सर्वसामान्य मुस्लिम मुलीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कित्येकदा घरातल्या माणसांशी, समाजातील माणसांशी, कडवी झुंज द्यावी लागते. तशीच झुंज मुंबईला जोगेश्वरीत राहणा-या इर्फानालाही द्यावी लागली. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर, पुढील बीएपर्यंतचे शिक्षण कॉरस्पॉडन्स कोर्सने पूर्ण केले. त्यानंतर तिने क्राफ्ट व ड्रॉईंगचा कोर्स पूर्ण केला. ही गोष्ट 1995 सालची. त्यानंतर तिने दोन शाळांत शिक्षिकेची नोकरी तीन वर्षे केली. त्यांपैकी हैद्री शाळेत केवळ शियापंथीय विद्यार्थ्यांना सवलती व शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळतो हे पाहून इर्फाना अस्वस्थ होत असे. मात्र इर्फानाने तिथेच ठरवले, की आपण स्वत: एक शाळा काढायची, जिथे कोणत्याही विद्यार्थ्याला तो अमुक जाती-धर्माचा आहेस म्हणून सोयीसुविधा नाकारल्या जाणार नाहीत!
वडिलांनी तिच्या लग्नासाठी जी रक्कम बाजूला ठेवली होती तीच, इर्फानाने आपल्या वडिलांकडून तिच्या या शाळेसाठी मिळवली. त्या छोटयाशा पुंजीतून जोगेश्वरी पूर्वेकडील हरीनगर या झोपडपट्टीमध्ये इर्फानाची 'यंग इंडियन्स स्कूल' ही इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहिली. इर्फान या शब्दाचा अर्थ ज्ञान असाच आहे.
तिची शाळा शहरात आहे असे म्हणायचे, परंतु सर्व बाजूंनी झोपडपट्टीने वेढलेली आहे. तिथे पोचणेच एवढे मुश्कील, की दहा फूट अंतरावरूनदेखील कळणार नाही, की इतक्या जवळ शाळा आहे व तेथे दोनशे मुले शिकतात! शाळा जोगेश्वरीच्या पंपहाऊस विभागात हरीनगर वस्तीत आहे. हा भाग इस्टर्न एक्स्प्रेसच्या पलीकडे येतो. इर्फाना स्वत: बेचाळीस वर्षांची आहे. तिचा विवाह झालेला नाही. ती शाळेत इतकी रमली आहे की म्हणते, ''लग्न करून काय साधायचे आहे? शिवाय जोडीदार आपली उर्मी समजून घेणारा भेटला पाहिजे.'' इर्फानाचे कुटुंब मूळ वाईचे. तिचे सारे आयुष्य मुंबईत गेले. ती जेमतेम दहावी शिकली व पुढे तिने कॉरस्पाँडन्स कोर्सद्वारे बी.ए. केले. शाळेत शिक्षकवर्ग संमिश्र आहे. एल्सी जोसेफ ह्या मुख्याध्यापक आहेत.
इर्फाना मराठी-हिंदीत बोलत होती. ती स्वत: बुरखा घालून शाळेत आली व येताच, तिने तो काढून ठेवला.
इर्फानाला 'आयबीएन'चा 'रिअल हिरो' हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. ह्यामुळे तिचे कार्य प्रकाशात आले. ह्याआधी, फिरोज अशरफ नावाचे तिचे पत्रकार मित्र आहेत, ते एका हिंदी वृत्तपत्रात 'पाकिस्ताननामा' म्हणून कॉलम लिहितात. त्यात त्यांनी इर्फानाच्या कार्याविषयी लिहिले होते. फिरोज यांनी लिहिलेले वाचून केकी उनवाला नावाचे एक आर्किटेक्ट गृहस्थ हरीनगरमधील शाळा शोधत आले. जवळजवळ दोन तास भटकंती केल्यावर, त्यांना शाळा सापडली. उनवाला यांनी इर्फानाच्या शाळेला आर्थिक मदत केली. ते शाळेतील तीस-चाळीस मुलांना दत्तक घेतात व त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतात. सध्या श्रीमती कीर्तीदा उनवाला शाळेच्या विश्वस्त मंडळावर आहेत व त्यांची बरीच मदत होत असते.
पहिल्या वर्षी, 2000 साली चाळीस मुले-मुली 'यंग इंडियन्स'मध्ये दाखल झाली. त्या वेळी इर्फाना व तिची मैत्रीण गजाला मुगल या दोन शिक्षिका शाळेत काम करत होत्या. गजालाने 2006 साली यंग इंडियन्स शाळा सोडली.
त्यातून मधेच शहरातील हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तणावाचे वातावरण नीर्माण झाले, की शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढते. यातून कसाबसा मार्ग नीघाला की शेजारीपाजारी राहणारे लोक त्रास द्यायचे. शाळेसंदर्भात पोलिसांकडे तक्रारी करायचे. इर्फानाने एक किस्सा सांगितला. शाळेतील मुलांसाठी संडास बांधायला घेतला तेव्हा अशीच आजुबाजूच्या लोकांनी मेघवाडी पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली. मेघवाडी पोलिस स्टेशन शाळेपासून जवळ आहे. इर्फानाला पोलिस स्टेशनमधील तेव्हा असणा-या इन्स्पेक्टरचा चांगला अनुभव आला. इर्फानाने इन्स्पेक्टरांना तिच्या शाळेविषयी सर्व माहिती जेव्हा सांगितली तेव्हा त्यांना समजले, की ती किती चांगले समाजोपयोगी काम करत आहे! त्या इन्स्पेक्टरांनी इर्फानाला आश्वासन दिले, की 'तुमचे काम चालू ठेवा. काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे.'
इर्फानानेही कच खाल्ली नाही व ती आपले काम शांतपणे पुढे करत राहिली.
आज 2010 साली, नर्सरी ते दहावीपर्यंत ही इंग्लिश मिडियम शाळा चालू आहे. प्रत्येक इयत्तेचा एक वर्ग. एकूण तीनशे मुले/मुली शाळेत शिक्षण घेत आहेत. सकाळ, दुपार अशा दोन शिफ्टमध्ये. टिचिंग, नॉनटिचिंग मिळून वीस जणांचा स्टाफ आहे. शाळेला शासनाकडून अनुदान मिळत नाही. शिक्षिकांपैकी काही ट्रेण्ड आहेत व काही अनट्रेण्ड. पुरुष शिक्षिक एकच आहे- गणित विषयासाठी. बाकी सर्व शिक्षिका. शिक्षकांना पगार कमी आहे, परंतु गरजू लोकांना मी नोकरी देते असे इर्फाना म्हणाली. शाळा सुरू केली तेव्हा फी महिना 75 रुपये होती. आज ती दर महिना 180 रुपये इतकी आहे.
शाळेतील मुले तळच्या स्तरातून येणारी आहेत. त्यामुळे मुलांना व त्यापूर्वी त्यांच्या पालकांना स्वच्छतेचे धडे देण्याचे कामही इर्फानालाच करावे लागते व ते ती प्रेमाने करते. इर्फाना सांगत होती, की कित्येक वेळा, शाळेत येणा-या अस्वच्छ मुलांना आंघोळ घालण्याचे कामही आम्ही केले आहे.
दुपारची शाळा सुरू होण्याच्या सुमारास मी तिथे गेलेली असल्यामुळे, शाळेच्या युनीफॉर्ममधील त्या छोटया मुलांचा चिवचिवाट ऐकत मी तिथे उभी होते. इयत्तेप्रमाणे रांगा करून, पाठीवर बॅग घेऊन सर्व मुले, कधी एकदा वर्गात जातो अशा प्रतीक्षेत होती. काही मुले स्पोर्ट्स युनीफॉर्ममध्ये होती. त्यांच्या त्या पांढ-या व ग्रे रंगाच्या कॉम्बिनेशनमधील टी-शर्टवर पाठीमागच्या बाजूस 'यंग इंडियन्स स्कूल' असे छापलेले होते.
शाळेत येणा-या मुलांना आया डबाच देत नसत. दोन-तीन रुपये त्यांच्याबरोबर देत. मुले जेवणाच्या सुट्टीत काहीतरी विकत घेऊन खात. इर्फानाच्या जेव्हा हे लक्षात आले, तेव्हा तिने पालकांची मीटिंग घेऊन, त्यांना चांगल्या पौष्टिक आहाराचे- पोळी, भाजी, सॅलड वगैरेचे- महत्त्व समजावून सांगितले. इर्फाना केवळ पुस्तकी शिक्षण देण्याचे काम करत नाही तर मुलांना व पालकांना अशा जीवनौघात येणा-या, पण महत्त्वाच्या गोष्टी जाता-जाता शिकवत असते. समाजातील व्यक्तींचे हे प्रबोधनाचे कार्यच आहे. इर्फानाने वस्तीमध्ये लोकांचा विश्वास संपादन केला आहे. मध्यंतरी अशोक कोळमकर नावाचे गृहस्थ अकाली मृत्यू पावले. त्यांच्या पत्नी सैरभैर झाल्या. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला निश्चिंतपणे इर्फानाच्या स्वाधीन केले. इर्फानाने ही त्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली.
शाळेची इमारत लहानच आहे. जागा बेताची आहे. शाळेला ग्राऊन्ड नाही, पण बाजूला असणा-या गबरू गार्डनमध्ये मुलांचे स्पोर्ट्स घेतले जातात. वंदे मातरम्, जन-गण-मन, राष्ट्रीय प्रार्थना शाळेत म्हटल्या जातात.
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने सोशल ऍक्टीव्हिटीच्या अंतर्गत मुलांना संकल्पना समजावून सांगितल्या जातात. त्यांपैकी काही अमलातही आणल्या जातात. उदाहरणार्थ, वृक्षारोपण. झोपडपट्टीच्या भागात लहानशा कुंडीत माती घालून त्यात बी पेरणे, त्यातून येणारे रोप या प्रक्रियेविषयी मुलांना वर्गातच समाजावून सांगितले जाते. मग मुले जमेल तसा त्याचा प्रयोग घरी करू शकतात.
स्वच्छतेविषयी तर वेळोवेळी मुलांना सांगितले जातेच. मग ती स्वच्छता वैयक्तिक असो, वर्गातील असो वा आजुबाजूच्या परिसरातील असो. इर्फानाने स्वच्छतेविषयीचा एक किस्सा सांगितला. मुस्लिम लोक 'जुम्मे के जुम्मे' स्नान करतात असा समज असतो. इर्फाना म्हणते, ते खरे नाही. पण शुक्रवार हा आठवडयातील एक असा वार आहे की ज्यादिवशी प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या संपूर्ण शरीराची स्वच्छता करायची. रोजच्या कामाच्या, धकाधकीच्या वेळेला शरीराकडे नीगुतीने लक्ष द्यायला वेळच कुठे असतो कुणाकडे? मग तसा वेळ शुक्रवारी काढायचा! त्या दिवशी आवर्जून नखे कापायची वगैरे. इर्फाना म्हणते, की मी माझ्या सर्वच मुलांना हिंदू-मुस्लिम असा भेद नाहीच असे समजावून सांगते.
इर्फाना प्रत्येक गोष्टीकडे विशाल, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात असते, असे तिच्याशी गप्पा मारताना मला पदोपदी जाणवत होते. तिची धर्माविषयीची मते तिने मला सांगितली. ''धर्म… धर्म म्हणजे तरी काय? धर्म हा स्वत:साठी असतो. धर्म हा आपल्या अंतर्वस्त्राप्रमाणे आहे. ती आपण कधी कोणाला दाखवतो का? दिसते ते आपले बाह्यरूप, बाहेरून घातलेले कपडे, आपली वागणूक, तुम्ही कसे बोलता? कसे वागता? माणुसकी जपता की नाही? एकमेकांना तसेच गरजूंना मदतीचा हात देता की नाही? हे सर्व म्हणजेच खरा धर्म.''
शाळेत वेगवेगळया मोहिमांची माहिती दिली जाते, सणवार-राष्ट्रीय दिन साजरे होतात. शाळेची पिकनीक, स्नेहसंमेलन असे सारे असतेच. दिवाळी, ईद साधारण एका सुमारास येतात. तेव्हा हिंदू मुले त्यांचे पदार्थ आणतात, मुस्लिम मुले त्यांचे; व मग एकत्र बसून पदार्थांचा आस्वाद घेतला जातो! रक्षाबंधनही साजरे केले जाते. वर्कशॉपअंतर्गत मुलांना काही पदार्थ- फास्टफूड, सँडविच वगैरे – कसे बनवायचे ते शिकवले जाते.
शाळेत तीन-चार संगणक आहेत. त्याविषयी मुलांना माहिती दिली जाते. शाळेत लायब्ररी आहे. सध्या त्यात फक्त पाचशे पुस्तके आहेत. एखाद्या फ्री तासाला, त्या पुस्तकातील गोष्टी मुलांकडूनच वर्गात वाचून घेतल्या जातात. त्यातील मुलांना न कळलेला भाग समजावून सांगितला जातो. त्या गोष्टीतून आपण काय शिकण्यासारखे आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक वर्गात तीसच्या आसपास मुले आहेत. या वर्षी दहावीची पहिली बॅच परीक्षेला बसली आहे. सहा जणच आहेत. या वर्षी नववीतून दहावीत जाणारी नऊ मुले आहेत. शाळेला मान्यता मिळायची आहे. मुले दहावीला दुस-या शाळेच्या नोंदणीने बसतात.
तरुण वयात असे काही काम करावे असा विचार मनात येणे, नुसता विचार करणे नाहीतर तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे यामागील तुझे प्रेरणास्थान कोण? असे विचारताच इर्फाना म्हणाली, माझे वडील इस्माईल मुजावर! माझ्या भावाच्या इंजिनीयरिंगच्या वेळचा त्याचा एक हिंदू मित्र, त्याला माझ्या वडिलांनी कशी व किती मदत केली हे मी स्वत: पाहिले आहे. वडील नसणा-या त्या हिंदू मुलाचे, माझे वडील हे वडील झाले, त्यांनी त्याला मानसिक आधार दिला, त्याला इंजिनीयरिंग शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, त्याची फी माझे वडील भरत असत. आज तो इंजिनीयर होऊन मुंबईबाहेर नोकरी करत आहे, पण तो, त्याचे कुटुंब-बायको, मुले- माझ्याच वडिलांना मानतात. वडिलांचा हा वारसा, त्यांचाच आदर्श डोळयांसमोर ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून एकीकडे हिंदू, दुस-या बाजूला मुस्लिम अशा वस्तीत मी शाळा काढली आहे.
संपर्क : इर्फाना मुजावर
irfana.mujawar@gmail.com
– पद्मा क-हाडे
Last Updated On – 2nd June 2016