‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत

1
246
carasole

अण्णा हजारेंसोबत साजरा केलेला मित्रमेळावा‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्‍थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली ती १९८० सालापासून. त्‍या काळी महारोग असे ज्या रोगाला संबोधण्यात येत असे, त्या कुष्ठरोगाची लोकांच्या मनात प्रचंड धास्ती बसली होती. कुष्ठरुग्णांस समाजात स्थान नव्हते. कुटुंबांची मानसिकता त्या रुग्‍णांना वाळीत टाकण्याची होती. कुष्ठरुग्णांमध्ये असणा-या शारीरिक व्यंगांमुळे तर मानसिक कडवटपणा अधिक तीव्र होई. त्‍या जोडीला औषधे आणि उपचारपद्धत यांत सुधारणा आणण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. कुष्ठरुग्णांसाठी शासनपातळीवर नवनवीन योजना हाती घेतल्या गेलेल्या होत्या, पण तरीही कुष्ठरुग्णांसाठी काम करणा-या व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांची निकड भासत होती.
या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील नेरे गावाजवळील एकशेबावीस एकराच्या विस्तीर्ण परिसरात स्त्रिया व कुष्ठरुग्ण यांच्यासाठी काम करायचे ठरवले गेले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभुगुरुजी यांना सत्तर एकर जमीन शासनाकडून मिळाली होती. पुढे, कुष्ठरुग्णसेवेचे काम ख-या अर्थाने सुरू झाल्यानंतर आणखी जमीन विकत घेतली गेली. ज्येष्ठ सामाजिक आणि सर्वोदयी कार्यकर्ते अण्णासाहेब सहस्रबुद्धे हे १९७० मध्ये संस्थेच्या कार्यकारिणीत सामील झाले. त्यांनी त्यांचे मानसपुत्र असलेले सर्वोदयी कार्यकर्ते गोविंदराव शिंदे यांना संस्थेची जबाबदारी सोपवली. संपूर्ण उजाड माळरान, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, अशा स्थितीत त्यांनी संस्थेच्या कामकाजाला सुरुवात केली. नेरे गावापासून ‘शांतिवन’ला जाणा-या गाढी नदीवर, सुरुवातीच्या काळात पूलही नव्हता. गोविंदराव शिंदे आणि पाच कुष्ठरुग्ण यांना नदी पोहून जावे लागत असे. हळुहळू समाजातील अनेक व्यक्ती आणि संस्था यांचा हातभार लागून संस्था वाढत गेली आणि तिचे रूपांतर वटवृक्षात झाले! तो प्रवास खडतर होता. पण त्याचे फलित म्हणजे मुंबईच्या जवळ असलेली ‘शांतिवन’ ही सेवाभावी संस्था होय.
संस्थेचे माजी अध्यक्ष कै. प्रकाश मोहाडीकरएस.एम.जोशी काही काळ संस्थेचे अध्यक्ष होते. रामभाऊ मोहाडीकर, भाऊसाहेब धामणकर, प्रकाशभाई मोहाडीकर यांनी त्यानंतर संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी आहेत.
कुष्ठरोग निर्मूलनाबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत गेल्यामुळे जनतेचा कुष्ठरोगी व्यक्तीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात हळुहळू फरक पडत आहे. मात्र कुष्ठरोग हा रोग सर्वसामान्य आहे. समाजाने कुष्ठपीडित व्यक्तींना स्वीकारावे याबद्दलची मानसिकता बदलण्यास काही काळ जावा लागेल. अशा परिस्थितीत कुष्ठरोगी आणि कुष्ठरोगमुक्त व्यक्ती यांचे पुनर्वसन करून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे या दृष्टीने ‘शांतिवना’त काही रुग्णांचे पुनर्वसन करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून संस्थेतर्फे काही उपक्रम राबवले जातात. जमिनीची उपलब्धता असल्याने शेती आणि इतर उत्पादनांवर आधारित प्रकल्प हे त्यांतील महत्त्वाचे. प्रामुख्याने भातशेती केली जाते. विविध प्रकारच्या भाताची उत्पादने घेतली जातात. फळबाग लागवडही केली जाते. त्यात केळी, पेरू, चिकू, काजू, जांभूळ, नारळ आणि हापूस यांचा समावेश आहे. ‘शांतिवना’त ऊसाचीही लागवड केली गेली पण ती नमुन्यादाखलच म्हणायची; फक्त रसवंती चालवण्यापुरत्या आवश्यक, तेवढ्याच ऊसाचे उत्पादन केले जाते. निसर्गशेती हा प्रयोग महत्त्वाचा. घेवडा, शिराळी, घोसाळी, भेंडी इत्यादी भाजी त्यातून निघते.
शासनाच्या सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत दहा हजारांची ‘किसान रोपवाटिका’ तयार करण्यात आली आहे. शासनाने पिशव्या आणि बियाणे पुरवले. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन बाभूळ, रेन ट्री, बांबू, प्लेटोफॉर्म, काजू, गुलमोहर, आवळा, खैर, साग, कॅशिया, सुरू, अशोक व कडुनिंब या जातींची रोपे तयार करून जवळजवळ दोन हजार आठशेपन्नास रोपे लावण्यात आली आहेत. त्यांतील पंचवीस टक्के रोपे शासनाला देण्यात आली. शोभेची आणि फुलांची पाच हजार रोपे तयार करण्यात आली. त्यांमध्ये गुलाब, शेवंती यांच्यासह अनेक फुलझाडांचा समावेश झाला.
कुष्ठरोगमुक्त बांधवांसाठी केलेली रोजगाराची सोयआंब्याची कलमे आणि वनौषधी यांनाही प्राधान्य देण्यात आले. निरगुंडी, ब्राम्ही, आवळा, कोरफड, लसूण, नीम, संत्री, गुळवेल, जांभूळ, अर्जुन, कुडा, मुरुडशेंग अशा वनौषधींची तेले आणि चूर्ण तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केली जातात.
गृहोद्योगांची सुरुवात ‘शांतिवना’त सुरूवातीच्या काळात करण्यात आली. विणकाम आणि शिवणकाम विभाग हा स्त्रियांना प्रिय झाला. स्वतंत्र गोशाळा बांधण्यात आली. गोशाळेतल्या दुधाचा उपयोग तेथील रहिवाशांना, कार्यकर्त्यांना आणि रुग्णांना होत असतो. विणकाम व शिवणकाम विभाग स्वतंत्रपणे चालतात. त्या विभागांच्या उत्पादनांना बाजारपेठ उत्पन्न झाली आहे. तिथे तयार होणा-या सतरंज्या, शबनम, आसने, डस्टर या उत्पादनांचा दर्जा आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते. विशेषत: त्यांचा भरभक्कमपणा ग्राहकांना लुभावतो.
सर्वोदयी विचारसरणीचा भर निसर्गोपचारात असल्याने ‘शांतिवना’त ‘स्नेहलता निसर्गोपचार केंद्रा’ची विशेष स्थापना असणे स्वाभाविक आहे. विनोबाजींनी त्यांच्या समर्पक कोटीप्रियतेनुसार ‘सिंपथी’ असलेली पॅथी म्हणजे नॅचरोपॅथी अशी निसर्गोपचाराची व्याख्या केली आहे. जल, उपवास, माती आणि आहार यांच्या चिकित्सेने आरोग्य सुधारते. कष्टकरी, अंगमेहनत करणारे यांना या उपचारपद्धतीचा लाभ व्हावा अशी गांधीजींची दृष्टी होती. ‘शांतिवना’तील निसर्गसंपदा, तेथील शांत परिसर निसर्गोपचार केंद्राला पूरक आहेत. नवी दिल्लीच्या ‘गांधी स्मारक निधी’मधील ‘प्राकृतिक चिकित्सा समिती’तर्फे ‘शांतिवना’मध्ये ‘एन.डी.डी.वाय’ (Naturopathic Diploma & Yogic Science) व ‘सहाय्यक चिकित्सक’ यांच्यासाठी अभ्यासवर्गदेखील चालवले जातात. डॉ. कुमुद जोशी, डॉ. सुधारक खराडे. डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. जयनारायण जयस्वाल हे सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या निसर्गोपचार केंद्राशी जोडले गेलेले आहेत. निसर्गोपचार केंद्रात रुग्णांच्या व्याधीच्या स्वरूपानुसार निवासाची सोयही केलेली आहे. रुग्णसेवा माफक दरात केली जाते.
कुष्ठरोगमुक्त बांधवांसाठी केलेली रोजगाराची सोय‘शांतिवन’ प्राथमिक स्वरूपात असताना सर्वोदय विचारसरणीला साजेसे असे अनेक उपक्रम सुरू झाले. पण संस्थेचा विस्तार होऊ लागला आणि संस्थेची माहिती परिघाबाहेर पोचू लागली तशी संस्थेत करता येऊ शकणा-या वैविध्यपूर्ण उपक्रमांत वाढ होत गेली. त्यांपैकी महत्त्वाचा म्हणजे रामकृष्ण निकेतन हा वृद्धाश्रम. निसर्गरम्य वातावरणात सर्व सोयींनी युक्त असे वृद्धांसाठी निवासस्थान. ‘राजीवरतन आधारघर’ हे विकलांग व्यक्तींची अखेरपर्यंत देखभाल करून त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी प्रयत्नशील असणारे असे आधारघर. दोन्हींची व्यवस्था अनुक्रमे विद्या साळवे आणि मीरा लाड पाहात असतात.
‘शांतिवन’मध्ये जयप्रकाश नारायण यांचे सहकारी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवतंराय मेहता यांच्या नावाने ‘बलवंतराय मेहता पंचायतराज जागृती केंद्र’ त्यांच्या स्नुषा रक्षाबेन मेहता यांनी स्थापन केले आहे. केंद्राची आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी इमारत उभी आहे. ग्रामीण विकासाच्या संदर्भात पंचायतीराज प्रशिक्षण, पिण्याचे पाणी व सिंचन व्यवस्था, ग्रामीण स्त्री-पुरुषांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, आदर्शगाव पुरस्कार, आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन, आदिवासींच्या शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी शिक्षण व शैक्षणिक साहित्य पुरवठा अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात.
सामुदायिक विवाह सोहळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम होता तेव्हापासून, ‘शांतिवन’ने तो अंगिकारला व अनुसरला. परिसरातील आदिवासींची ती गरजदेखील होती. आसपासच्या आदिवासी भागातील वधुवर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यांना संसारोपयोगी भांडी, कपडे भेट देण्याचा कार्यक्रम होतो. टबलवंतराय मेहता पंचायतराज केंद्राटच्या कार्यामुळे ‘शांतिवन’चा लौकिक वृद्धिंगत होत आहे. हे केंद्र गांधी विचारांचे चालते-बोलते संस्कारस्मारक ठरले आहे.
‘शांतिवना’त राबवला जाणारा आगळावेगळा उपक्रम म्हणजे श्रमसंस्कार शिबिरे. सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. सर्व समाजाचे यांत्रिकीकरण झाले आहे. भौतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. माणसांची मनेही यांत्रिक झालेली आहेत. बालमनावर संस्कार ही गोष्ट तर दुर्मीळ झालेली आहे. समाजात एकूणच कृतिशून्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शांतिवना’त घेतली जाणारी श्रमसंस्कार शिबिरे मुलांवर संस्कार करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एक हजारांहून अधिक माध्यमिक विद्यालये, साठ महाविद्यालये यांमधून दहा हजारांहून अधिक विद्यार्थी आणि चार हजारांहून अधिक शिक्षक-प्राध्यापकांनी शिबिरांमध्ये सहभाग घेतला आहे. महाविद्यालयांतून राबवल्या जाणा-या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची शिबिरेही ‘शांतिवना’त आणि आसपासच्या परिसरात भरवली जातात. श्रमसहयोग, मूल्यशिक्षण, आकाशदर्शन, स्लाईड शो यांद्वारे कुष्ठरोगाची माहिती, गाणी, खेळ असा भरगच्च कार्यक्रम असतो. शिबिर समारोपाच्या वेळेला संस्कारांची अनोखी शिदोरी गाठीशी बांधलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतले अश्रू पाहणे हा आनंददायी आणि कृतार्थ अनुभव असतो.
‘शांतिवना’त दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘मित्रमेळावा’ होतो. पंढरीच्या वारीला नियमितपणे जाणारे वारकरी जसे आहेत तसे ‘शांतिवना’च्या सामाजिक परिवर्तनाच्या पंढरीला दरवर्षी येणारी अनेक मंडळी आहेत. असंख्य लोक मुंबईतल्या अनेक भागांतून मित्रमेळाव्याला हजेरी लावतात.
ज्या व्यक्तींच्या प्रेरणेतून शांतीवन उभे राहिले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले प्रेरणास्थळ‘शांतिवना’त राबवले जाणारे छोटेमोठे उपक्रम बरेच आहेत. एस.एम.जोशी, रामभाऊ मोहाडीकर, प्रकाश मोहाडीकर, भाऊसाहेब धामणकर या ज्येष्ठ समाजधुरिणांचा ‘शांतिवन’ला सहवास आणि मार्गदर्शन लाभले. मोदगी सराफ, हरिभाऊ दामले, चंद्रकांत पाटगांवकर या कार्यकर्त्यांचा ‘शांतिवन’च्या जडणघ़डणीला हातभार लागला. गोविंदराव शिंदे या सर्वोदयी कार्यकर्त्याने स्वत:ला ‘शांतिवन’च्या कार्याशी बांधून घेतले. ‘शांतिवन’ला घडताना बघणे हा त्यांचा जीवनध्यास होता. गोविंदरावांचा सुरुवातीच्या काळात भूदान आंदोलनात आणि त्यानंतर शहाद्याजवळील आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्याच्या संघर्षात सहभाग होता. गोविंदरावांनी ‘शांतिवना’त काम करायला सुरुवात केल्यावर मात्र इतर क्षेत्रांतले त्यांचे काम कमी करून ‘शांतिवना’वर लक्ष केंद्रित केले. गोविंदरावांनी त्यांच्या आयुष्यातली पस्तीस वर्षे ‘शांतिवन’ला वाहिली. त्यांनी स्वत: ‘शांतिवन’च्या पंचक्रोशीत फिरून ‘शांतिवन’सह, तिथल्या तळागाळातील समाजाचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी, शरीराला कर्करोगाने ग्रासलेले असताना आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याकरता आसपासचा परिसर पालथा घातला. त्यात दीडशे गावांचा समावेश होता. ‘शांतिवन’च त्यांच्या जीवनाचा ध्यास होते. म्हणून त्यांनी शेवटचा श्वासही ‘शांतिवना’त घेतला. आयुष्य झोकून देणा-या अशा कार्यकर्त्यांमुळे एखादी संस्था किती आदर्शवत घडू शकते याचे ‘शांतिवन’ हे उत्तम उदाहरण आहे.
गोविंदरावांच्या नंतर जयवंत मठकर या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा संस्थेला मोलाचा हातभार लाभत आहे. रक्षाबेन मेहता यांच्यासह प्रभुदेसाई, उदय जाधव यांचे संस्थेतले वास्तव्य आणि त्यांचा विविध उपक्रमांतील हातभार हे नोंद घेण्याजोगे काम आहे. चंद्रशेखर धर्माधिकारी हे वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षीही अनेक उपक्रमांना उपस्थित राहतात. त्यांचे मार्गदर्शन संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरते. तथापि संस्थेला स्वत:ची गती केव्हाच लाभली आहे! कुष्ठरोगनिवारण व कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन या एकरेषी ध्येयापासून आरंभ झालेली संस्था नेरे परिसरातील ग्रामविकासाचे ध्येय कवटाळून अधिक जोमाने व विस्ताराने कार्यरत आहे.
शांतीवन कुष्‍ठरोग निर्मूलन समिती, मु. पो. नेरे, तालुका पनवेल, जिल्‍हा रायगड.
९५२१४३-२३८०७०/ २०५४०१

उमा दीक्षित
०९८६७६७००३३
uma.dixit11@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. this article is so good .It
    this article is so good .It is inspires the new generation .New generation child think that what our elder do.

Comments are closed.