राष्ट्रीय जल अकादमी – जलस्रोतांचे प्रशिक्षण

0
60
-jalakadami-heading

‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना केंद्रीय जल आयोगाच्या अंतर्गत 1988 मध्ये  करण्यात आली. संस्था भारत सरकारच्या ‘जल संसाधन मंत्रालया’च्या अखत्यारीत येते. संस्था पुण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर खडकवासल्याच्या सुंदर आणि हिरव्यागार परिसरात आहे. खडकवासला धरण संस्थेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. संस्थेला लागून Central  Water and Power Research Station (CP&PRS) आहे, तर समोरच्या बाजूला National Defense Academy (NDA). ‘राष्ट्रीय जल अकादमी’मध्ये केंद्रीय आणि राज्य सरकार यांच्याशी संबंधित संस्थांमधील अभियंत्यांना इन-सर्व्हिस ट्रेनिंग दिले जाते. इन-सर्व्हिस ट्रेनिंग दरम्यान अभियंत्यांना नियोजन, डिझाईन, मूल्यांकन, बांधकाम, ऑपरेशन व जलस्रोत प्रकल्पांची देखरेख यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. जल संसाधनाच्या संबंधित विशिष्ट विषयावर जर कोठल्याही संस्थेला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर संस्था त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम आयोजित करते.

‘राष्ट्रीय जल अकादमी’ची  स्थापना USAID (The United States Agency for International Development) च्या सहाय्याने झाली. तिला जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळाल्यामुळे बळ प्राप्त झाले आहे. संस्थेची ओळख जलसंसाधनांच्या प्रशिक्षणामध्ये ‘उत्कृष्टतेचे केंद्र’ म्हणून आहे. संस्था ‘राष्ट्रीय जल अकादमी’चे प्रशिक्षण केंद्र मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्था (NGOs), केंद्र व राज्य सरकार यांचे सार्वजनिक उपक्रम, खाजगी कंपन्या, व्यक्तिगत आणि परदेशी नागरिक यांच्यासाठी सशुल्क खुली आहे. ‘राष्ट्रीय जल अकादमी’ या संस्थेचे उद्दिष्ट केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विभागातील ग्रूप A व ग्रूप B अधिकाऱ्यांकरता विशेष अभ्यासक्रम आयोजित करणे हे आहे.

‘राष्ट्रीय जल अकादमी’चे मुख्य चीफ इंजिनीयर असतात. त्यांच्या मदतीला Central Water Engineering Services मधील ग्रूप A श्रेणीतील अनुभवी आठ वेगळे विभागीय अधिकारी असतात. ते जलसंसाधन विकास आणि व्यवस्थापन यांतील दीर्घ व्यावहारिक अनुभव आणि योग्यता असलेले व चांगले संवादकौशल्य प्राप्त केलेले असतात. त्यांना प्रशिक्षण देण्याचे कौशल्य असतेच. विशेषज्ञ अतिथी प्राध्यापक म्हणून भारतातील प्रमुख संशोधन केंद्रे, विद्यापीठे आणि इतर संस्थांमधून प्रशिक्षण देण्याकरता येतात.

‘राष्ट्रीय जल अकादमी’चा दृष्टिकोन जल संसाधन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणार्थी तयार करणे हा आहे. त्यांना नवनवीन संकल्पना आणि कल्पना हाताळता येण्यास हव्यात, तशी नवीन कौशल्ये आणि ज्ञान त्यांना तेथे उपलब्ध असतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास निर्माण होईल, ते योजना आखू शकतील, गरजा पूर्ण करतील! 

‘राष्ट्रीय जल अकादमी’ पाणी व्यावसायिकांच्या क्षमता वाढवण्यासाठी व बदल घडवून आणण्यासाठी नेतृत्व करत असते. केंद्राची ओळख जल संसाधन व तत्संबंधीचे प्रशिक्षण यांमध्ये उत्कृष्टता साधण्यासाठी आहे. संस्थेने चारशेतीसहून अधिक कार्यक्रम आयोजित केले असून दहा हजार पाचशे कर्मचाऱ्यांना जलस्रोतासंबंधात प्रशिक्षित केले आहे. 

-jal-akadami-logoसंस्था जलस्रोतांचा विकास आणि व्यवस्थापन यांतील सर्व पैलूंवर प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करते. तसेच, तेथे प्रशासन व व्यवस्थापन यांवरही भर दिला जातो. तेथील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे –

• एकीकृत जल संसाधन विकास व व्यवस्थापन (IWRDM ),
• नदीखोरे प्रकल्पांची तपासणी, नियोजन,  
धरण सुरक्षितता, विविध बांधकामांकरता डिझाईन तयार करणे,    
• सिंचन- कमांड एरिया डेव्हलपमेंट, वॉटरशेड व्यवस्थापन, भागीदारी सिंचन व्यवस्थापन, सिंचनप्रणालीचे बेंचमार्किंग,  
• हायड्रोलॉजी,  
• पूर व्यवस्थापन आणि पूर संभव,            
• रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्र (Geographic Information System),
• हायड्रोमेट्री आणि डेटा प्रोसेसिंग,  
नदी घाटी प्रकल्पाचे सामाजिक, मानवी  आणि पर्यावरण पैलू,    
नदी घाटी प्रकल्पाचे बांधकाम आणि आर्थिक पैलू,                            
• जलसंबंधातील कायदे आणि नदी खोरे विवाद,  
• वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी व्यवस्थापन विकास अभ्यासक्रम.

अभ्यासक्रम सहभागी  होणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या आधारावर रचले जातात. ते पाच विभागांत विभागलेले आहेत.

  1. एक्सपोजर प्रोग्राम – नवीन तंत्रज्ञान काय आले आहे, ते माहीत करून देण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अभ्यासक्रम असतात. तो ट्रेनिंग प्रोग्राम नव्हे, त्यांनी कसे करायचे हे फक्त जाणून घ्यायचे असते. ते अल्पावधीचे अभ्यासक्रम असून तीन दिवसांत चार-सहा विषय पूर्ण केले जातात.
  2. ऑपरेशन लेव्हल ट्रेनिंग प्रोग्राम- ते प्रोग्राम JEs आणि  SEs करता वेगवेगळे, पण एकाच विषयाकरता डिझाईन केलेले असतात. ते  प्रोग्राम पाच ते पंधरा दिवसांचे असतात.
  3. रिफ्रेशर प्रोग्राम – हे  प्रोग्रामही स्वतंत्रपणे डिझाईन केलेले असतात. प्रशिक्षणार्थींना नवीन विषयांवर अप-टू-डेट माहिती मिळवून देणे आणि विसरलेल्या संदर्भांची पुन्हा आठवण करून देणे हा त्यामागील उद्देश. हे फक्त तीनच दिवसांचे असतात. विषय एकापेक्षा जास्त असतात.
  4. ब्रेन स्टॉर्मिंग प्रोग्राम – हे प्रोग्राम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेले असतात. खुल्या चर्चेद्वारे विषयांना पुढे आणणे आणि थिंक-टँक तयार करणे हा या प्रोग्रामचा हेतू. प्रोग्राममध्ये तीन दिवसांच्या अवधीत चार ते सहा विषयांवर चर्चा केली जाते.

संस्थेत वर्षभर कार्यक्रम चालतात. कार्यक्रमांची यादी वर्षाच्या एप्रिल महिन्यात प्रकाशित व प्रसृत केली जाते. ‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही स्वतः परिपूर्ण संस्था आहे. कारण तेथे वर्गखोली, वाचनालय, कॉम्प्युटर सुविधा यांसह प्रयोगशाळा, आमंत्रित व्याख्याते यांच्याकरता गेस्ट हाउस, अतिथी लोकांना बसण्यास उत्तम सोय, मनोरंजनाची उत्तम सोय आहे. मैदानी खेळ नसले तरी आतमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बिलियर्ड, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल व स्विमिंग-पूल असे अनेक खेळ आहेत. वर्गखोल्या एअर कंडीशंड असून LCD प्रोजेक्टर लावलेल्या आहेत. तेथे चालणारे सर्व शैक्षणिक कार्यक्रम हे निवासी असतात. हॉस्टेलमध्ये ट्वीन शेअरिंग पंचावन्न खोल्या आहेत व आवारातच मेसची सुविधाही आहे.

संस्थेशी संपर्क –
नॅशनल वॉटर अकॅडमी, सिंहगड रोड, खडकवासला, पुणे, 411024 फोन (020) 24380678
http://nwa.mah.nic.in/
nwa.mah@nic.in-

– विनोद हांडे, vinod_khande@rediffmail.com 

About Post Author