मी आयुष्याबद्दल समाधानी! – रामदास भटकळ

2
42

कृतार्थ मुलाखतमालेत प्रेक्षकांशी आपला जीवनप्रवास कथन करताना ज्‍येष्‍ठ प्रकाशक रामदास भटकळ.प्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे असा भाव घेऊन श्रोते आनंद मनात साठवत सभागृहाबाहेर पडले. वास्तवात भटकळ कृतार्थ मुलाखतमालेत बोलताना म्हणाले, की ‘‘मी कृतार्थ जीवन जगलो किंवा नाही ते नाही सांगता येणार, पण मी माझ्या आयुष्‍याबद्दल समाधानी नक्‍कीच आहे.’’

रामदास भटकळ यांच्‍या रंगात गेलेल्या ‘कृतार्थ मुलाखतमाले’च्‍या (दुसर्‍या पर्वातील सातवी मुलाखत) कार्यक्रमात त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा पट उलगडला गेला. शुक्रवारी, २३ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी दादर माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या या कार्यक्रमात एका मान्यवर प्रकाशकाची मुलाखत त्‍यांच्‍याच लेखकाने घेण्‍याचा सुंदर क्षण जुळून आला होता. मुलाखत घेतली प्रसिद्ध नाटककार-लेखक-दिग्‍दर्शक रत्‍नाकर मतकरी यांनी. त्‍यावेळी भटकळांनी त्‍यांच्‍या आयुष्‍याचा आणि प्रकाशन क्षेत्रातील प्रवास श्रोत्यांना मनमोकळेपणाने कथन केला.

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन, ग्रंथाली आणि वैद्य साने ट्रस्ट यांच्या वतीने दर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात कृतार्थ जीवन जगलेल्या ज्येष्ठ व्यक्तीची मुलाखत घेण्यात येते.

रामदास भटकळ यांना प्रश्‍न विचारताना मुलाखतकार रत्‍नाकर मतकरीआरंभीच रत्‍नाकर मतकरी यांनी, ते रामदास भटकळ यांच्या बरोबर एलफिन्‍स्‍टन महाविद्यालयात शिकत असल्‍याची आठवण जागवली. मतकरी यांच्या वर्गात, भटकळ यांची भावी पत्‍नी लैला पालेकर होती. त्यामुळे मतकरी यांनी रामदासचा डोळा आमच्‍या वर्गावर असायचा असे सांगताच श्रोत्‍यांमध्‍ये हास्याची खसखस पिकली. मतकरी पुढे म्‍हणाले, की रामदास भटकळ यांच्या बरोबर त्‍यांचे नाते केवळ मित्रत्‍वाचे नसून लेखक-संपादकाचेही होते, तसेच त्‍यांचे बंध सामाजिक कार्यातूनही गहिरे होत गेल्‍याचे मतकरी यांनी सांगत त्‍या दोघांमधील जवळीक उलगडली. तेव्‍हाच त्‍या मुलाखतीचा रंग अनौपचारिक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

भटकळांनी बोलायला सुरुवात करताना म्‍हटले, की ‘‘ या कार्यक्रमाचे नाव ‘कृतार्थ मुलाखतमाला’ असे असले तरी स्‍वतःला कृतार्थ म्‍हणवून घेण्‍यासाठी मनात तीव्र समाधान असण्‍याची गरज आहे आणि माझ्याकडून खूप काही गोष्‍टी करायच्‍या राहून गेल्‍या आहेत, ज्‍या केल्‍या त्‍यामध्‍ये चुकाही झालेल्‍या आहेत. त्‍यामुळे स्‍वतःला कृतार्थ म्‍हणून घेण्‍यापेक्षा मला जे वाटतं ते मी माझ्या गाण्‍याच्‍या भाषेत सांगू इच्छितो.’’ असे सांगून त्‍यांनी राग पूर्वकल्‍याण या बंदिशीमध्‍ये थोडा फरक करून काही ओळी गायल्‍या.

धन धन भाग जागे आज मेरे

धन धन भाग जागे आज मेरे

सुगंभयो आभार तुमरे

धन धन भाग जागे आज मेरे

''मी कृतार्थ म्‍हणवून घेण्‍यापेक्षा माझ्या हातून जे घडलं ते घडवण्‍यासाठी ज्यांनी ज्यांनी मला बळ दिलं त्‍या व्‍यक्‍तींबद्दल कृतज्ञ आहे.'' - रामदास भटकळभटकळ म्‍हणाले, की मी कृतार्थ म्‍हणवून घेण्‍यापेक्षा माझ्या हातून जे घडलं ते घडवण्‍यासाठी ज्यांनी ज्यांनी मला बळ दिलं त्‍या व्‍यक्‍तींबद्दल कृतज्ञ आहे. पण वयाच्‍या अठ्ठ्यात्‍तराव्या वर्षीदेखील रागाचे चढउतार योग्‍य रीतीने पेलत गीत गाणारे रामदास भटकळ पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. त्‍यांपैकी अनेकांना रामदास भटकळ गातात हे ठाऊक नसल्‍याने त्‍यांच्‍यासाठी तो सुखद धक्‍का होता.

मतकरी यांनी भटकळांना पहिलाच प्रश्‍न केला तो त्‍यांच्‍या समस्‍त कार्याचा पाया म्‍हणावा अशा त्‍यांच्‍यावरील संस्‍कारांचा वेध घेण्‍याचा दृष्‍टीने! त्यास उत्‍तर देताना भटकळ म्‍हणाले, की ‘‘पारतंत्र्य असले तरी लोकांमध्‍ये उत्‍साह होता. आसपासची अनेक मंडळी विविध क्षेत्रांत मार्गदर्शन करत होती. आमच्‍या वाडीतच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, सेवादल यांच्या शाखा होत्या, व्‍यायामशाळाही होती. त्‍यामुळे बौद्धिकांप्रमाणे व्‍यायाम, नाचगाणी अशा अनेक गोष्‍टींचे आमच्‍यावर संस्‍कार होत होते.’’ त्‍या बारा वर्षांत स्‍वतःची मोठी जडणघडण झाल्‍याचे भटकळांनी सांगितले. त्‍यांनी त्‍यांच्‍या आयुष्‍यावर मोठा प्रभाव असलेल्या गांधींना प्रत्‍यक्ष पाहिले नसले तरी त्‍यांच्‍या आसपासच्‍या लोकांवर गांधीविचारांचा मोठा पगडा होता. त्‍यामुळे त्‍यांना बालपणी गांधीजी त्यांच्या सभोवताली असल्‍याचे जाणवे. त्‍या संस्‍कारांमुळे त्‍यांनी कॉलेजमध्‍ये प्रवेश केला तेव्‍हा मनाची स्थिती फार वेगळी होती असे भटकळ म्‍हणाले. सामाजिक संस्‍कारांबरोबर भटकळांवर त्‍यांचे वडील आणि भाऊ यांचा मोठा प्रभाव होता. ते सांगताना भटकळ म्‍हणाले, की ‘‘मी केवळ माझ्याबद्दल बोलणे अर्थहीन आहे. कारण मी जो काही आहे तो त्यांच्‍या व सहकार्‍यांच्या प्रभावातूनच घडलेलो आहे. मी जे कार्य केलं ते त्‍यांच्‍यामुळेच केलं आणि त्‍याची जाणीव मला आहे.’’

त्‍यानंतर मतकरी म्‍हणाले, की रामदासच्‍या ठायी असलेली उत्‍तम अभिरुची, कलेची आवड आणि योग्‍य-अयोग्‍याची चांगली समज हा त्‍याच्‍यावरील संस्‍कारांचा परिणाम असला तरी त्‍यात त्‍याची उपजत वृत्‍तीदेखील आहे. ही गोष्‍ट सुचवून मतकरींनी भटकळांना त्‍यांच्‍या प्रकाशन व्‍यवसायाबद्दल बोलते केले. भटकळ म्‍हणाले, की पॉप्‍युलरची सुरुवात १९२४ ची. त्‍यांचे वडील गणेश भटकळ केवळ वैद्यकीय पुस्‍तकांचे प्रकाशन करत असत. १९४८ साली पॉप्‍युलरचे गिरगावात बस्‍तान बसले आणि रामदास भटकळ कुतूहलाने मराठी साहित्‍याकडे वळले. त्‍यांनी वयाच्या सतराव्या वर्षी, १९५२ साली गंगाधर गाडगीळ यांचे ‘कबुतरे’ हे नवकथांचा संग्रह असलेले पहिले पुस्तक प्रकाशित करत स्‍वतःच्‍या कारकिर्दीला सुरुवात केली. त्‍यानंतर त्‍यांनी वसंत कानेटकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, ना.धों. महानोर, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, कमल देसाई अशा अनेक मोठ्या व्‍यक्‍तींचे लेखन प्रसिद्ध केले. त्या प्रवासात त्‍यांचे कानेटकर, विश्राम बेडेकर यांसारख्‍या लेखकांशी विशेष बंध जुळले.

रामदास भटकळ यांच्‍या वडिलांचा त्‍यांच्‍यावर असलेला प्रभाव मुलाखतीत वेळोवेळी प्रकट होत राहिला. त्‍यांचे वडील प्रकाशन व्‍यवसायात असले तरीही त्‍यांनी स्‍पर्धात्मक वृत्ती ठेवली नाही. ‘‘आमच्‍या शेजारी जर एखादे नवे दुकान उघडले तर वडील स्‍वतः त्‍याचे उद्घाटन करत आणि त्‍या दुकानाला सर्व प्रकारची मदत करत.’’ पुढे भटकळ म्‍हणाले, की ‘‘माझा मुख्‍य धंदा इंग्रजी प्रकाशनाचा असला तरी मराठी प्रकाशन ही माझी हौस आहे. मी अमके तमके पुस्‍तक बाजारात चालेल का? त्‍यास वाचकांचा प्रतिसाद मिळेल का? असा विचार करून ते कधीच प्रसिद्ध केले नाही. मनाला वाटेल-पटेल तेच पुस्‍तक प्रसिद्ध केले. पुस्‍तक प्रसिद्ध केल्‍यानंतर ते खपवायचे कसे याचा विचार केला. जे चांगले आहे ते टिकेलच हा विश्‍वास होता. त्‍यामुळेच आम्ही प्रकाशित केलेल्या प्रत्येक शंभर पुस्तकांपैकी नव्‍वद पुस्‍तके आजही टिकून आहेत.’’

रामदास भटकळ यांनी पॉप्‍युलरकडून प्रकाशित झालेल्‍या अनेक दर्जेदार पुस्‍तकांच्‍या आठवणींना उजाळा दिला. ते म्‍हणाले, की १९५०-६० चा काळ हा मराठी साहित्‍यक्षेत्राच्‍या दृष्‍टीने मोठा प्रभावाचा होता. त्‍यावेळी विंदा करंदीकर, सई परांजपे, गाडगीळ यांच्यासारखी अनेक मंडळी लिहित होती. त्‍या लेखनाचा स्‍तर खूप चांगला होता. आजचे लेखन मात्र तेवढे चांगल्‍या रीतीने केले जात नाही. भटकळ म्‍हणाले, की आम्ही प्रकाशित केलेल्या मराठीतील या हजारभर पुस्‍तकांमध्‍ये नुसतेच चांगले लेखक आहेत असे नाही तर त्या सर्व पुस्तकांमधून आमची अशी संपादकीय दृष्टी जाणवेल. ते स्‍पष्‍ट करताना त्‍यांनी उदाहरण देत म्‍हटले, की ज्‍याप्रमाणे ऑर्केस्‍ट्रामध्‍ये विविध वादक असतात आणि प्रत्‍येकजण स्‍वतःचा वेगळा ताल वाजवत असतो, मात्र त्‍यातून निर्माण होणारी हार्मनी खूप छान असते. तसंच या सर्व पुस्‍तकांतून आम्‍ही एक विशिष्‍ट चित्र उभे करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे आणि त्‍यामध्‍ये आम्‍ही बर्‍यापैकी यशस्‍वी झालो आहोत.’’

त्यांनी स्वत: जास्त का लिहिले नाही? या प्रश्नावर ते म्हणाले, की दुसर्‍या लेखकांकडून लिहून घेऊन त्‍यांना मखरात बसवताना आपण स्‍वतःदेखील मखरात बसू शकत होतो याचा विसर पडला! भटकळांच्‍या या वाक्‍यावर उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात भटकळांच्‍या प्रकाशनाबरोबर त्‍यांचे लेखन, त्‍यांनी केलेला गांधींचा अभ्‍यास, त्‍यांच्‍या आवडीची क्षेत्रे अशा अनेक मुद्यांबाबत गप्‍पा झाल्‍या. भटकळांनीही मोकळेपणाने त्‍यांचे अंतरंग व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाची सांगता रामदास भटकळांच्‍या सुरावटींनी झाली. सूरपेटीच्‍या साथीने भटकळांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्‍या गीताला लावलेली नवी चाल पेश केली. त्‍या सुरांनी सारे सभागृह भारावून गेले होते. त्‍याचा नमुना येथे सादर करत आहोत.

कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला ‘ग्रंथाली’कडून प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या ‘कथा इन्‍शुलिनची’ या डॉ. विजय अजगावकर लिखित पुस्‍तकाचे रामदास भटकळ यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले. त्यावेळी बोलताना डॉक्‍टर अजगावकर यांनी सांगितले, की मधुमेहावरील औषध म्हणून सर्वांना ठाऊक असलेले इन्‍शुलिन कसे निर्माण झाले आणि त्‍यामागचे नाट्य काय होते? ते सांगण्‍याचा प्रयत्‍न या पुस्‍तकात केला आहे.

विविधांगी रुची बाळगणार्‍या आणि प्रकाशनक्षेत्रात मोठी कामगिरी करणार्‍या रामदास भटकळांची ही विविधांगी मुलाखत पाहण्‍याची संधी तुम्‍हालाही मिळू शकेल. ‘व्हिजन महाराष्‍ट्र’कडून घेण्‍यात येणार्‍या या मुलाखतींचे चित्रीकरण करून तो दस्‍तऐवज जपून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येतो. या आणि यापूर्वी झालेल्‍या सर्व मुलाखतींच्‍या डिव्‍हीडी मिळवण्‍यासाठी ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’कडे ०२२-२४१८३७१० या क्रमांकावर किंवा thinkm2010@gmail.com  या इमेलवर संपर्क करावा. इच्छुकांना या कार्यक्रमाच्‍या डिव्‍हीडी नाममात्र दरात उपलब्‍ध करून दिल्‍या जातील.

-‍ टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’

About Post Author

2 COMMENTS

  1. bhatkar yanche lobhas
    bhatkar yanche lobhas wyaktimatta mala satat bhawat ale ahe. maharastra janun ghycha asel tar phule-shahu , tilak- gandhi ganun ghywe lagtil.tasch aadhunik maharastra samjaun ghenyasathi sadanand more- ramdas bhatkal yanche bot dharawe lagel.

  2. vah vah great Ramdasji

    vah vah great Ramdasji
    tumchya gayanamule Balkavinchi kavita
    navyane ulgadli.

Comments are closed.