रॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास

2
46
carasole

‘रॉबी डिसिल्वा हे पहिले मराठी/भारतीय ग्राफिक आर्टिस्ट, की ज्यांना युरोपीयन डिझायनरच्या बरोबरीने सन्मानाने वागवले गेले! रॉबी यांनी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात जागतिक दर्जा व कौशल्य सिद्ध केल्यानेच त्यांना इटालीच्या मिलान शहरातील प्रसिद्ध ‘स्टुडिओ बोजेरी’ ह्या ठिकाणी सन्मानाने बोलावले गेले. तसेच, लंडनच्या ‘जे. वॉल्टर थॉम्पसन’ जाहिरात संस्थेत ज्येष्ठ कला दिग्दर्शक ह्या त्या काळातील अत्यंत दुर्मीळ पदाने सन्मानित केले गेले. रॉबी हे एकमेव भारतीय डिझायनर, की ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीने सन्मानित केले गेले. फॅशन डिझाईनच्या नवनवीन वाटा पॅरिसला सुरु होतात हा समज असलेल्या काळात रॉबी डिसिल्वा व इतर काही युरोपीय प्रतिभावंत यांनी तो मान काही काळ लंडन व मिलान (इटली) येथे खेचून आणला!

रॉबी यांचा जन्म मुंबईजवळ वसईचा. त्यांची युरोपातील प्रतिभाशाली पंधरा-वीस वर्षांची कारकीर्द वगळली तर त्यांचे सारे आयुष्य वसई-मुंबईत गेले. त्यांनी आई-वडिलांची व कुटुंबाची काळजी वाहिली. ते स्वत:च वृद्धावस्थेत वसईला राहतात.

भारतात पॅकेजिंग डिझाईन आणि इंडस्ट्रियल डिझाईन या कलाकौशल्याची सुरूवात करू देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते जेव्हा भारतात परतले तेव्हा भारतातील डिझाईन कलेची समज प्राथमिक अवस्थेत होती. भारतातील कलाकारांचे लक्ष युरोपीयन डिझाईन ‘कॉपी’ करण्यावर असे. ते बदलून त्यांनी स्वत:चे सत्त्व असलेली डिझाईन कला घडवण्याचा प्रयत्न केला.

रॉबी भारतीय डिझाईन कलेच्या पंचवीस वर्षें पुढे होते. साहजिकच, लोकांना त्यांच्या कामाचे आकलन झाले नाही – त्यांची सृजनक्षमता समजली नाही. ती समजण्याकरता पुढे बरीच वर्षें जावी लागली. तोपर्यंत रॉबी दुर्लक्षित राहिले. पण त्या माणसाने वसईत एकाकी राहून उपयोजित कलेच्या प्रतिष्ठापनेसाठी चिकाटीने प्रयत्न केले.

भारतीय ग्राफिक डिझायनरची नवी पिढी १९७०च्या नंतर उदयास आली. रॉबी त्या आधी पंचवीस-तीस वर्षें युरोपात सृजनशील डिझायनर, ग्राफिक डिझायनर, इंडस्ट्रियल डिझायनर, कॉर्पोरेट आयडेंटिटी तज्ज्ञ म्हणून नावाजले गेले होते. ती क्षेत्रे भारतात जन्मण्यापूर्वीच रॉबी यांना त्या विषयातील आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या अनेक नामवंत जाहिरात कंपन्यांमधून मागणी होती. रॉबी यांचे अफाट कर्तृत्व जगाच्या नकाशावर आहे. ब्रिटन, अमेरिका, रशिया, कॅनडा, इटली, फ्रान्स, पोलंड, बेल्जियम, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्कॅडेनेविया, झेकोस्लाव्हाकिया, जपान, कोरिया, इराण इत्यादी देशांत प्रदर्शनांमध्ये त्यांच्या डिझाईनसंबंधीच्या कृती मांडल्या गेल्या आहेत. त्या त्या देशांनी त्यांना त्या त्या वेळी आमंत्रित केले आहे. मग अशी अनुकूल परिस्थिती असताना रॉबी ह्यांचा पुढील जीवनप्रवास अपेशी का झाला? हा भारतीय चित्रकला जगतास अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

वीणा गवाणकर यांनी या उपेक्षित कलावंताची महती टिपली आहे. त्यांनी लिहिलेल्या नव्या चरित्रात्मक पुस्तकात रॉबी यांचे आयुष्य व कार्य यांचा पट उभा राहतो. रॉबी डिसिल्वा यांची कहाणी वाचताना कधी डोळ्यांत पाणी येते, कधी निराशेने मन काळवंडते. तर कधी ऊर अभिमानाने भरून येतो.

रॉबी डिसिल्वा यांचा जन्म १९३० साली वसईजवळच्या पापडी गावालगत छोट्या पोपेसाव वस्तीत झाला. पण त्यांनी त्यांच्या प्रतिभाशाली कलाकारीने जगातील मोठमोठ्या देशांत मानाचे स्थान मिळवले. त्याच्या यशापयशाची गोष्ट प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे.

रॉबी डिसिल्वा यांनी त्यांचा कलाप्रवास चित्रकलेच्या माध्यमातून सुरू केला. त्यांनी नोकरी करून जे.जे.स्कूलमधील उपयोजित कला (Applied Arts) हा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला, त्यांचे लेटरिंग, कॅलिग्राफी आणि पोस्टर डिझाईन यांमध्ये जबरदस्त प्राविण्य होते. ते पार्ट टाईम कोर्सला असूनसुद्धा Applied Art च्या चतुर्थ (अंतिम) वर्षात प्रथम श्रेणीत पहिले आले. रॉबी यांना मिळालेला प्रथम श्रेणी व प्रथम क्रमांक हे वृत्त वृत्तपत्रात झळकले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने तर त्यांच्या छायाचित्रासकट बातमी छापली. रॉबी यांचे तोपर्यंतचे रेकॉर्ड आणि शिक्षकांनी केलेली शिफारस यामुळे त्यांना १९५५-५६ सालासाठी फेलोशिप मिळाली. त्यांची सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ ‘अॅप्लाईड आर्ट’चा फेलो म्हणून नेमणूक झाली.

गौतम बुद्धाच्या अडीच हजाराव्या वर्ष जयंतीनिमित्त पोस्ट अँड टेलिग्राफ मंत्रालयाने १९५५ साली अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली. ती स्पर्धा विशेष स्मृती पोस्टाच्या तिकिटाचे डिझाईन बनवण्याची होती. रॉबी यांनी गौतम बुद्धाविषयी माहिती मिळवली. बोधी वृक्ष, त्याची पाने, स्तूप, बौद्ध धर्माची तत्त्वे असे घटक घेऊन, त्यांची प्रतीकात्मक पद्धतीने मांडणी केली. रॉबी यांचे ते डिझाईन बुद्धाला अपेक्षित शांतता, समृद्धी असा अर्थ प्रतीत होईल असे होते. रॉबी यांना स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. रॉबी यांची प्रवेशपत्रिका संपूर्ण भारतातून आलेल्या अडीचशे प्रवेश पत्रिकांमधून पहिली ठरली होती. त्याची पुढची पायरी म्हणजे रॉबी यांचे डिझाईन असलेले डाक तिकिट रॉबी यांच्या नावासह छापले गेले. ते पुढे व नवीन काही शिकण्याच्या जिद्दीने लंडनमध्ये गेले. त्या प्रवासात त्यांना परिस्थिती व स्वभावातील अबोलपणा यामुळे अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी चिकाटीने व त्यापेक्षाही त्यांच्या प्रतिभाशाली कलेने त्यावर मात केली.

रॉबी यांनी, त्यांची गुणवता, तयारी लक्षात घेता पुढील शिक्षणासाठी लंडनला जावे असे सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ ‘अॅप्लाईड आर्ट’चे डीन व्ही. एन. आडारकर व इतर प्राध्यापक मंडळी यांना वाटू लागले. त्यावेळी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाही लंडनला शिक्षण घेण्याकरता मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून जावे लागे. रॉबी ऑगस्ट १९५६ मध्ये बोटीने लंडनला पोचले. त्यांनी तेथे ‘सेण्ट्रल स्कूल ऑफ आर्ट्स अँड डिझाईन’मध्ये प्रवेश घेतला. त्यांचे राहण्याचे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर होते. तेथील प्रवासखर्च झेपत नसल्यामुळे ते अर्धे अंतर ट्यूब रेल्वेने व अर्धे अंतर पायी जात! ‘सेण्ट्रल स्कूल’चा दर्जा खूप उच्च; तेथील कलेचे जग खूप वेगळे होते. रॉबी फावल्या वेळात फलक, स्केचेस करून कामे मिळवत. त्यांचे उत्कृष्ट सुलेखन त्या कामी आले. त्यातून त्यांना पैसे मिळू लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे काही जाणकार मंडळी होती त्यामध्ये कोलीन फोर्ब्स (रॉबीचे शिक्षक आणि मार्गदर्शक) यांनी त्यांना उत्तम मदत केली. टायपोग्राफी हा रॉबी यांचा आवडीचा विषय. त्यात त्यांनी प्राविण्य मिळवलेच. ते तेथील शेवटच्या परीक्षेत पहिले आले. त्याकरता स्कूलने त्याना निरोपाची पार्टी दिली. गमतीची गोष्ट म्हणजे रॉबी १९५६ च्या ऑगस्टमध्ये पुढील शिक्षणासाठी लंडनला आले तेव्हा ते कोणालाच माहीत नव्हते. मात्र साडेतीन वर्षानी ते सेंट्रल स्कूलमध्ये पहिले आले त्यावेळी त्यांना मिळणाऱ्या निरोपाच्या पार्ट्या संपता संपत नव्हत्या!

चित्रकलेच्या उपयोजित विभागामधून अनेक कौशल्यशाखा निघतात. त्यात ग्राफिक डिझाईन जाहिरात कला, इंडस्ट्रियल डिझाईन या वाढत्या उद्योगधंद्यांसाठी अतीव उपयुक्त. वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनाप्रमाणे सिम्बॉल डिझाईन – याबाबत भारतात फारच कमी बोलले जाते, कारण त्याविषयी माहितीच नसते. फाईन आर्ट्समधील ज्या शिक्षणाला ग्राफिक आर्टमधील विद्यार्थी जात त्यांच्या कामाचा वापर व्यापारी कारणासाठी सुरू झाल्यामुळे तिलाच ग्राफिक डिझाईन या नावाची संज्ञा मिळाली. एडवर्ड डिविगिन्स ह्यांनी १९२२ मध्ये प्रथमच ग्राफिक डिझाईन ही संज्ञा वापरली व पुढे तिला जगात मान्यता मिळाली.

रॉबी यांनी नंतर इटालीमधील मिलानमध्ये ‘स्टुडिओ बोजेरी’(Studio Bojeri)  येथे काम केले. रॉबी यांच्यावर ‘स्टुडिओ बोजेरी’मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसाठी बोधचिन्हे बनवण्याचे काम सोपवण्यात आले. त्यांनी ती कामे मोठ्या कल्पकतेने उत्तम तऱ्हेने पार पाडली. ग्राफिक डिझायनर्स, आर्किटेक्चरल डेकोरेटर्स, इंडस्ट्रियल डिझायनर यांना इटालीमध्ये मान मिळत असे. मिलान ही तर उद्योगनगरी. त्यामुळे साहजिकच रॉबी यांच्या जगातील उच्च कलाकारांच्या भेटी होऊ लागल्या. तेथून ते रोमला गेले. त्यांना डोलोरस हार्ट यांना भेटायचे होते. डोलोरस हार्ट ही तरुण अभिनेत्री. तिने ब्रिटिश व अमेरिकन चित्रपटसृष्टी गाजवली होती. पुढे, अचानक तिने सिनेसृष्टी सोडून संन्यास घेतला व ती नन झाली. पण दुर्दैवाने तिची व रॉबी यांची भेट झाली नाही.

रॉबी इटालीतील दीड वर्षांच्या वास्तव्यानंतर लंडनला परतले. कारण लंडन त्यांना City of Any Dream वाटत असे. लंडनला त्यांची ‘सेण्ट्रल स्कूल’मध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. ‘जे. वॉल्टर थॉमसन’ ही जगविख्यात अमेरिकन जाहिरात कंपनी. त्या कंपनीत रॉबी यांनी आर्ट डिरेक्टर म्हणून प्रवेश केला. त्या कंपनीतील ते पहिले भारतीय आर्ट डायरेक्टर झाले. त्यांनी तेथे प्रसिद्ध केलॉगसाठी पॅकेजिंग डिझाईन केले. त्यानंतर त्यांनी सिगारेट कंपन्यांसाठी पॅकचे नवे वेष्टन व जाहिराती केल्या.

पुढे, १९६५ साली लंडनच्या प्रेस एक्स्चेंज कंपनीने भारतातील प्रसिद्ध ‘‘एल.पी.ई.अय्यर्स अॅडव्हर्टायझिंग’बरोबर सहकार्य करार केला. कंपनीने रॉबी यांना ‘एल.पी.ई.अय्यर्स’मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून पाच वर्षांच्या करारावर काम करण्याची ऑफर दिली. रॉबी यांना त्या निमित्ताने भारतात चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९६७ मध्ये लंडन सोडले. भारतात परतल्यावर, रॉबी यांनी कंपनीसाठी काही कलर अॅड फिल्म्स् बनवल्या. त्यामध्ये ओटीन टाल्कम पावडर, लॅक्टो कलॅमिन अशा उत्पादनांचा समावेश होता. शिवाय, त्यांनी काही चित्रपटांच्या प्रमोशनसाठी मदत केली. त्यामुळे त्यांना चित्रपटांसाठी आर्ट डिरेक्टर म्हणून बोलावणे येऊ लागले. मात्र रॉबी यांनी त्यांचा विचार केला नाही. रॉबी यांच्या मनात स्वत:चा डिझायनर स्टुडिओ उभा करण्याचा विचार करियरच्या त्या टप्प्यावर आला.

त्यांनी ‘एलपीई अय्यर्स’मधील पाच वर्षांचा करार संपल्यावर कंपनीने दिलेला ताडदेवमधील मोठा फ्लॅट सोडला व ते त्यांच्या मूळ गावी राहण्यास गेले. त्यावेळी त्यांना युरोपीय (इंग्लंडमधील) जाहिरात कंपन्या मोठ्या मानाची पदे देऊन बोलावत होत्या, पण त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर टाकलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी (व्यक्तिगत यशाचा विचार बाजूला ठेवून) वसईत राहण्याचा निर्णय घेतला. विशेषत: आईचे दीर्घ आजारपण लक्षात घेता, त्यांचा तो निर्णय कौटुंबिक हिताचा ठरला.

त्यांना ते त्यांनी वडिलांना दिलेला शब्द पाळू शकले याचे समाधान अधिक वाटले. ते त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद आर्थिक संपन्नतेत न मांडता भारतीय आध्यात्मिक तत्त्वाप्रमाणे मानसिक/आंतरिक समाधानात मांडतात. त्यांनी स्वत:विषयी बोलताना म्हटले आहे, की “मी छोटी Ad Agency  चालवली, व्यावसायिक नीतिमत्तेशी तडजोड केली नाही, सुरवातीला निराशा आली पण प्रामाणिकपणे स्वत:ला साक्षी ठेवून जगलो, मी समाधानी आहे, भूतकाळ उकरण्यात मला रस नाही.”

रॉबी यांनी त्यांचे धाकटे भाऊ लॅन्सी आणि डोनल्ड यांना हाताशी घेऊन स्वत:ची ‘डिसिल्वा असोसिएट्स फर्म’ फोर्ट विभागातील हॉर्निमन सर्कलजवळ सुरू केली. ते तसा डिझाईन स्टुडिओ भारतात सुरू करणारे कदाचित पहिले असावेत. रॉबी यांच्या कंपनीला दिल्लीत भरलेल्या ASIA 72 या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी भारताचा पव्हेलिअन मांडणीचे काम मिळाले. रॉबी यांचे सुरुवातीपासून धोरण होते, की गुणवत्तेशी तडजोड करायची नाही व सचोटीने व्यवहार करायचा. आडमार्गाने व्यवहार करायचा नाही. त्यांनी त्यांच्या एजन्सीमार्फत अडवानी अर्लिकोन, मल्याळम मनोरमा अशी काही महत्त्वाची कामे केली. भारतातील वेष्टन क्रांतीचे प्रवर्तक रॉबी यांनी JWT मुंबईसाठी, लिरील सोप, ओल्ड स्पाईस वगैरे उत्पादनांकरता पॅकेजिंग डिझाइन केले होते. त्यांनी १९७३ साली डिसिल्वा असोसिएट्सतर्फे स्वतंत्रपणे ब्रिटानिया, स्नॅक्ससाठी अभिनव वेष्टन केले होते. ते त्यांचे भारतात विकल्या जाणा-या वस्तूसाठी आकर्षक वेष्टन देण्याचे मूलस्वरूप काम आहे.

त्यांनी वसईतील ‘सुवार्ता’ मासिकासाठी मुखपृष्ठ करून दिले. त्यांचे त्यांनी केलेल्या कामांबद्दल अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले. वसईतील लोकांनीही उशिरा का होईना, त्यांनी केलेल्या कामाचे महत्व जाणले. वसईत रॉबी यांनी त्यांच्या झालेल्या सत्कारनिधीत स्वतःच्या पैशाच्या भरीतून रॉबी डिसिल्वा दृककला महाविद्यालय सुरु केले. पुढे, त्याचे रूपांतर ‘वसई विकासिनी’ कला विद्यालयात झाले.

रॉबी यांनी त्यांची अॅड एजन्सी उतारवयामुळे बंद केली. त्यांनी त्यांचे वास्तव्य त्यांच्या जन्मगावी म्हणजे वसई पापडी येथे ठेवून घरातील सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या, त्याची कोठे वाच्यता केली नाही. त्यांचे कर्तृत्व प्रसिद्ध होण्याकरता त्यांच्या वयाचे पंच्याऐंशीवे वर्ष उजाडावे लागले!

रॉबी यांना ‘अवर फादर’ प्रार्थनेच्या सुलेखनासाठी १९५३ साली स्टुडंट्स कॅग (कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड) अॅवार्ड मिळाले होते. ‘कॅग’ ही भारतातील उपयोजित कलाकारांची आद्य संस्था. त्यानंतर उण्यापुर्‍या साठ वर्षानंतर, २०११ साली त्यांच्या भव्यदिव्य कारकिर्दीसाठी ‘कॅग’नेच त्यांचा ‘कॅग हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. त्या समारंभानिमित्त त्यांना दिलेल्या सन्मानपत्रात सुरुवातीलाच म्हटले आहे – “पाश्चात्य गुणवत्तेच्या प्रमाणभूत कठोर आदर्शानुसार वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संकल्पन (डिझाईन ) शैलीची निर्मिती करण्याचे मूलभूत कार्य केल्याबद्दल या प्रख्यात भारतीय ग्राफिक डिझायनरचा समावेश ‘कॅग हॉल ऑफ फेम’ मध्ये करण्यात येत आहे.”

रॉबी यांनी अनेक दिग्गज डिझायनर्स, विख्यात जाहिरात कंपन्या. अव्वल डिझाईन स्टुडिओ यांच्या समवेत केलेल्या कामगिरीचा आढावा घेताना सन्मानपत्रात पुढील नोंद केली गेली आहे – “त्यांच्या या कामगिरीमुळेच ते भारतीय डिझायनर्स कलेचे उद्गाते ठरतात.”

दृकबोध चिन्हांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर योगदान देणार्‍या जागतिक महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये रॉबी डिसिल्वा यांचा समावेश होतो.

रॉबी यांच्या गुणवत्तेचा, कार्यकर्तृत्वाचा बोलबाला परदेशात अधिक झाला. भारतातील काळाच्या पुढे असणार्‍यांची घुसमट, कुचंबणा त्यांच्या वाट्याला आली. युरोपात समकालीन, समव्यवसायिकांत अनुभवलेला बौद्धिक आनंद, भारतात आल्यावर त्यांच्या लेखी इतिहासात जमा झाला होता! ते स्वत:च्या माणसांत, स्वत:च्या जगात आकलनाच्या पलीकडे राहिले. पण त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार  केली नाही.

रॉबी यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना जे ध्येय साध्य करायचे होते, जेथे पोचायचे होते तेथे ते पोचले आहेत! मला तर ते एखाद्या भारतीय ऋषिमुनीसारखे वाटतात. त्यांनी त्यांच्या ध्येयासाठी प्रचंड तपश्चर्या केली व जीवनाचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर ऋषिमुनी जशी शांती व समाधान मिळवतात, तसे रॉबी निवांत संन्यासाश्रम जगत आहेत. रॉबी यांनी आयुष्याची पहिली साठ वर्षे (पाच तपे) कलेची साधना करून ती शांती, समाधान व कृतार्थता मिळवली आहे. ते समाधानी, आनंदी जीवन जगत आहेत.

अशा माणसांमुळे देश व जग विकासाची वाटचाल करत असते.

संदर्भ: रॉबी डिसिल्वा
(एका मनस्वी कलाकाराचा प्रवास)
लेखन: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन
पृष्ठे : १६०
किंमत: रु.२००/-

-प्रभाकर शंकर भिडे

छायाचित्रे – रंजन जोशी

About Post Author

2 COMMENTS

  1. एका कला तपस्व्याचे
    एका कला तपस्व्याचे अभ्यासपूर्ण चित्रण वीणा गवाणकरांनी माेठ्या अात्मियतेने चितारले अाहे. माेठे प्रेरणादायक अाहे !

Comments are closed.