रानडेआजींचे वय म्हणजे नुसताच आकडा

_ShailajaMadhavRande_UrfaRandeAaji_1_0.jpg

शैलजा माधव रानडे म्हणजे माझी आई. ती रत्नागिरीला असते. माझी बालमैत्रीण मला अनेक वर्षांनी भेटली. गप्पागोष्टी चालू असताना, तिने माझ्या आईची चौकशी केली. तेव्हा मी तिला आईबद्दल सांगू लागले. मैत्रीण या वयातही माझी आई इतकी उत्साही आहे हे ऐकून  थक्क झाली. मी आईचे तेच जीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर आणत आहे.  

माझी आई एकोणऐंशी वर्षांची आहे. पण ती बारावीच्या मुलांचे इंग्रजी व्याकरण घ्यायला अठरा किलोमीटर लांब ‘पावस’ला जाते. तिला या वयातही व्याकरण शिकवणे झेपते. तीला ती  स्वरूपानंदांची कृपा आहे असे वाटते. ती मंदिरात दर आठवड्याला चार दिवस राहते. तिच्या राहण्याची व जेवण्याखाण्याची सोय ‘स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळा’कडून झाली आहे. काही मुले मंदिरात तिच्याकडे दुपारी तीन वाजल्यानंतर संस्कृत शिकण्यास येतात. त्याबाबत तिला कंटाळा अजिबात येत नाही. उलट, ती म्हणते, “मुलांना शिकवणे हे माझे टॉनिक आहे.” शिवाय, ती पौराणिक कथा सांगण्यास पावसमधील महिला वृद्धाश्रमात जाते. तिने तेथील महिलांना भजनेही म्हणण्यास शिकवली आहेत. तसेच, रानडेआजी निरनिराळ्या विषयांवर कीर्तनही करतात.

‘महिला दिना’निमित्त अनेक स्पर्धा असतात. तिची 2017 च्या एकपात्री स्पर्धेत हॅट्रिक झाली. तिने रचलेले भारूड 2015 साली स्पर्धेत सादर केले होते. त्यात तिचा पहिला नंबर आला. तिने एक गोंधळ 2016 साली सादर केला होता, त्यात तर ती दिवट्या घेऊन नाचली होती. तेव्हा आईचे वय होते अठ्ठ्याहत्तर वर्षें! आईने शबरीचे जीवनचरित्र 2017 साली सादर केले आणि तेव्हाही तिचा पहिलाच नंबर आला.

आई झिम्मा-फुगडी स्पर्धेत या वयातदेखील भाग घेते. ‘झी- मराठी’च्या श्रावणात स्पर्धा असतात. तिचे नाव तिच्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी ‘वुमन ऑफ द सीरीज’ म्हणून जाहीर झाले होते. रत्नागिरीत कॉलनीसमोर मोठी झोपडवस्ती होती. आईने त्या मुलांच्या झोपडीत जाऊन मुलांना लिहीण्या-वाचण्यास शिकवले होते. तिने त्या मुलांची नावेदेखील शाळेत घातली होती. झोपडवस्तीवाले गणपती बसवत, नवरात्रात देवी बसवत. त्यावेळी कॅसेट लावून वेडीवाकडी नाचत असत. तिने त्यांना गणपतीची व देवीची आरती शिकवली. रोज बारा सूर्यनमस्कार घालण्यास लावून मारुतीची आरती शिकवली. मारुतीच्या तसबिरीची स्थापना केली. रेडिओ केंद्रावर त्या मुलांचा ‘अंगत-पंगत’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तेथेच नोकरीवर कार्यरत असलेल्या अधिकारी व्यक्तीने त्या मुलांना आर्थिक साहाय्य केले. ती मुले देवी सप्तसती पाठातील दहा स्तोत्रे संस्कृतमध्ये सुंदर म्हणत असत. रेडिओ केंद्रावरील ते गृहस्थ त्यांचे कौतुक करताना म्हणाले, की कोणीच झोपडवस्तीतील मुलांचा कार्यक्रम रेडिओवर सादर केलेला नाही.

आईने ‘कचर्‍यातून कला’ या तत्त्वाचा अवलंब करून, चॉकलेटच्या कागदांचे हार, जुन्या लग्नपत्रिकांचे आकाशकंदिल बनवणे, चिंध्यांपासून आसने तयार करणे अशा कला शिकवल्या. अनेकजण खडू-फळा-पाट्यांसाठी पैसे देऊ लागले. सणावारी खाऊ वाटण्यासाठी पैसे देत. आई म्हणते, ‘देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ हा अनुभव त्यावेळी आला.

आईच्या तब्येतीचे गमक म्हणजे ‘औषधं जान्हवी तोयं’ हे तत्त्व आणि चार-पाच किलो मीटर चालणे! त्यामुळे तिला वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षींही ‘नो डायबिटीस, नो प्रेशर!’

– अश्विनी अनिल देवधर

About Post Author