यतिन पिंपळे हा चौकटीबाहेर विचार करणारा माणूस आहे. त्याची प्रतीची त्यांच्या घरात पाऊल टाकल्याक्षणी येते. पिंपळे यांच्याशी गप्पा मारल्यानंतर लक्षात येते, ती त्यांची कलावृत्ती, त्यांची निरीक्षणशक्ती आणि त्यांचा अचूकतेचा ध्यास…
पिंपळे बी.ई.एस.टी.मध्ये यांत्रिक विभागात ज्येष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासून गाड्यांची आवड! त्यांना लहानलहान गाड्या बघून आश्चर्य वाटे. त्यांच्या मनात त्या गाड्या कशा बनतात? ते त्या का बनवू शकत नाहीत? असे विचार त्यांच्या मनात येत. ते त्यांच्या शालेय वयातील सहावी-सातवीत असताना, त्यांनी ओढ वाटून लहान गाडीची कागदाची प्रतिकृती तयार केली. ती त्यांची त्यांनाच इतकी भावली, की त्यांनी कागदी प्रतिकृती तयार करण्याचा तो प्रयोग पुढे सुरूच ठेवला. लहान मुलांना खेळताना प्लास्टिक आणि काच यांपासून बनवलेल्या गाड्यांची इजा होऊ नये, म्हणून त्यांनी इकोफ्रेंडली गाड्यांची प्रतिकृती तयार केली. त्यांनी ‘बेस्ट बस’ प्रकारातील पहिली गाडी कागदाचा वापर करून, तयार केली. पिंपळे सांगतात, की ते सध्या कामकाज करत आहेत त्या आगारात जुन्या काळातील बेस्ट बसचे संग्रहालय आहे. तेथे त्यांना 1800 सालचे जुने पुस्तक मिळाले. त्यात ट्रामबद्दल माहिती आहे. ट्राम 1874 साली घोड्यांद्वारे ओढली जायची. तेव्हा ‘बेस्ट’ बॉम्बे ट्राम बेस्ट कंपनी म्हणून ओळखली जात असे. त्यांना पुस्तकात ट्रामची मापे, ट्रॅक टाकण्याचा खर्च, कामगार किती लागले इत्यादी माहिती मिळाली आणि त्यांना जणू त्यांचा विषय गवसला!
पिंपळे यांचा पहिला छंद म्हणजे कागदाच्या बसेस बनवणे. ते सांगतात, की, ‘चित्रकलेची आवड लहानपणापासून असल्यामुळे रंग आणि कागद सर्वात जवळचे.’ त्यांनी सुरुवातीला एक बस बनवली ती कागद आणि साध्या वॉटर कलरचा वापर करून. हाताचा घाम; तसेच, पाणी यांमुळे कागद लगेच खराब होतो हे कळल्यावर ते त्यावर वॉर्निश वापरू लागले. पुढे, लॅमिनेशन आले. मूळ बसच्या डिझाइनप्रमाणे असलेल्या त्यांच्या कागदी बसच्या प्रतिकृती सर्वसामान्य बसच्या एक नव्वदांश लहान आहेत. त्यांनी बनवलेली सर्वात लहान बस एक हजारांश लहान आहे. ती मानवी बोटाच्या नखावर मावते. ओम्नी बस १९२६ मध्ये आली. त्यांनी तेव्हापासून ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल झालेल्या सर्व प्रकारच्या बसच्या कागदी प्रतिकृती बनवल्या आहेत. त्यात निगेटिव्ह-पॉझिटिव्ह साइन असलेली स्कोडाची ‘इलेक्ट्रिक ट्रॉली बस’, इंजिन बाजूला काढून त्याला रिपेअर करता येणारी ‘सेमीआर्टिक्युलेटेड डबल डेकर ट्रेलर बस’, डबल डेकर ‘डायमलर बस’ (Daimler bus); तसेच ‘रॉयल टायगर बस’ अशा बसच्या कागदी प्रतिकृतींचा समावेश आहे. त्यांनी किंगलॉग एसी बस, सर्व बी.ई.एस.टी. बस, एस.टी. बस, मुंबई-पुणे दरम्यान धावणार्यार बस, डबलडेकर बस, इंडियन क्रिकेट टीमला त्यांनी वर्ल्ड कप जिंकल्यावर ज्या ओपन बसमध्ये बसवून फिरवण्यात आले ती बस… बसच्या एकूण अडीचशेहून अधिक वेगवेगळ्या प्रतिकृती कागदापासून तयार केल्या आहेत.
यतिन यांनी ‘गिफ्ट बस’ बनवली आहे. त्यामध्ये ‘बेस्ट’ बसवर ज्या पद्धतीच्या जाहिराती दिसतात त्या प्रकारे त्यांना ज्या व्यक्तीला कागदी बस भेट द्यायची आहे त्याचा फोटो किंवा संदेश लिहून ती भेट देता येते. प्रसंगी लहानग्यांना त्यात गोळ्या-चॉकलेटस् घालून देता येतात. त्यांनी ‘बेस्ट’ला प्रमोट करणारी कागदी शॉपिंग बॅग ही नवीन कल्पनासुद्धा अंमलात आणली आहे. त्या बॅगवर बेस्ट बसचे चित्र असून `बेस्ट`या शब्दाचा कल्पकतेने वापर केला आहे.
त्यांनी ‘ऑल द बेस्ट’ या नावाने कागदी प्रतिकृतींचे प्रदर्शन 2011मध्ये भरवले होते. प्रदर्शनामध्ये पहिल्या बसपासून सध्या रस्त्यावर धावत असलेल्या बसपर्यंतच्या सर्व डिझाइन्सच्या प्रतिकृती होत्या. त्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांनी प्रदर्शन भरभरून पाहिले. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘मोनो रेल्वे’. लोक मोनो रेलची प्रतिकृती पाहून भारावून गेले. पिंपळे यांचा पुढील प्रकल्प ‘भारतीय रेल्वे’ हा आहे. रेल्वे इंजिनांची आणि डब्यांची अनेक मॉडेल्स मागील कित्येक वर्षांत बदलली. त्या सर्वांची माहिती, मापे यांचा अभ्यास करून त्यांची प्रतिकृती तयार करणे हे कठीण काम आहे. त्यांनी रेल्वेसाठी ‘हमसफर एक्स्प्रेस’ हे नाव गुंफून शुभेच्छापत्र तयार केले आहे. त्यांनी केवळ डिझाइन नव्हे तर त्यासाठीचे शब्दही गुंफले आहेत. शिवाय भारतीय रेल्वेत शाही फाईव्ह स्टार कोच असतात. ते सर्वसामान्यांना पाहण्यास मिळणे कठीण असते. पिंपळे त्या कोचची प्रतिकृती तयार करणार आहेत. त्यांना कागदाची व्हॅनिटी व्हॅनही बनवायची आहे. त्यांनी शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनचा अभ्यास सुरू केला आहे. शाहरुखची व्हॅन त्याच्या चाहत्यांना बघता येणार नाही. परंतु त्यांना शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची कागदी प्रतिकृती पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल.
पिंपळे म्हणतात, की “प्रेक्षकांची, रसिकांची वाहवा हे माझे खरे पुरस्कार आहेत. त्यामुळे मला अजून काम करण्यासाठी हुरूप येतो. माझ्या या सर्व छंदांचा, मी तयार केलेल्या कागदी प्रतिकृतींचा संग्रहित संच असावा, म्हणजे ते सर्वसामान्य व्यक्तींना पाहण्यास मिळतील असे मला वाटते. त्यासाठी एक म्युझियम तयार करावे अशी माझी इच्छा आहे.” मुंबईच्या आयआयटीने त्यांच्या छंदाची दखल घेऊन त्यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते.
यतिन पिंपळे – 9869043017
– प्रेरणा तळेकर
(मूळ लेख : ‘आरंभ’ दिवाळी अंक २०१२)
Very very excellent
Very very excellent
अप्रतिम!!! श्री. यतिन पिंपळे…
अप्रतिम!!! श्री. यतिन पिंपळे यांनी आपल्या कलेने सर्वांना मोहवून टाकले आहे. आज कित्येक वर्षे त्यांनी सातत्याने, मेहनतीने व चिकाटीने हा कला-संग्रह निर्माण केला आहे. त्यांच्या सर्वांगीण कला साधनेस प्रणाम!!
hi yetin mala tuza craft…
hi yetin mala tuza craft bagayla milel ka…mi pan kagdi craft banavto mala tuza craft bagaychi khup iccha aahe thanks
Comments are closed.