सीबी जन्माने, कर्तृत्वाने मुंबईकर. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1937 रोजी एका साध्या कुटुंबात जुन्या बावनचाळीत झाला. त्यांचे दहाजणांचे कुटुंब दहा-बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहत होते. सीबी कॉटनग्रीनच्या फूटपाथवरील गॅसबत्तीखाली पोत्यावर बसून, अभ्यास करून बी.ए. झाले. त्यांना झोपण्यासाठीही फूटपाथ किंवा दुसऱ्याच्या पडवीचा आसरा कधी कधी घ्यावा लागे. त्यांनी मिळेल त्या छोट्यामोठ्या नोकऱ्या करत त्या प्रतिकूल परिस्थितीत एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतले. ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला 1962 मध्ये लागले. तेव्हापासून त्यांच्या उर्जितावस्थेला सुरुवात झाली. त्यांची पत्नी शिक्षिका. त्यांचा विवाह 1967 साली झाला. ते प्रथम डोंबिवलीत राहत. यथावकाश, सीबी पार्लेकर झाले. त्यांना दोन मुली. त्या दोन्ही उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी शिल्पा लंडनमध्ये भूलशास्त्रतज्ज्ञ आहे, तर रूपा मुंबई विद्यापीठात जर्मन भाषा शिकवतात.
सीबी हाडाचे कार्यकर्ते. ते बाबा आमटे यांचे कार्य, त्यांचे विचार – ते प्रकट करण्याची पद्धत यामुळे भारावून गेले. सीबींचे आयुष्य एक आमटेपर्व आहे. सीबी त्या काळात मुंबईतून सुट्टी मिळाली रे मिळाली की वरोऱ्याला धाव घेत. उलट, सीबी हे बाबांच्या मुंबई मुक्कामाच्या व्यवस्थेचा घटक बनून गेले. सीबींनी बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात 1985 साली कन्याकुमारी ते काश्मीर आणि 1989 साली अरुणाचल प्रदेश ते ओटावा या यात्रांमध्ये सूत्रधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्या अभियानात गोवा राज्य राहिले होते. तेथील ‘भारत जोडो’ यात्रा एकट्या सीबींच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये झाली. बाबा आमटे तेथे शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले.
सीबींना भारताचे संपूर्ण चित्र, समाजसेवेचा विशाल पट त्या तिन्ही अभियानांतून अनुभवता आला. त्यांना अभियानाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. त्या सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ते अस्वस्थ झाले. तेव्हा बाबा आमटे यांनी सी.बीं.ना त्यांची ‘बँक ऑफ इंडिया’तील नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सी.बीं.नी 1994 साली उपव्यवस्थापक पदावरुन ऐच्छिक सेवानिवृत्ती पत्करली आणि ते विधायक कार्य करण्यासाठी उभे राहिले. सीबींचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूरपार. सीबी त्यांच्या वडिलांनी मुंबईशी जुळवून घेतल्यामुळे जरी मुंबईकर झाले, तरी त्यांचा रजा घेऊन गावी जाण्याचा कोकणी सिलसिला सुरू होता. त्यामुळेच त्यांचा त्यांच्या गावात, जिल्ह्यात काम सुरू करावे असा विचार पक्का झाला. सी.बीं.नी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी ‘वसुंधरा’ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना केली.
‘वसुंधरा विज्ञान केंद्र’ मुंबई-गोवा हायवेवर, कुडाळपासून पाच किलोमीटर अंतरावर, बिबवणे या गावी भाड्याच्या जागेत उभे राहिले. सीबींच्या मित्रपरिवाराने केंद्र उभारणीत आर्थिक, बौद्धिक आणि इतर साहित्य यांची भरभरून मदत दिली. पुढे मीना नेरुरकर यांच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या प्रयोगांनी ‘वसुंधरा’ला आर्थिक पाठबळ दिले.
बी.बी. यांचा ‘वसुंधरा’ हे विज्ञान केंद्र निर्माण करण्याचा ध्यास होता. विज्ञानजाणीव व दृष्टी जागृत झाली, की लोकांमधील अनिष्ट प्रथांना नवीन पिढी विज्ञानातून उत्तर देईल व त्या कमी होतील हा आशावाद सीबींना ‘वसुंधरा’ सर्वोत्तम विज्ञान केंद्र स्थापण्यासाठी प्रेरित करत होता. ‘वुसंधरा’च्या कार्यासाठी सी.बी. नाईक यांचा यथोचित गौरवही करण्यात आला आहे. वसईचा ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार’ व ‘आशीर्वाद’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार संस्थेच्या व सीबींच्या कार्यासाठी मिळाला. सी.बी. नाईक यांना सावंतवाडी संस्थान मराठा समाजातर्फे ‘मराठा समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यु.आर.एल. फाउंडेशनच्या एक लाख रुपये रकमेच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे सीबी काका मानकरी आहेत. विलेपार्ले येथील सावरकर प्रतिष्ठानतर्फे पार्ल्यातील थोर समाजसेवक स्व. रामभाऊ बर्वे स्मृती पुरस्काराने ‘वसुंधरा’चे कार्य गौरवण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान व शैक्षणिक पर्यटनासाठी ‘वसुंधरा’ हे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे हे सीबीकाकांचे स्वप्न आहे.
– प्रसाद घाणेकर
(सी.बी. नाईक यांच्या ‘वसुंधरा’ संस्थेसंदर्भात सविस्तर वाचा.)
जुग जुग जिओ सी. बी. काका. खूप
जुग जुग जिओ सी. बी. काका. काका तुम्ही खूप आणि समाजावश्यक, अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. तसा विज्ञानाशी संबंध नसताना तुम्ही विज्ञानाचे महत्त्व जाणले याचे अप्रूप व आनंद आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आणि जिल्ह्यातील शिक्षक, विज्ञानप्रेमी तुमचे कार्य आणखी पुढे निश्चित नेतील याची खात्री आहे. श्रीकृष्ण गुत्तीकर, सरचिटणीस लोकविज्ञान संघटना.
समाजसेवेचा हा कोकणी सिलसिला
समाजसेवेचा हा कोकणी सिलसिला प्रेरणादायी!
Comments are closed.