा स्वधर्माचा शोध सोपा नसतो. या शोधाचे पांथस्थ असलेले असेच एक ध्येयवेडे दांपत्य म्हणजे डॉ. रवींद्र व सौ. स्मिता कोल्हे. एम.बी.बी.एस., एम.डी. असलेला हा माणूस निष्ठेने खेडयात राहून आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करत आहे. ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा शोध घेत आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका प्रसिध्द आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी, तेथील पट्टेदार वाघांसाठी, दुर्गम व घनदाट जंगलासाठी आणि गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या आदिवासींच्या कुपोषणासाठी. याच तालुक्यातील बैरागड व परतवाडा-धारणी रोडवरील कोलुपूर या ठिकाणी या दांपत्याची वस्ती आहे.

बैरागड हे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेले दोन हजार लोकवस्तीचे खेडेगाव. ते तापी नदीच्या किनारी वसले आहे. हिवाळयात तर तिथे कधी-कधी चक्क हिमवर्षाव होतो! गावात मुस्लिम, आदिवासी गोंड व कोरकू अशी संमिश्र वस्ती आहे.

कित्येकदा, थोर व्यक्तीच्या सान्निध्यात वावरताना आपल्या मनावर दडपण असते. डॉक्टर दांपत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकर्षाने जाणवणारा एक पैलू हा, की त्यांच्यासमोर आपण बुजून जात नाही. कदाचित, तो त्यांच्या वलयांकित जीवनाचा प्रभाव असू शकेल. परंतु त्याचवेळी आपण समृध्द व्यक्तींच्या संपर्कात आहोत याची जाणीव मात्र तीव्रतेने झाल्याशिवाय राहात नाही.

रवींद्र बैरागडला येऊन चोवीस वर्षे झाली आहेत. डॉ.सौ. स्मिता डॉक्टरांनंतर तीन-चार वर्षांनी बैरागडला आल्या. ही बाई नागपुरातला चांगला चालता दवाखाना सोडून डॉक्टरांसारख्या कलंदर माणसाची पत्नी बनून बैरागडला आली आणि आज, डॉक्टरांशी संबंधित कुठल्याही गोष्टीचा विचार त्यांना वगळून करताच येत नाही! डॉक्टरांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, ''मी आज बैरागडला उभा आहे, तो केवळ स्मिताच्या समर्थ सहकार्यामुळे.''

विवाह करताना, डॉक्टरांचा दृष्टिकोन स्पष्ट होता. त्यांनी त्यांच्या चार अटींची पूर्तता करणा-या स्त्रीशी विवाह करायचा असे ठरवले होते. त्या अटी म्हणजे 1. चारशे रुपये महिन्यात घरखर्च चालवावा लागेल. 2. चाळीस किलोमीटर पैदल चालण्याची तयारी. 3. स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागावी लागल्यास संकोच नको. 4. पाच रुपयांत विवाहखर्च!

डॉक्टरांच्या चारही अटींची पूर्तता करत, स्मितावहिनी डॉक्टरांच्या आयुष्यात आल्या आणि आज त्या डॉक्टरांच्या सहधर्मचारिणी आहेत. डॉक्टर रवी, स्मिता व त्यांची दोन मुले- रोहित आणि रामू- हे बैरागडचे वैभव आहे.

डॉ. रवींद्र कोल्हे बैरागडला आले त्यावेळी बैरागड म्हणजे 'बे-राह-गड' होते (रस्ता नाही असा गड). धारणीवरून हरीसालमार्गे चाळीस किलोमीटर अक्षरश: पायपीट करावी लागायची. डॉक्टरांनी विद्यार्थी जीवनात गांधी-विनोबांच्या विचारांनी प्रेरित होऊन खेडयात जायचे निश्चित केले होते. त्याचवेळी त्यांच्या वाचनात 'व्हेअर देअर इज नो डॉक्टर' हे पुस्तक आले होते. एका स्कॉटिश मिशन-याने लिहिलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ मोठे वैशिष्टयपूर्ण होते. ते असे, की एका आजारी माणसाला डोलीत टाकून काही माणसे चालली आहेत व रस्त्यावरील मैलाचा दगड दवाखाना तीस किलोमीटर आहे असे दाखवत आहे! डॉक्टर बैरागडला आले तेव्हा बैरागड व परिसरातील पाच-पंचवीस खेडयांची परिस्थिती तशीच होती. आज बैरागडला दिवसाकाठी चार-पाचदा एसटी येते. तेथे प्राथमिक सुविधा केंद्र आहे. पशू चिकित्सालय, समाजमंदिर, धान्यगोदाम, शाळा-इमारत अशा प्राथमिक सुविधासुध्दा आहेत, पण डॉक्टरांचे घर हा परिसरातील जनतेसाठी आधार आहे. डॉक्टरांना केवळ डॉक्टर म्हणणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. ते डॉक्टर तर आहेतच, पण त्याशिवाय ते उत्तम शेतकरी आहेत. गाय ही माता आहे हे तोंडाने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे उत्तम गोपालक आहेत. आदिवासींना धान्य योग्य किमतीत व हवे तेव्हा उपलब्ध व्हावे म्हणून सरकारी स्वस्त धान्याचे दुकान चालवणारे प्रामाणिक दुकानदार आहेत (मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न लक्षात घेतल्यास डॉक्टरांच्या भूमिकेचा दृष्टिकोन लक्षात येईल.) आणि मुख्य म्हणजे आदिवासींसाठी आदिवासींसारखे जीवन पत्करून, साक्षात आदिवासी होऊन जीवन जगणारे ते एक सच्चे सेवक आहेत.

डॉक्टरांप्रमाणे सौ. स्मिताचे जीवन ग्रामीण जीवनाशी पूर्णपणे समरस झालेले आहे. त्या स्वत:सुध्दा डॉक्टर आहेत; शिवाय, एलएल.बी. आहेत. पण त्या डॉक्टरांना सारे काही विसरून आत्यंतिक साधेपणाने साथ देत आहेत. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत अनेक प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिलेले आहे. त्यांतील दोन-तीन प्रसंग तर कसोटीचे होते. एका आदिवासी मुलाच्या धर्मांतरास विरोध करून त्याचे परत शुध्दिकरण केल्यामुळे खवळलेल्या काही धर्मांधांनी, डॉक्टर गावी नसताना स्मिता यांना त्या प्रकरणात गोवले व पोलिसांकरवी अटक करवली. दुस-या प्रसंगात एका आदिवासी मुलीच्या शीलरक्षणासाठी त्यांनी गावातील धनदांडग्या गुंडांशी व मुजोर, भ्रष्ट अधिकाऱ्यांशी टक्कर दिली. त्यामुळे आदिवासी स्त्रियांना त्यांचा मोठा आधार वाटतो. या संदर्भात एका स्त्रीचे उद्गार मोठे बोलके ठरावेत. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने त्रस्त असलेली ती स्त्री उपचारासाठी डॉक्टरांकडे आली. डॉक्टरांनी तिला तिच्या आजाराबद्दलची सत्य परिस्थिती समजावून सांगण्याचा व कॅन्सरची दुर्धरता विशद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या स्त्रीचे म्हणण असे, की ''आप को नहीं जमता होंगा तो रैने दो, डॉक्टरणीबाई कहां है उतना बताओ.'' स्वत:बद्दलचा हा विश्वास अर्थातच स्मितांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने व कर्तव्यतत्परतेने मिळवला आहे.

डॉक्टरांचा दवाखाना व त्यांचे निवासस्थान सर्वसामान्य माणसाच्या घराहून वेगळे नाही. त्यांच्या दवाखान्याचा बोर्डसुध्दा कुठे दिसत नाही. (त्याची त्यांना गरजही नाही). त्यांची राहती जागा व घर बैरागड ग्रामपंचायतीद्वारे ठराव करून त्यांना दिले गेले आहे.

त्यांनी मेळघाटातील पस्तीस गावांत पदयात्रा करून कुपोषणाच्या प्रश्नाचा जवळून अभ्यास केला आहे. मेळघाटातील कुपोषणाच्या प्रश्नावर डॉक्टरांना छेडले असता ते म्हणतात, ''खरं म्हणजे त्यास कुपोषण न म्हणता उपासमार म्हटले पाहिजे' पण हे कुठलेच शासन स्वीकारणार नाही. यासंबंधीचे आपले निष्कर्ष त्यांनी शासनदरबारी पोचवले आहेत. त्यांची एम.डी.ची डीग्रीसुध्दा त्याच प्रश्नाशी निगडित आहे. दरवर्षी पावसाळयात कुपोषणाचा नव्हे उपासमारीचा राक्षस मेळघाटात थैमान घालतो पण त्यावर स्थायी उपाय मात्र अजूनपर्यंत निघालेला नाही! डॉक्टरांच्या मते, केवळ शासकीय योजनांनी हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आदिवासींची अन्नोत्पादक क्षमता वाढली पाहिजे व मुख्य म्हणजे त्यांना लुबाडून जे आपली तुंबडी भरतात त्या नतद्रष्टांवर कठोर नियंत्रण असले पाहिजे.

डॉक्टरांनी स्वत: पशुपालन व शेती व्यवसाय करून त्याद्वारे अन्नोत्पादनाच्या दिग्दर्शनाचा प्रयत्न चालवला आहे. कमी पैशांत जास्त काळ मजुरी करवून घेण्याबद्दलची जाणीव आदिवासींना करून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, एक दुभती गाय अथवा एक एकर शेत एका कुटुंबाचे पोट भरण्यास पुरेसे आहे, पण त्यासाठी डॉक्टरांचा अपरिग्रहाचा आदर्श अंगी बाणवणे अपरिहार्य आहे.

डॉ. रवींद्र व सौ. स्मिता कोल्हे या दांपत्याचे जीवन म्हणजे एका ध्येयनिष्ठ, समर्पित व क्रांतदर्शी जीवनानुभवाचे आगर आहे. डॉक्टर प्राचीन भारतीय द्रष्टया ऋषीप्रमाणे जगताहेत. कोल्हे दांपत्याच्या कार्याचा गौरव अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन केलेला आहे. फाय फाउंडेशन ऍवार्ड व इंडियन ज्युनियर चेंबरचे यंग युनियन ऍवार्ड त्यांना संयुक्तरीत्या प्राप्त झालेले आहे. डॉक्टरांना मा. बा. गांधी ट्रस्टचा पुरस्कार व सन्मानपत्र तर स्मिता यांना मानव मंदिरतर्फे (नागपूर) देण्यात येणारा 1992 चा स्मिता स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याशिवाय इतरही अनेक पुरस्कारांनी ते गौरवांकित झालेले आहेत. पण डॉक्टर दांपत्याचा खरा पुरस्कार म्हणजे आदिवासींच्या मनातील त्यांच्याविषयीचा अपार आदर व विश्वास हाच होय.

– डॉ. मनोहर नरांजे

09767219296

About Post Author

1 COMMENT

  1. लेखकांनी स्वता बैरागड राहुन
    लेखकांनी स्वता बैरागड राहुन अनुभव घेऊन व कोल्हे जोड़ी कडूण अनुभव ऐकूण लिखलेले पुस्तक अप्रतिम आहे.

Comments are closed.