शंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना

_ShankarBalvantPandit_1_0.jpg

शंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.

शंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.

पंडित स्वत: आणि त्यांची मुलगी सौ. अलका श्रीखंडे यांनी मिळून ‘मैना फाउंडेशन’ची स्थापना 2008 मध्ये केली आहे. फाउंडेशन शंकररावांच्या पत्नी शैलजा यांच्या स्मरणार्थ निर्माण करण्यात आले आहे. फाउंडेशनचा उद्देश विशेषत: ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी दक्षता घेणे व ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या महिलांना उपचारासाठी मदत करणे हा आहे. फाउंडेशनचे कार्य अमेरिकेत; तसेच, भारतातही चालू आहे. कॅन्सर रुग्णांना भारतात मातृसेवा क्लिनिक – नागपूर, लायन्स सर्व्हिस सेंटर – कोपरखैराणे (नवी मुंबई), टाटा मेमोरियल हॉस्पिटल – परळ आणि सोमय्या हॉस्पिटल-सायन (मुंबई) यांच्या सहयोगाने मदत करण्यात येते.

शंकर पंडित यांना चित्रकलेचाही छंद आहे. त्यांच्याकडे काही विद्यार्थी चित्रकला शिकण्यासाठी येतात. शंकरराव त्यांना चित्रकला शिकवण्याचे काम आवडीने करतात. त्यांच्या सर्व पुस्तकांवरील मुखपृष्ठे, त्यांनी व त्यांची मुलगी अलका यांनी तयार केलेली आहेत. त्यांनी स्वतः पुस्तकाच्या आतील रेखाटनेदेखील काढली आहेत. त्यांनी काढलेली काही स्केचेस त्यांच्या हॉलमध्ये पाहण्यास मिळतात.

त्यांनी पहिली कविता 1939 साली केली. त्यांच्या कवितेच्या छंदाची सुरुवात मनोवेधक रीतीने झाली आहे. त्यांच्या लहान बहिणीला शाळेत म्हणण्यासाठी एक गाणे तयार करून द्यायचे होते. तिने भावाला कविता रचण्याचा आग्रह केला, तेव्हा शंकररावांनी तिला तिच्या सगळ्या शिक्षकांची नावे लिहून काढण्यास सांगितले. पंडितांनी ती सगळी नावे लयीत बसवून त्यांवर आधारित अशी रचना केली. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा आहेत…

कानविंदे, एकबोटे, डोंगरे, टोकेसर,

उपेंद्र हाटेकर, प्रभाते, विरकर… अशा होत्या.

त्यांची ती पहिली रचना होय. त्या कवितेला शाळेत प्रथम पारितोषिक तर प्राप्त झालेच, पण सर्व शिक्षकांच्याकडून पंडित यांचेही कौतुक झाले. ती शाबासकीची थाप पुढील काव्यप्रवासासाठी प्रोत्साहन देणारी ठरली. त्यानंतर कॉलेजमध्ये पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पॅरिस फिलहार्मनी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला. त्यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळी भूपाळी तयार केली. ‘हा धुंद रानवारा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांमध्ये अंतर्गत लय आहे. ‘दिवलान’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना देताना विवेक दिगंबर वैद्य यांनी म्हटले आहे, की “त्यांच्या ‘दिवलान’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये शब्दांचा चकवा आहे, अर्थांचे विभ्रम आहेत, तरल भावभावनांचा नाद आहे. ठसठसणाऱ्या वेदनांना खडबडून जागे करणारी बोच आहे, काहीतरी गमावल्याची सल आहे. हळव्या वृत्तीने व्यक्त होताना वाचकांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाशी जोडू पाहणारे नातेदेखील आहे. ते फक्त संबोधनाने कवी नाहीत तर ते मनाने कवी आहेत.” या वर्णनाचा प्रत्यय त्यांच्या इतर काव्यसंग्रहांतील कविता वाचतानादेखील जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या काव्यात असलेल्या अंतर्गत लयीमुळे वाचकांना त्या कविता अधिकच गोड वाटतात. त्यांच्या ‘या सरींनो या’ या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता ‘आजचा दिवस’, या कवितेच्या सुरुवातीच्या काही ओळी आहेत..

मी सुवर्णाने आभाळ सजवीत आलो

फुलत्या कळ्यांचा गंध उधळीत आलो

वनी रानवाऱ्यास मी झुलवीत आलो

उगवत्या उषेचे गीत मी गात आलो

पंडित यांची लेखनसंपदा अफाट आहे. त्यांची काव्यसंग्रह व भाषांतरे मिळून एकूण वीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे सहाशे कविता केलेल्या आहेत व पंचवीस कथा लिहिल्या आहेत. त्यांचा मानस वर्षाला किमान दोन पुस्तके प्रकाशित करण्याचा आहे. त्यांनी रामदास स्वामी यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक, तसेच दासगणू महाराजांचा ‘गजानना विजय’ या ग्रंथांचे इंग्रजी रूपांतर केले आहे त्याखेरीज त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची विवाहपद्धत, कालिदासाच्या मेघदूत काव्य यांचे  इंग्रजी भाषांतर केलेले आहे. त्यांचे ‘हा धुंद रानवारा’, ‘कधी कधी’, ‘भरजरी लावण्या’, ‘निबोरीच्या सरी’, ‘हिसका तुळशीचा’, ‘शेला ढगांचा’, ‘सल’, ‘जोगीणी’, ‘वेल जांभळी’, ‘साधेच शब्द दोन’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘जीवनवेल’ इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे आगामी काव्यसंग्रह ‘थवा काजव्यांचा’ व ‘सुगरणीचे घरटे’ हेदेखील लवकर प्रसिद्ध होत आहेत.

त्यांची तब्येत सुदृढ आहे, त्याबाबत ते म्हणतात, की उदंड आयुष्य हे त्यांच्या घराण्याला मिळालेले वरदान वंशपरंपरागत आहे. त्यांचे आजोबा नव्याण्णव वर्षांपर्यंत होते. वडील व आई दोघेही शहाण्णव वयाच्या वर्षांपर्यंत होते. त्यांनी तब्येतीसाठी मुद्दाम कोणताही व्यायाम अथवा योगासने केलेली नाहीत. माफक आहार व शाकाहार इतकेच पथ्य त्यांनी पाळलेले दिसून येते. सरांची दोन्ही मुले, मुलगी अलका श्रीखंडे व मुलगा विक्रम पंडित ही अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा विक्रम पंडित यांनी सुमारे 2008 पासून जेव्हा सिटी बँक डबघाईला आली होती त्यावेळी केवळ नाममात्र एक डॉलर प्रतिवर्षी वेतन घेऊन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदावर काम केले व ती बँक नफ्यात आणली.  

पंडितसर वर्षातून चार महिने मुंबईतील घरी एकटे राहतात. इतर वेळी ते अमेरिकेत त्यांची मुले, नातवंडे या परिवारासोबत रमतात. शंकर पंडित यांना पाहिल्यानंतर त्यांना शतायुष्यापेक्षाही जास्त आयुष्य लाभो अशी प्रार्थनादेखील पूर्ण होईल याचा विश्वास वाटतो.

ते सर्वाना असा संदेश देतात की –

हसते रहो, हसाते रहो

जो कुछ कर सकते लोगोंके लिए

वो करते रहो

– सुरेश कुलकर्णी

About Post Author

Previous articleअभिमान गीताचे सातवे कडवे
Next articleमी शैलेशसर
सुरेश यशवंत कुलकर्णी हे मुंबईमधील कुर्ला भागातील रहिवासी आहेत. त्यांनी एम. कॉम, जी. डी. सी. अॅंड अे. चे शिक्षण घेतले आहे. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे विभागीय लेखाकर आहेत. त्यांना कथा, काव्यलेखनाचा छंद आहे. त्यांचे काव्यवाचन, भाषण, निवेदन आकाशवाणीवर प्रसारित झाले आहे. ते काव्यंजन या नावे स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रमही सादर करतात. कुलकर्णी यांचा माझी काव्य गंगा नावाचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला आहे व पिंपळपान नावाचा दुसरा काव्यसंग्रह एप्रिल 2018 मध्ये प्रकशित होत आहे. लेखकाचा दूरध्वनी 9323425508