वयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास

0
35
_VayamSobatcha_KaustubhaAamteyanchaPrawas_1.jpg

बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील कौस्तुभ हे ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची भटकंती सर्वत्र सुरू असते. ते त्यामधील अनुभवांची टिपणे पुण्याच्या ‘महा अनुभव’ मासिकात लिहीत असतात. त्यातील जुलै अंकामधील त्यांनी ‘वयम’ला दिलेल्या भेटीचा वृत्तांत येथे त्या संस्थेबाबतचा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील अपडेट म्हणून नमूद करावासा वाटतो. ‘वयम’चे मिलिंद थत्ते व दीपाली गोगटे यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील लोकांना ‘सबल’ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. ते वेगळे व अनुकरणीय आहेत. त्यांच्या कामाबाबतचा परिचयलेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध आहे. कौस्तुभ यांच्या निरीक्षणानिमित्ताने त्या लेखाकडेही पुन्हा लक्ष वेधता येईल.

कौस्तुभ यांनी लिहिले आहे – आदिवासी व वनवासी वस्ती असलेल्या भागात मूलभूत सुविधांचा अभाव, निरक्षरता, बेरोजगारी, स्वतःच्या हक्कांबद्दलचे लोकांचे अज्ञान ही परिस्थिती दिसून येते. त्या भागात काम करताना समस्यांव्यतिरिक्त तेथील लोकांची मानसिकता, जीवनशैली, संस्कृती आणि पारंपरिकता या बाबींचा विचारही प्राधान्याने केला गेला पाहिजे. त्या लोकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले, त्यांची कामाची पद्धत समजून घेतली तर ते कार्यकर्त्यांना तशा भागात काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल, या विचाराने आम्ही पालघर जिल्ह्यातील जव्हार या दुर्गम भागात 2008 पासून ‘वयम’ संस्थेमार्फत काम करणाऱ्या मिलिंद थत्ते, दीपाली गोगटे आणि त्यांचे सहकारी यांची भेट घेतली.

_VayamSobatcha_KaustubhaAamteyanchaPrawas_3.jpgवनवासी गावांमधील लोकांना माहिती अधिकार, रोजगार हमीविषयक माहिती, वनहक्क आणि या सगळ्यांशी संलग्न असलेले कायदे या मुद्यांवर सक्षम करण्याचे काम ‘वयम’ संस्था, नव्हे, ‘वयम चळवळ’ करते. निरनिराळ्या शिबिरांच्या माध्यमातून या विषयांत मार्गदर्शन करून गावातील इतर प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी भागातील मुलांना तयार करणे हा देखील त्या चळवळीचा भाग आहे. कायद्याच्या अनुषंगाने तयार झालेली ती मुलेच पुढे गावातील काम समर्थपणे पुढे नेण्यासाठी प्रवृत्त होतात.

‘आनंदवन समाजभान अभियान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या दोन्ही उपक्रमांचे हेतू, स्वरूप आणि भविष्यातील कामाची रूपरेषा मिलिंद थत्ते यांना सांगितली. त्यावर त्यांनी दिलेली मते आणि मार्गदर्शन मोलाचे आहे. ते म्हणाले, “समाजातील कोणताही प्रश्न सोडवताना त्याआधी त्या भागातील लोकांशी नाळ जुळवून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे हे काम फार जिकिरीचे, परंतु तितकेच आवश्यक आहे. कार्यकर्त्यांच्या कामाच्या मूळ हेतूसोबत स्थानिकांच्या इतर वैयक्तिक प्रश्नांवर; तसेच, गावच्या सामूहिक प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्यांना मदत केली तरच ते कार्यकर्त्यांशी जोडले जातात. हे करता करता तेथे स्थानिक नेतृत्व उभे केले गेले तर त्या नेतृत्वातून आणि इतर लोकांच्या विश्वासातूनच कामे पुढे जाऊ शकतात.” या क्षेत्रातील लोकांमधील त्यांचा अभ्यास, कष्ट आणि अनुभव पाहिला तर अगदी योग्य वेळी त्यांच्याशी जोडले गेल्याने आमचा आत्मविश्वास व जबाबदारी, दोन्ही वाढत आहे.

– कौस्तुभ आमटे
kvamte@gmail.com

(‘महा अनुभव’ जुलै 2018 वरून उद्धृत)

About Post Author