शिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा!

5
33
-heading-teacher

मला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही! ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही? त्याची कारणे विविध आहेत. मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण बालवाडीपासून शाळाशिक्षण संपेपर्यंत व नंतरही असते. बालवाडीतील मुलांनादेखील ट्यूशनला पाठवणारे पालक आहेत. समाजाची एकूण विचारसरणी त्या प्रकारची झाली आहे – यश मार्कांवर मोजले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण मिळाल्याने होऊ शकणारा आनंद निघून जात चालला आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण इतका प्रचंड असतो, की ती ज्ञान घेण्यातील आनंदाला पारखी होत जातात. ती फक्त पोपटपंची करू लागतात. ज्या मुलांना पोपटपंची जमते, ती तरून जातात, पण ज्यांना ती जमत नाही, ती मुले मागे पडतात आणि ‘ढ’ हा शिक्का त्यांच्या नावापुढे लागतो. ती मुले त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. उमलत्या वयात हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.

विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा घसरू लागलेला आहे, त्याची कारणे अनेक आहेत. त्या शाळांमध्ये जी मुले येतात, ती समाजातील तळच्या आर्थिक स्तरातील असतात. त्यांच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरण नसते. किंबहुना त्यांपैकी पालकांना वाटते, की त्यांच्या मुलांना पुढे जर रोजगारीवर किंवा तशाच प्रकारची कामे करण्याची असतील, तर त्यांनी शिक्षण कशाकरता घ्यावे? कित्येक मुलांच्या घरांतील मातृभाषा मराठी नाही, तरी त्यांना परिस्थितीमुळे जवळ असणाऱ्या पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांत जावे लागत आहे. अशी मुले शाळांत गैरहजर अनेक दिवस राहतात. काही मुलांची शाळा आई-वडिलांचे कामाचे ठिकाण बदलले, की बदलते. शिक्षकांनी त्यांना निरनिराळी इतर कामे असल्यामुळे शाळांत जे काही शिकवलेले असते ते मुलांना नीट समजले की नाही ते समजून घेण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो. मुलांचा कल कसा आहे ते पाहून त्याला त्या विषयात विचारप्रवृत्त करणे महत्त्वाचे. मुले त्या विषयात रमतील- उत्सुकतेने अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांची सुरेख गोष्ट आहे. त्याला सुमार बुद्धिमत्तेचा मुलगा म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्याच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलनी, ‘त्याची बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे आमच्या शाळेतील अभ्यासक्रम त्याला झेपणार नाही. तेव्हा त्याला ‘स्लो-लर्नर’ मुलांच्या शाळेत घालण्यात यावे’ असे पत्र पालकांना दिले होते. एडिसनच्या आईने ते पत्र त्याला वेगळेच वाचून दाखवले. ती त्याला म्हणाली, ‘तुझी बुद्धिमत्ता इतक्या वरच्या स्तराची आहे, की इतर सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांबरोबर अभ्यास करण्यापेक्षा तू घरी माझ्याबरोबर अभ्यास करत जा.’ तोच एडिसन पुढे जगातील नामवंत शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने या अंधकारमय जगात विजेच्या बल्बचा शोध लावून प्रकाश आणला!

-dr.v.n.shrikhandeरामानुजन, आइनस्टाईन यांच्या कथा थोड्याफार तशाच आहेत. त्यांना त्यांच्या शाळांतील इतर मुलांच्या तुलनेने कमी बुद्धिमत्तेचे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली गेली होती. त्या कथा सांगतात, की बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करणे शक्य नाही. ती कोणाला कशी दिली आहे, ते माणूस ठरवू शकत नाही.

मला हे सगळे लिहावेसे वाटले ते ‘रोजनिशी लेखन उपक्रमा’च्या वर्षपूर्ती समारंभातील वक्त्यांची भाषणे ऐकून. 

‘भाग्यश्री फाऊंडेशन’च्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या पस्तीस शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रोजनिशी लेखन उपक्रम चालतो. आमच्या ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ने शाळांमधून ‘रोजनिशी उपक्रमाची’ सुरुवात करून दिली आहे. रोजनिशी उपक्रमाच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम एप्रिल 2019 मध्ये साजरा झाला. उपक्रमाला आयुक्त मनोहर हिरे व अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांचे मार्गदर्शन व सहकार्य सतत लाभले. त्या सर्वांचा भाषणातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे व त्यामुळे ती विचारप्रवृत्त होणे किती महत्त्वाचे आहे त्याचा प्रत्यय येत गेला. तोच तर रोजनिशी लेखन उपक्रमाचा प्राण आहे.

हा ही लेख वाचा- लष्करी प्रशिक्षणाच्या नाना संधी
                                                 रोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती

वर्षपूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबईचे शल्यविशारद डॉ. वि.ना. श्रीखंडे यांनी भूषवले. ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आहेत. ते त्याप्रसंगी बोलताना म्हणाले, की मुलांना मायेने शिकवणे फार आवश्यक आहे. त्यांनी स्वतःचेच उदाहरण दिले. श्रीखंडे म्हणाले, की माझ्या बोलण्यात तोतरेपणाचा दोष असल्यामुळे माझ्या मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ सर्जन्सनी मला म्हटले, की ‘तू या क्षेत्रात कशासाठी येतोस? तुला धड बोलताही येत नाही.’ पण मी त्यामुळे माझा आत्मविश्वास गमावला नाही. मी तो दोष दूर करण्यासाठी सल्ला घेतला. शिक्षण चालू ठेवले. आणि उत्तम यशस्वी झालो. कालांतराने, मी प्रसिद्ध सर्जन झाल्यावर तेच मला म्हणाले, ‘तू पोटावरील शस्त्रक्रिया उत्कृष्ट करतोस मला त्या पाहायच्या आहेत.’ आणि त्यांनी मी शस्त्रक्रिया करत असताना बाजूला उभे राहून पाहिल्या. हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे, की शिक्षकांनी कोणामध्ये काय क्षमता दडलेली असते हे ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांची हेटाळणी न करता, त्यांचे व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण व्हावे ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

-mejar-gawandकार्यक्रमातील प्रमुख वक्ते मेजर सुभाष गावंड यांनीही त्यांच्या खेळीमेळीच्या भाषणाने, शिक्षकांची मने जिंकली. मेजर गावंड हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते भिवंडी मनपा शाळांच्या नववी-दहावींच्या मुलांसाठी ‘मिलिटरी एंट्रन्स प्रशिक्षण शिबीर’ विनामूल्य जुलै 2019 पासून घेणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन आम्हीच ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ तर्फे करण्यात येणार आहे. मेजर गावंड म्हणाले, की कोणत्याही करिअरविषयी मुलांना व्यवस्थित माहिती मिळण्यास हवी, त्यांच्या मनात अर्धवट माहितीमुळे उगीच भीती उत्पन्न होते. ती माहिती देण्याची व त्यांना समजावून घेण्याची जबाबदारी शिक्षक व पालक यांची आहे. पुढे ते म्हणाले, की शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला आला, की आपण कौतुक करतो. पण तो स्वतःच्या घरी जन्मला तर, ते आपल्याला पेलवत नाही. म्हणजेच प्रत्येक पालकाला मुलांनी स्वतःला कोठल्याही जोखमीत घालता कामा नये, असेच वाटत असते, ते योग्य नव्हे.

‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी त्यांच्या भाषणात, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे हे समजावून सांगितले. ते म्हणाले, की मी औपचारिक शिक्षण खूप घेऊ शकलो नाही, परंतु माझ्या करिअरमध्ये मला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सहकारी भेटले. गुरूच ते! गुरूमध्ये इतके सामर्थ्य असते, की तो त्याच्या विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर निश्चितच चालवू शकतो. मग विद्यार्थी कोठल्याही परिस्थितीमधील असू देत. भिवंडीमधील सर्जन डॉ. विवेक जोशी यांनी त्याप्रसंगी त्यांना त्यांचे गुरू, डॉ. श्रीखंडे यांनी सर्जरीबरोबर आयुष्यात अनेक महत्त्वाचे धडे दिले, ते कशाप्रकारे ते सांगून गुरू व शिष्य या नात्यावर समर्पक भाष्य केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांचा विकास हा गुरूंच्या मार्गदर्शनातून होत असतो.

शाळांना रोजनिशी लेखन उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी जरूर संपर्क साधावा.

– शिल्पा खेर 98197 52524
संयोजक, शिक्षक व्यासपीठ
khersj@rediffmail.com

 

About Post Author

5 COMMENTS

  1. रोजनिशी हा उपक्रम खुप सुंदर…
    रोजनिशी हा उपक्रम सुंदर आहे आणि तज्ञांचे विचारही उत्कृष्ट आहेत.

  2. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा…
    शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक, कौटुंबिक व सत्यपरिस्थिती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

  3. यासाठी शिक्षकांनी…
    यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आर्थिक,कौटुंबिक,बाह्य परिस्थिती या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

  4. सहज सोपा असा उपयोगी उपक्रम.
    सहज सोपा असा उपयोगी उपक्रम.

Comments are closed.