वामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन

1
66
_VamanChordhadeYanchiKatha_TajiAaniSamkalin_1.jpg

पूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक कथांचे संपादन दोन भागांतील प्रकाशित झाले आहे. चोरघडे यांचे एकूण सात कथासंग्रह. कथांची संख्या एकशेपन्नास.

चोरघडे यांच्या कथेला मानवी जीवनाचे विविध स्तरांवरील दर्शन घडवण्याची आस आहे. चोरघडे मानवी मूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन कथेतून घडवतात. मानवाचे मूलभूत भाव टिपणाऱ्या त्यांच्या अनेक कथा या संपादनात आहेत. चोरघडे यांच्या कथेमध्ये राग, लोभ, मत्सर, जिज्ञासा या भावनांबरोबरच मानवी जीवनाच्या तळस्पर्शी जाणिवा टिपण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. चोरघडे यांची कथा फडके-खांडेकरांच्या बरोबरीने, परंतु त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र वाटेने जाते. जीवनातील अंतिम सत्याचा शोध हे त्यांचे ध्येय होते.

त्यांनी ‘अम्मा’ ही पहिली कथा 1932 च्या दरम्यान लिहिलेली. ती कथा म्हणजे बालमनात त्यांच्या मनावर झालेला श्रमाचा संस्कार आहे. लेखक कडाक्याच्या थंडीत काम करणाऱ्या अम्माला पाहून अंतर्मुख होतो. त्याला अम्मामुळे कळून चुकले, की कष्टणाऱ्यांपुढे थंडी, ऊन, वारा शरण येतात. त्यामुळे ते त्या गोष्टींपासून बचावण्याचे रिकामटेकड्यांचे फाजील लाड सोडून देतात. त्यांची कथा अशा वरकरणी छोट्या प्रसंगातून आकार घेत जाते. त्यांना आकर्षित करणारा स्वाभिमान हा गुण ते अनेक कथांचा विषय करतात. ते कष्टाळू, गरीब हमाल, कामकरी, आदिवासी स्त्रिया, शेतकरी यांच्या स्वाभिमानी जीवनाचा वेध कथेतून घेतात. त्या दृष्टीने त्यांची ‘सव्वापाच आणे’ ही कथा वाचनीय आहे. त्यांना गरिबीतही फुकटचे काही न स्वीकारणारा हमाल कथेचा विषय करावासा वाटतो. ‘समुद्राचे पाणी’ या कथेतील पोटासाठी मुंबईकडे निघालेला प्रवासी दोन दिवस उपाशी राहूनही चोरी करू धजत नाही. उलट, तो जेवण देणाऱ्या सहप्रवाशाला म्हणतो, ‘साहेब, सुखी राहो तुमचे घरधनीण; पण मला ते खाण्याचा हक्क नाही. इतक्या उमरीत मी कधी दान घेतले नाही. हात आहेत तोवर भिक्षा मागणार नाही. रागावू नका. देव तुम्हाला सुखी ठेवेल!’ त्यांचे हे सांगणे निरागस बालकाप्रमाणे आहे. ती निरागसता पाहून मुंबईत याचे कसे होईल याची चिंता सहप्रवासी करतो. तो म्हणतो, ‘उंचावरून कोसळणारी नदी पर्वतांच्या दऱ्यांत पुष्कळदा लुप्त होते.’ तो मुंबईच्या अफाट समुद्रात तसे त्याचे होईल या अभद्र विचाराने अंतर्मुख होते. कथाकाव्यात्म अनुभूती देते.

विषयवैविध्य हा चोरघडे यांच्या कथालेखनाचा विशेष. त्यामुळे त्यांची कथा जीवनाचे सांदीकोपरे धुंडाळताना दिसते. ते बालमनाचे, निसर्गाचे, प्राणिसृष्टीचे, कष्टकऱ्यांचे मोठे विलोभनीय भावविश्व साकारतात. ते बालमनाचा तळ शोधताना तितकेच लहान होतात. ‘काचेची किमया’, ‘आणभाक’, ‘पोर’, ‘कुसुमाची पहिली लघुकथा’ यांसारख्या कथा वाचताना त्याचा प्रत्यय येतो. बालमन निरागसतेने अनेक खेळ खेळत असते. प्रत्येक गोष्टीविषयीच्या त्याच्या म्हणून काही कल्पना असतात. त्या मनाला जीवनातील वाईटाचा स्पर्श नसतो. त्यामुळे त्या वयात जीवनात आलेली जुलिया ‘काचेची किमया’ या कथेत हे बालमन कशा प्रकारे व्यापून टाकते आणि विरहाने भावव्याकुळ झालेल्या अबालमनाला हळवे बनवते ते चोरघडे बालमनात डोकावून लिहितात. ते तशाच चंचल परंतु निष्कलंक हृदयाची स्पंदने ‘पोर’ या कथेमध्येही टिपतात.

चोरघडे यांच्या कथाविश्वाचा मोठा भाग स्त्रीविषयीच्या भावविश्वाने व्यापलेला आहे. त्यांची स्त्रीकडे पाहण्याची म्हणून एक दृष्टी आहे. ते स्त्रीचे मनही तिच्या अंतःकरणाने समजून घेतात. त्यांच्या त्या भावविश्वात लहान मुलींपासून वृद्धेपर्यंतची स्त्री येते. त्यामुळेच कष्टकरी स्त्रिया, संसारी, कुमारिका, शाळकरी अशा अनेक स्त्रिया त्यांच्या कथांत दिसतात. व्यक्त न करता येण्यासारखी अनाम दुःखे झेलणाऱ्या स्त्रिया जीवनसंघर्ष कसा करतात, त्यांच्या वाट्याला आलेले दुःख त्या कशा झेलतात ते ‘रात्रीरेव व्यरंसीत’ या लघुकथेतून दाखवतात. किरकोळ स्वरूपाच्या संवादातून साकारलेली ती कथा स्त्रीच्या भावविश्वाचा ठाव घेते, तर ‘विहीर’ कथेतील स्त्रीचे भागधेय वाचकाला भावव्याकुळ बनवते. ‘विहीर’ हे स्त्रीचे प्रतीक आहे. ते तळाचा ठाव न घेता येणारे स्त्रीचे जीवनदर्शन या कथेतून घडवतात. विहिरीजवळचे दृश्य दुरून विलोभनीय वाटते. विहीर ‘फुलाफळांनी लवलवलेल्या निरनिराळ्या वेलींची चिरण’ वाटते, परंतु जवळ गेल्यास ‘कोणाचेही जीव घ्या सोकावलेली तोंड न बांधलेली अशी ती एक विहीर आहे आड दडलेली’. ही आड दडलेली विहीर म्हणजे स्त्रीच्या वाट्याला आलेले जीवन आहे. ज्यातून ‘त्या बिचाऱ्या खोल खोल घागरी टाकून जपून जपून जीवन ओढताहेत’. या कथेतील वाक्ये स्त्रीचे दुःख नेमकेपणाने मुखर करतात. या स्त्रिया त्यांचे मन कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून होणारी मानहानी सांगत मोकळे करतात. घरातील सारी कर्तव्ये, जबाबदाऱ्या स्त्रीच्याच वाट्याला येतात. त्यातून त्यांचे स्वातंत्र्य हरवते, मनाची आणि शरीराची फरफट सुरू होते. तलावावरील खळबळत्या पाण्यात सावल्या हलत राहतात. त्याप्रमाणे ते ‘तलाव’ या कथेतून जीवनात जाणूनबुजून पाऊल घालून, स्वतःचे अस्तित्व अस्थिर करून घेतल्याचे चित्र मांडतात. तलावात कपडे धुण्यासाठी आलेली प्रत्येक स्त्री म्हणजे दुःखाचे प्रतीकच. स्त्रीचे ते दुःख संपलेले नाही; म्हणूनच चोरघडे यांची बहुतांश कथा जुनी होत नाही. समकालीन आशयाची वाटते.

चोरघडे यांची कथा जीवनातील नानाविध प्रश्नांना सहजतेने भिडते, झुंजतेही. ते जीवनात वस्तूचे मूल्य ठरवणारे निकष तपासून पाहिले गेले पाहिजेत यांची सूचना काही कथांच्या माध्यमातून करतात. त्यांची ‘वस्तूचे मूल्य’ ही कथा त्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. फुले आणि फुलमाळी यांच्या माध्यमातून ते एक मानवी मूल्य साकारतात. ते कथेची मांडणी त्यासाठी अशी करतात, की वाचक अंतर्मुख बनतो. त्यांची कथा मानवी मूल्यांवर लिहितानाही तत्त्वचर्चेत अडकत नाही, तर ती कलात्मक होताना दिसते. त्यांची कलादृष्टी ‘कला…जीवन’ या कथेमध्ये निसर्गाचे विहंगम दृश्य टिपताना दिसून येते. ते ‘पिंजरा’ या कथेतूनही अंतिमतः खरी कला निसर्ग उधळत असल्याचा संदेश देतात. लेखकाला असणारी निसर्गाची ओढ, पशुपक्ष्यांविषयीचा त्यांचा मानवतावादी, अहिंसावादी दृष्टिकोन त्या कथांमधून स्पष्ट होतो.

स्वार्थ, आपमतलबी वृत्ती मानवी जीवनाला व्यापून आहे. ती वृत्ती व्यक्तीचा आणि मानवतेचा घात करते याचे चिंतनप्रवृत्त करणारे चित्र त्यांची कथा टिपते. ‘गुलामांचे संकल्प’ या कथेत रोममधील गुलामगिरी, सिझर त्यांचे उमराव यांनी मानवतेचा मांडलेला खल रेखाटतात. वाचक माणसांना गुलाम बनवून पायी तुडवलेली मानवता पाहून स्तब्ध होतो. तेथील क्रूर, हिंस्त्र वर्तणूक मानवी स्वातंत्र्य संपवणारी आहे. गुलाम असलेले दोन मित्र स्वातंत्र्यासाठी पळून जाऊन जंगलात राहण्याचे ठरवतात. परंतु त्यांच्यामध्ये मुक्तीसाठीचा क्रूर खेळ लावून जी अमानुष हिंसा केली जाते ती हृदय पिळवटून टाकणारी आहे.

मानवच मानवाची करत असलेली विटंबना गांधीविचारांच्या चोरघडे यांना न साहणारी होती. त्यामुळे ते हिंसेविषयी सतत बोलत राहतात. ‘महायात्रा’ या कथेमध्ये समाजातील श्रद्धा-अंधश्रद्धेच्या समजातून पुढे आलेल्या नरबळीसारख्या मानवी क्रूरतेचे टोक गाठणारे अनुभव लिहितात. नरबळीची प्रथा देवी थांबवते असा भास ते या कथेतून घडवतात आणि वाचकाला अस्वस्थ करतात. ते देव या कल्पनेचीच चिरफाड त्या कथेत करतात. ती चिरफाड वाचकाचा थरकाप उडवते. त्या कथेतून एक उत्कर्ष बिंदू गाठताना ते जी काव्यमय भाषा वापरतात – ती लघुकथांमध्ये फार क्वचित दिसते. तशी काव्यात्म भाषा वापरून आशयसूत्र परिणामकारक करण्याचे खास तंत्र चोरघडे यांच्या अनेक कथांमध्ये दिसते.

‘भाकरीची गोष्ट’ मध्ये आलेले ग्रामजीवन, ‘मातीची भांडी’मध्ये आलेले आदिवासी गौंड जमातीचे चित्रण, ‘अतिथी देवो भव !’मध्ये आलेले गरीब शेतकरी कुटुंबाचे भावविश्व चोरघडे यांची कथा किती वैविध्यपूर्ण जीवनदर्शनाची मागणी करते ते स्पष्ट करते. त्यांच्या अनेक कथा उपेक्षित, वंचित, अलक्षित अशा वर्गाचे चित्रण बारकाईने करणाऱ्या आहेत. जीवनाची अशी नवनवी अनुभूती टिपताना त्यांची कथा ठोकळेबाज तंत्र वापरत नाही. ती खुली आणि जीवनाइतकीच नाविन्यपूर्ण रीतीने लिहिली जाते.

चोरघडे यांनी रूढ कथेला नाकारत तिला संकेतातून मुक्त केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही बंधन घालून न घेता कथेला अनेक पातळीवरील विषय दिले. त्यांची साधी सरळ भाषा तत्कालीन रंगरंगोटी केलेल्या कथेतूनही उठून दिसते. त्यांची कथा बारकाईने वाचताना त्यांनी अभिव्यक्तीच्या पातळीवर केलेले प्रयोग लक्षात येतात. ते जीवनातील विविध स्तरांवरील लोकांचे विविध तऱ्हेचे अनुभव सारख्याच समरसतेने रेखाटताना दिसतात. त्यांच्या कथेचा विषय कोणत्याही स्तरातील समाज असो; व्यक्तिरेखेच्या मनाच्या सूक्ष्म भावछटा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची सारी कथा वाचताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते-ती म्हणजे त्यांना असणारे तीव्र सामाजिक भान. अशा अनेकविध वैशिष्टयांमुळे त्यांची कथा अजून ताजी आणि समकालीन वाटते.

 

वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ व २

संपादक : आशा बगे, डॉ.श्रीकांत चोरघडे,

साकेत प्रकाशन, औरंगाबाद,

पृष्ठे – 192+200,

मूल्य – 200+200 रुपये.

(लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, रविवार 28 डिसेंबर 2014 वरून उद्धृत)

– नंदकुमार मोरे

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.