यज्ञसंस्कार

1
56
_YadnyaSaunskar_1.jpg

यज्ञ हा संस्कार भारतात वेदकाळापासून अस्तित्वात आहे. यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत उष्णता व ध्वनी यांच्या ऊर्जेचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी निर्माण झाल्याचे जाणवते.

सर्वसामान्य जनतेने यज्ञ अंगिकारावे म्हणून तो ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो, त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते अशी मांडणी करण्यात आली. निसर्गाने मानवाला जे जे उपयुक्त दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे ही त्यामागील धारणा आहे. त्याकरता अनेक उपक्रम शोधले गेले आहेत. उदाहरणार्थ, जन्मानंतर नक्षत्रशांत व आयुष्य होम हे होम करण्यास सांगितले गेले आहेत. त्यानंतर धन्वंत्री होम, मृत्युंजय होम हेही चांगल्या प्रकृतीसाठी, अल्पायुषी होऊ नये ह्यासाठी केले जातात. मुंजी-लग्नातील लज्जा होम, गर्भदान संस्कार आणि नित्य आढळणारे वास्तुशांत, साठीशांत, सहस्र चंद्रदर्शन हे विधी ही यज्ञसंकल्पनेची रूपे होत. दुर्गा व चंडी होम, आत्मविश्वास वाढवण्यासाठी गायत्री होम, सकारात्मकता स्वभावात येण्यासाठी विद्याहोम इत्यादी सांगितले गेलेले आहेत. पण ते यज्ञ छोटे व प्रसंगानुरूप होत.

शतचंडी, महाचंडी, सोमयाग, पर्जन्ययाग हे यज्ञ समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो, तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बनवले जाते. ती कुंडे भूमिती आकृतीत तयार केलेली असत. अग्नी प्राचीन काळी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून प्रज्वलित करत. त्या वस्तूंत औषधी तत्त्वे आहेत असे मानले जाई व ते काही प्रमाणात सिद्ध होत आहे. आहुती म्हणून त्यात गायीचे तूप, साळीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ अर्पण करत, तर समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, देवदार वृक्षांच्या खाली पडलेल्या काड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत टाकत. आहुती देताना मंत्र विशिष्ट स्वरात म्हणत. यज्ञ लहान असल्यास तो तीन ते चार तासांत होई. मोठ्या यज्ञास तीन ते सात दिवस अवधी लागे. सर्व यज्ञांना जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, यज्ञसामुग्री खरेदीसाठी लागणारा पैसा इत्यादी गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात.

– डॉ. प्रमोद मोघे

About Post Author

1 COMMENT

  1. या यद्न्यांचे आजच्या काळात…
    या यद्न्यांचे आजच्या काळात काही प्रयोजन आहे असे वाटत नाही.

Comments are closed.