शिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन

0
27
carasole

‘शिक्षकांचे व्यासपीठ’ ही संकल्पना आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आकारास आणत आहोत! आदर्श समाज घडवण्यासाठी शिक्षक त्या योग्यतेचे असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक काळात असे शिक्षक होते व आहेत. त्यामुळे जुन्या शिक्षकांच्या व गुरुजींच्या गोष्टी सांगत बसण्याचे कारण नाही. विद्यमान उदात्त व उद्बोधक काळातील तशा सर्व उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ शिक्षकांचे व्यासपीठ हे माध्यम निर्माण करत आहे. शिक्षकांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्या उत्तम कार्यापैकी किमान एक अविस्मरणीय अनुभव लेखरूपाने आमच्याकडे फोटोसहित (शिक्षकाचा फोटो, उपक्रमाचा फोटो) पाठवावा. शिक्षकाच्या एखाद्या प्रयोगाने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला असल्यास तसे अनुभव तर अवश्य कळवावे.

शिक्षक म्हणजे सर्व व्यक्ती, ज्यांनी त्यांच्या जीवनात कोणाला तरी सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे – फक्त तो प्रयत्न औपचारिक पद्धतीने केलेला असावा. मग ते शाळा-कॉलेजमधील शिक्षक असोत वा गायन-नृत्य-अभिनय आदींचे शिक्षक, सैन्यातील शिक्षक, खेळांचे शिक्षक, चित्रकलेचे शिक्षक… सर्वजण ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ यासाठी शिक्षक या सदरात येतात. त्यांना डिग्री असो वा नसो, त्यांची त्यांच्या कामाप्रती शंभर टक्के निष्ठा असली की झाले!

मी, शिल्पा खेर या व्यासपीठाची प्रमुख संयोजक म्हणून दोन अनुभव तुमच्यासमोर मांडू इच्छिते-

मी ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेत हौस म्हणून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. जयदेव हट्टंगडी हे तेव्हा आमचे प्रशिक्षक होते. त्यांचा उल्लेख निर्मळ व्यक्तिमत्त्व म्हणून करावासा वाटतो. त्यांनी आम्हाला अभिनयाचे कित्येक धडे हसत-खेळत दिले. विद्यार्थ्यांमध्ये कित्येकदा संकोच असतो. सर्व येत असते, पण सादर करताना आत्मविश्वास कमी पडतो. तेव्हाचे सरांचे एक वाक्य मनावर कोरून राहिले आहे. आज कळते, की ते वाक्य किती महत्त्वाचे आहे! ते म्हणायचे, “अभिनय करता आहात ना. मग भूमिकेशी एकरूप व्हा. नटाला कसली आली आहे लाज? लाज गेली गाढवाच्या गांडीत” येस! असा असतो शिक्षक! तो नेमक्या शब्दांत विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो. सर कधीही कोणाशी असभ्यपणे बोललेले वा वागलेले मला आठवत नाहीत; पण त्यांनी त्या नेमक्या क्षणी शिष्टाचारात असभ्य मानला गेलेला शब्द आम्हा विद्यार्थ्यांसमोर नि:संकोच उच्चारला! त्यांचा ध्यास प्रत्येक कलावंताचा आत्मविश्वास हा उच्च कोटीचा असावा इतकाच होता आणि तो ते विद्यार्थ्यापर्यंत अचूक रीतीने पोचवत.

दुसरे उदाहरण मुंबईच्या भांडुप-विक्रोळीच्या ‘शिवाई विद्यालय’ येथील आकाश तोरणे या मुलाचे आहे. आम्ही फाउंडेशनतर्फे अनेक शिबिरे त्या शाळेत घ्यायचो. तेव्हा त्या मुलांच्या झोपडवस्तीतील घरांनाही भेटी द्यायचो. रस्त्याजवळील झोपडीत राहणार्या  आकाशचे वडील वारले होते. आई घरकाम करायची. मोठी बहीण, आकाश व धाकटा भाऊ – तिघांचे कुटुंब. आकाश मस्ती करायचा. तो अभ्यासात अजिबात लक्ष घालायचा नाही. आईने त्याच्याबद्दल माझ्याकडे तक्रार केली, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. ती म्हणजे आकाशची चित्रकला उत्तम आहे. आम्ही एकदा शाळेत चित्रकला स्पर्धा ठेवली होती, पण आकाशला पहिले बक्षीस मिळाले नाही. वास्तविक, तेव्हा त्याच्या तोडीचे चित्र अन्य कोणाचे नव्हते. त्याने ‘लालबागचा राजा’ सुंदर काढला होता, पण त्याला ठरलेल्या वेळेपेक्षा काही काळ अधिक लागला होता. म्हणून परीक्षकांनी त्याला तिसरे बक्षीस दिले. आम्हाला ते खटकले, पण आम्ही त्यातील तज्ञ नव्हतो.

त्यानंतर, काही काळाने, आमच्या सहकारी डॉ. शुभांगी दातार यांनी त्याला ‘रोटरी क्लब’ची चित्रकला स्पर्धा होती तेथे पाठवले. तेथे साहजिकच, त्याचा पहिला नंबर आला. त्याचा, त्याच्या चित्राचा मोठ्ठा फोटो ‘डीएनए’ वर्तमानपत्रामध्ये आला! ठाण्यातील चित्रकार शैलेश साळवी यांनी त्यांच्या क्लासमध्ये त्याला फी न घेता अॅडमिशन दिली. मुख्य म्हणजे आकाशचा त्या दिवसापासून आत्मविश्वास वाढला. पुढे, त्याला दहावीत एक्याऐंशी टक्के गुण मिळाले. त्या घटनेने त्याला त्याच्यात काहीतरी चांगले आहे हे दाखवून दिले. ते फार महत्त्वाचे आहे.

उपक्रमशील शिक्षक मुलांना शिकवताना अनेक प्रकारचे अनुभव घेत असतात, काही तंत्रे उपयोगात आणत असतात, काही उपक्रम राबवत असतात. ते उपक्रम, त्यांचे विचार यांचे हे व्यासपीठ आहे. यामधून पुढील पिढी घडवण्यासाठी अनेक शिक्षकांना (गुरुंना) मार्गदर्शन मिळणार आहे!

‘शिक्षकांचे व्यासपीठ’कडून दहा आदर्श शिक्षक त्यांच्या लेखनामधून दर तीन महिन्यांनी निवडण्यात येतील. वर्षअखेरीस निवडलेल्या त्या चाळीस शिक्षकांना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात येईल. शिक्षकांनी त्यांचे उपक्रमाधारित लेखन (तीनशे ते सातशे शब्द) पुढील पत्त्यावर पाठवावे.

– शिल्पा खेर

khersj@rediffmail.com

About Post Author