विद्यापीठ नामांतर आणि तारतम्य

विद्यापीठांच्या, रेल्वे स्थानकांच्या आणि विमानतळांच्या नावांवरून वाद सुरू झाले, की काही लोकांना वैताग येतो. मग असे लोक वेगळीच भूमिका घेतात. ‘नकोच कोणाचे नाव द्यायला!’ ‘नाही तरी नाव दिल्याने काय, विद्यापीठातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का?’ ‘नाव दिल्याने काय, कोणाचा मोठेपणा वाढणार आहे का?’ ‘कशाला या महापुरूषांना वादात ओढता?’ असे काही प्रश्न या लोकांकडून विचारले जातात. त्यांना नावावरून चाललेल्या एका अर्थाने निरर्थक अशा वादांचा कंटाळा आलेला असतो. साधारणत: अशा मागण्यांना एक जातीय पार्श्वभूमीही असते. तेव्हा व्यक्तीने कोणत्या तरी एका नावाचा पुरस्कार केला तर तिच्यावर एका जातीचा शिक्का बसेल आणि दुसरी जात तिच्यावर नाराज होईल अशी भीती लोकांमध्ये असते. म्हणून ते कोणाच्याही नावाचा पुरस्कार करण्याचे टाळून, नकोच ती नामांतराची कटकट असे सावधपणाचे धोरण स्वीकारतात. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव द्यावे की अहिल्यादेवींचे नाव द्यावे यावर वाद जारी आहे पण तो वाद करण्यापेक्षा केवळ सोलापूर विद्यापीठ असे नाव दिलेले काय वाईट आहे? अशी या लोकांची भूमिका असते.

आता, सोलापूरचा वाद जारी आहे म्हणून त्यातून विद्यापीठाला कोणाची नावेच नकोत असे सरसकट म्हणता येईल का? तसे म्हणू लागलो तर मग काही विद्यापीठांना पूर्वी जी नावे दिली गेली आहेत, त्यांचे काय करणार असा प्रश्न पडतो. म्हणून वादाला कंटाळून किंवा वाद नको म्हणून नावच नको असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. वाद झाला तरीही त्यातून मार्ग काढून विद्यापीठे ही समाजातील महापुरुषांची नावे धारण करून उभी राहिलीच पाहिजेत असे मला वाटते. आता, सोलापुरातील वादाकडे पाहू. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव दिले गेले पाहिजे असे माझे ठाम मत आहे. असे मत व्यक्त केले, की मग सिद्धरामेश्वरांचे नाव का नको असा प्रश्न निर्माण होतो, पण त्याचे उत्तर फार सोपे आहे. सोलापुरात सिद्धरामेश्वरांचे नाव अनेक गोष्टींना दिले गेलेले आहे. मुळात, त्यांचे अत्यंत देखणे मंदिर अठ्ठावीस एकर विस्तीर्ण जागेवर आहे. सोलापूर ते मुंबई अशी ये-जा करणारी रेल्वेही सिद्धेश्वर एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. शहरातील काही शिक्षण संस्थांना सिद्धेश्वर विद्यालय, सिद्धेश्ववर तंत्रनिकेतन अशी नावे आहेत. सोलापूरच्या मार्केट कमिटीच्या आवाराचे नावही सिद्धेश्वर मार्केट असे आहे. शहरात सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आहे. तेव्हा ते नाव अनेक संस्थांना दिले गेलेले असल्याने, पुन्हा त्यांचे नाव दिले जाऊ नये.

अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला दिले का जावे याला काही कारणे आहेत. अहिल्यादेवी होळकर हा मराठेशाहीतील फार मोठा दुवा आहेत. महाराष्ट्रातून एक अशिक्षित मुलगी मल्हारराव होळकर यांची सून होऊन इंदूरला गेली आणि तिने मल्हारराव होळकर यांच्या हयातीत आणि पश्चात असा चाळीस-पंचेचाळीस वर्षें इंदूर संस्थानचा कारभार सक्षमपणे पाहिला. माळव्यातील लोक त्यांचा प्रजाहितदक्ष राणी म्हणून गौरव करतात. त्या एवढ्या महान आणि दानशूर; तसेच, प्रजेविषयी कणव बाळगणार्‍या होत्या, की त्यांना आदर्श राणी मानले जाते. अहिल्यादेवी धनगर समाजातील लोकांना त्यांच्या जातीच्या होत्या एवढेच माहीत आहे; पण, मराठेशाहीतील त्यांचे स्थान नेमकेपणाने त्याही लोकांना माहीत नाही. मला मात्र नक्की वाटते, की कर्तबगार अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला देणे सर्वथा योग्य आहे. कोणीतरी सवंग राजकारणापायी त्या नावाला विरोध केला म्हणून, कोणाचेच नाव नको अशी भूमिका घेतली जाणार असेल तर ते अहिल्यादेवींवर अन्याय करण्यासारखे होईल.

मराठेशाहीत तसे अनेक हिरे होऊन गेले आहेत. मराठेशाहीचा इतिहास 1618 ते 1818 असा दोनशे वर्षांचा पाहिल्यास असे लक्षात येते, की त्यांतील कित्येक नररत्नांची कामगिरी सार्‍या जगाने दखल घ्यावी अशी आहे. मात्र त्यांच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. लोक शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज येथपर्यंत येऊन, चकित होऊन तेथेच थांबतात. पण त्यांनी पुढे जाण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब सत्तावीस वर्षें दक्षिणेत ठाण मांडून बसला होता. एखादा सम्राट त्याचे राजधानीचे स्थान सोडून, तिच्यापासून शेकडो मैल दूर, तुलनेने एक लहान राज्य संपवण्यासाठी एवढा दीर्घकाल ठाण मांडून बसतो हा मोठाच बाका प्रसंग आहे! जगाच्या इतिहासात असा प्रकार कधी घडलेला नाही. त्या सत्तावीस वर्षांतील नऊ वर्षें संभाजी राजांनी औरंगजेबाला झुंजवले आणि नंतरची अठरा वर्षें ताराबार्इंनी! ताराबार्इंची महाराष्ट्राला नीट ओळख झालेली नाही. जगाच्या इतिहासातील तो मोठा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा आहे. बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, मल्हारराव होळकर, दिल्लीचे तख्त राखणारे महादजी आणि या अहिल्यादेवी! त्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आलेला नाही. मी नुकताच एका कवीला सहज प्रश्न केला, अटकेपार झेंडे लावणे म्हणजे काय? त्यावर त्याला काहीही सांगता आले नाही. अनेक मुलांची तीच स्थिती असणार. कारण अटक हे गावाचे नाव आहे. ते गाव अफगाणिस्तान आणि (आताचा) पाकिस्तान यांच्या सीमेवर आहे (त्यावेळी तो प्रांत भारतात होता). मराठ्यांनी तेथील किल्ल्यावर झेंडे रोवले होते. आताच्या पाकिस्तानचा बराच मोठा भाग दोन वर्षें मराठ्यांच्या ताब्यात होता. इतकी मर्दुमकी गाजवणार्‍या मराठी पूर्वजांची नावेही कालांतराने मनातून पुसून जातील म्हणून त्यांची नावे संस्थांना आवर्जून दिली गेली पाहिजेत.

ही नावे देताना मात्र काही तारतम्य पाळणे गरजेचे वाटू लागले आहे. नावे आदरभावनेने दिली जातात, पण कालांतराने त्या नावांचा शॉर्टफॉर्म होतो आणि मुळातील नावे विसरली जातात. एकदा भोपाळला गेलो होतो. दोन दिवस मुक्काम होता. तिसर्‍या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांची सभा ऐकून यायचे होते. मुक्काम पडला होता, टीटी मार्केटमध्ये. टीटी म्हणजे काय असा प्रश्न मनात आला आणि अनेकांना विचारले. पण फार कमी लोकांना हे माहीत होते, की टीटी म्हणजे तात्या टोपे! महापुरुषांची नावे त्यांची लघुरूपे प्रचलित होणार नाहीत अशा रीतीने दिली गेली पाहिजेत. महाराष्ट्रात टिमवि, वायसीएम, औरंगाबाद विद्यापीठ, एसआरटी अशी नावे रूढ होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची नामांतरे निष्फळ ठरत आहेत. अहिल्यादेवी यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिले जाणार आहे. त्यांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्यानी, ‘अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ एवढ्या नावावर समाधान मानले तर निदान पु़ढील काही वर्षांत ते नाव तसेच राहण्याची शक्यता आहे. पण जर ‘पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे लांबलचक नाव देण्याचा आग्रह धरला गेला तर आगामी काळात कोणी तेवढे लांब नाव घेत बसणार नाही. नेहमीच्या सामाजिक सवयीने त्याचे लघुरूप पीएमएएच सोलापूर विद्यापीठ असे होईल आणि त्या लघुरूपात अहिल्यादेवींचा नेमका विसर पडेल.

जाता जाता, नावांची काही रूढ लघुरूपे नमूद करावीशी वाटतात. मुंबईत दादरमध्ये एनसी रोड आहे आणि अंधेरीला एलबी स्क्वेअर आहे. एनसी म्हणजे नरसिंह चिंतामणी केळकर तर एलबी म्हणजे लालबहादूर शास्त्री. पुण्यातील एमजी रोड आणि मुंबईतील सीएसटी या नावांतील एमजी म्हणजे महात्मा गांधी आणि सीएसटीतील सीएस म्हणजे छत्रपती शिवाजी यांचा विसर अजून तरी पडलेला नाही!

– अरविंद जोशी

About Post Author

3 COMMENTS

  1. मान्यवर आपल्यI मताशी मी सहमत…
    मान्यवर आपल्यI मताशी मी सहमत आहे . असे होत राहले तर पुढील पिढीला इतिहास कळणा रच नाही .

Comments are closed.