शम्मीकपूरचा संदर्भ

0
37

–  दिनकर गांगल

हिंदी चित्रपटांकडे बारकाईने पाहिले तर त्‍यांमधून समाजस्थिती फार चांगल्‍या पद्धतीने व्‍यक्‍त झाली असल्‍याचे लक्षात येईल. ही गोष्‍ट जुनी असली तरी शम्‍मीकूपरच्‍या उदयानंतर ही बाब ठळकपणे लक्षत येऊ लागली. पुढे राजेश खन्‍ना, अमिताभ बच्‍चन ही मंडळी प्रसिद्ध झाल्‍यानंतर त्‍यात ठामपणा आला. समाजशास्‍त्रज्ञ आणि विचारवंतांकडूनही त्‍याची दखल घेतली जाउ लागली. ‘तुमसा नही देखा’ या शम्‍मीकपूरच्‍या पहिल्‍या चित्रपटातील त्‍याच्‍या प्रतिमेचा संदर्भ घेऊन दिनकर गांगल यांनी धावती चर्चा केली आहे.

–  दिनकर गांगल

 

     भारतातील समाजस्थिती आणि हिंदी चित्रपटांतील तिचे दर्शन हे समीकरण जुने आहे. पण शम्मीकपूरच्या उदयानंतर, ते ठळकपणे लक्षात येऊ लागले आणि राजेश खन्ना व अमिताभ बच्चन गाजू लागल्यावर त्यात ठामपणा आला; समाजशास्त्रज्ञ, विचारवंत त्याची दखल घेऊ लागले.

 

     शम्मीकपूरचा गाजलेला पहिला चित्रपट- ‘तुमसा नही देखा’! तो 1957 साली प्रदर्शित झाला. नायिका होती अमिता. ती पुढे फार गाजली नाही. गळ्यात तांबडा रुमाल अडकावून मुलींच्या मागे फिरणारा, विशेषत: आपल्याला हव्या त्या मुलीला (नायिकेला) ‘पटवणारा’ शम्मीकपूर हा पहिला हिरो! तोपर्यंत नायिका नायकासाठी झुरत. येथे अमिता ताठर आहे, सहज भुलणारी नाही, पण शम्मीकपूर अंगविक्षेप करत (पुढे त्याची ती ‘स्टाइल’ झाली), नाचत-बागडत-विहरत तिच्यामागून जात म्हणतो, ‘यु तो हमने लाख हसी देखे है – तुमसा नही देखा.’ शम्मीकपूर त्यावेळी उच्च वर्गातील रसिकांना सहन होणे शक्य नव्हते. तसेच झाले. दिलीपकुमार-राजकपूर-देवानंद यांची ‘रूपे’ ठरून गेली होती. ती आमप्रेक्षकांना गळ्यातील ताईत वाटत. राजेंद्रकुमार आणि अन्य छोटे-मोठे नट त्यांच्या ‘कॉप्या’ करत होते, परंतु शम्मीकपूरने त्या त्रयीला यशस्वी शह दिला. त्या काळात समाजाची सरमिसळ सुरू झाली होती. उच्च वर्गाची मिरास नष्ट होत होती. तळचे वर्ग जागे होऊ लागले होते. त्यांच्या ‘अॅसर्शन’चे प्रतीक शम्मीकपूरची इमेज बनली, तीच एकमेव प्रबळ समाजशक्ती त्यावेळी तयार होत होती. त्यास नंतरच्या काळात ढोबळपणे ‘ओबीसी’ म्हटले जाऊ लागले.

 

     त्या आधीची त्रयी -राजकपूर, दिलीपकुमार व देवानंद ही दत्तासारखी होती. दिलीप शोकात्मता व्यक्त करत होता, राजकपूर नेहरुयुगाचे दर्शन, म्हणजेच सामाजिक भान घडवत होता आणि देवानंद गुलजार तरुणाची प्रतिमा, त्यांनी खूप काळ प्रेक्षकांवर राज्य केले, कारण त्यावेळी स्वातंत्र्योत्तर भारत घडत होता. त्याआधी ‘प्रभात’चे चित्रपट सामाजिक जागृतीचे असत, तर ‘न्यू थिएटर्स’चे प्रणयरम्य, कलासंकेतांचे अभिजात रूप प्रकट करू पाहणारे.

 

     शम्मीकपूरपाठोपाठ ठळकपणे पुढे आली राजेश खन्नाची इमेज. त्यावेळी ‘करिश्मा’ हा शब्द प्रचलित झाला. तो समाजामध्ये भ्रमनिरासाचा काळ आहे. पंचवार्षिक योजना व नेहरूंचे धोरण यांमधून काही घडत नाही हे जाणवून देणारा. त्यामुळे राजेश खन्नाने ‘आराधना’ व अन्य चित्रपटांतून प्रणयरम्य भावमुद्रा तयार केली, ज्यामध्ये अवघा भारत काही वर्षे पूर्ण गुंगून गेला होता! के.डी.गोरवाला यांच्या ‘ओपीनियन’नेदेखील त्यावेळी राजेश खन्नावर स्फुट लिहिले. असा त्याचा तो महिमा! त्याला यथार्थ छेद दिला अमिताभ बच्चनने. जर भारतातील 1970 नंतरचा ‘मूड’ आठवला तर संतप्त तरुणाची ती इमेज डोक्यात रास्त रीतीने तयार होईल. अमिताभला ना चेहरा, ना मोहरा. तो ‘आनंद’मध्ये किती सर्वसामान्य आहे! परंतु ‘जंजीर’ने त्याला प्रतिमा दिली. अमिताभने चित्रपटातील लोकप्रियतेची सारी गणिते पुसून टाकली, त्याचा संतप्त तरुण ते ‘कौन बनेगा करोडपती’मधील पोक्त गृहस्थ ही इमेज म्हणजे टिपिकल भारतीय गृहस्थजीवनाची स्वप्नवत प्रतिमा आहे.

 

     त्यानंतरचे शाहरुखखान ते अक्षयकुमार यांनी पुन्हा सद्यकालीन जीवनाची सरमिसळ व त्यातील अपेक्षा-आकांक्षा- निराशा-वैफल्य व्यक्त केलेले दिसेल.

 

     हिंदी सिनेमांच्या तपशिलात गेले तर समाजस्थिती खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त झाल्याचे दाखवता येईल. उल्हासनगरचा आमदार पप्पू कलानी याचे संस्थान मोडून काढले गेले व त्यास पळून जात असताना पोलिसांनी दादर स्टेशनच्या बाहेर फोनबूथवर अटक केली, त्याचे वर्तमानपत्रांतील वर्णन म्हणजे हिंदी सिनेमामधील गुन्हेगारीची तंतोतंत प्रतिकृती होती.

 

     येथे नटांच्या प्रतिमेच्या अंगाने समाजस्थितीच्या प्रकटीकरणाची त्रोटक, धावती चर्चा केली असली तरी त्या प्रतिमांचे कर्ते लेखक-दिग्दर्शक असतात. आपल्याला अमिताभमुळे सलिम जावेदचे नाव कळते तेवढेच. ‘तुमसा नही देखा’- मधील शम्मीकपूरच्या प्रतिमेचे आकलन असे मला झाले व तो संदर्भ घेऊन मी एक पट मांडला.

दिनकर गांगल – भ्रमणध्वनी: 9867118517, इमेल: thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleराष्ट्रगीताबद्दल अपप्रचार चुकीचा
Next articleहल्ला संविधानावर !
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.