शिष्यवृत्तीपोटी बत्तीस लाखांचे एकहाती वाटप!

डॉ. रतिकांत हेंद्रेमी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (NCL) वरिष्ठ संशोधक म्हणून ३१ जुलै १९९५ रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर वेगळ्या वाटेने जायचे असे ठरवून त्याची सुरुवात सेवानिवृत्तीपूर्वी तीन वर्षे केली होती. आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले विद्यार्थी आजुबाजूला दिसत होते. त्या सर्वांना मदत करणे माझ्या कुवतीच्या पलीकडचे होते. त्यामुळे मी माझे कार्यक्षेत्र माझ्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित केले. माझ्या मुलाला १९९३ मध्ये इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याचवेळी इंजिनीयरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी केली. चौघांचे शिक्षण एकाच वेळी सुरू झाले.

मी शिष्यवृत्ती देतो असे समजल्यावर आणखी काही विद्यार्थ्यांनी संपर्क साधला, पण त्यांना मदत करणे मला अशक्य होते. अगोदर निवडलेल्या त्या तीन विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे चार वर्षांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करायची होती. त्यांना मध्येच वाऱ्यावर सोडून चालणार नव्हते. त्यामुळे मला शिक्षणप्रेमी, समविचारी समाजबांधवांची आवश्यकता भासू लागली. ‘आधी केले, मग सांगितले’ हे माझे धोरण असल्यामुळे नवे देणगीदार मिळवण्यास अडचण आली नाही. परंतु मला देणगी देणारे देणगीदार फक्त नको होते, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या कालावधीइतके शैक्षणिक पालकत्व घेणारे समविचारी समाजबांधव हवे होते.

अज्ञान, दारिद्र्य यांमुळे येणारा अंधार नाहीसा करण्यासाठी माझ्यासारख्या एकट्या व्यक्तीने सूर्यप्रकाशाएवढा प्रकाश देणे केवळ अशक्य होते. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा, दुसऱ्याने तिसरा दिवा लावावा असे आणखी काही दिवे लावून गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग प्रकाशित करणे शक्य झाले आहे. माझ्या या उपक्रमात ‘भावकर चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘कै. गोविंद दामोदर खुर्द ट्रस्ट’ आणि काही समाजबांधव सहभागी झाले आहेत. शिष्यवृत्तीसाठी आर्थिक मदतीची गरज हा निकष असतोच पण विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. वर्तमानपत्रांत शिष्यवृत्तीसंबंधात निवेदन प्रसिद्ध केले जाते. शिष्यवृत्तीचा चेक दिल्यावर काम संपले असे आम्ही (मी व माझे सहकारी) मानत नाही. विद्यार्थ्यांकडे वेळोवेळी पत्राद्वारे, फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटींतून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, पालकांशी संपर्क साधणे याला महत्त्व दिले जाते. मी किमान ऐंशी-नव्वद विद्यार्थ्यांच्या गावी स्वखर्चाने जाऊन आलो आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि दत्तक पालक यांच्यात जिव्हाळा, आपलेपणा निर्माण होतो.

या योजनेमधून एकूण दोनशेबारा विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण जून २०१३ पर्यंत पूर्ण केले. त्यांपैकी एकशेब्याऐंशी विद्यार्थ्यांनी नियमानुसार निम्म्या रकमेची परतफेड केली आहे. नियम असा, की शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने तो नोकरीव्यवसायात स्थिर झाला, की शिष्यवृत्तीच्या निम्मी रक्कम देणगीदार व्यक्तीला परस्पर परत करायची. उत्तम भाग असा, की प्रारंभीचे शिष्यवृत्तीधारक आहेत त्यांनी त्यांच्या वाटेची रक्कम परत केलीच, पण तेही नवी शिष्यवृत्ती देतात. आमची ही शैक्षणिक पालकत्व योजना आहे आणि विद्यार्थ्याला पदवी मिळेपर्यंत दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. कृतघ्नता, स्वार्थी वृत्ती यांनी प्रदूषित असलेल्या समाजजीवनात एकशेब्याऐंशी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परतफेडीचे वचन पाळून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

सध्या इंजिनीयरिंग आणि संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. वाढती फी विचारात घेता, आम्ही देत असलेली शिष्यवृत्ती अपुरी आहे. गेल्या एकवीस वर्षांतील शिष्यवृत्ती वाटपाची एकूण रक्कम बत्तीस लाख रुपये आहे. सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत एकेचाळीस विद्यार्थ्यांना मिळून एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये दिले गेले आहेत. त्यांपैकी काही विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळाली आहे तर काही जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी म्हटले आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थी हे एक प्रकारचे ज्ञानाचे दीपच होत. ते विद्यार्थी योग्य वेळी मदत केल्यामुळे चांगले शिकले, त्यांना देशात-परदेशात चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळाल्या, तर त्या कुटुंबांचे आणि पर्यायाने समाजाचे जीवनमान उंचावणर आहे. त्या ज्ञानदीपांच्या निरांजनात तुपाचे दोन-चार थेंब घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याची चांगली फळे दिसू लागली आहेत. सेवानिवृत्तीपूर्वी मानसिक तयारी झाली असल्यास अगर उचित नियोजन केलेले असल्यास सेवानिवृत्ती हे संकट न वाटता नव्या रीतीने जीवन जगण्याची संधी वाटते!

डॉ. रतिकांत हेंद्रे
मयुरेश अपार्टमेंट्स,
फ्लॅट नं. ६, २७६, रास्ता पेठ, पुणे ४११०११
०२० २६१२०४६२
reach.kaustubh@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.