लाला लजपत राय महात्मा गांधींबद्दल लिहिताना…

_Lala_Lajpat_Rai_Gandhi_1.jpg

महात्मा गांधी आणि त्यांनी सुरू केलेली असहकराची चळवळ यांबद्दल भलभलती विधाने आणि वस्तुविपर्यास करून विलायतेतील पत्रांनी त्या दोहोंवर इतके तोंडसुख घेतले आहे, की त्यातील खऱ्या प्रकारची माहिती विलायतेतील लोकांस पटवणे बहुधा दुरापास्त आहे असे मला वाटू लागले होते. त्यांनी महात्मा गांधी यांजवर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांनी गांधी यांची नालस्ती करण्याचा कोणताही प्रकार बाकी ठेवला नाही. एखाद्या प्रसंगी, गांधी यांस पाहून अथवा त्यांचा एखादा लेख वाचून आणि तेवढ्या तुटपुंज्या माहितीवरून, त्याच्या मनाचा हवा तसा समज करून घेऊन, वाटेल तो गृहस्थ गांधी यांजवर तुटून पडू लागला. लेखकांच्या त्या झुंडीत बहुतेक लोक अशा प्रकारचे होते, की खुद्द गांधी यांस त्यांनी जन्मात कधी पाहिले नव्हते आणि गांधी यांच्या मताबद्दलची त्यांची माहिती म्हटली, तर इतकीच की त्यांनी त्यांच्याच पंक्तीच्या इतर लोकांनी लिहिलेले लेख वाचले होते. मला आंधळ्या मागे आंधळ्यांनी जावे; तसाच प्रकार त्याबाबतीत बहुधा सर्वत्र आढळून आला. ज्या दुसऱ्या कित्येकांनी स्वतः त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संभाषण केले, त्यांपैकी बहुतेकांना गांधी यांच्या मतांचा उमज बरोबर पडलेला नाही.

सामान्य युरोपीय लेखकाच्या दृष्टीला गांधी एखाद्या कोड्यासारखे दिसतात. त्यांच्या दृष्टीने तो एक मोठा कूट प्रश्‍न असून तो समाधानकारक रीतीने सोडवणे त्यांना शक्य दिसत नाही. बिझांटबाई यांच्यासारख्या युरोपीयाला गांधी सर्वथा त्याज्य वाटतात, त्यांच्या म्हणण्याचा नुसता विचार करावा इतकीही योग्यता, त्यांच्या दृष्टीने गांधी यांस नाही. बिझांटबाई अदृश्य, अतर्क्य, अप्राप्य अशा प्रकारच्या गुणांनी युक्त असलेल्या महात्म्याच्या शोधांत होत्या आणि भटकता भटकता, त्यांना आता जो महात्मा भेटला तो तर सामान्य मानवी जीव! माणसांच्याच रक्तामांसाचा तो घडलेला! तो साधारण माणसाप्रमाणे दूधभाकर खाऊन राहणारा, हाताने कातलेल्या सुताची हाताने विणलेली खादी नेसणारा आणि सामान्य माणसे राहतात, तसल्याच सामान्य घरात राहणारा. तो महात्मा दिसण्यात अगदी साधा, त्याचे भाषण अगदी साधे आणि अलंकारहीन, तो अगदी सामान्य स्त्रीपुरुषांबरोबर बोलतो आणि तो जे बोलतो, तेच त्याच्या चित्ताला पटलेले असते. तो त्याच्या श्रोत्यांना काय आवडेल याचा विचार करून बोलत नाही. त्याच्या भाषणाने श्रोत्यांच्या चित्ताला आनंदाच्या गुदगुल्या होतील, की त्यांच्या चित्ताला विंचू चावल्यासारख्या वेदना होतील याचा विचार शिवत नाही. त्याचे बोलणे रोखठोक. त्यांत आडपडदा अथवा लपवालपवी मुळीच नाही. त्याच्या सार्‍या दिनचर्येत कसलेही काव्य म्हणून नाही. त्याचा जीवनक्रम प्रत्यक्ष स्थितीशी पक्का बांधला गेलेला असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात कल्पनामय काव्याचा प्रवेश कोठून होणार? त्याच्या कृतीत अथवा उक्तीत लपून राहिलेले रहस्यही कोठे नाही. तो स्वतःसंबंधी कोणालाही बुचकळ्यात पाडत नाही. त्याचा सारा व्यवहार जगाच्या नजरेसमोर चालतो. त्याची भेट घेण्यास कोणासही मनाई नाही. खाणेपिणे आणि निजणे वगैरे त्याचे सामान्य व्यवहारही साऱ्यांच्या साक्षीने होतात. तो त्याचे लेख चारचौघांत बसून लिहितो आणि तो कोणाशी बोलायचे झाले, तरी तेही चारचौघांत मंडळींच्या समक्ष बोलतो. त्याच्या जवळ काही गौप्य नाही आणि तो कोणाचे गौप्य लपवून ठेवायचा नाही. तो हाताने सूत काढतो, पण त्याने काढलेल्या धाग्यांचे साम्य कवींच्या, साहित्यकारांच्या, वेदांत्यांच्या अथवा सूक्ष्मेंद्रियशास्त्र्यांच्या धाग्याशी नाही. तो दृष्टांताने बोलत नाही आणि त्याचप्रमाणे, तो काही विशिष्ट देवतांची, चिन्हांची अथवा प्रतिमांची गरजही ठेवत नाही. तो जो धागा काढतो, तो अगदी साधा आणि जाडाभरडा. त्यामुळे त्याचे विणलेले कापडही तसेच, जाडेभरडे. मग तो कपडा राजकारणाच्या विद्येत मुरलेल्या धुरंदर पुरुषांस असह्य व्हावा यांत नवल काय?

अर्वाचीन काळच्या राजपुरुषाला त्या गृहस्थाचा मार्ग ध्यानातच येण्यासारखा नाही. साधेपणा, मोकळेपणा आणि निष्कपटपणा हे गुण अर्वाचीन राजकारणी पुरुषाला कोणी शिकवलेले नाहीत. त्याला राजकारणात त्या गुणांचे वास्तव्य असणे शक्य आहे हेसुद्धा खरे वाटत नाही. त्यामुळे त्या गृहस्थाचा साधेपणाच त्यांच्या चित्ताला बावरून टाकतो. त्याचा साधेपणा, त्यांना अशा कोटीचा वाटतो, की सामान्य बुद्धीला त्याचा उमज पडणे, त्यांना शक्‍य दिसत नाही. तो महात्मा स्वतः अगदी निर्भय चित्ताचा असून तो इतरांनाही भूलवत नाही. तो कसल्याही लौकिक चालीरीतींची पर्वा ठेवत नाही. तो लोकांतून अगदीच उठून जावे लागू नये म्हणून आवश्यक तितके शिष्टाचार पाळतो. त्याची वागणूक थेट व्हाइसरॉयपासून तो अगदी कंगालापर्यंत सर्वांशी एकसारखी. त्याला मोठ्यांच्या पायांवर डोके ठेवावे आणि धाकट्याच्या डोक्यावर पाय ठेवावेत, ही विद्या ठाऊक नाही. तो ज्या पोषाखाने व्हाईसरॉयकडे जाईल, तो त्याच पोशाखात भिकाऱ्यांचीही भेट घेईल. तो कोणालाही परात्पर गुरुच्या स्थानी लेखत नाही आणि कोणालाही तो शिष्य म्हणवत नाही. त्याचे शिष्य स्वतःला म्हणवणारे लोक पुष्कळ आहेत, पण तो स्वतःस कोणाचा गुरू म्हणवत नाही.

गांधी यांजपाशी काही अलौकिक शक्ती नाही आणि ते ती असल्याचा बाहणाही ते करत नाहीत. त्यांजपाशी दिव्यशक्ती आहे असे समजणारे भोळे लोक पुष्कळ आहेत. तथापी, स्वत: गांधी असल्या समजाचा प्रतिकार वारंवार मोठ्या अट्टहासाने करत असतात. मेस्मेरिझमसारख्या एखाद्या वशीकरण विद्येचा गंधही गांधी यांस नाही अथवा ते कोणत्या तरी युक्तीने कोणाला भुरळ पाडण्याचाही यत्न करत नाहीत. ते सदोदित प्रवास करत असतात आणि एखाद्या गोष्टीचा विचार करायचा झाला, तर तोही मोठ्याने बोलून करतात. त्यांना स्वतःची मालमिळकत नाही. त्यांचे खाते कोठल्याही पेढीवर नाही. ते पैसे व्याजी लावत नाहीत,  तथापी स्वतःच्या गरजेसाठी कोणाच्या मागेही लागत नाहीत. सारांश, गांधी हे तुम्हा-आम्हासारखेच सामान्य मानवी प्राणी आहेत. फरक इतकाच, की त्यांची दानत विशेष शुद्ध आणि दौर्बल्यरहित आहे. ते कोणत्याही कार्याला एकनिष्ठपणे वाहून घेतात. त्यांचे विचार आणि आचार ही दोन्ही सारखीच पवित्र आहेत. त्यांचे प्रेम सर्वांवर सारखे आहे. ते फक्त द्वेषाचे द्वेष्टे आहेत. क्षूद्र बुद्धी आणि मत्सर यांचा वास त्यांच्या चित्तात नाही. ते कोणत्याही कारणाने तत्त्वभ्रष्ट होत नाहीत आणि कोणापुढे मान वाकवत नाहीत. साधेपणा आणि सरळपणा ही दोनच त्यांची हल्ल्याची शस्त्रे आहेत आणि त्यामुळेच ते युरोपीयांस कोडे होऊन बसले आहेत.

ज्या हिंदी लोकांनी युरोपीय इतिहासात बुडी मारून त्यातील सारी तत्त्वे आपलीशी केली आहेत, ज्यांची मने युरोपीय राजकारणाने पूर्ण भरून गेली आहेत आणि जे युरोपीय संस्कृती व चालीरीती यांच्या भजनी लागले आहेत अशा हिंदी लोकांनाही गांधी आवडत नाहीत आणि त्यांना त्यांची तत्त्वेही समजत नाहीत. त्यांच्या दृष्टीने गांधी हा शुद्ध रानवट मनुष्य आहे. त्याचे पाय जमिनीला लागलेले नसून तो कल्पनाकाशात भराऱ्या मारतो हा त्यांजवरचा आक्षेप खरा असण्याचा संभव आहे. गांधी यांच्या डोळ्यांवर अर्वाचीन सुधारणेचा चष्मा चढलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या बुद्धीवर दांभिक तर्कशास्त्राचा पगडा बसलेला नाही. त्यामुळे मानवी जीवनाचे स्वरूप जसे वास्तविक आहे, तसे त्यांना दिसते. ते त्यांच्या हातून चूक कधी व्हायचीच नाही असे म्हणत नाहीत. ते स्वतः मूर्ख आणि वेडगळ आहोत अशी ओरडही करत नाहीत. कोणत्याही प्रश्नाची भवति न भवति होऊन त्यांचा निश्चय एकवार कायम झाला, की त्यांना त्यापासून ढळवणे हे जवळजवळ अशक्यच आहे. ते देवदूत नाहीत, तथापि त्यांना त्यांच्यापुढे नियोजित कार्य काय आहे ती जाणीव असून त्यांची श्रद्धा त्यांच्या अंगी कार्य सिद्धीस नेण्यास लागणारे सामर्थ्यही आहे अशी आहे. ते विनित आहेत, पण विनितपणा हा त्यांचा धंदा नव्हे. त्यांचा विनय अहेतुक आणि स्वभावजन्य आहे. हिंदुस्थानात स्वराज्यासाठी जी चळवळ चालली आहे, तिच्या प्रमुख स्थानी असलेला गृहस्थ अशा प्रकारचा आहे.

कित्येकांचे म्हणणे गांधी यांना कोणतीही राज्यपद्धत प्रिय नसून त्यांना नुसती पुंडशाही पाहिजे असे आहे. दुसऱ्या कित्येकांचे म्हणणे ते टॉलस्टॉयपंथवादी आहेत असे आहे. कित्येक त्यांना निहिलिस्ट समजतात. अशा रीतीने, त्यांच्याबद्दल अनेकांची अनेक मते आहेत. पण ते त्यांपैकी कोणत्याही पंथाचे नाहीत. त्यांनी त्यांना स्वतःला कोणत्याही पंथाला वाहून घेतलेले नाही. ते एक साधे भोळे हिंदू गृहस्थ आहेत. त्यांना त्यांच्या मातृभूमीचा अभिमान आहे. त्यांचा विश्वास परमेश्वर, धर्म आणि श्रृती यांच्या ठिकाणी आहे. त्यांना चातुर्वर्ण्यसंस्थाही मान्य आहे, तथापी त्यांना हल्लीच्या नानाविध जाती, पोटजाती आणि पंथ व उपपंथ या गोष्टी मात्र मान्य नाहीत. त्यांना केवळ जात म्हणून अमुक मनुष्य श्रेष्ठ आणि अमुक कनिष्ठ हा भेदही मान्य नाही, तथापी त्यांचे मत ज्यांनी बापजाद्यापासून चालत आलेले त्यांचे त्यांचे धंदे करावे असे आहे. त्यांचे म्हणणे आनुवंशिक संस्काराने त्या त्या धंद्याची हातोटी त्या त्या जातीला विशेष साधलेली असते असे आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी वर्ण जन्मजात आहे असे मानण्याइतका जुनाटपणाही आहे. त्यांचे मत निरनिराळ्या धर्मानुयायांनी व वेगवेगळ्या जातींच्या लोकांनी एकत्र सहभोजन करू नये आणि बेटीव्यवहारही करू नयेत असे आहे, तथापी त्यांचे म्हणणे तसे कोणी केले तर त्याला समाजबाह्य समजून वाळीत टाकावे असेही नाही. ते विटाळ नुसत्या स्पर्शाने होतो असेही मानत नाहीत आणि त्यांना कोणाही जातीच्या, धर्माच्या मनुष्याच्या हातचे अन्न खाण्यास प्रत्यवाय वाटत नाही.  त्यांना बेबंदशाही प्रिय नाही. इतकेच नव्हे, त्यांना तर शिस्त, अधिकार आणि संघटनाही प्रिय आहेत.

ते ‘काहीच नको’ असे म्हणणाऱ्या नेतीवादी लोकांपैकी नाहीत, तर उलटपक्षी ते स्वार्थत्याग आणि परोपकार या तत्त्वांवर उभारलेल्या शिस्तीचे भक्त आहेत. ते हिंदवासियांस इंग्रज, अमेरिकन किंवा जपानी यांच्याप्रमाणेच पूर्ण स्वातंत्र्य असावे या मताचे प्रतिपादन अट्टाहासाने करतात. म्हणून इंग्रज लोक आणि नोकरशाहीचे थुंकीझेले त्यांचा द्वेष करतात. त्यांस गोरे लोक स्वभावतः श्रेष्ठ आहेत अथवा परमेश्वराने त्यांना इतर लोकांवर राज्य करण्याचा ताम्रपट दिला आहे असे मुळीच वाटत नाही. त्यांस कोणाही एका वर्गाकडे धनीपण आणि बाकीच्यांकडे गुलामगिरी अशी वाटणी स्वभावजन्य आहे असे वाटत नाही. ते युरोपीय संस्कृतीचा द्वेष करत नाहीत, पण तिची उभारणी ज्या व्यापारी तत्त्वावर झाली आहे त्याचा मात्र त्यांना मनापासून तिटकारा आला आहे. त्यांनी सुरू केली सहयोगाची चळवळ ही नेतीवादमूलक नाही. इंग्रज लोक हिंदवासियांच्याच मदतीने राज्य करत आहेत. ते स्वतःची तुंबडी भरण्याकरता हिंदुस्थानची लूट मूळ रहिवाशांच्या मदतीनेच करत आहेत आणि त्यांच्या त्या कार्यास हिंदी लोक आपखुषीने मदत करत आहेत. त्यांना तशी मदत मिळू न देणे हे असहरकारयोगाचे ध्येय आहे. हिंदी लोक गांधी यांच्या नेतृत्वाखाली निर्भीड, धीट आणि स्वावलंबी बनत आहेत. ते त्यांच्या तत्त्वांसाठी हवी ती दुःखे भोगण्याची तयारी करत आहेत आणि त्यांनी या साध्याच्या मार्गात मदत म्हणून असहकारयोगाचे शस्त्र पाजळले आहे. शेकडोच काय पण हजारो लोक न्याय-कचेरीत स्वतःचा कोणताही बचाव न करता तुरुंगात गेले आहेत. गांधी यांच्या मार्गात लपवाछपवी नाही. त्यांच्या शाळेत तयार झालेली माणसे स्वतःस इष्ट असलेली गोष्ट चव्हाट्यावर करतात. गांधी त्यांच्या शिष्यांना सत्यनिष्ठा, निर्भयता आणि अहिंसा या तीन गुणांचे बाळकडू  पाजतात. रशियातील क्रांतिकारक पक्ष आणि हिंदुस्थानातील असहकारयोगी यांच्यातील फरक तेथेच आहे. ते हिंदुस्थानातील सांप्रतची राज्यपद्धत धुळीला मिळवण्यासाठीच बाहेर पडले आहे असे स्पष्ट सांगतात. ते त्यांच्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून द्यावे हे त्यांचे ध्येय चोरून ठेवत नाहीत. हिंदुस्थानास पूर्ण मुभा ब्रिटिश साम्राज्यातील घटक म्हणून त्यात राहायचे, की त्यातून त्याने बाहेर पडायचे हे ठरवण्याची असली पाहिजे हा त्यांचा उद्देश त्यांनी जगजाहीर केला आहे. त्यांना त्या कामात कोणत्या परक्याची मदत नको आहे.

गांधी यांचा असहकारयोग जसजसा बळावत आहे, तसतसे अधिकाऱ्यांच्या दमननीतीचे प्राबल्यही वाढत चालले आहे. नोकरशाही सभा पुकारली, की ती बंद पाडायची, वक्त्यांना आणि लेखकांना तुरुंगात टाकायचे इत्यादी ठरीव मार्गांनीही पुढे पाऊल टाकत आहे. तथापी, त्या दमननीतीस न जुमानता, असहयोगाचे पाऊल पुढे पडत आहे. हिंदुस्थान अहिंसायुक्त क्रांती पाहत आहे आणि त्या कार्यात हिंदुस्थानास स्त्रीवर्गाचेही साहाय्य आहे ही गोष्ट विशेष आनंदाची आहे. स्त्रियांचे तांडेच्या तांडे खादीची वस्त्रे नेसून असहकारी सभांना येतात. परदेशी कपड्याचा तिटकारा लोकांच्या चित्तात पूर्ण बाणावा म्हणून त्यांनी त्यांची लक्षावधी रुपयांची परदेशी वस्त्रे होळीत टाकली आहेत. दंडनीतीचे पुरस्कर्ते तिचा वासही त्यांच्या चळवळीला लागू नये म्हणून अट्टाहासाने मेहनत करत आहेत. जेथे रक्तपात झाला, तेथे उलट पक्षाच्या कृतीच्या अतिरेकाने लोक बेदील झाल्याचे आढळून आले. म्हातारेकोतारे, तरुण आणि मुलेही तुरुंगात जात आहेत आणि त्यांची संख्या शेकड्यांनी मोजता येण्यासारखी आहे. ती माणसे त्यांचा न्याय करण्याचा अधिकार ब्रिटिश कोर्टास नाही असे ठासून सांगून तुरुंगात जातात.

सरकारचे कायदे मोडण्याचा उद्योग आम्ही जन्मभर करू अशी शपथ वाहण्यास हजारो माणसे तयार आहेत, पण पुढाऱ्यांनी त्यांच्या कायदेभंगाच्या चळवळीला दंडनीतीचा गंधही लागू नये म्हणून चळवळीला अद्यापी प्रोत्साहन दिले नाही. अशा मंडळींपैकी कोणालाही पोलिसांनी पकडले म्हणजे जामीन न देता तो चौकीचा रस्ता सरळ सुधारतो.

तो भारतीय जनता ब्रिटिश सरकारची सत्ता मानत नाही आणि सरकारी न्यायावर भारताचा भरवसा नाही या तत्त्वाचा प्रसार अशा रीतीने करत असतो. कित्येक प्रसंगी त्यातील काही लोक बेताल होऊन पोलिसांवर तुटून पडले. तशाही गोष्टी मधून मधून घडतात. गांधी तशा लोकांचा मुलाहिजा मुळीच ठेवत नाहीत. गांधी ते लोक तत्त्वभ्रष्ट झाले असे स्पष्टपणे जाहीर करतात आणि ते त्यांस त्यांच्या त्या पातकाचे प्रायश्चित करण्यास सांगतात. मलबार प्रांती मात्र मोठी विचित्र घटना घडून आली. शेतकऱ्यांच्या सामान्य आप्तेष्टांची दु:खे आणि राजकीय असंतोष यांची मिसळ होऊन, त्यातच धर्मवेडेपणाची भर पडली. इतक्या सगळ्या गोष्टी घडून आल्यानंतर बंडाचा प्रचंड वणवा तेथे पेटला यात नवल नाही. गांधी यांस त्या बंडामुळे फार दुःख झाले, पण हिंदुस्थानच्या प्रचंड खंडांत मलबार हे एक क्षुद्र स्थळ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तेथे मोपल्यांची एकंदर वस्ती फार झाले तर वीस लक्ष असेल-नसेल आणि त्यांतील अगदी थोड्यांनी हाती शस्त्र धरले. बाकीचा मोठा भाग पूर्ण शांतीने वागत आहे. गांधी यांस मलबारात जाण्याची परवानगी मिळाली असती तर, त्यांनी त्या माथेफिरू सशस्त्र मोपल्यांस शांत केले असते, पण ‘सदय’ सरकारला ते आवडले नाही. हिंदू आणि मुसलमान यांतील द्वैतभाव वाढवण्यास उपयोगी पडणारी अशी ही सोन्यासारखी संधी चालून आली असता तिचा उपयोग करणे सरकारला अयुक्त वाटले यात नवल नाही.

असहकारयोगाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे 1. सरकारी पदव्या, दुसऱ्या मानाच्या वस्तू आणि मानाच्या जागा यांचा त्याग, 2. मद्यपाननिषेध, 3. मुलगे आणि मुली यांस सरकारी शाळांतून काढणे, हल्लीच्या शिक्षणपद्धतीमुळे परकीय सत्तेखाली गुलामगिरीत खितपत पडण्यास चांगल्या चांगल्या हिंदी लोकांस दिक्कत वाटत नाही. त्या पद्धतीतील विषारी नांगी त्यांना झोंबत नाही. त्याप्रमाणे त्यांना कामकरी वर्गाचे रक्तशोषण करून बांडगुळाप्रमाणे परान्नपुष्ट होण्यासही लाज वाटत नाही. त्यासाठी या शिक्षणपद्धतीचा उच्छेद करणे, 4. इंग्रजी आणि इतर युरोपीय साहित्याचा अभ्यास ज्यांत दुय्यम प्रतीचा समजला जाईल अशा शाळा उघडणे. हिंदुस्थानातील चालू भाषांस आद्यस्थान मिळून त्याबरोबरच हस्तकौशल्याच्या धंद्याचे शिक्षण देणे, 5. इंग्रजी पद्धतीच्या न्याय, न्यायकचेऱ्या आणि वकील यांजवर बहिष्कार घालणे, 6. परदेशी कापडाचा त्याग आणि स्वदेशीचा स्वीकार, 7. सरकारी नोकरीतून हिंदी लोकांस परावृत्त करणे, त्याच प्रमाणे ब्रिटिश सैन्य आणि पोलिस या नोकऱ्यांतूनही त्यांस मागे खेचणे, 8. कर न देणे.

कार्यक्रम तात्पुरता म्हणून मुक्रर करण्यात आला आहे. तो सर्वतोपरी परिपूर्ण आहे असे नाही आणि तोही साराच अमलात आणायचा आहे असेही नाही. गांधी आणि त्यांचे सहकारी यांनी केवळ बारा महिने या क्रमाला अनुसरून कार्य केले आणि तेवढ्या अल्प मुदतीतही आश्चर्यकारक यश मिळवले. पुष्कळांनी अद्यापि त्यांच्या पदव्यांचा आणि मानांच्या जागांचा त्याग केला नाही हे खरे, त्याच प्रमाणे स्वत:चा धंदा सोडणारे वकीलही अगदी थोडे आहेत हेही खरे आहे. विद्यार्थ्यांसंबंधी पाहता कोलकाता महाविद्यालयाच्या उपाध्यक्षाने सांगितलेली माहिती लक्षात ठेवण्यासारखी आहे. विद्यार्थी कॉलेजांत तेवीस टक्के आणि शाळांत सत्तावीस टक्के बाहेर राहिली. महाविद्यालयाच्या परीक्षेच्या फीच्या रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी तूट आली. परदेशी कापडावरील बहिष्कार फार चांगल्या रीतीने यशस्वी झाला. लांकेशायरला चिमटा बसत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंदुस्थानच्या उभ्या बाजारात परदेशी कापड पंचवीस टक्‍क्‍यांहूनही कमी खपते. गांधी यांस काही श्रीमंत व्यापाऱ्यांचाही पाठिंबा आहे ही गोष्ट ‘टिळक स्वराज्य फंडा’च्या वेळी उघडपणे निदर्शनास आली. फंडाला अभूतपूर्व यश येऊन तीन महिन्यांपेक्षाही कमी मुदतीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभी राहिली. गांधी यांनी काँग्रेसची घटना त्या तीन महिन्यांच्या अवधीत पूर्ण स्वरूपास आणली. तिच्या सभासदांची संख्या सुमारे एक कोटी आहे. गांधी यांनी त्यांच्या देशबांधवांजवळ त्याच तीन महिन्यांच्या मुदतीत पंचवीस लाख चरखे फिरले पाहिजेत अशी मागणी केली होती.

ती मागणीही हिंदी लोकांनी पुरी केली. गांधी यांस मिळालेल्या यशाची ही प्रत्यक्ष उदाहरणे आहेत.

तथापी, त्यांनी केलेले खरे मोठे कार्य याहून वेगळ्या स्वरूपाचे आहे. त्यांनी स्वातंत्र्याची आवड एकंदर सर्व राष्ट्राच्या मनात उत्पन्न केली आणि त्याबरोबरच लोकांस अहिंसेचा मार्गही पटवला तेच त्यांचे मोठे कार्य आहे. रशियातील क्रांतिकारक पक्षाचे पुढारी आणि गांधी यांच्या तालमीत तयार झालेले हिंदुस्थानातील पुढारी यांच्यातील फरक तेथेच आहे. गांधीपक्ष कोणतेही काम लपवून छपवून करत नाही. त्यात गुप्तमंडळ्या, निवासस्थाने आणि गुप्तकट यांचे नावही नाही. ते आणि त्यांचे साहाय्यकर्ते त्यांची कार्ये हिंदुस्थानात अथवा हिंदुस्थानाबाहेर, दिवसाढवळ्या चव्हाट्यावर करत असतात. ते त्यांचे कार्य चालू राजकीय पद्धतीचा समूळ उच्छेद करणे आहे असे स्पष्टपणे सांगतात. ते त्यांची सारी खटपट ब्रिटिश साम्राज्यात राहवे की त्या बाहेर पडावे हे ठरवण्याचा हक्क सर्व देशाचा असून तो त्यास मिळवून देण्यासाठीच आहे ही गोष्ट उघड बोलून दाखवतात.

कित्येक स्वतःच उच्च आणि मानार्ह समजणारे लोक नोकरशाहीच्या बाजूस असून, ते गांधी यांच्या चळवळीविरूद्ध खटपट करतात, हे खरे आहे. कारण त्यांना गांधी यांची चळवळ यशस्वी झाली तर त्यांचा मोठेपणा आणि श्रीमंती नाहीशी होईल असे भय  वाटते. नोकरशाहीनेही तसल्या लोकांस त्यांच्या लुटीच्या कारभारात दुय्यम भागीदार करून त्यांना बगलेत मारले आहे. लोकांची लूट करून, त्यांचे खिसे भरणे हा हक्क केवळ भांडवलशाहीला मिळाला आहे असे नसून, त्यात साम्राज्यशाहीही भागीदार आहे. गेली दीडशे वर्षें पुढारी वर्ग सुधारणांसाठी ओरड करत होता, पण सरकारने ती ओरड मनास आणली नाही. आरंभी तर त्या पुढारी वर्गांच्या मनात स्वराज्याची आकांक्षा मुळीच नव्हती. त्यांचे म्हणणे त्यांना मोठ्या जागांपैकी थोड्याशा अधिक जागा मिळाव्या आणि शिक्षणाचा प्रसार थोडा अधिक व्हावा एवढेच होते.

पुढे, 1905 साली तो मनू बदलला आणि स्वराज्याचे निशाण उभारणारा एक पक्ष हिंदुस्थानात निर्माण झाला. ते झाल्याबरोबर सरकार आणि त्याचे बगलबच्चे या दोघांनाही त्यांचे दिवस भरले असल्याचे कळून आले. पंडित मोर्ले यांनी ‘नेमस्तांस काखेत मारा’ ही ओरड सुरू केली आणि त्याच दिशेने नेमस्तांच्या तोंडावर थोडेसे तुकडे त्या बहाद्दर राजकारणी पुरुषांनी फेकले. नेमस्तांनीही आभारपूर्वक ते तुकडे पदरी बांधले व सरकारची स्तुतिस्तोत्रे गाण्यास सुरुवात केली आणि नोकरशाहीशी संगनमत करून स्वराज्यवाद्यांचा पक्ष हाणून पाडण्याचा विडा उचलला. सरकारने एका बाजूने दमननीतीचा अवलंब करावा आणि नेमस्तांनी लेखांच्या आणि व्याख्यानांच्याद्वारे लोकमताची दिशा बदलण्याचा उपयोग करावा अशी कामाची वाटणी झाली. या गोष्टीला थोडा काळ लोटतो, तोच युरोपात महायुद्ध सुरू झाले. लॉर्ड मोर्ले यांचे शिष्टमंडळ आणि हिंदुस्थानातील संस्थानिकवर्ग यांनी ब्रिटिशांची तळी उचलली आणि ते लोकांस ब्रिटिशांच्या विजयाबरोबर हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळेल असे भासवू लागले. हिंदुस्थान त्याचे रक्तशोषण महायुद्धात होऊन, पांढरा फटफटीत पडला. माणसे, पैसा आणि साहित्य यांचे डोंगरच्या डोंगर निरनिराळ्या युद्धक्षेत्रांत जाऊन पडले.

हिंदुस्थानाने लक्षावधी माणसे रोग आणि दुष्काळ यांस बळी पडली असतानाही माघार घेतली नाही. एकट्या इन्फ्लुएन्झाच्या साथीने केवळ सहा महिन्यांत साठ लाख बळी घेतले. अखेरीस, ब्रिटिशांना युद्धात यश मिळाले आणि त्यामागोमागच हिंदुस्थानला रौलट कायद्याची प्राप्ती झाली. हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यावर तो गदाप्रहारच झाला. युद्ध सुरू असताना, गांधी सैन्यभरतीचे काम करत होते, पण त्यांनी त्यांचे चित्त पुढे घडलेल्या त्या प्रकारांनी पालटून असहकारयोग पुकारला. त्यांनी त्यांच्या साधी राहणी, दीनवत्सलता आणि निर्भयपणा या सद्गुणांनी त्यावेळीही लोकांवर त्यांची छाप चांगलीच बसवली होती. नोकरशाहीने दमननीतीच्या सार्‍या प्रकारांस सुरुवात केली, पण गांधी यांच्या अनुयायांनी सरकारी हुकूमांना न जुमानता ती चळवळ तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याच्या चळवळीची पाळेमुळे हिंदुस्थानात फार खोल गेली असून त्यांचे उन्मूलन करणे सरकारच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या खिशातील ‘सभ्य’ गृहस्थांनी कितीही धडपड केली, तरी त्यांना ती चळवळ उलथून पाडता येणार नाही. सरकारने कितीही दमन केले, तरी ती चळवळ दडपून टाकणे त्याला शक्य नाही. इंग्रज लोकांनी वसाहतीसारखे स्वराज्य लोकांस देऊ केले, तर त्या तडजोडीला गांधी पक्षाचा मोठा भाग कबूल होण्याचा संभव आहे, पण ती गोष्ट आता आणखी दिरंगाईवर पडेल तर लोकमत अधिकाधिक क्षुब्ध होऊन त्या पक्षाला विलक्षण वजन प्राप्त होईल आणि पूर्ण स्वातंत्र्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने हिंदुस्थान संतुष्ट होणार नाही.

– लाला लजपतराय
(‘अमेरिनकन नेशन’मधून उद्धृत)

About Post Author