शम्स जालनवी – कलंदर कवी

1
44

महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवीजालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण ऊर्फ शोला यांच्या नावाचा चौक शहरात आहे. त्याच शहरातील महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवी हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळ मुशायरे गाजवत आहेत.

त्यांच्या वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेलेली आहेत. जवळपास पावणेसहा फुटांची उंची, पांढरीशुभ्र दाढी… ‘शम्स’ यांची प्रकृती तंदुरुस्त आहे. ते रोज सकाळी पाच वाजता उठून सायकलवरून बसस्थानकात पोचतात. शहरभर सायकलवर फिरून उर्दू वृत्तपत्रवितरण करणे हा त्यांच्या चरितार्थाचा व्यवसाय. त्यांनी एका ऑईल मिलमध्ये नोकरी करून पाहिली, परंतु ते काही त्यांना जमेना म्हणून ते वृत्तपत्रवितरणाच्या कामास लागले. त्यांच्या दोन मुलांपैकी एक त्या व्यवसायात त्यांच्या मदतीला आहे. शम्स याचा अर्थ सूर्य. म्हणूनच बहुधा अरुणोदय होण्याच्या आधीच एवढ्या वयातही शम्स सायकल घेऊन जालना शहराच्या रस्त्यावर असतात!

शम्स यांनी शायरीत अधिक रस घेण्यास सुरुवात केली ती थोरल्या भावामुळे. तो शिक्षक होता. त्यांची पहिली रचना एका हिंदी मासिकात छापून आली, त्यास जवळपास पंचावन्न वर्षे उलटून गेली आहेत. ती आठवण ‘शम्स’ यांच्या मनात ताजी आहे.

जहर-ए-कातील है, अगर
हुस्न तो अमृत भी है
एक तवायफ की सोचो
वो औरत भी है। (१९५८)

त्यांचे वडील पहेलवान होते आणि तो कित्ता ‘शम्स’ यांनीही बालपणापासून गिरवला होता. त्यांच्या तंदुरुस्त प्रकृतीचे रहस्य शरीरसंपत्तीकडे बालपणापासून लक्ष दिलेल्या व्यायामातही आहे.

‘तमाजत’ (सूर्याची उष्णता) हा त्यांच्या उर्दू रचनांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तोच संग्रह देवनागरी लिपीत ‘मध्यान्ह का सूर्य’ या नावाने २००५ मध्ये प्रकाशित झाला. भावभावना, सुखदु:खांच्या आठवणी, विविध पातळ्यांवरील संघर्ष इत्यादींच्या कोलाहलातून मनात उमटणारे प्रतिबिंब ‘शम्स’ यांच्या रचनांमध्ये उमटलेले दिसते. अनेकदा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरील अनुभवविश्वास व्यष्टीकडून समष्टीकडे नेताना त्यास ते समर्थ, वजनदार आणि भारदस्त शब्दांची जोड देतात. रस्त्यावरच्या गर्दीत आणि कोलाहलात फिरतानाही ते स्वत:च्या जगण्यातील अर्थ शोधताना परखडपणे सांगून जातात की –

जर्द-जर्द चेहरे है जख्म दिलके गहरे है
वक्त है तमाशाई,
वो तसल्ली देते है जख्म पर नमक रखकर
खुब है मसाहाई!

(पिवळे चेहरे आणि काळजातील जखमा खूप खोलवर असून काळ आमचा तमाशा बघत आहे. ते तर खोटे दिलासे देताहेत आणि तेही जखमेवर मीठ चोळून! व्वा, काय पण उपचार आहेत!)

जीवनात कितीही अपेक्षा असल्या आणि आजच्यापेक्षा उद्याचा दिवस अधिक चांगला तसेच मनासारखा उजाडावा असे वाटत असले तरी तसे घडेलच असे नव्हे! जीवनातील संघर्षात एखाद्या वळणावरील अपयशानंतर कुणी सावरण्याचा प्रयत्न करत असेल तर आसपासची माणसे त्याला साथ देण्याची किंवा सहानुभूती व्यक्त करण्याची भूमिका बजावतीलच याबद्दल शाश्वती नसते. त्यामुळे एका ‘मुक्तका’त ते म्हणतात –

बिगडने को संवरने नहीं देती दुनिया
कश्ती से उभरने नहीं देती दुनिया
जख्मोंपर छिडकती है नमक हस हसकर
जख्मों को भी भरने नहीं देती दुनिया।

वर्तमानपत्रे विकतानाच वर्तमानाचे तटस्थपणे निरीक्षण करणा-या या कवीच्या मनात भूतकाळातील अनेक अनुभवांची जंत्री आहे. अनेकदा कळत असूनही माणूस इतरांकडून चांगल्या अपेक्षा करतो, त्याबद्दल ‘शम्स’ यांची पुढील रचना प्रसिद्ध आहे –

मेरा मन कितना पागल है
कांटोसे खुशबू की आशा,
जहर से जीवन मांग रहा है।
सुखे पेडसे छाया मांगे
पत्थर दिलसे माया मांगे
गुंगेसे वह प्यार की बोली
निर्धनसे धन मांग रहा है।
खुशबू कागज के फुलोंसे
ठंडक भडके हुए शोलोंसे
अंधोसे आंखोंकी ज्योती
और दर्पण मांग रहा है।

‘शम्स’ यांची ही रचना मुशाय-यात सर्वांची दाद आणि वन्समोअर घेऊन जाते. कारण ते त्यांच्या दर्दभ-या आवाजात ती रचना गाऊन सादर करतात. त्यांच्या आवाजातील दर्दभरी तलमता रचनेतील आशयाला गहिरेपण देते. दिल्लीतील अखिल भारतीय पातळीवरचा मुशायरा असो की जालना शहरातील गल्लीबोळातील एखाद्या दुकानातील दोन रसिक असोत, ‘शम्स’ यांना ती रचना सादर करण्याचा आग्रह होतो आणि तेही तेवढ्याच उत्साहाने ती पेश करतात. अनेकदा, त्यांच्या गीत, गझल किंवा मुक्तके या स्वरूपातील रचना या वैयक्तिक जीवनातील अनुभवांवर आधारित असल्या तरी श्रोत्यांना त्याच अनुभूतीची आठवण करवून देणा-या असतात! दिवसानंतर रात्रीचे येणे अपरिहार्य असले तरी ती अनेक आठवणी घेऊन येते हे सांगताना ‘शम्स’ म्हणतात –

सो गया सूरज, जागे तारे, आग लगाने आयी शाम
भुली-बिसरी याद दिलाकर मनको जलाने आयी शाम।
चांद का मुखडा, नैन रसिले रह-रहकर याद आते है
कट गया दिन तो जैसे-तैसे, फिर तडपाने आयी शाम।
किस को खबर थी, ये जालीम भी मेरे लहू की प्यासी है
मैं समझा था, लोरिया गाकर मुझको सुलाने आयी शाम।
किससे कहू मैं विपदा अपनी, सोने चले अब तारे भी
कल आऊंगी, जाते-जाते याद दिलाने आयी शाम।
‘शम्स’ गिले शिकवे रहने दो, मांग सितारोंसे भर दो,
ओढ के सर पे लाल चुनरिया, घुंघट ताने आयी शाम।
एकीकडे अशी रचना करणारे ‘शम्स’ स्पष्ट बोलताना म्हणतात-
चिराग-ए-आरजू-ए-दिल को भडकाने नहीं आता
हमे झुठी तसल्ली दे के बहलाना नहीं आता

रसिक श्रोत्यांच्या अंतर्मनास स्पर्शून जाण्याची क्षमता त्यांच्या रचनांमध्ये आणि तिच्या ‘तरन्नूम’मधील सादरीकरणात असते. एका रचनेत ते म्हणतात –

मोहब्बत हदसे बढ जाने पर
कोई गम नहीं होता
लगा दो आग पानी में
तो पानी कम नहीं होता
हमेशा चढते सूरज की ही
पूजा ‘शम्स’ होती है
बिगड जाती जब किस्मत
कोई हमदम नहीं होता

जीवनातील नकोशा असणा-या अनेक आठवणी मनात घर करून राहतात आणि त्यांना बेचैन करतात. त्या अनुभवातून ते निराश होत नाहीत तर नव्या उभारीने जगण्यासाठी परमात्म्याकडे पुढील मागणी करतात –

शिशा हूं, पत्थर का जिगर दे अल्लाह
फिरसे मुझे जीने का हुनर दे अल्लाह

जीवनाविषयी आशावाद ठेवून परमात्म्याकडे ते सहन करण्याची आणि त्याचप्रमाणे ते जगण्याची कला मागणारे ‘शम्स’ कधी-कधी इतरांना समजुतीने वागण्याचा सल्लाही देतात –

सबको मनकी बात बताना ठीक नहीं,
बदनामी का पेड लगाना ठीक नहीं।
प्यार के फुले-फले रिश्ते आबाद रहे,
आंगन मे दिवार उठाना ठीक नही।
इन्साँही इन्सानों के काम आता है,
कर के फिर एहसान जताना ठीक नहीं।
हिम्मत है तो जुल्म का सीना चाक करो,
कमजोरों पर हाथ उठाना ठीक नहीं।
शौकसे तुम दिनरात मनाओ रंगरलीयां,
बंद कलींको फूल बनाना ठीक नहीं।
रौंदी हुई राहों को मूडकर मत देखो,
बीती बातों को दोहराना ठीक नहीं।
देखो दुनिया को दुनिया की नजरसे,
होशमें आओ ‘शम्स’ जमाना ठीक नहीं।

दैनंदिन जीवनात विश्वासघाताचे आणि ज्यांच्यावर भरवसा ठेवला त्यांच्याकडूनच फसवणूक झाल्याचे अनुभव आलेल्यांना ‘शम्स’ यांची पुढील रचना विचार करायला लावण्यावाचून थांबवू शकत नाही.

फरेब देने लगे जब मेरे ही साथ मुझे
किसी के प्यार का कैसे यकीन आये मुझे।
मेरी तो उम्रही कांटोमें सरबसर गुजरी
न रास आये चमन के गुलों के साए मुझे।
उसे भी दौरे तरक्की की देन ही समझो
पराए अपने तो अपने लगे पराए मुझे।

शम्स स्वातंत्र्यपूर्व काळात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे पुढील शिक्षण कराचीत झाले.

‘शम्स’ स्वत:च्या मर्यादांची जाणीव नम्रपणे व्यक्त करताना म्हणतात –

तेरे चेहरे का भरम खुल जाएगा
राह में आइनाखाने बहुत।
‘शम्स’ रखिए अपनी चादर का खयाल
लग गए तुम पाँव फैलाने बहुत।

असा हा जालना शहरातील कलंदर कवी! कायम उत्साहात असणारा, उर्दू शायरीवर भरभरून बोलणारा. अतिशय साधेपणाने जगणारा आणि सायकलीवर फिरणारा. ‘शम्स’ यांचे साधेपण व्यक्त करायचे तर त्यांच्याच पुढील रचनेचा आधार घेता येईल –

मुझे पुछते है वो इस तरह मेरा नाम ले के गैरसे
सर-ए-शाम क्या वही ‘शम्स’ था जो अभी यहांसे गुजर गया।

(शब्द रुची, जानेवारी २०१४ अंकावरून)

लक्ष्मण राऊत
१५, शांता-गोंविंद अपार्टमेंट्स,
डबलजीन, जालना ४३१२१३
९४२२७९६४७३
laxmanr1234@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. नमस्कार. ” शम्स ” या जालना
    नमस्कार. “शम्स” या जालना शहरातील अवलिया कवीचा नितांत बोलका परिचय दिला, खूप समाधान वाटलं. शायरीतील निवड ही नेमकी, प्रतीनिधिक, बोलकी ,अर्थपूर्ण आणि परिणामकारक. अभिनंदन. शायरीतील अनुस्वार, नुखते याकडे अधिक लक्ष दिले जावे अशी अपेक्षा आणि विनंती.
    असे खजाने आणखी घ्‍यावेत.

Comments are closed.