पंतप्रधानांनी पाच पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीचे साद-पडसाद बराच काळ उमटत राहतील, कारण मुकस्तंभ मनमोहन सिंग बोलते झाले! त्यांतली वेगळी एक टिप्पणी तवलीनसिंह या पत्रकार महिलेची आहे. त्या म्हणतात, की जनतेच्या मनातील असंतोष आणि संताप यांचे प्रतीक म्हणजे अण्णा हजारे व बाबा रामदेव. लोक चिडले आहेत ते राज्यकारभाराच्या पध्दतीवर. सर्वसाधारण लोकांच्या अनुभवाला काय येते? तर राज्यकारभार करणारे छोटे-छोटे गट सर्वसामान्य माणसाची सर्व तर्हेने अडवणूक करत असतात. ते गट असतात सरकारी कर्मचार्यांचे आणि ते हितसंबंध जपत असतात राजकर्त्यांचे, राजकारण्यांचे. त्यांना लोकांशी काही देणेघेणे नसते.
पंतप्रधानांनी पाच पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीचे साद-पडसाद बराच काळ उमटत राहतील, कारण मुकस्तंभ मनमोहन सिंग बोलते झाले! त्यांतली वेगळी एक टिप्पणी तवलीनसिंह या पत्रकार महिलेची आहे. त्या म्हणतात, की जनतेच्या मनातील असंतोष आणि संताप यांचे प्रतीक म्हणजे अण्णा हजारे व बाबा रामदेव. लोक चिडले आहेत ते राज्यकारभाराच्या पध्दतीवर. भ्रष्टाचार हा त्याचा एक भाग आहे. काळा पैसा हा त्यातील अनुषंगिक भाग. सर्वसाधारण लोकांच्या अनुभवाला काय येते? तर राज्यकारभार करणारे छोटे-छोटे गट सर्वसामान्य माणसाची सर्व तर्हेने अडवणूक करत असतात. ते गट असतात सरकारी कर्मचार्यांचे आणि ते हितसंबंध जपत असतात राजकर्त्यांचे, राजकारण्यांचे. त्यांना लोकांशी काही देणेघेणे नसते.
अण्णा हजारे यांचे म्हणणे तरी वेगळे काय आहे? त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान एका वाक्यात समाविष्ट करता येईल, की लोकशाहीत जनता ही मालक असते आणि सत्ताधारी हे सेवक असतात. त्यांच्या या विधानाशी कोण दुमत होईल बरे? परंतु कोणाला सरकारी यंत्रणेत तळाच्या जागेवर जरी नोकरी मिळाली तरी तो राजाच्या रुबाबात वागतो. मंत्र्यांची आणि उच्चाधिकार्यांची मिजास तर त्यांच्या गाड्यांवरील लालदिवे आणि त्यांच्या मागे-पुढे आवाज करत जाणारे मोठमोठे भोंगे यांमधूनच व्यक्त होते. रुबाब आणि मिजास हे सर्वसामान्यांच्या सहनशक्तीपलीकडे जाऊन पोचले आहेत.
जनतेचा संताप पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या विरुध्द आहे असे आपण म्हणतो, परंतु सर्व राजकीय पक्षांचे सर्व ज्येष्ठ पुढारी त्या दोघांसारखेच, जनतेबद्दल कोणताही कळवळा नसल्याप्रमाणे वागतात. त्यांच्यापैकी कोणाशीही नुसते फोनवर बोलायचे तरी माझ्यासारख्या पत्रकाराला शंभर कॉल करावे लागतात! तर मग सर्वसामान्य भारतीयाची अवस्था काय होत असेल बरे! सरकारी कचेरीत अधिकार्याला गाठायचे तरी प्रथम शिपायाशी मखलाशी करावी लागते. मोठमोठ्या उद्योगपतींनादेखील मंत्र्यांसमोर जाताना गुडघ्यात वाकून विनम्र व्हावे लागते हे मी पाहिले आहे. परिपक्व लोकशाहीचे हे लक्षण नव्हे.
ही तर आहे वसाहतवादी वृत्ती. अजून आपल्याकडे ब्रिटिशांनी घालून दिलेल्या अनेक पध्दती व व्यवस्था जशाच्या तशा चालू आहेत. कायदेदेखील त्याच प्रकारचे आहेत. त्यामुळे अन्यायाला सीमा राहिलेली नाही. आपले राजकीय नेते वेळीच जागे झाले नाहीत तर चौका-चौकात रामदेवबाबा व अण्णा हजारे तयार व्हायला वेळ लागणार नाही. (संकलित)
(योगायोग असा, की तवलीन सिंग यांचे भाष्य मराठी जनांसमोर मांडायचे ठरवले आणि ‘लोकसत्ते’च्या सहा जुलैच्या अंकातील मुंबईच्या राजीव मुळ्ये यांच्या पत्रात तोच सूर उमटलेला दिसला -संपादक)
प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नाही
भारतीय लोकशाहीच्या सद्य परिणामांचा विचार केला तर कोणाच्याही मनात लोकशाही व्यवस्थेबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी परिस्थिती आहे. दहा टक्के लोकांच्या हाती नव्वद टक्के सत्ता आणि संपत्ती एकवटलेली आहे आणि तळातले सत्तर टक्के लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. मधल्या वीस टक्के मध्यमवर्गीयांना ना तळातल्या लोकांबद्दल करुणा, ना सत्ताधीशांबद्दल चीड अशी दारुण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला सरसकट, देशाचे राज्यकर्ते कोण असावेत, हे ठरविण्याचा अधिकार असावा का, असा प्रश्न मनात उभा राहातो. थोडे लोक सत्ता उपभोगत संपूर्ण राष्ट्राला विषमतेच्या आणि दारिद्र्याच्या खाईत लोटतात हे खचितच प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नव्हे. म्हणूनच संसदेतल्या प्रतिनिधींवरचा समाजाचा विश्वास पूर्ण उडालेला आहे.
राजीव मुळ्ये, दादर, मुंबई