शशिकांत सावंत – आजचा ऋषिमुनीच तो!

0
45
carasole

शशिकांत सावंत ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथविक्रेता आहे. त्याहून अधिक, तो स्वत: विविध वाचणारा आहे, व्यासंगीही आहे. तेवढाच तो लहरी व त-हेवाईक आहे. त्याच्याबद्दल अशा ब-याच गोष्टी ऐकल्या होत्या. मात्र त्याच्या अन् माझ्या तारा जुळल्या नव्हत्या, कारण त्याच्यावर विश्वासून राहावे असा मला त्याचा अनुभव नव्हता. पत्रकार म्हणून, तेही वर्तमानपत्र-मासिकांचे संपादन करत असताना डेडलाईन सर्वात महत्त्वाच्या. त्यामुळे लेखकांनी वेळा पाळणे फार गरजेचे असते. संपादक आणि लेखक यांच्यातील तो भरवसा शशिकांतकडून पाळला जातोच अशी त्याची ख्याती नव्हती. त्यामुळे बहुधा, मी वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी संपादनकार्य करत असताना त्याच्यापासून दूर राहिलो होतो. मात्र मित्रांकडून त्याच्या ग्रंथप्रेमाच्या आणि संदर्भचातुर्याच्या इतक्या गोष्टी, इतक्या वारंवार ऐकल्या होत्या, की त्याला त्याच्या अड्ड्यात जाऊन भेटणे क्रमप्राप्त होते. तो योग या लेखाच्या निमित्ताने जुळवला आणि नव्या मुंबईतील वाशीमधील त्याच्या दुकानी व घरी गेलो.
त्याने सेक्टर दहामधील दुकान साताठ महिन्यांपूर्वीच सुरू केले आहे. त्यापूर्वी तो घरून ‘ऑपरेट’ होत असे. त्याचा व्यवसाय म्हणजे पुस्तकविक्रीचे सर्वसाधारण दुकान असा नाही. तो गि-हाईके हेरतो आणि त्यांना हवी ती पुस्तके पुरवतो. तो असा व्यवहार करत असताना स्वाभाविकच त्याचा गि-हाईकाबरोबर मोठा व सतत संवाद चालू असतो. त्यामुळे त्याला स्वत:ला वाचनवेड्या, ज्ञानोत्सुक गि-हाईकापेक्षा अधिक सजग राहवे लागते. शशिकांत तेवढा संदर्भ संपन्न असतोच!
गंमत अशी, की शशिकांत तसा आहे आणि म्हणून त्याने हा व्यवसाय सुरू केला आहे! तो वाचनवेडा, कलावेडा, माहितीवेडा असा बराच संदर्भबहुल आहे. मी त्याच्या दुकानी गेलो तेव्हा त्याच्या ऑडिओ सिस्टिमवर पाश्चात्य संगीतातील सिंफनी वाजत होती. तो म्हणाला, तुम्हाला वाटेल की हा बिथोवन आहे, परंतु नाही. हा ब्राह्मस् आहे. त्याने नवव्या सिंफनीतील ही धून अगदी बिथोवन याच्यासारखी परंतु स्वत:च्या अंगाने वाजवली आहे. लगेच, त्याने शेल्फमधून एक पुस्तक काढले व तो सिंफनी संयोजनातील विविध प्रयोगांबद्दल बोलू लागला. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात पाश्चात्य संगीताचे श्रोते जवळजवळ नाहीत, अभ्यासक तर दुर्मीळच. मी ‘क्लॉकवर्क ऑरेंज’ नावाच्या सिनेमाच्या संबंधात बिथोवनच्याच नवव्या सिंफनीसंबंधी ब-याच वर्षांपूर्वी काही संदर्भ शोधत होतो. तर संग्रहालयातल्या संगीतविषयक एकाही पुस्तकात पाश्चात्य संगीताचा परामर्ष नव्हता. देवधरांच्या पुस्तकात, आपली ती मेलडी व त्यांची ती सिंफनी असे नमूद केलेले आहे व तो प्रांतच वेगळा आहे, आपण त्या वाटेला न गेलेले बरे असा पोक्त सल्ला आहे! आता, ए.आर.रेहमानने या दोन्ही संगीतांचा मिलाफ करून सुगम संगीताचा नवीनच, आधुनिक तंत्रानुकूल सुगम प्रकार सादर केला आहे व जगभर नाव मिळवले आहे.
संगीताचा मुद्दा क्षणांत बाजूला झाला, कारण शशिकांतच्या समोरच्या टेबलावरील अर्धवट चित्रकृती नजरेत भरली. त्यावर पुस्तके, पेन, पंच मशीन अशा आणखी काही वस्तू पडलेल्या होत्या. त्यामुळे मला वाटले, की अर्धवट सोडून दिलेले हे कोणाचे चित्र आहे व ते टेबलटॉप म्हणून उपयोगात येत आहे. मी माझ्या हातातला पाण्याचा ग्लास त्यावर ठेवू लागताच शशिकांत उठला, जवळ आला, त्याने माझ्या हातातला ग्लास घेतला. घेता घेता म्हणाला, “मी रंगवतोय ते चित्र. अर्धवट राहिलंय. करीन पुरं आता.” दुकानाच्या भिंतींवर तीन–चार लहान चित्रे होती – फ्रेम केलेली. शशिकांत त्यांचा निर्देश करून म्हणाला, “ती मी काढली आहेत. माझ्या चित्रांची दोन प्रदर्शनंदेखील झाली आहेत!” मग त्याने गोवा ट्रिपमध्ये केलेली आणखी काही चित्रे दाखवली. ती सारी रंगलेपनाची कुशलतेने केलेली क्रीडा होती. त्यातील रंगछटा विलोभनीय होत्या. मात्र त्यांना ‘थीम’ असावी असे जाणवले नाही, मग आठवले, की मी शशिकांतची पाश्चात्य चित्रकारांची ओळख करून देणारी दोन भाषणे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ऐकली होती. त्याने त्यासोबत स्लाइड्सदेखील दाखवल्या होत्या. आपल्याकडे पेंटिंग कलेबद्दलची आस्था नाही याबद्दल त्याला खंत वाटे. म्हणून त्याने ती व्याख्याने मुद्दाम सचित्र रचली होती. त्याच ओढीने तो चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या सहवासात बराच काळ होता. त्याने त्यांच्या संबंधात लेखनही केले आहे.
शशिकांतचे व्यक्तिमत्त्व मला एकाएकी गुंतागुंतीचे, बहुआयामी, गूढसुद्धा वाटू लागले. हा माणूस एवढा अभ्यास, एवढे छंद कसे करतो-सांभाळतो? त्याचे बालपण गरिबीत गेले. त्याचे व़डील वॉचमन होते. तो महापालिकेच्या शाळेत शिकला. घर खार-वांद्र्याच्या झोपडवस्तीत. तीच मधु मंगेश कर्णिकांनी रेखलेली ‘माहीमची खाडी’…रेल्वे रूळ, मोठमोठे पाइप…. ‘स्लमडॉग मिलियॉनेर’ने परत तेच जीवन वाचक-प्रेक्षकांच्या मनी ठसवले. शशिकांतचे राहणे मात्र वेगळे होते. त्यांचे घर सुसंस्कृत होते, वडील शिक्षित होते, मोठ्या भावाने जेजेच्या कला अभ्यासक्रमाचा ध्यास घेतला होता – तो एम. आर. आचरेकरांच्या पुतण्याच्या बरोबर स्टुडिओत काम करायला जायचा. तो वाचणारा होता. त्यांना शेजार नारिंग्रेकरांचा होता. त्यांच्याकडेही पुस्तके असत. ती माणसेदेखील बहुश्रुत होती.
शशिकांतला वाचनवेड लागले, त्याचे आणखी एक कारण झाले. तो शाळेत होता तो काळ गिरणी संपाच्या तयारीचा. कामगारक्षेत्रात सर्वत्र उग्र वातावरण. आर.जे. मेहता, दत्ता सामंत यांच्यासारखे व्यक्तिनिष्ठ कामगारपुढारी तयार होऊ लागले होते. स्वाभाविकच, रोजच्या वर्तमानपत्रांत काय येते याचे औत्सुक्य सर्वत्र होते. शशिकांतला रोज त्याच्या वडिलांना, शेजा-या-पाजा-यांना सामुदायिकपणे पेपर वाचून दाखवावा लागे. त्यातच शशिकांतच्या स्वत:च्या व घरच्यांच्याही ध्यानी आले, की तो जवळजवळ एकपाठी आहे. गोष्टी, घटना त्याच्या सहजपणे स्मरणात राहतात व तो त्या गप्पागोष्टींत तितक्याच लीलेने वापरू शकतो. तो शाळा-कॉलेजमध्ये, अभाविपमध्ये व आता व्यवसायात अनेक मंडळींना गप्पाष्टकांत रमवून ठेवू शकतो, तेवढी विविधविषयांची तयारी, माहितीची अचूकता आणि बोलत राहण्याचा उत्साह त्याच्याकडे आहे. बोलकेपणा ही शशिकांतची जशी पॉझिटिव साइड होती, तसा त्याचा तरुणपणी सभोवतालच्या ‘खाडी गॅंग’मध्ये वावरही होता. तो प्रकृतीने शेलाटा होता तरी काटक होता. तो गॅंगबरोबर पाइपा-पाइपातून हिंडे-खेळे, उनाडक्यादेखील करे. त्याचे ते अनुभव हा स्वतंत्र विषय आहे. परंतु बहुधा त्या कारणामुळे वडिलांनी त्याला खारच्या बीपीएम स्कूलमध्ये टाकले. तो बदल शशिकांतला उपयोगी ठरला. गांधीबाई, फडकेबाई अशा लक्ष देणा-या शिक्षिका लाभल्याच, परंतु अनिरुद्ध फडके (य.दिं.चा मुलगा, आता प्रख्यात डॉक्टर), अजय गद्रे (आता स्वत:चा मोठा उद्योग) असे मित्र लाभले. त्यांच्याबरोबर अभ्यास, वाचन…शशिकांतला वळण मिळाले.

शशिकांतच्या जीवनात जो दुसरा टप्पा आला, तो म्हणजे त्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील (अभाविप) दिवस. ते जसे गडबडीचे होते, तसे चांगल्या संगतीचे होते. शशिकांत सांगतो, की कॉलेजात असताना त्याच्याकडे पार्ल्याचे क्षेत्र होते. तो खारहून सायकल दामटत पार्ल्याला जाई आणि घरोघरी संपर्क ठेवे. तेव्हापासून त्याचा विनोद तावडे वगैरेंशी संपर्क – म्हाळगी प्रबोधिनीमधील वावर. त्याने त्याच कार्याने भारून जाऊन पदवी प्राप्त झाल्यावर ‘अभाविप’चे पूर्णवेळ कार्य स्वीकारले व तो दोन वर्षे महाडला जाऊन राहिला. शशिकांतसारख्या बहुविध वाचणा-या माणसाला विश्वभान लवकर येते व त्याची मर्यादित विचार-वर्तुळात कोंडी होते. शशिकांत तेथून सटकला, त्याने काही काळ ‘महानगर’मध्ये नोकरी केली, पण त्याच्या जीवाला तो बंदिस्तपणादेखील मानवणारा नव्हता आणि त्याने ‘फ्री लान्स’ आयुष्य पत्करले.
शशिकांत गेली वीस-पंचवीस वर्षे ‘मुक्त’ आहे. तो जिज्ञासू आहे–अभ्यासक आहे. ते तो माणूस असल्याचे लक्षण आहे. त्याच्या ‘दुकाना’त तीन हजार पुस्तके आहेत–त्यांत विविध विषयांतील ज्ञान सामावलेले आहे. वाचकाने उच्चार करायचा अवकाश, तो त्या विषयातील दहा खास पुस्तके शेल्फातून काढतो व वाचकास पुरवतो. एकेका लेखकाचे खंडच्या खंड दाखवतो. त्यात सतत रमून असतो. त्या सोबत असते संगीत आणि चित्रकला. त्याने मला सांगितले, की पी.जी.वुडहाऊस याची एकूण ऐंशी पुस्तके आहेत, मी त्यातील साठ अमक्या अमक्याला दिली आहेत. छांदिष्ट, अभ्यासू वाचक-त्यांच्या गरजा आणि त्या पुरवण्याकरता शशिकांतने केलेले खटाटोप याच्या अनंत कहाण्या त्याच्याकडे आहेत. तो त्या रंगवून–रंगवून सांगतो.
शशिकांतच्या बोलण्यात सारखे येत होते, की दुकानात आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे जवजवळ सहा हजार पुस्तके त्याच्या घरी आहेत. मला औत्सुक्य होतेच. त्याचे घर दुकानापासून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर, चौथ्या मजल्यावर आहे. साधारण तीनशे-साडेतीनशे चौरस फुटांचे घर. त्याला गोडाऊनच म्हणायचे. कारण सारे घर पुढून-मागून पुस्तकांनी भरलेले होते. आम्ही दुकानातून त्याच्या घरी गेलो, तेव्हा जाताना एका रेस्टॉरंटमध्ये चहा घेतला. शशिकांत सारखा म्हणत होता, की ‘इथं फ्रेश व्हा- लॅटरीनला वगैरे जाऊन या’. त्याच्या त्या आग्रहाचे रहस्य घरी गेल्यावर कळले. त्याच्या घरातल्या संडास-बाथरूमचे कोपरेदेखील पुस्तकांनी भरून गेले आहेत! सराइतालाच तिथे आत प्रवेश करता येईल.
शशिकांत दाराला कुलूप लावत नाही. आम्ही गेलो, त्याने कडी बाजूला सारून दार उघडले, तर आतून एक गावठी कुत्रे बाहेर आले. शशिकांत म्हणाला, की त्यानेच त्याला पाळले आहे. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता. घरात बाहेरच्या खोलीत मध्यभागी लाकडी दिवाण–सभोवताली पुस्तकांचे ढीग–एका कोपर्यालत पुस्तकांच्या ढिगावर काही शर्ट-पॅंट्स अस्ताव्यस्त, चुरगळलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. शशिकांतच्या अंगात मात्र नीटनेटकी शर्टपॅंट होती. पूर्वीच्या काळी मार्क्सवादी मुलांची आंदोलने–चळवळी चालत. त्या मुलांचे राहणे असे अस्ताव्यस्त असे. ना त्यात वक्तशीरपणा आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव. त्या उलट रा.स्व.संघाचे तरुण कार्यकर्ते पक्‍क्या शिस्तीत व नीटेनेटके असत. शशिकांतचे वय सत्तेचाळीस आहे. त्याने लग्न केलेले नाही. तो म्हणाला, की ‘लग्न, संसार यांमध्ये बंध व बंधने, दोन्ही येतात. व्यक्तीच्या मुक्तत्वाला मर्यादा येतात. मला त्यात अडकायचे नव्हते. केव्हा केव्हा वाटले, लग्न करावे. पण मग बंधनांचा मुद्दा मनात पुढे येई. शेवटी, या उलटसुलट विचारांत लग्नाचे वय उलटून गेले.
शशिकांत खूप चालतो–रानावनात फिरल्यासारखा चालतो. त्याचे सुमारे तीनशे बांधील वाचक आहेत. त्यांना काय प्रकारची पुस्तके लागतात ते शशिकांतला माहीत आहे. शशिकांत तसे पुस्तक नजरेस पडले, की त्या वाचकास फोन करतो, मग पुढचा व्यवहार सुरू होतो. असे आमीर खान, सोनाली कुलकर्णीपासूनचे त्याचे वाचक आहेत. विशिष्ट वाचनाचे व पुस्तकखरेदीचे हे वेड कॉलेजच्या दिवसांत लागले असे तो सांगतो. “त्यानंतर मी निवडक स्वरूपात वाचकांना पुस्तके पुरवायचो, पण ‘महानगर’मधील नोकरीच्या वेळी माझ्या ध्यानी आले की नोकरीत आवश्यक असणारी शिस्त माझ्या अंगी नाही. मग मी पुस्तकशोध, खरेदीविक्री हा व्यवसाय सुरू केला. मला अलिकडे असे वाटू लागले आहे, की माझ्या या छंदाची संस्था बनली पाहिजे. म्हणून हे दुकान थाटले. माझ्याबरोबर चार तरुण–तरूणी काम करतात. असा कोणी हे व्रत पुढे चालवेल का असे मनात असते. पण कोणाची विचारणा आली, की मी पुस्तकाच्या शोधात व त्या वाचकाची ज्ञानतृष्णा शमवावी म्हणून धावत निघतो. ती ओढ कोणती आहे ते मला सांगता येत नाही, पण ती उपजत नाही–विकसित झाली हे जाणवते.”
शशिकांतचे ज्ञानसाधनेत रमणे मला ऋषिमुनींच्या तोडीचे वाटते. तो अखंड, गंभीरतापूर्वक विविध विषयांवर बोलत राहू शकतो. मी मध्येच त्याला विचारले, की कधी भावाकडे, नातेवाईकांकडे जावेसे वाटते का? तो म्हणाला, “हो. आजच संध्याकाळी जायचे आहे.” पण एकूण, मला तो भावनेच्या जगाबद्दल बोलण्यास फारसा उत्सुक दिसला नाही. त्याच्या भावविश्वी संगीत –ग्रंथ–चित्रकला यांतील व्यक्ती असतात. रेम्ब्रॉं त्याच्याशी बोलत असावा, बाख त्याच्याबरोबर भोजन करत असावा आणि अॅगाथा ख्रिस्तीचे बाउंड व्हाल्यूम्स त्याला झोपेत साथ देत असावेत. मला डॉ. श्रीराम लागू ‘परमेश्वराला रिटायर करा’ असे म्हणतात त्याची आठवण झाली. मी एका मुलाखतीत त्यांना विचारले होते, की केवळ बुद्धिवादी जीवन तर्ककर्कश, बुद्धिकठोर होणार नाही का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते, की बुद्धीच्या उच्च पातळीवरील भावनांचे जग हे माणसाचे व्यक्तिमत्त्व मृदुमुलायम बनवत असते. त्याला ताज्या फुलांच्या सुवासाची तरलता आणि पर्णांच्या कडांची सूक्ष्मता असते.
शशिकांतसमोर य.दि. फडके या ज्ञानसाधकाचे उदाहरण मूर्तिमंत होते. त्यांचा मुलगा अनिरुद्ध हा शशिकांतचा शाळासोबती. त्यामुळे शशिकांतचे फडक्यांकडे लहानपणापासून जाणेयेणे असे. मोठा शशिकांत यदिंशी पुस्तकशोधाबद्दल मोकळेपणाने बोलू शके.

शशिकांतला लेखन–संपादन हे विषयदेखील आवडते आहेत. त्याने काही मराठी मासिकांचे अंक संपादित करून दिले आहेत व ते नावाजले गेले आहेत. त्यांपैकी ‘श्रीदीपलक्ष्मी’चे दिवाळी अंक महत्त्वाचे. शशिकांत म्हणतो, की “मला विषय सुचत असतात. त्यावर कोणी लिहावे हेदेखील मनात तयार होते. मासिकांच्या संपादकांना असा तयार माल हवा असतो. माझ्या स्वत:च्या लेखनाला कुमार केतकर यांनी चोखंदळ वळण दिले. त्यांनी ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक असताना मला लेखन करण्यास सुचवले, मात्र तुझ्याजवळ बरीच सामग्री असते म्हणून भरताड लिहीत जाऊ नकोस असेही बजावले.”
शशिकांत त्याच्या मुख्यत: शोधक बुद्धीच्या गुणाने मुंबईच्या निवडक कॉस्मॉपॉलिटन विद्वान मंडळींत परिचित आहे. तो म्हणतो, की “आदिल जसावाला, रणजित भुस्कुटे व जैन भंडारी या इंग्रजी कवी–लेखक मंडळींचा ग्रूप होता. त्यांचे लेखन–वाचनाचे प्रयोग चालत. मी त्या ग्रूपच्या कोप-यावर बसे. त्यांना क्वचित कधी वेगळे पुस्तक दाखवी. त्यातून त्यांच्याशी ओळखी होत गेल्या.” शशिकांतने ‘टाइम’सारख्या साप्ताहिकातील लेखनासाठी येथील पत्रकारांना संशोधन सहाय्य केले आहे. सध्या त्याला त्याची आकार पटेलशी मैत्री आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. पटेल हा भारतातला विद्वान पत्रकार. त्यांचा ‘मिंट’मधील स्तंभ भारतभर चिकित्सेने वाचला जाई. आकारने शशिकांतच्या छांदिष्टपणाबद्दल एकदा लिहिलेदेखील आहे.
शशिकांत खातो काय–जेवतो कोठे हे विचारण्याचे धाडस मला झाले नाही. त्याने मला ‘बेस्ट कुसिने इन द वर्ल्ड’सारखा एखादा ग्रंथराज काढून दाखवला असता! आपण ऋषिमुनींच्या तपाच्या गोष्टी वाचतो–ऐकतो, एका पायावर उभे राहून बारा वर्षे नामजप वगैरे. शशिकांत गेली चाळीस वर्षे तसाच चालत आहे. त्याहून तेज त्याची बुद्धी चालत आहे…

शशिकांत सावंत – ९८२१७८५६१८
shashibooks@gmail.com

दिनकर गांगल

(‘आरोग्‍य-संस्‍कार’मासिकातून साभार)

Last Updated On – 27th June 2016

About Post Author

Previous articleनाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी
Next articleजयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.