वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा !

0
30

प्रभाकर भिडे

अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्‍त झाली. त्‍यानंतर गोरे यांनी विद्यार्थी परिषदेच्‍या अधिवेशनात युवकांना सेन्‍यात भरती होण्‍याचे आवाहन केले. त्‍यांच्‍या शब्‍दांना विनयच्या त्यागाचे बळ आले होते. पुढे त्यांनी या विषयात वाचन केले, पुस्तके-लेख गोळा केले आणि देशसंरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे या प्रचारासाठी भाषणे सुरू केली. ‘वॉर विडोज’साठी काम करावे, त्यांना जाणून घ्यावे, म्हणून त्यांनी ‘वॉर विडोज’ना बोलते केले. त्यातून ‘वारस होऊ अभिमन्यूचे’ हे पुस्‍तक लिहीले गेले. एखादी गृहिणी मुलाच्या देशासाठीच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन किती विविध प्रकारची सकारात्मक कामे करू शकते याचे हे आदर्श उदाहरण आहे.

प्रभाकर भिडे

अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत.

 आई म्हणजे काय असते?
'घरातल्या घरात गजबजलेले गाव असते
 
आई म्हणजे वासराची गाय असते
 लेकराची माय असते
 दुधावरची साय असते!

अनुराधा गोरे ह्या पार्ले येथील शाळेत शिक्षिका होत्या. मुलांना तीस-पस्तीस वर्षे शिकवताना, त्यांच्या संवेदनाशील स्वभावामुळे त्यांना मुलामुलींची मनस्थिती कळली, बालपण ते तारुण्य येईपर्यंत मुलां-मुलींच्या शरीरात व विचारांत बदल होत असताना, काही वेळा, आईवडील किंवा पालक मुलांना समजू शकत नाहीत; तसेच, मुलांना आपल्या आईवडिलांना समजण्यात अडचण येते. मग आई-वडिलांच्या अपेक्षा मुलांच्या भावी करियरबद्दल असतील वा इतरांशी वागण्या-बोलण्यासंबंधी असतील-त्या पूर्ण होत नाहीत. येथून वादाला/गैरसमजाला सुरूवात होते. घरात एखाद-दुसरे मूल असते, पण तेही पालकांशी नीट बोलले नाही तर पालकांना वाईट वाटते. मग सुरू होतो संघर्ष. अशा वेळी शाळेतील शिक्षिका मुलांना समजून घेऊ शकतात. कारण मुले त्यांच्याजवळ अधिक विश्वासाने वागतात.

अनुराधा गोरे यांनी मानसोपचारतज्ज्ञ सुधा भट यांच्या मदतीने अशा मुलांवर उपाय सुरू केले. प्रत्येकाची केस वेगळी असते. पार्ले टिळक ही मुंबईतील नावाजलेली शाळा. तेथे अशा मुलांचा त्यांच्या पालकांशी सुसंवाद निर्माण करण्याचे जे प्रयत्‍न झाले, त्यांतील अनुभवाचे पुस्तक अनुराधा गोरे यांनी लिहिले आहे त्याचे नाव ‘कळी उमलताना

अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्‍त झाली. ते लाईन ऑफ कंट्रोलजवळ एका तुकडीचे नेतृत्व करत होते. त्याच्या जीवनासंदर्भातील संकेतस्थळ गावडे पती-पत्‍नी यांनी तयार केले आहे.

जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्याच्या एका गोळीने विनायकचा घात केला. त्याच्या निधनाने गोरे यांच्या घरातील वातावरण बदलून गेले! त्या धक्क्यातून अनुराधा गोरे यांना सावरण्यास व त्यांचे जीवन पुन्हा अर्थपूर्ण करण्यास एक घटना कारणीभूत झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तिसावे अधिवेशन ठाण्याला दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलात भरले होते. तिथल्या पेंडॉलला कॅप्टन विनायक गोरे यांचे नाव दिले गेले होते. त्याच्या उद्‍घाटनाला अनुराधा गोरे यांना निमंत्रण होते. त्यांनी मनोधैर्य एकवटून ते स्वीकारले.

भारतमाते पुत्र शहाणे कितीक तुला लाभले,
तुझ्या कुशीला परी जन्मती काही वेडी मुले

ही कविता आरंभी उद्धृत करून त्या म्हणाल्या, आर्मीत अधिकार्‍यांच्या बर्‍याच जागा रिकाम्या आहेत. त्या युवकांकडून भरल्या जाव्यात असे मला वाटते. त्यांच्या या धाडसी विधानाला विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोरे यांच्या शब्दांना विनयच्या त्यागाचे बळ आले होते. सीमेवरील लढाईत आपला मुलगा गमावलेली माता तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करत होती! पुढे, त्यांनी या विषयात वाचन केले, पुस्तके-लेख गोळा केले आणि देशसंरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे या प्रचारासाठी भाषणे सुरू केली. त्यांचा जणू या कार्यासाठी पुनर्जन्म झाला होता! त्यातून विनयच्या त्यागाला आदरांजली वाहण्याची नवीन पद्धत सुरू झाली. त्यांनी हे काम अखंड बारा वर्षे केले. त्यांच्या भाषणांचा आकडा शंभरच्या पुढे गेला. त्यांनी या कामी आकाशवाणी, दूरदर्शन ही माध्यमे प्रभावीपणे हाताळली. वृत्तपत्रांत लिहिले. पुढे ‘सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर’ या मालिकेचे लिखाण झाले. त्यांना वाटते, की या अनुभवातून आपण घडलो!

त्यांनी शाळेत-शैक्षणिक क्षेत्रात काम केले, त्यालाही‘ उमललेल्या कळ्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने न्याय मिळाला. यातूनच एका कामातून दुसर्‍या कामात असे त्यांच्या बाबतीत घडत गेले. त्यांनी १९९९ च्या कारगिल संघर्षात चर्चगेटजवळ निदर्शने केली, कारण पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय वैमानिकांची प्रेते अत्यंत विद्रूप परत केली होती. गोरे यांनी त्या कृत्याचा निषेध करून, हजारो स्वाक्षर्‍या गोळा करून सरकारकडे पाठवल्या. त्यातूनच त्यांना मग ‘वॉर विडोज’साठी काम करावे, त्यांना जाणून घ्यावे, देशासाठी प्राणत्याग करणार्‍या सैनिकांच्या आप्तांना त्यांच्या पश्चात काय भोगावे लागते, लोकांना त्यांच्याबद्दल कशी बेफिकिरी असते हे कळावे म्हणून त्यांनी ‘वॉर विडोज’ना बोलते केले. त्यातून घडले एक पुस्तक. त्याचे नाव ‘वारस होऊ अभिमन्यूचे’. लष्करी मुख्यालयाचे प्रमुख जनरल हुंडा यांनी त्यांच्या अशा कामाला सतत प्रोत्साहन दिले.

 अनुराधा गोरे यांचा जोर कृतीवर आहे. त्यांना विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळाची साथ आहे. त्या मंडळाच्या सहकार्याने सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणारा व तरुणांच्या विकासाला प्राधान्य देणारा ‘ऑपरेशन विजय’ हा उपक्रम सुरू करत आहेत.

एका तरुण देशभक्ताची कहाणी माणसाचे आत्मभान जागृत करते. माणूस अंतर्मुख होतो. भारतातील सर्वसामान्य लोक सुरक्षित व सुखी जीवन, सैनिकांमुळे व त्यांच्या त्यागामुळे जगू शकतात याची जाणीव लोकांना करून देणे हे गोरे यांचे व्रत होऊन गेले आहे. त्यांच्या मुलाच्या बलिदानातून अनुराधा गोरे यांचे जीवन बदलून गेले!

 अनुराधा गोरे यांना लोकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना विलक्षण भारावून टाकणारा होता. लोक त्यांना ‘वीरमाता’ म्हणून संबोधतात. पण लोकांच्या, देशवासीयांच्या उत्कट अशा प्रेमाने त्या ‘वीरमाता’ या संबोधनापलीकडे जाऊन पोचल्या आहेत. त्यांनी देशवासीयांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आपले आयुष्य जणू देऊ केले आहे.

एखादी गृहिणी मुलाच्या देशासाठीच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन किती विविध प्रकारची सकारात्मक, जीवनात आनंद-समाधान देणारी कामे करू शकते याचे हे आदर्श उदाहरण आहे. मला तर अनुराधा गोरे आदर्श गृहिणीप्रमाणे आदर्श समाजसेवक वाटल्या!

प्रभाकर भिडे बी-२०१ ओम यमुना माधव सोसायटी, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), टेलिफोन: (0251) 2443642, 9892563154

अनुराधा गोरे – 022-2683795,

सैनिकांच्‍या समस्‍यांसाठी कार्यरत असलेल्‍या प्रतिमा राव यांच्‍यावरील लेख वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

अनुराधा गोरे यांनी ‘लोकसत्‍ते’त लिहीलेली लेखमालिका वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

लष्करदिना निमित्त अनुराधा गोरे यांच्‍याशी केलेली बातचित पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा.

About Post Author