शिक्षण पत्रिका नव्वदी पार !

0
249

‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक गेली नव्वद वर्षे अविरतपणे सुरू आहे. या मासिकाचे स्थान बालशिक्षणक्षेत्रात फार मोलाचे आहे. ताराबाई मोडक यांनी ‘मराठी शिक्षण पत्रिके’ची सुरुवात अमरावती येथे 1932 साली केली. मासिक 1933 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यापूर्वी ‘शिक्षण पत्रिका’ गुजराती भाषेत प्रसिद्ध होत असे. पुढे ती हिंदी भाषेतही प्रसिद्ध होऊ लागली. ताराबाईंनी ‘शिक्षण पत्रिके’चे संपादन 1933 ते 1955 असे दीर्घकाळ केले. ‘शिक्षण पत्रिके’ने महाराष्ट्राला व भारतातील अनेक शहरांना बालशिक्षण या नव्या संकल्पनेची ओळख करून दिली. ताराबाई बरीच वर्षे भावनगरला राहिल्यामुळे त्यांच्या मराठी भाषेवर गुजराती भाषेचा प्रभाव होता. पुढे त्यांनी भाषाशुद्धीचे काम सुरू केले. त्यांनी मराठी भाषेत नवीन शब्द निर्माण केले. माँटेसरीच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रसार करण्याचा हेतू लक्षात घेऊन मासिकाची सुरुवात करण्यात आली होती. शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी भावनगर येथून 1926 साली पहिला अंक प्रसिद्ध केला. तेव्हा ‘पत्रिका’ गुजरातीतून निघत होती. ताराबाईंनी मराठी ‘शिक्षणपत्रिके’चे एकहाती लिखाण 1940 पर्यंत केले. त्यामुळे ‘पत्रिके’चे स्वरूप एकसुरी होत आहे असे त्यांना वाटले. तेव्हा त्यांनी संपादक मंडळ तयार केले व त्यात प्रथितयश मंडळींचा समावेश केला. तेव्हा ‘पत्रिके’त वैविध्य आले. ‘शिक्षणपत्रिके’चे स्वरूप आशयपूर्ण होते. स्वाभाविकच आहे, कारण शिक्षणविषयक नवविचार त्या काळी रुजू झाले होते. मंडळी त्यांनी भारली गेली होती. ताराबार्इंनी त्या मासिकाच्या माध्यमातून शिक्षक, पालक आणि समाज यांना बालशिक्षणाविषयी नव्या विचारांस प्रवृत्त केले.

ताराबाईंनी ‘शिक्षण पत्रिके’च्या संपादकपदाची धुरा शेष नामले यांच्यावर 1955 साली सोपवली. त्यांनी 1974 सालापर्यंत ती जबाबदारी सांभाळली. ताराबाई व शेष नामले यांनी ‘शिक्षण पत्रिके’च्या माध्यमातून विचारवंत व शिक्षणप्रेमी यांचा एक वर्ग निर्माण केला. ‘शिक्षण पत्रिके’च्या संपादक मंडळावर सुलभा पाणंदीकर व भास्कर धोंडो कर्वे यांच्यासारखे जाणकार लोक होते. त्यानंतर अनुताई वाघ यांनी ‘शिक्षण पत्रिके’चे संपादन 1974 ते 1992 पर्यंत केले. बालशिक्षणाला उपयुक्त अशी बालगीते, बडबडगीते, अभिनयगीते, नाटके, गोष्टी, खेळ असे विविध साहित्य ‘शिक्षण पत्रिके’च्या माध्यमातून महाराष्ट्राला उपलब्ध झाले.

ताराबाईंनी मुंबईत दादर येथे ‘शिशुविहार’ या महाराष्ट्रातील पहिल्या ‘बालमंदिरा’ची स्थापना केली. त्यांना 1936 मध्ये दादर भगिनी समाज या संस्थेचे सहकार्य मिळाले. त्यांनी माँटेसरी पद्धतीच्या शिक्षणाचा म्हणजेच शास्त्रोक्त बालशिक्षणाचा प्रसार व प्रचार याच हेतूने हे कार्य हाती घेतले होते. त्यांनी माँटेसरी पद्धतीचे भारतीयीकरण महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावरून केले. त्यांना ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ अशी नावे दिली. संपूर्ण भारताने ती नावे स्वीकारली आहेत.

‘शिक्षण पत्रिके’चे काम ताराबाईनी स्वत: 1955 पर्यंत पाहिले. बालशिक्षण बालसन्मुख असले पाहिजे असे त्यांचे मत होते. मुलांनी जे शिकायचे ते सर्व मुले ‘स्वयंस्फूर्ती’ने स्वतः शिकत असतात. शिकणे म्हणजे माहीत नसलेले जाणून घेणे, व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहीत झालेले वापरात आणणे, वापरता येण्यासाठी ते आठवणे आणि शक्य झाले तर माहीत झालेल्यात काही भर घालणे. शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती माणसांतच नव्हे तर सर्व प्राण्यांमध्येही उपजत असते आणि त्यातून आनंद मिळतो. पण ही प्रक्रिया नैसर्गिक राहिलेली नाही. तिला औपचारिक रूप आले आहे. पालकांना-शिक्षकांना त्यांचे विचार लहान मुलांच्या डोक्यात कोंबण्याची घाई झाली आहे. खरे म्हणजे, मुलांनी स्वतः निरनिराळे अनुभव घेऊन शिकले पाहिजे. त्यांची शिकण्याची प्रक्रिया जन्मापासून सुरू होते. ताराबाईंचे बालशिक्षणाविषयीचे विचार वेगळे होते. ते मोलाचे आहेत : बालकाच्या शारीरिक विकासाला जसा व्यायाम हवा तसे त्याला काम हवे. त्याला घरातील काम करू द्यावे; तसेच बागकाम, सुतारकाम, गवंडीकाम, विणकाम इत्यादी कामे करू द्यावीत. त्यामुळे त्याची व्यावहारिक जीवनाची तयारी उत्तम होते. मुलांवर श्रद्धा ठेवावी. ते मनुष्याचे बाळ आहे. बालकाजवळ ज्ञानप्राप्तीची स्वयंभू जिज्ञासा आहे.

‘शिक्षण पत्रिके’च्या संपादकपदी 1955 नंतर शेष नामले आले. त्या काळात बालशिक्षणासारख्या समाजाकडून दुर्लक्षित विषयावर मासिक चालवणे हे फार कठीण काम; ते त्यांनी केले. बालशिक्षणाबरोबर प्राथमिक शिक्षणाचा आणि प्राथमिक शिक्षकांना उपयोगी पडतील अशा विषयांचा समावेश केला. ‘पत्रिके’चा अधिक भर त्या काळात पालकांपेक्षा शिक्षक प्रशिक्षण यावर दिसतो. शेष नामले यांनी 1973 पर्यंत ‘पत्रिके’चे काम पाहिले. त्यांनी ‘पत्रिके’त वैचारिक लिखाण आणले.

अनुताई वाघ ‘शिक्षण पत्रिके’च्या संपादकपदी 1974 साली आल्या. अनुताईंना बालशिक्षणात ताराबाईंचे मार्गदर्शन लाभले होते. कुरणशाळेसारखे अनेक नवनवे प्रयोग बोर्डी व कोसबाड येथे चालू होते. अनुताई प्रत्यक्ष त्या प्रयोगात सहभागी होत्या. त्यामुळे आदिवासी परिसरातील वस्तूंचा शैक्षणिक साधने म्हणून उपयोग; तसेच, ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रश्न यांचा ‘पत्रिके’त समावेश अनुतार्इंच्या काळात होऊ लागला. बालवाङ्मयालाही मोठ्या प्रमाणात स्थान दिले गेले. त्यामुळे शिक्षकांना नवीन बालगीते, बडबडगीते, नाटिका यांचा लाभ झाला. त्या संदर्भात अनुताई लिहितात, “ग्रामीण जीवनाशी मिळतेजुळते, सोप्या शब्दातील पण प्रासादिक असे बालसाहित्य लिहिले जावे. त्यात लोकगीते व लोककथा यांचाही उपयोग करावा.” अनुताईंचा हेतू बालशाळेतून शिकवणाऱ्या शिक्षकांचे शिक्षणकार्य समृद्ध व्हावे असा होता.

रमेश पानसे यांनी ‘पत्रिके’चे संपादन 1992 साली हाती घेतले. खरे तर, त्या आधीपासूनच अनुताईंबरोबर राहून पानसे यांनी अनुताईंना संपादनाच्या व इतर अनेक कामात मदत केली होती. त्यांच्या काळात बालशिक्षणासारखा रोजचा, साधा वाटणारा विषय लोकांपुढे सातत्याने मांडण्याचे काम झाले. त्यांनी शिक्षणाविषयी नवा विचार करायला लावणारे, पालकांना व शिक्षकांना अंतर्मुख करणारे लिखाण केले. पानसे शिक्षणविषयक मासिकाच्या कामाविषयी म्हणतात, “शिक्षणविषयक मासिकाचे कार्य प्रामुख्याने विचारांच्या प्रसाराचे असते. शिक्षणाच्या क्षेत्रातल्या नव्या विचारांचा शोध नित्य घेत राहणे, त्याची कालप्रस्तुतता लक्षात घेऊन, ते आपलेसे करणे, प्रत्यक्ष प्रयोगांतून त्याची व्यावहारिकता तपासणे आणि युक्त विचाराचे धन मुक्तपणे समाजाच्या स्वाधीन करणे. ही प्रक्रिया जितकी सातत्याने चालेल तितकी मासिकाची समाजोपयोगिता सिद्ध होते. वैचारिक मासिकाचे हेच अंगभूत असे कार्य होय.”

रमेश पानसे यांनी 1992 ते 2009 या कालावधीत ‘शिक्षण पत्रिके’चे संपादक म्हणून काम पाहिले. त्यांनी ‘शिक्षण पत्रिके’तून शिक्षणक्षेत्रातील बदल, जागतिक स्तरावरील बालशिक्षणातील नवीन विचार प्रसिद्ध केले. साहित्यक्षेत्रातही ‘शिक्षण पत्रिके’ला स्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. वर्गणीदार व वाचक वर्ग वाढवण्यासाठी अनेक योजना आखल्या व यशस्वी केल्या. पानसे यांनी मेंदूशास्त्रातील संकल्पना वापरून ‘मूल कसे शिकते’ या प्रश्नाकडे लक्ष वेधले व पत्रिकेसही संशोधनाचे स्वरूप दिले.

नंतर शिक्षण पत्रिकेची धुरा विद्याधर अमृते यांच्याकडे आली. त्यांनी ‘शिक्षण पत्रिके’ला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भारतातील बऱ्याच राज्यांत केंद्र शासनाचे धोरण अमलात येत होते. तो बदल महाराष्ट्रानेही स्वीकारावा यासाठी ते आग्रही होते. विद्याधर अमृते भूगोल या विषयाचे तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी अनेक भौगोलिक प्रकल्प गाव, तालुका, जिल्हा असे नकाशे व माहिती ‘शिक्षण पत्रिके’तून प्रसिद्ध केली. त्यांनी पत्रिकेचा व्याप शालेय पातळीपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला.

अशोक पाटील हे संपादक म्हणून 2013 पासून काम पाहत आहेत. शिक्षणक्षेत्रातील नवीन प्रवाह, नवे बदल जे विद्यार्थी-पालक-शिक्षक या सर्वांना मार्गदर्शक होतील; असे लेखन तसेच शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या लेखकांना लिहिण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.

शिक्षण पत्रिकेचा मुख्य भर मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत असावा यावर आहे. पत्रिका कोसबाडसारख्या आदिवासी भागातून प्रकाशित होत आहे आणि ती 91 व्या वर्षात पदार्पण करत आहे, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.

– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here