विनोद कुमरे यांचा आदिवासी बाज!

आदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी आदिवासी कविता आदिवासींच्या चळवळीसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहिली जात होती, त्यात लिहिणाऱ्या कवींची संख्याही लक्षणीय होती. पण ती कार्योपयोगी व मोहिमेचा भाग असल्याने तिचा कविता म्हणून हृदयस्पर्शी विचार झाला नाही. भुजंग मेश्रामने त्याच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहाने आदिवासी कविता ही एक वाङ्मयीन आविष्कार म्हणून वाचक-रसिकांच्या लक्षात आणून दिली. त्यापाठोपाठ कवी म्हणून विनोद कुमरे यांच्या ‘आगाजा’ संग्रहाची नोंद घेतली जाते. आगाजा म्हणजे आवाहन. त्या संग्रहाला कणकवली येथील ‘आवानओल प्रतिष्ठान’चा ‘कवी वसंत सावंत स्मृती’ ‘उगवाई’ पुरस्कार २०१५ साली मिळाला. आदिवासी कवीला पहिल्यांदाच असा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुमरे यांच्या एकूण लेखनकार्याबद्दल वर्धा येथील ‘जंगलमित्र’ या संस्थेने त्यांना २०१६ चा ‘डॉ. मोतीरावण कंगाली’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. संस्था आदिवासी अस्तित्व व अस्मिता यांसाठी सामाजिक चळवळ चालवते.

प्रसिद्ध कवी, समीक्षक चंद्रकांत पाटील कुमरे यांच्या कवितेच्या निमित्ताने लिहितात, “मराठी आदिवासी कवितेची प्रेरणा दलित कवितेपासून वेगळी आहे. निसर्ग हा तिचा आत्मा आहे. मानव हा निसर्गावर विजय मिळवणारे नायक नसून निसर्ग मानवाचा एक अतूट भाग आहे अशी तिची धारणा आहे. निसर्गापासून तुटणे म्हणजे माणसाने त्याच्या अस्तित्वापासूनच ढळण्यासारखे आहे. आदिवासी कविता विस्थापितांच्या वेदनेची कविता आहे. आधुनिकीकरणातून येणारे नागरीकरण आणि जागतिकीकरण यांच्या झंझावातात आदिवासी पाळेमुळे टिकवून कशी ठेवायची, त्यांच्या अस्तित्वाचे विघटन कसे थांबवायचे हा तिच्यासमोरचा पेच आहे. अशा मूलभूत प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न विनोद कुमरे यांच्या कवितांतून दिसून येतो. कवितेतील चिंतनशीलता फक्त समाजापर्यंत, समुहापर्यंतच मर्यादित नाही. तिने व्यक्तींच्या समुहातील नेमक्या नात्याचाही विचार केलेला आहे. कुमरे यांनी त्यांच्या पहिल्याच संग्रहात आशय, अभिव्यक्ती आणि रूपबंध यांवर मिळवलेला ताबा प्रशंसनीय आहे.” त्यांच्या कवितेचा आशय आदिवासी अस्तित्वाची ओळख हा आहे असे म्हणता येईल. ते म्हणतात – ‘स्वातंत्र्य, समता, बंधुत्त्वाच्या संकल्पनेत तो शोधतोय आपले हरवलेले स्वातंत्र्य.’ कुमरे यांना ते स्वातंत्र्य ‘अरण्या’त आढळते. त्यांना नागर संस्कृतीतदेखील ‘अरण्या’ची ओढ आहे. जगभर पसरलेले अरण्य हेच मानव संस्कृतीचे अधिष्ठान होते व आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यांचे हे अरण्य अनेक कवितांत विलोभनीय रीत्या भेटते.

त्यांनी अभिव्यक्तीमध्येही नवता आणली आहे. त्यांच्या अनेक कविता तुकड्यातुकड्यांनी बनलेल्या आहेत. तो प्रत्येक तुकडा अनुक्रमाने येतो. तो तुकडा स्वतंत्र आहे व एकत्र बांधलेला देखील आहे. त्यांची शब्दयोजना नागर व आदिवासी अशी संमिश्रता घेऊन येते.

 

(रिप्लाय : एक

हाय बाई येरम्मा येरमई (हेरम्बा हिडिम्बा हेडंबा)
राजेकुमारी लर्कांन्याचे विरंगणे बाई
तुया मोबाईल आऊट ऑफ रेंज
म्हुण वॉट्सअपवरचं लेयते मेसेज
सांगते मनातली गोस्ट
आपल्या मातृसत्ताक व्यवस्थेचे आभार
भाऊ लर्कानेश्वराचा बी लय आधार
म्या करावं मंते मर्मिंग
द्यावं मंते आयुष्याले टर्निंग
म्हुण म्या फिरत अस्ते वनात
काळा-गोरापण अस्तो माणूसच)
तिचा रूपबंध मात्र मुक्तछंद कवितेचा आहे.
“आता आयुष्यातील कुठल्याही क्षणांना
क्लिक आणि डाऊनलोड करता येतं
पण अरण्या, तुझ्या गर्भातल्या वेदनेला
आणि तू आरंभलेल्या मूकपणाला
कुठलीही निगेटिव्ह बंदिस्त करू शकणार नाही
हजारो वर्षांपासून घडत आलेलं अरण्यकांड
माणसानं माणसाच्या संस्कृतीसाठी क्रूरपणे आरंभलेली रक्तक्रांती
महाकाव्याच्या नावाखाली खपवून घेता आली जगाला
अमेरिका काय भारत काय आफ्रिका काय?
अरण्यबेट लुटलं जातंय तेव्हाही नि आत्ताही”

कुमरे यांच्या ‘आगाजा’तील कविता वाचताना त्यांच्या कवितेत एक विशिष्ट लय जाणवते. कवितांत आदिवासी सामाजिक-सांस्कृतिक व ऐतिहासिक जीवनाचे येणारे संदर्भ कळत असले किंवा नाही कळाले तरी वाचकाला अस्वस्थ करून जातात. आदिवासी भावजीवनाचे अदृश्य पदर एकेक उलगडत जातात. आदिवासींच्या आधुनिक सामाजिककरणाच्या नावावर जागतिकीकरण, औद्योगिकीकरण त्यांच्या विस्थापनाला कसे कारणीभूत ठरले, आदिवासी वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा नागवला गेला त्याचे मार्मिक दर्शन कुमरे यांच्या कवितेतून होते. आदिवासींच्या अरण्यजीवनाशी ही कविता एकनिष्ठ आहे किंवा अरण्य आदिवासींच्या जीवनातून वेगळे करता येत नाही हा या कवितेचा भाव आहे.

 

 

“अरण्या, तुझीही आखली जाताहेत शहरं
जोडले जाताहेत डांबरी रस्ते बिनधास्त
शहरीकरणाच्या प्रक्रियेत तुझाही आराखडा
मांडला जातो धुराड्याच्या चिमण्यांसह
नि घडवले जाताहेत पुन्हा पुन्हा जागतिकीकरणाचे बलांट”

कुमरे यांची कविता ही आदिवासींचे दु:ख, दारिद्र्य, दैना मांडत जाते. कवितेत आक्रोश दिसत नाही. कवितेला पक्की वैचारिक बैठक आहे ती माणसाच्या निसर्गाशी असलेल्या नात्याची. संग्रहात कवीच्या वैशिष्टयपूर्ण लेखनशैलीने वैचारिक आशयाच्या आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक संचित पांघरणाऱ्या छंदातील कविता त्यातील कवित्व न हरवता व्यक्त होतात.

 

 

“जल, जमीन, जंगल आणि गगनभरारी पहाडांना बोलता
लिहिता, वाचता आलं असतं तर
त्यांनी पुकारलं असतं विंध्वस्वरूपी माणसाविरूद्ध बंड
लिहिली असती क्रांतीची बात पानापानांवर
आणि पेटवलं असतं उलगुलान”

आदिवासींचे घडवले गेलेले विस्थापन हाही त्यांच्या कवितेत पुन:पुन्हा येणारा मुद्दा आहे. आदिवासींचा इतिहास नाकारला गेला. त्यांच्या संस्कृतीचे विकृतिकरण मांडले गेले. वर्तमानकाळात जल, जमीन, जंगल यांबरोबरच अनेक प्रश्न व समस्या आदिवासींच्या वाट्याला आहे. विनोद कुमरे यांच्या कवितेचे वर्तुळ आदिवासींच्या अस्तित्वाच्या व अस्मितेच्या अशा सर्व प्रश्नांना व्यापून आहे.

विनोद कुमरे कवितेप्रमाणेच अन्य साहित्यप्रकार सहज हाताळतात. त्यांनी नाटक, कादंबरी हेही प्रकार लिहिले आहेत. त्यांचे ‘बारकोड’ हे नाटक वर्तमान शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करते आणि कलाकौशल्याच्या शिक्षणाच्या आदिम पंरपरेचा वेध घेते. ‘बारकोड’ आय.एन.टी. स्पर्धेत गाजले.

‘कोयतूर’ ही विनोद कुमरे यांची ‘गोंड’ आदिवासी जीवनावरील कादंबरी ‘शब्दालय’ प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. ‘कोयतूर’ म्हणजेच ‘गोंड’ आदिवासी जमात. ‘गोंड’ ही भारतातील मूळ आदिम, आदिवासी जमात असून त्या जमातीला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इतिहास आहे. आदिवासींच्या नावावर खोऱ्याने पैसा खर्च होत असतो. मात्र विकास घडत नाही. ज्यांचा विकास करायचा त्यांना कधीच कोणी, त्यांना कसा विकास अपेक्षित आहे ते विचारत नाही. आता आदिवासींनीच विकासासाठी पुढे येऊन त्यांचा विकास केला पाहिजे ही मध्यवर्ती कल्पना कादंबरीच्या कथा वस्तूची आहे. कादंबरी गोंडांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनसंदर्भांना स्पर्श करत आदिवासी विकासाची कल्पना कथानकातून पुढे मांडते.

विनोद कुमरे यांचे आदिवासी समाज, संस्कृती व इतिहास या संदर्भाने संशोधनात्मक लेखन महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी आधुनिक कालखंडातील आदिवासी साहित्यावर पीएच.डी.चे संशोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण केले.

त्यांनी ‘गोंदण’ या आदिवासी साहित्य व संस्कृतीला वाहिलेल्या त्रैमासिकाचे प्रकाशन जानेवारी २०१६ पासून सुरू केले आहे. ते भारतीय आदिवासी कवी-लेखकांबरोबरच जगातील आदिवासी मूळ वंशाच्या कवी-लेखकांची नोंद घेऊ पाहते.

विनोद कुमरे यांचा जन्म २ जुलै १९७८ रोजी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील बोपापूर (दिघी) येथे झाला. ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बोपापूर (दिघी) पासून ते मुंबई असा त्यांचा शैक्षणिक व वाङ्मयीन प्रवास संघर्षशील आहे. त्यांनी आदिवासी साहित्य संशोधन व अभ्यास या अनुषंगाने चाळीस शोधनिबंधांचे लेखन केले आहे. कुमरे ज्या वर्धा जिल्ह्यातून आले त्या जिल्ह्याला आदिवासी वैचारिक साहित्य लेखनाची परंपरा आहे. त्या जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक व्यंकटेश आत्राम, तसेच गोंडवनाचे प्रसिद्ध संशोधक व अभ्यासक डॉ. मोतीरावण कंगाली यांच्या वैचारिक लेखनाचा प्रभाव कुमरे यांच्या विचारांवर व लेखनावर जाणवतो.

 

 

भाषण

तुमच्या भाषणातल्या कवितांनी रंगात येते सभा
डोलवतात सर्व माना तुम्ही अनभिषिक्त सम्राट
घोषणांचे शोषकांना करता जेरबंद शब्दात
उठवता शोषणाविरुद्धा रानं पेटवता वणवा
तुमच्या विधानांचा उठतो फतवा
तुम्ही सांगाल तो कायदा वायदा
तुम्ही म्हणजे ह्युमॅनिझम तुम्ही म्हणजे अन्यायाचा कर्दनकाळ
तुमच्या पावलात जादू रस्त्याचं जिवंतपण
पावलांच्या हादऱ्याने दुश्मन होतात गार
तुम्ही म्हणजे सच्चाईचा सार
तुम्ही गेलेत शोषणाविरुद्ध मंत्रतंत्र सांगून
म्हणून लिंगोच्या बाजूला तुमचा फोटो ठेवला टांगून
तुम्ही मागच्या लिंगोपूजेला सांगितली कथा
मांडली धर्मावर झालेल्या अत्याचाराची व्यथा
म्हणाले आता चळवळ उभारून लढू सर्वच स्तरावर
धर्माची पताका उभारू घराघरांवर
बाबा मार्क्स आणला होता तुम्ही वस्तीवर
बुद्दाची लिंगोशी तुलना करून मांडलं तत्त्वज्ञान
आम्ही लिंगो सोडून तुमच्या मागं आलो
परवा परवा ते येऊन गेलेत वस्तीवर
येशूची तुलना लिंगोशी करून सांगितलं बायबल
मुंडीस्तंभाच्या जागी रोवला गेलाय क्रूस
सर्वांचा ईश्वर एकच सांगितल्यावर पुन्हा
लिंगो पळून गेलाय जंगलात
इकडची गुप्त गोष्ट निसटून कशी गेली शहरात?
ते म्हणाले पाद्र्यांनी धर्म बाटवला शुद्धी करू
त्यांनी फुंकले आगीवर मंत्र
हरेकाच्या कानात दिला जप
गोटुलात सरनापूजेला मंदिर बांधू म्हणाले
तेव्हा झाडाझाडावरेचे देव गारठून गेले मंत्रात
लीडर
घडलं तुमच्या पश्चात हे
आन् हे धर्मांतर चळवळीचं पत्र हातात
काळजाचा ठोका चुकला लिंगो भयाभया रडला
सोडून जातो म्हणला कायमचा जंगल-वस्ती-पाडा
घरातलं अन्न झालंय कडू जहर
लीडर
तेवढं धर्मांतराचं सोडा
आहे तोच आधी जमातीजमातीत जोडा
पाण्यावर काठी मारल्यानं फाकत नाही म्हणतात पाणी
आपल्या बी धर्मात काय आहे वाईट, सांगा?
तो खुंटलाय बघा जगातल्या खंडाखंडात
धर्मानं विझणार नाही म्हणा मेळघाटातली भूक
बिनागुंड्याचा वणवा
पण त्यांच्या आक्रमणाला गवसंल बिनतोड उत्तर
कधीमधी वस्तीकडे पण येत जा
तुमच्या पावलानं मोहरून जाते बघा वस्ती
खांद्यावर लिंगो दिसला की ताल धरतोय ढेमसा
आपण बुद्ध बी समजून घेऊ पण
जळतं घर आधी शाबूत ठेवलं पाहिजे ना लीडर 

विनोद कुमरे ९७६९९२३९१३

– रामदास किसन गिळंदे
८०९५३०२९५

 

About Post Author

1 COMMENT

  1. कवितासंग्रहाचे परीक्षणं…
    कवितासंग्रहाचे परीक्षणं अतिशय व्यवस्थित आणि विचारापूर्वक केले आहे. विचार चिंतनाची सखोलता आणि मार्मिक’ता महत्त्वपूर्ण आहे.

Comments are closed.