युगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता

0
191
_Yugyatra_Pravahatil_1.jpg

ते 1956 चे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसमवेत धम्मदीक्षा नागपुरात त्या वर्षीच्या 14 ऑक्टोबर रोजी घेतली. त्या दीक्षांत कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी त्यांच्यासमोर एक नाटक सादर झाले होते. ते म्हणजे, मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी लिहिलेले आणि सादर केलेले ‘युगयात्रा’ हे नाटक! ‘युगयात्रा’ या नाटकाचा विशेष म्हणजे त्याला धम्मदीक्षा घेण्यास आलेला लाखोंचा जनसमुदाय प्रेक्षक म्हणून लाभला! इतक्या मोठ्या जनसमुदायापुढे नाटक होणे दुर्मीळच आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या नाटकापासून दलित रंगभूमीची सक्रिय चळवळ उभी राहिली. त्यानंतर समाजाच्या दुर्लक्षित घटकाला समोर ठेवून नाटके लिहिली गेली, सादर होत राहिली.

मिलिंद महाविद्यालय हा दलित रंगभूमीच्या चळवळीचा उगमस्रोत. त्या महाविद्यालयातून साहित्य-साहित्यिक व कार्यकर्ते यांची फळी तयार झाली. त्यामधून 1976 मध्ये ‘अखिल भारतीय दलित थिएटर’ची स्थापना झाली. त्या ‘थिएटर’मधून दर्जेदार नाटके लिहिली गेली. दलित समाज साहित्यातून, नाटकांतून विद्रोहाची भाषा सांगू लागला; त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज झाला. तशी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि त्या प्रवाहातील तशा बारा नाटकांची एकत्रित बांधणी ‘युगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता’ या नव्या संपादित ग्रंथात करण्यात आली आहे.

प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे या दोघांनी ’युगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता’ या ऐतिहासिक अनमोल ठेव्याचे संपादन केले आहे. त्र्यंबक महाजन हे मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थी. ते तेथेच शिक्षक झाले. तो ग्रंथ म्हणजे केवळ बारा नाटकांच्या संहितांचे पुस्तक नव्हे तर ते एक प्रकारे दलित रंगभूमीच्या चळवळीचे दस्ताऐवजीकरण होय. ते ज्या मिलिंद महाविद्यालयातून साकार झाले, त्याविषयीच्या आठवणी, बाबसाहेबांना जवळून अनुभवलेल्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या आठवणी त्या ग्रंथात येणे हे आपसूकच आहे.

शिवाय ग्रंथामध्ये ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या मिलिंद महाविद्यालयाची आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये केलेली सुरुवात, त्यावेळचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्या विद्यार्थ्यांप्रती व शिक्षक-पालक यांच्याबद्दल असणार्याे भावना, त्यांचे ‘युगयात्रा’चे पहिले लेखन व सादरीकरण यांविषयी सविस्तर मांडणी केली आहे. ती दलित साहित्याची-रंगभूमीच्या इतिहासाचीच मांडणी आहे!

मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीमुळे व्यावसायिक नाटकनिर्मिती मराठवाड्याच्या भूमीत होणे व ती रंगभूमीवर सादर होणे हे शक्य झाले, हे त्या ग्रंथातून स्पष्ट होते. त्यापूर्वी दलित समाजात ‘तमाशा’ व पौराणिक कथांवर आधारित ‘दशावतार’ हे प्रसंगानुरूप गावपातळीवर होत, पण त्यांचे स्वरूप छोटे होते. मराठवाड्यात रझाकारांचे राज्य भारताच्या स्वातंत्र्यानंतरही वर्षभर होते. त्यामुळे शैक्षणिक सुविधा नव्हत्या, सामाजिक परिवर्तनाच्या व अन्य चळवळी यांना मुभा नव्हती. हिंदू-मुस्लिम तेढ होती. मराठवाड्याच्या विकासाला सुरुवात रझाकारांच्या मराठवाड्यातील पराभवानंतर झाली. विकासाला सुरुवात झाली ती ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या उभारणीतून. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या देखरेखीखाली औरंगाबादमधील नागसेनवन परिसरात मिलिंद महाविद्यालय उभे केले.

विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ‘मिलिंद’मध्ये पुस्तकी ज्ञानासोबत प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली होती. मात्र प्रस्थापित साहित्यलेखन पुण्या-मुंबईत केले जात होते; नाटकेही तिकडेच लिहिली जात होती. तेथे व्यावसायिक रंगभूमीला दिवस चांगले होते. पण भारतीय समाजाच्या दुसर्या् भागातील जनतेच्या समस्यांना स्वतंत्र रीत्या रंगभूमीवर आणले जात नव्हते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील शेवटचा वर्ण जो दलित त्या वर्गाच्या जगण्याच्या रीती, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या विस्तारित व प्रत्ययकारी स्वरूपात येणे हे अत्यल्प होते. आंबडेकरांनी मराठवाड्यातील तशा समस्त परिस्थितीचा विचार करून मिलिंद महाविद्यालय तेथे उभारले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विद्यार्थी-शिक्षकांना त्यांच्याच आसपासच्या प्रश्नां विषयी नाटक सादर करण्याचेही सुचवले होते. त्यांनी अन्य कोणाचे नाटक घेऊन सादर करण्यापेक्षा विद्यार्थी-शिक्षकांना काय म्हणायचे आहे, कोणती समस्या मांडायची आहे त्यावर नाटक असावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी पुढे जाऊन प्राचार्य म. भि. चिटणीस यांना असेही सुचवले, की तसे नाटक तुम्हीच लिहा! चिटणीस यांना बाबासाहेबांचा तो प्रेमळ आदेश अमान्य करणे शक्यच नव्हते. त्यातून ‘युगयात्रा’ हे नाटक आकाराला आले. अशा विविध आठवणी त्या ग्रंथात वाचण्यास मिळतात.

‘युगयात्रा’ या नाटकाचा पहिला प्रयोग बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या उपस्थितीत सादर केला गेला होता. ‘युगयात्रा’ची मध्यवर्ती कल्पना गावकुसाबाहेरील दलित आणि विद्रोह अशी आहे. दलितांनी प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत ते थेट बाबासाहेबांच्या काळापर्यंत विविध युगांत कसा विद्रोह केला त्याचे नाटकातून सादरीकरण करण्यात आले आहे. ‘युगयात्रा’ नाटकाविषयी संपादक लिहितात, ‘आत्मशोध, आत्मभान, प्रबोधन आणि त्यासाठी विद्रोह असा हा रंगप्रयोगाचा, रंगभाषेचा नव्याने साकार होऊ पाहणारा शोध ‘युगयात्रा’, हा प्रवाहातील नाट्यलेखनाचा गाभा ठरला.’

‘युगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता’ या संपादित ग्रंथात बारा नाट्यसंहिता समाविष्ट आहेत.  ‘युगयात्रा’ – म. भि. चिटणीस, ‘गाव नसलेला गाव’- अविनाश डोळस, ‘अगा जे घडलेची नाही’- योगिराज वाघमारे, ‘आवर्त’- दत्ता भगत, ‘व्हय! हे गाव माझंबी हाय!’- विजयकुमार गवई, ‘थांबा रामराज्य येतंय!’ – प्रकाश त्रिभुवन, ‘अंगुलिमाल’ – सुशीला मूलजाधव, ‘भगवान पर मुकदमा’- आर. के. क्षीरसागर, ‘कैफियत’- रूस्तम अचलखांब, ‘म्युलॅटो’ (अनुवादित) – त्र्यंबक महाजन, ‘गुलाम’(अनुवादित) – गंगाधर पानतावणे आणि ‘प्रकाशाच्या प्रदेशात’(अनुवादित) – प्रभाकर बागले व प्रा. त्र्यंबक महाजन. पुस्तक सहाशेचौतीस पानांचे आहे. ती केवळ संहितांची बांधणी नाही, तर तो दलित थिएटरचा, दलित रंगभूमीच्या चळवळीचा ऐतिहासिक ठेवा झाला आहे. संशोधकांना संशोधन करण्यासाठी मूलभूत आणि महत्त्वाचा ग्रंथ बनला आहे. पुस्तकाचे प्रकाशन ‘रमाई प्रकाशना’ने केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार सरदार जाधव यांचे आहे, तर प्रभाकर बागले यांनी ‘अन्याय, अवहेलना, आर्थिक दास्यातील वेदना-संवेदनेची चाहूल लागणार नाही अशा व्यवस्थेचे कवच आदी गोष्टी जेव्हा असह्य होतात, तेव्हा विद्रोह जन्माला येतो’ अशी सुरुवात करत समर्पक असे मलपृष्ठ लिहिले आहे.

दलित थिएटर ही सामाजिक चळवळीतून रंगभूमीला नवनिर्मितीची प्रेरणा देणारी ज्वलंत उभारणी होती. तिने केवळ रंगभूमी नव्हे तर एकूण साहित्यप्रवासात दलित साहित्याचा समावेश करण्यास भाग पाडले आहे. त्या सगळ्या बाबींचा विचार करता एकत्रित रीत्या नाटकांचा ऐतिहासिक ठेवा जपणे व त्याचे दस्ताऐवजीकरण करण्याची गरज होती आणि ती या पुस्तकाने भरून काढली.

युगयात्रा- प्रवाहातील रंगसंहिता
रमाई प्रकाशन
पाने- 604
मूल्य- 500

(‘रमाई’ मासिक ऑगस्ट २०१७)

– रेखा मेश्राम

About Post Author