मुंबईतील ‘रॉयल ऑपेरा हाउस’ या पुरातन वास्तूला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘युनेस्को’तर्फे दिला जाणारा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे. ती वास्तू अनेक बाबतींत एकमेवाद्वितीय आहे.
‘रॉयल ऑपेरा हाउस’ ही केवळ संगीत मैफलींसाठी ‘बरोक’ शैलीत बांधलेली भारतातील एकमेव इमारत आहे. दर्शनी भिंतीवरील उंची दर्शवणारे आभासी कॉरिन्थियन शैलीतील स्तंभ, मिश्र आकारातील लाकडी तावदानी कमानदार खिडक्या व त्याच आकाराशी मेळ साधणाऱ्या पांढऱ्या रंगातील उठावदार दुपाखी महिरपी, स्टेनग्लास, घोटीव इटालियन मार्बल बलुस्टर्स, खिडक्यांभोवतीचा नक्षिदार गिलावा आणि कोरीव दगडी कमानीवर आधारित अरुंद बाल्कन्यांचे संरक्षक कवच व त्यावरील पाना-फुलांच्या आकारातील नक्षिकाम इत्यादींच्या कला-सौंदर्यपूर्ण सुसंगतीतून ‘बरोक’ शैलीची नमुनेदार वैशिष्ट्ये प्रकट होतात! त्या इमारतीच्या दर्शनी भिंतीच्या त्रिकोणी शिखरमाथ्यावरील (Podium) निरागस बालकांची शिल्पे व त्रिकोणी खोबणीतील निरनिराळ्या वयोगटांतील व्यक्तींची शिल्पे कला-मनोरंजन दर्शवणारी सांकेतिक प्रतीके आहेत. ती प्रतीकात्मक दृश्ये इमारतीच्या कार्यपद्धतीचा अंदाज रसिकांपर्यंत पोचवण्याइतपत सूचक आहेत! तसेच, उत्तराभिमुख प्रवेशद्वाराच्या छतावरील बैठ्या प्रसन्न मुद्रेतील बालकशिल्पाच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस चक्र असून, त्या बालकाचा उजवा हात ईश्वरकृपा दर्शवणाऱ्या देवतेसमान सूचक वाटतो! ‘ऑपेरा हाउस’च्या उत्तरेकडील भिंतीचा काही भाग मलाड खाणीतील फिकट पिवळसर घडीव दगडात बांधला आहे.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीमध्ये मुख्यत: संगीत व वक्तृत्वकला यासंबंधीचे कार्यक्रम सादरीकरणाच्या जिज्ञासेतून अद्भुत अशी ‘बरोक’ शैली (Baroque म्हणजे जिज्ञासू) उदयास आली. बरोक म्हणजे रसिकांच्या मनावर भुरळ घालणारे आभासी स्तंभ, कलासौंदर्याने अंतर्बाह्य नटवलेल्या भिंती, आकर्षक रंगांचा उपयोग, लाकूड व प्लास्टरमधील नक्षिकाम, मानवी आकारातील मार्बल पुतळे, मार्बल फरशी, आकर्षक भित्तिचित्रे, छत, भिंत व स्तंभ यांवरील झगमगणारे सोनेरी रंगाने सुशोभित केलेले नक्षिकाम, अंतर्गत सजावट, इत्यादी. लुइस ल् वाव याने आरेखित केलेले पॅलेस ऑफ व्हर्सिलस; तसेच, फ्रेंच राजा चौदावा लुइससाठी आरेखित केलेला ज्यूल्स हार्डोइन मानसर्ट ही बरोक शैलीची सर्वोत्तम उदाहरणे आहेत! इटलीतील मिलान येथील 1778 मध्ये बांधलेले ‘ल् स्काला ऑपेरा हाउस’ जगप्रसिद्ध समजले जाते! तसेच, पॅरिसमधील ‘पलाइस गॅनिअर’ व लंडनमधील ‘रॉयल ऑपेरा हाउस’ इत्यादी वास्तुशिल्पांना ‘They are another world of beauty’ असे म्हटले जाते!
मुंबईचा फोर्ट परिसर ब्रिटिशकाळात व्यापारी केंद्र म्हणूनच विकसित झाल्यानंतर सत्ताधारी व धनिक एतद्देशीय यांनी निवासासाठी मुंबईच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याजवळील वाळकेश्वरचा पहाडी भाग निवडला, काहींनी भायखळा-परळ भागातील प्रशस्त जागेत जाणे पसंत केले. ‘ऑपेरा हाउस’ सध्याच्या चर्नी रोड रेल्वे स्टेशनसमोरील ‘मामा परमानंद रोड’वरून गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या डाव्या वळणावर उभे आहे. त्या जागेपासून गिरगावमार्गे फोर्ट, चौपाटीमार्गे वाळकेश्वर व सँडहर्स्ट रोडमार्गे भायखळा परिसरात जाणे सोयीस्कर होते. ‘ऑपेरा हाउस’साठी जागा अशी सोयीची निवडण्यात आली होती. इमारतीचा पायाभरणी समारंभ 1911 मध्ये किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते झाला. ‘ऑपेरा हाउस’1915 मध्ये बांधून पूर्ण झाले.
त्या इमारतीने गेल्या शंभर वर्षांत अनेक चढउतार पाहिले. आयडियल पिक्चर्स कंपनीने 1935 मध्ये संगीत नाट्यगृहाचे सिनेमागृहात रूपांतर केले. गोंडलचे महाराज विक्रमसिंगजी जडेजा यांनी ती इमारत 1952 मध्ये विकत घेतली. तेथील सिनेमागृहसुद्धा 1980 नंतर बंद करावे लागले. ती जागा नंतर जाहिरातींच्या शूटिंगसाठी वापरली जात असे; पण कालांतराने, सिनेमागृह कायमचे बंद करण्यात आले. तब्बल बावीस वर्षें ती इमारत बंद होती! ‘वर्ल्ड मॉन्युमेंट फंड’ देणाऱ्या संस्थेने ‘रॉयल ऑपेरा हाउस’चे नाव ‘जगातील सर्वाधिक चिंताजनक’ पन्नास इमारतींच्या यादीत 2004 मध्ये नोंदले. त्यानंतर 2012 मध्ये भारतात पुरातन वास्तूंबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘रॉयल ऑपेरा हाउस’ इमारतीस जागतिक स्मारकयादीत घेण्यात आले. ज्योतिंद्र सिंघ जडेजा यांनी ‘ऑपेरा हाउस’च्या नूतनीकरणाची जबाबदारी वास्तुसंवर्धन आर्किटेक्ट आभा नारायण लांभा अँड असोसिएट्स यांच्याकडे सोपवली. खिळखिळ्या झालेल्या त्या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यास सात वर्षें लागली. पुनरुज्जीवित ‘ऑपेरा हाउस’चे उद्घाटन 2016 मध्ये झाले. अनोख्या शैलीतील त्या इमारतीला ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठीचा ‘गुणात्मक’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.
जुन्या ‘ऑपेरा हाउस’मध्ये कलेचे सादरीकरण केलेल्यांच्या यादीत बालगंधर्व, लता मंगेशकर, कृष्णा मास्तर, बापू पेंढारकर, मास्टर दीनानाथ, ज्योत्स्ना भोळे लोंढे, पटवर्धनबुवा व पृथ्वीराज कपूर अशा भारतीय दिग्गज संगीतकार, गायक आणि कलाकार यांचा समावेश आहे. ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या संगीतमय प्रयोगाचे सादरीकरण 26 नोव्हेंबर 2017 रोजी ‘रॉयल ऑपेरा हाउस’मध्ये झाले. बाबासाहेब पुरंदरे यांचे ओजस्वी निवेदन त्या प्रयोगाला लाभले होते. तो मराठी भाषेतील गेल्या शंभर वर्षांतील पहिला संगीतमय ‘शिवचरित्र’ प्रयोग असावा.
मूळ रचनाकाराने संगीतनाट्यगृहाचा आराखडा तत्कालीन रसिकांची आवड व अभिरूची आणि नाट्यसंगीतगृहाच्या गरजा ध्यानात घेऊन 1909 मध्ये बनवला आहे. जगभरातील वास्तुविशारदांवर एकोणिसाव्या शतकात युरोपीय शैलींचा पगडा होता. ब्रिटिशकालीन मुंबईतील बहुतांश सार्वजनिक इमारती गॉथिक शैलीत, तर इतर इमारती व्हिक्टोरियन निओ-क्लासिकल, इंडोसारसेनिक व आर्ट डेको शैलीत बांधलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, परदेशातही म्हणावी तशी प्रसिद्धी न लाभलेल्या ‘बरोक’ शैलीत ‘ऑपेरा हाउस’ बांधण्याचे धाडस मॉरिस इ. बँडमन व कोलकाता येथील कोळसा व्यापारी जहांगीर फ्रामजी कारका या द्वयीने केले! त्या द्वयीला करमणूक क्षेत्रात मान्यता होती. ‘ऑपेरा हाउस’मध्ये प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत त्या जागेतील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट रसिकाला वेगळेपणाची जाणीव करून देते. प्रेक्षागृहात जवळपास पाचशेचौऱ्याहत्तर आसनांची व्यवस्था आहे. स्तर तीन आहेत. तिन्ही बाजूंनी अलंकृत केलेला भव्य रंगमंच हा त्या प्रेक्षागृहाचे हृदयस्थान असावे! मुंबईत अनेक नाट्यगृहे बांधण्यात आली; पण 1980 च्या दशकात जगप्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्ट फिलिप्स जॉन्सनने आरेखित केलेले ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’ (NCPA) व पृथ्वी थिएटर या तोडीचे दुसरे नाट्यगृह बनले नाही! ‘ऑपेरा हाउस’ या दोन शब्दांच्या नावाने ओळख मिळालेल्या इमारतीला पुढे ‘रॉयल’ हे समर्पक विशेषण लागण्याची कारणे त्या जागेला प्रत्यक्ष भेट दिल्यास समजून येतात!
संगीतनाट्यगृह पाहण्याचा अनुभव घेतल्यानंतर आढळलेल्या काही गोष्टी –
‘रॉयल ऑपेरा हाउस’ इमारतीचे काही बाह्य घटक नजर खिळवून ठेवणारे आहेत, ते असे –
♦ पदपथासह इमारतीचा ईशान्येकडील दर्शनी भाग आणि कलात्मक रीत्या काटछाट केलेले वृक्ष हे त्या इमारतीचाच एक भाग असल्यासारखे भासतात.
♦ स्वागतकक्ष दालनात, इमारतीचा शंभर वर्षांचा इतिहास व तांत्रिक माहिती मांडलेली आहे.
♦ मालाड खाणीतील फिकट पिवळसर दगडातील भिंत व खिडक्यांच्या आकारात वळण घेणाऱ्या ईशान्येकडील भिंती यांना धरून ठेवणाऱ्या पांढऱ्या रंगातील महिरपीची कलात्मक व कल्पक मांडणी यांतील लयबद्धता मोहक आहे.
♦ पांढऱ्या रंगात इतर रंगांना सामावून घेण्याची क्षमता अधिक असते, हे ‘ऑपेरा हाउस’च्या दर्शनी रंगसंगतीवरून कळते.
इमारतीच्या तळघरातील आग नियंत्रण व प्रेक्षागृहातील आरोग्यघातक कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन व्यवस्था यांतील दूरदृष्टी अचंबित करणारी आहे!
♦ एकाच रांगेतील समान आकारातील अर्धगोलाकार खिडक्यांची पार्श्वभूमी लाभलेला पहिल्या मजल्यावरील उत्तराभिमुख लांब-रुंद गच्चीचा कठडा शानदार इटालियन संगमरवरी खांबांनी (Balusters) सजलेला आहे. सूर्यास्तानंतरच्या संधिप्रकाशात ती जागा अधिक खुलून दिसते. ती इमारत राजस (Royal) म्हणून घेण्यास पात्र आहे!
‘रॉयल ऑपेरा हाउस’च्या अंतर्गत रचनेतील काही घटक मनोवेधक व नजर खिळवून ठेवणारे आहेत. ते असे –
♦ स्वागत कक्षातील आठ पाकळ्यांच्या डोमच्या पोकळीत डकवलेली तत्कालीन जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपीयर, कवी विल्यम वर्डस्वर्थ व ख्यातनाम संगीतकार यांची छायाचित्रे!
♦ स्वागत कक्ष व मेजवानी सभागृह यांच्या (Banquet hall) भिंती पांढऱ्या व पिस्ता रंगछटांनी सुशोभित केल्या आहेत. त्या दोन्ही रंगांशी सोनेरी रंग जवळीक साधणारा आहे!
♦ काही अद्भुत घटक रसिकांच्या मनातील उत्सुकता वाढवतात. उदाहरणार्थ, स्वागत कक्षातील मानवी आकारातील अप्रतिम मार्बल पुतळे. ते सेल्फीवेड्या प्रेक्षकांसाठी प्रॉप्स (टेकू) बनले आहेत! विविध आकार व तशाच शैली यांतील एकाधिक स्तरांतील आकर्षक झुंबरे, मंद विद्युत रोषणाई, तिकिट खिडकीचा अपारंपरिक आकार व पुरातन महत्त्व लाभलेल्या वस्तू, इत्यादी.
♦ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केलेली प्रेक्षागृहातील स्वतंत्र व्यवस्था (BOX), प्रेक्षागृहाच्या दोन्ही भिंतींवरील अरुंद बाल्कन्यांचे थर इत्यादी…
♦ स्वच्छतागृहात एकाच रंगातील (Mono color) भित्तिचित्रे डकवण्याची कल्पना नावीन्यपूर्ण आहे!
♦ रंगमंचावरील काही घटक तांत्रिक दृष्ट्या सरस आहेत. उदाहरणार्थ, प्रेक्षागृहातील त्रिस्तरीय आसनव्यवस्था व प्रेक्षक-रंगमंच समन्वय (ध्वनिस्पष्टता), शेवटचे आसन व रंगमंच यांतील अंतर, दोन पंक्तींतील आसनांमधील व मार्गिकेची ऐसपैस रुंदी इत्यादी.
♦ प्रत्येक मजल्यावरील स्वागत कक्षांना जोडणारी दोन्ही टोकांवरील जिन्यांची रचना.
♦ चौकोनी आकारातील भव्य रंगमंच हे प्रेक्षागृहाचे आकर्षण आहे. विविध पद्धतींनी अलंकृत केलेले चौकटीवरील नक्षिकाम व स्तंभ, रंगमंचापासून पुढे ओढलेले फॉल्स सीलिंग भोंग्याच्या (Gramophone) आकारात केले आहे. त्यामुळे ध्वनी शेवटच्या आसनापर्यंत पोचतो, इत्यादी. त्याचबरोबर प्रकाश, ध्वनी (Acoustic), वातानुकुलित योजना या गोष्टी नाट्यसंगीत मैफलींस पूरक व अत्याधुनिक दर्ज्याच्या आहेत.
काही गोष्टी खटकल्या. त्या अशा
– स्वच्छतागृहांचे खुजे दरवाजे, स्वागत कक्षातून स्वच्छतागृह व नाट्यगृह प्रवेशद्वाराच्या मार्गिकेतील अपुरी जागा.
– जिन्यातील प्रत्येक पायरीवरील कलात्मक खाच! (कदाचित, ती हिकमत त्या काळात एका वेळी एकाने चढउतार करावा यासाठी केलेली असावी. परंतु वर्तमानात दुरुस्ती अपेक्षित आहे!)
– प्रेक्षागृहातील एकूण सोनेरी व लाल रंगकामाचा अतिरेक, नक्षिकामातील बेजोड रंगकाम, ओबडधोबड नक्षिकाम व त्यावर लेपलेला रंग, जिन्याच्या कलत्या भागावरील टवके, लाकूड व व्हिनियरवरील पॉलिशचे डाग, इत्यादी…
तत्कालीन मुंबईत बांधलेल्या काही अप्रतिम इमारतींप्रमाणे या इमारतीच्या मूळ रचनाकाराचे नावही गुलदस्त्यात राहिले आहे! ‘युनेस्को’कडून मिळालेल्या पुरस्कारात, ‘ऑपेरा हाउस’ची इमारत बांधणारे मॉरिस बँडमन व जहांगीर कारका, सध्या इमारतीचा मालकी हक्क असलेले गोंदल संस्थानचे महाराज, संवर्धन वास्तुविशारद आभा लांभा व मूळ रचनाकार यांचा वाटा खूप मोठा आहे. या संदर्भात, खुद्द मॉरिस बँडमनचे विधान बोलके आहे. ते म्हणतात, ‘Nobody, however, is likely to remember the man who started it’. मॉरिस बँडमन हा या अद्भुत वास्तुसौंदर्यामागील ‘खेळिया’ होता! ‘ऑपेरा हाउस’च्या निर्मितीप्रमाणेच मॉरिस बँडमनचा भारतातील वास्तव्याचा इतिहासही मनोरंजक आहे! त्यांचे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झाले. त्यास ‘Theater pioneer of the East’ असे गौरवले गेले होते व ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ‘Pioneer of musical comedy’ असे म्हटले होते. संवर्धन वास्तुविशारद आभा लांभा यांनी वृक्ष-फांद्यांच्या कलात्मक काटछाटीतून वृक्षाचा व्यास, विस्तार व उंची यांच्या माध्यमातून पुनरुज्जीवित इमारतीच्या दर्शनी भागास उजाळा दिला आहे! त्या कला-संवेदनशील दृश्यातून परिसराचा चेहरा बदलल्याचे जाणवते! पुरातत्त्व खात्याने या शाश्वत ठेव्याचे महत्त्व ओळखून या इमारतीला ‘ग्रेड-1’ दर्जा दिला आहे.
‘युनेस्को’ने जगभरातील वारसा वास्तू नष्ट होण्याच्या समस्येची गंभीर दखल घेऊन 16 नोव्हेंबर 1972 रोजी ‘वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन’ची स्थापना केली होती. भारताने 14नोव्हेंबर 1977 रोजी कन्व्हेन्शनवर सही केली. महाराष्ट्र सरकारने ते धोरण स्थानिक पातळीवर राबवण्यासाठी भारतात सर्वप्रथम पुढाकार घेतला. ‘हेरिटेज रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर बॉम्बे 1995 अॅक्ट’नुसार, मुंबईतील सहाशेपंधरा ठिकाणे वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, स्थापत्य क्षेत्राशी संबंधित वास्तूंसह बाणगंगा, खोताची वाडी अशा धार्मिक, सांस्कृतिक परिसरांचा समावेश आहे. त्या वास्तू मुंबईकर नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग अनेक वर्षें होत्या. 16 ऑक्टोबर 1916 रोजी बांधलेली इमारत शंभर वर्षांनंतर, 2016 साली पुनरुज्जीवित करण्यात आली.
– चंद्रशेखर बुरांडे, fifthwall123@gmail.com
(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत)