शंकर खाडे यांचा बेडगला मुक्त गोठा

_Shankar_Khade_Gotha_2.jpg

मी दुग्धव्यवसायात विविध पदांवर कामे पस्तीस-छत्तीस वर्षें करून सेवानिवृत्त झालो आहे. मी मला सेवानिवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम जनावरांच्या मुक्त गोठ्यात गुंतवली आहे. मला त्या रकमेवर बँकेतून परतावा मिळाला असता त्यापेक्षा जादा परतावा उत्पन्न स्वरूपात नियमितपणे मिळू लागला आहे. त्याशिवाय आरोग्य-स्वास्थ्य आहे, वेळ कसा घालवायचा ही चिंता राहिलेली नाही. हे सारे मला ऐंशी जनावरांच्या मुक्त गोठ्यातून मिळते!

मी दुग्धव्यवसाय विभागात कृषी अधिकारी म्हणून १९८४ ते २००५ या कालावधीत कार्यरत होतो. माझे कार्यक्षेत्र दापचरी, पालघर व आरे मिल्क कॉलनी येथे होते. माझ्याकडे कृषी विभागात दुग्ध विभागाकडील पशुधनाच्या विविध जातींच्या गायींना चारा पुरवठा करण्याचे काम होते.

मी स्वतः कृषी पदवीधर आहे. आरे दुग्ध वसाहत येथे सलग चौदा-पंधरा वर्षें वैरण विभागात व दुधाळ जनावरांचे संगोपन या विभागात काम केल्याने जनावरे संगोपनाची खास गोडी निर्माण झाली. मी शासकीय दूध योजना, मिरज येथे जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी तथा महाव्यवस्थापक या पदावरही २००५ ते २०१० या कालावधीत काम केले. नंतर निवृत्तीपर्यंत म्हणजे २०१६ पर्यंत कोल्हापूर येथे जिल्हा दूध विकास अधिकारी म्हणून काम केले. त्या कालावधीत कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादकांशी संपर्क आला. दुग्धव्यवसायाची आवड होतीच. त्यात खास करून वासरू संगोपन या विषयात रस घेतला. सेवेत असतानाच वडिलार्जित जमिनीवर पत्नीच्या सहकार्याने थोड्या फार प्रमाणात वासरू संगोपन सुरू केले. पंधरा-वीस जनावरे त्यातून तयार झाली. तो माझ्या मुक्त गोठा व्यवस्थापनाचा पाया ठरला.

शेतकरी जनावरामध्ये काही दोष असेल तरच गोठ्यातून जनावर विक्रीसाठी काढतो. कोणीही शेतकरी चांगले, दूध देते, जातिवंत जनावर, कितीही अडचणीत आला तरी विक्रीस काढत नाही. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच बाजारातून जनावर खरेदी करायचे नाही असे ठाम ठरवले. ते माझ्या यशस्वी गोठ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.

माझ्याकडे एकूण लहान-मोठी ऐंशी जनावरे आहेत. सहा महिन्यांखालील पंचवीस वासरे आहेत. सहा महिन्यांवरील पंचवीस वासरे आहेत. प्रत्येक गाय बावीस लिटरपर्यंत सकाळ-संध्याकाळी दूध देते. पन्नास वासरांतून दोन वर्षांत नवीन पन्नास गायी दुधावर गोठ्यात दाखल होतात. मी संपूर्ण गोठा ‘मुक्त गोठा’ म्हणूनच विकसित केला आहे. माझ्याकडे तीस दुधाळ गायी आहेत. दररोज सरासरी सव्वातीनशे लिटर दूध संकलन होते. गोकुळ डेअरी दूध जागेवरून येऊन घेऊन जाते.

गोठा व्यवस्थापनात दोन प्रमुख बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. एक वैरण आणि दुसरे मनुष्यबळ. मी माझ्या अनुभवातून त्या दोन्ही गोष्टी हाताळण्यास शिकलो. मुक्त गोठा पद्धतीमुळे मजूर खर्चात मोठी बचत झाली आहे. गोठ्यात जनावरांचा मुक्त संचार असतो. त्या ठिकाणी जनावरांना पुरेसे पाणी, गवाणीत वैरण उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वैरण घालणे, पाणी पाजणे, शेणघाण काढणे यावरील खर्च कमी झाला आहे. जनावरांचा वावर मुक्त असल्याने ती आरोग्यसंपन्न राहतात. त्यांचे रोगराईचे प्रमाण कमी होते.

_Shankar_Khade_Gotha_1.jpgगोठ्यातून नफा कमावयाचा असेल तर वैरण ही तुमच्या शेतातीलच असली पाहिजे हे सूत्र महत्त्वाचे आहे. मी अनेक प्रयोग त्यासाठी केले आहेत. बेबी कॉर्न मक्याची लागवड अलिकडच्या काळात जास्त प्रमाणात केली जात आहे. दोन महिन्यांत कणसे काढली जातात. त्याचे सरासरी एकरी तीस हजार रुपये मिळतात. उर्वरित वैरण गोठ्यासाठी वापरली जाते. बेबी कॉर्न मका फारच किफायतशीर ठरतो. त्याशिवाय हाइड्रोपोनिक्स (जमिनीशिवाय केवळ पाण्यावर वनस्पती वाढवणे), आझोला, मुरघास गवत यांच्या निर्मितीचे नियोजन केले. दर दिवशी प्रत्येक जनावराला दहा किलो ओली वैरण मिळते. वैरणीचे नियोजन पाच एकर क्षेत्रांवर केले आहे. बेबी कॉर्न मका, ऊस, नेपिअर गवत अशी सहाशे किलो वैरण त्यातून मिळते. 

हाइड्रोपोनिक्स केंद्रातून, तसेच शेतीतील विविध वैरण पिकातून पन्नास टन ओल्या वैरणीचे मुरघास साठवण केंद्र तयार केले आहे. गोठ्यात जागोजागी सॅलेज बॅगमध्ये वैरण साठवून ठेवलेली आहे. त्याशिवाय प्रती जनावरास दोन ते अडीच किलो आझोला शेवाळयुक्त गवत मिळेल, असेही नियोजन केले आहे. त्यामुळे आमचा भाग दुष्काळी असूनही ओल्या वैरणीअभावी जनावरांच्या दुधावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. मुक्त गोठ्यात जनावरांच्या पायात ठरावीक कालावधीने ऊसाचा पाला टाकल्याने चार-पाच महिन्यांत उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय खत तयार होते. त्याचे आम्ही गांडूळ खत तयार करतो. ते आमच्या शेताला वापरतो.

प्रकल्पावर चार मजूर कायम स्वरूपी कामावर आहेत. शिवाय, आम्ही नवरा-बायको एकूण सहा एकरांवर व्यवस्थापन करतो. वैरणीचे नियोजन स्वतःचे असल्याने दूध विक्री, शेणखत विक्री यांमधून मिळणारे उत्पन्न विचार करता गोठा व्यवस्थापन चांगले आणि फायदेशीर आहे.

आमच्या प्रकल्पाला वासरू संगोपन, गोठ्यावर जनावरे तयार करणे अशी अंदाजे तीस लाख रुपये गुंतवणूक करावी लागली असती. मी स्वतः सेवानिवृत्तीच्या आधीच वासरू संगोपन सुरू केल्याने सेवानिवृत्तीच्या पैशातून कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपयांत प्रकल्प उभा राहिला आहे. 

मी या प्रकल्पामुळे सदैव कार्यरत असतो. प्रकल्पावर वेळ कसा जातो, तेच कळत नाही. सतत जनावरांच्या सान्निध्यात राहिल्याने आरोग्याची कोणतीही समस्या नाही.
– शंकर धोंडिबा खाडे, 9730448855
 

About Post Author

1 COMMENT

  1. sir mala jast varsh gavt…
    sir mala jast varsh gavt chlanare chara pik lavayache ahet nepiar gavt / gini gavat yanchi lagvad karayachi ahet pn mala kate naslele gavat pahijel sir mazha contact no.-9112015399 /7391852367. pimpalgav Basvant, tel. Niphad, Dist. Nashik

Comments are closed.