शहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)

विठोबाशेट राघोबा पाटील हे ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’, शहाबाज या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या ‘विद्यार्थी मंडळा’तील सहकाऱ्यांच्या समवेत पुढाकार घेऊन, वाचनालयाचे इवलेसे रोप ३ एप्रिल १९१६ रोजी लावले व त्याचे संगोपन केले. ते इतिहासक्रमात त्या परिसरातील ‘वाचन चळवळी’चे प्रतीक बनून गेले.

त्यांचा जन्म धामणपाडा या गावातील खानदानी पाटील कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कमी झाले. त्यांनी व्यवहारचातुर्य, वाणीतील गोडवा व व्यवसायाची आवड या गुणांच्या जोरावर व्यापारउद्योगात पदार्पण केले. ते पोयनाड पेठेत प्रतिष्ठित व्यापारी म्हणून अल्पकाळात नावारूपाला आले. त्यांनी त्यांची छाप मुंबईसारख्या व्यापारी जगतातदेखील पाडली. ‘वखारवाले विठोबाशेट’ म्हणून त्यांचे एक आदर्श व्यापारी असे नाव झाले. त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात सामाजिक, शैक्षणिक व समाजबांधवांच्या संघटनात्मक कार्यास वाहून घेतले.

ते पहिल्या ‘अखिल आगरी ज्ञाती परिषदे’चे संचालक, पेण तालुक्यात महाराष्ट्रात गाजलेल्या ‘वाशी संपा’चे मार्गदर्शक, शहाबाजचे कुशल संघटक, धामणपाड्याच्या ऐक्याचे मुकुटमणी होते. ते शहाबाज येथील ‘विद्यार्थी मंडळा’चे नेते होते. त्यांनी धामणपाडा गाव व शहाबाजच्या पाच पाड्यातील लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्याचे कार्य कुशलतेने पार पाडले. ते एकीचे बळ काय असते हे सांगताना, शहाबाज व शहाबाजचे पाच पाडे यांना हत्तीची उपमा देत असत. ते सांगत, की शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा व चौकीचापाडा हे हत्तीचे चार पाय व घसवड हे हत्तीचे शेपूट आहे. “शेपूट तुटले तर हत्तीची शोभा जाईल व एक पाय तुटला तर हत्ती लंगडा होईल, म्हणून पाच पाड्यांतील सर्वांनी ऐक्य भावनेने सहजीवन जगुया” असे त्यांचे उदात्त विचार.

विद्यार्थ्यांविषयी त्यांना वाटणारे प्रेम आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा उत्तम दाखला म्हणजे १९११ साली प्लेगची साथ आली असताना शहाबाजची शाळा बंद पडू न देता त्यांनी ती मंडप घालून गावाबाहेर चालू ठेवली. तसेच, ते पोयनाड येथे इंग्रजी शाळा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यात प्रमुख होते.

विठोबाशेट हे ‘आगरी समाज ज्ञाती परिषदे’च्या संस्थापकांपैकी एक होते. ‘आगरी समाज ज्ञाती परिषदे’ची स्थापना १९०६ साली झाली. ती संस्था मुंबई, ठाणे, रायगड व नाशिक या चार जिल्ह्यांतील समाजबांधवांना एकत्र आणून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने स्थापन झाली. शहाबाजमधून विठोबाशेट व हरी जोमा पाटील यांनी रायगड जिल्ह्यातर्फे ‘आगरी समाज ज्ञाती परिषदे’त प्रतिनिधीत्व केले. समाजातील अनिष्ट चालीरीती, लग्नकार्यातील उधळपट्टी, वाईट परंपरा, व्यसनाधीनता व अंधश्रद्धा दूर करून, समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे आणि शिक्षणप्रसार करण्यासाठी गावोगावी शाळा सुरू कराव्यात यासाठी ‘ज्ञाती परिषदे’ने अनेक ठराव करून समाजबांधवांच्या प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. विठोबाशेट यांना मुंबई येथे पार पडलेल्या ‘ज्ञाती परिषदे’च्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान मिळाला होता.

विठोबाशेट पाटील यांचे नातू वैभव (भैय्याशेट), योगेंद्र राजन, उदय, कुमार, प्रकाश यांनीही त्यांच्या आजोबांनी दिलेल्या दातृत्वाचा वसा पुढे चालू ठेवला आहे. ते धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी उदारहस्ते मदत करत असतात. वैभव यांनी अनेक मंदिरांसाठी देणगी दिली आहे. त्यांनी कै. विठोबा शेठ यांच्या स्मरणार्थ भरघोस देणगी दिल्यामुळे धामणपाड्यातील हनुमानाचे भव्य मंदिर उभारता आले.

– शशिकांत गो. पाटील

(आम्‍ही या लेखात विठोबाशेट राघोबा पाटील यांचा फोटो उपलब्‍ध करून देऊ शकलो नाही. जर वाचक त्यासंदर्भात मदत करू शकत असतील तर त्‍यांनी कृपया आम्‍हाला संपर्क करावा. – टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’)

About Post Author