मी अस्वस्थ आहे! – विजय तेंडुलकर

_MiAsvasthaAahe_VijayTendulkar_1.jpg

साहित्याच्या वाटेला जाण्याच्या पुष्कळ आधी, म्हणजे अगदी शब्द फुटण्याच्याही आधी एक तंत्र लक्षात आले होते – मोठ्यांदा रडले, की जे हवे ते मिळते!

आवाज मोठ्ठा हवा किंवा जास्त खरे म्हणजे नरडे मोठे हवे. माणसे ओरडणाऱ्याची दखल झक मारत घेतात. नंतर लवकरच आणखी लक्षात आले, की गोंगाट, आरडाओरड केला पाहिजे असे नाही. इतरांच्या मनासारखे वागले, की बक्षीस मिळते! म्हणजे दरवेळी मिळेलच असे नाही, पण बहुदा मिळते.

क्वचित, त्या तंत्रातील हुशारी ओळखणारे कोणीतरी भेटे. मग लाभ घडत नसे. पण नुकसान तर नसे. ‘लबाड! नाटक करतोय’ असे कौतुक घडे. ‘बघा, कोणाला कसे खुश करावे ते एव्हापासूनच याला माहीत’ असे सर्टिफिकेट मिळे. हे असे या शब्दांत मनात येण्याचे वय ते अर्थातच नव्हते. शब्द येण्याच्या कितीतरी आधी माणसाला हुशारी आलेली असते. पुढे त्या उपजत हुशारीत भर पडत गेली. उदाहरणार्थ, थोडासा अभ्यास केला, की परीक्षेत पास होता येते. परीक्षेत पास होत गेले, की मोठी माणसे विशेष त्रास देत नाहीत. फार तर, ‘त्या अमुक तमुकाच्या मुलासारखा नंबर काढत नाही’ म्हणून अधून मधून कुरकुरतात, आपण ते मनाला लावून घेतले नाही म्हणजे झाले.

कधी तरी कळले, की मुलाने पास होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज नसते. अभ्यास न करता पास होण्याचेही मार्ग आहेत. तसे पास होणारेही आहेत. पण ते कळेपर्यंत शिक्षणच संपले होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्याने अनेक बऱ्यावाईट गोष्टी केल्या, त्यांत माझे शिक्षण संपवले. शिक्षण संपवले म्हणजे शालेय शिक्षण संपवले. जगण्याचे शिक्षण सुरूच राहिले. खरे म्हणजे त्यानंतर ते जोराने सुरू झाले.

सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि परिस्थितीत झपाट्याने पालट घडला. एकामागून एक बदल घडत गेले. बघता बघता, त्या बदलांना चक्रावून टाकणारा वेग आला. पायाखालील वाळू वेगाने सरकत गेली. आहे आणि असणारच असे मानलेले पुष्कळ काही वाळूच्या किल्ल्यांसारखे भसाभस खाली बसले. ती पडझड केवळ देशात नव्हे तर जगात घडली.

माणसे जाऊन सावल्या मागे उराव्यात तशी मूल्ये जाऊन आमच्यावरील त्यांचे संस्कार अर्थहीनपणे मागे उरले. त्यांचा आधार होण्याऐवजी पदोपदी अडचण होऊ लागली. त्यांचे काय करावे ते कळेनासे झाले. मग आम्ही संस्कार आणि आचरण यांची फारकत केली. संस्कार बोलण्यापुरते ठेवले आणि आचरणात परिस्थितीतील बदलांशी जुळवून घेत सुटलो. ते तसे सहज जमले नाही. तिरपीट उडाली. समर्थने शोधता शोधता ओढाताण झाली. जगण्याचा सुटू बघणारा तोल सावरताना पुष्कळ कसरत घडली. पण आम्ही मुळचेच हुशार असावेत. आम्ही ते सगळे करून टिकलो. आमच्यातील अनेक तर जगण्याच्या या कसरतीत मोठे झाले. त्यांनी नावे केली. आणखीही पुष्कळ केले.

देशातील त्या पिढ्यांचा मी एक प्रतिनिधी. ते सर्व पाहत वाढलो. तेच जगलो. पण देशात त्या कालखंडात केवळ आम्हीच झालो, असे नाही. आणखी पुष्कळ झाले, ते महत्त्वाचे होते. साम्राज्ये बघता बघता गाडली गेली, राजवटी हवेत उडाल्या, राजे भिकारी झाले, विचारसरणी निकालात निघाल्या, तयार उत्तरे हरवली आणि प्रश्नांचा गुंता झाला. तंत्रविज्ञानाच्या लाटा आमच्यावर एकामागून एक कोसळू लागल्या. एक ना अनेक उत्पात घडले. ते सर्व घडत होते आणि आम्ही चाप्लिनच्या सिनेमातील ढिली तुमानवाल्यासारखे त्यातून सावरण्यासाठी, शिल्लक राहण्यासाठी, वर शहाणे आणि सुजाण दिसण्यासाठी कसरतींची कमाल करत होतो. पायाखालील जमीन सरकत होती आणि आम्ही दाखवत होतो, की आम्हीच निघालो आहोत. कोठे? ते आम्हालाच माहीत नव्हते. कारण आम्ही निघालोच नव्हतो. केवळ असण्याची आमची पराकाष्ठा चालली होती. जमीन वेगाने सरकत होती.

अजून ती सरकतच आहे. पायाखालील वाळू निसटतच आहे आणि हात टेकण्यासारखे आधार दिसेनासे झाले आहेत.

चाप्लिनचे ठीक होते. त्याला चित्रपटाच्या दृश्याचे चित्रीकरण संपले, की स्थिरस्थावर, निवांत, प्रश्नांची उत्तरे असलेले एक जग भेटत होते. त्याच्या चित्रपटातील लुटुपूटूची जीवघेणी आणि संभ्रांत अहर्निश धावपळ आमचे खरोखरीचे जगणे झाली आणि ती करून दमछाक होऊ लागली, उरी फुटण्याची वेळ आली. न घसरता, न कोसळता दिशाहीन धावण्याच्या त्या धडपडीत, कोणास ठाऊक, काय काय तुडवले जात होते! डोक्यावर घेण्यासारखे किंवा उराशी धरण्यासारखेही काही त्यात असू शकत होते. नव्हे, होतेच. पण थांबून खाली पाहण्याची उसंत कोठे होती? आम्ही धावत होतो. कोठेही न पोचण्याची जीवघेणी शर्यत लागली होती. ती शर्यत आज आणखीच जीवघेणी झाली आहे. ज्यांचा सन्मान तुम्ही करताहात तो या शर्यतबाज आणि कसरतवाल्या पिढ्यांचा एक प्रतिनिधी आहे.

ज्या साहित्यकृतीचे निमित्त तुम्ही या सन्मानासाठी केले आहे, ती साहित्यकृती या पिढ्यांचा आणि त्यांच्या कालखंडाचा संदर्भ असलेली कहाणी आहे. ती पराक्रमाची विजयगाथा नाही. ती पराभवाची आणि वैचारिक गोंधळाची कबुली आहे. ती एका वेड्या आणि दारुण पराभवाचे खोलवर गेलेले शल्य आणि त्याबद्दलची वेदना बोलते. पराभवाचा सन्मान? वैचारिक गोंधळाचा सन्मान? खुळ्या स्वप्नरंजनाचा आणि त्याबद्दलच्या भ्रमनिरासाचा सन्मान? उरीपोटी दिग्भ्रांत धावणाऱ्यांचा आणि थांबणे शक्य नसणाऱ्यांचा सन्मान? सन्मान पराक्रमाचा होतो. जयाचा होतो. यशाचा होतो. जे जिंकण्यासाठीच शहाणपणाने शर्यतीत उतरतात आणि जिंकतात त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा आणि हुशारीचा होतो. त्यांच्या स्फूर्तिदायक कहाण्यांना दाद देण्याची रीत आहे. पण म्हणूनच मी या सन्मानाने गोंधळलो आहे. मी माझा सन्मान घडण्यासारखे नक्की काय केले आहे किंवा माझ्या हातून तसे काय घडले आहे ते शोधत आहे. एवढे खरे, की मी जे जगलो आणि माझ्याभोवती इतरांना जगताना पाहिले त्यांच्याशी, मी लिहीत असताना प्रामाणिक राहिलो. मी माझ्या काळाशी बेईमानी केली नाही.

मी माझ्या हाताशी नाटकासारखे प्रेक्षकसापेक्ष, रंजनप्रधान आणि बाळबोध माध्यम असूनही माझ्या काळाच्या जगण्यातील पेच, गोंधळ आणि गुंतागुंत प्रेक्षकांसाठी सरळ सोपी आणि खोटी करून मांडली नाही. मी जे लिहिले ते काही वेळा समाजाला धक्कादायक आणि प्रक्षोभकदेखील वाटले आणि त्यांनी मला त्याचे प्रायश्चित वेळोवेळी दिले. ते मी घेतले आणि लिहिल्या कृतीचा पश्चात्ताप कधी केला नाही. परंतु मी विचार करतो तेव्हा लक्षात असे येते, की त्यात माझे शौर्य नव्हते, धैर्य नव्हते; मलाही संगती न लागणारा एक हट्टीपणा होता. माझा जुना स्वभाव कोणी नको म्हटले, की तेच करण्याचा आहे आणि मला मी जे आणि जसे लिहिले त्यावेगळे काही लिहिताच आले नसते. कारण मला ते आणि तसेच दिसत होते; आणि लेखक म्हणून माझ्याकडे न दिसणारे आणि न पटणारे लिहिण्याचा हुन्नरीपणा नव्हताच. मी लिहिले, सातत्याने लिहीत राहिलो हेही कर्तृत्व नव्हे. माझी मला कळू लागले तेव्हापासून सवय काहीतरी लिहीत बसण्याची आहे आणि लिहिण्याव्यतिरिक्त दुसरे काही मला जमले नसते. जमले असते तर मी लिहिण्याऐवजी चित्रे काढली असती, गायलो असतो किंवा एखादे वाद्य वाजवले असते; किंवा चार्टर्ड अकौंटंट नाहीतर मॅनेजमेंट एक्स्पर्ट झालो असतो. त्या सर्वांचा मला वेगवेगळ्या कारणांनी हेवा वाटतो. माझा बेहिशेबीपणा, बेशिस्तपणा, संगीताविषयीची ओढ आणि जगातील महान चित्रकारांच्या कलाकृतींबद्दलचा दर वेळी नव्याने वाटणारा आश्चर्ययुक्त आदर अशी कारणे त्यामागे आहेत.

लेखक होणे ही माझी नियती होती आणि मी जसा लेखक झालो तसाच होणे आणि असणे हाही त्या नियतीचाच भाग असला पाहिजे. एरवी, माझे पहिलेच नाटक सपाटून पडल्यानंतर आणि मी पुन्हा जन्मात नाटक म्हणून लिहायचे नाही असा घोर निश्चय केल्यानंतर नाटकेच का लिहीत राहिलो? एका नाटकावर प्रचंड वादळ उठून त्यात भरपूर निंदानालस्ती आणि मनस्ताप पदरी घेतल्यानंतर वादळ उठवणारे दुसरे नाटक का लिहिले? नियती! त्याशिवाय दुसरे उत्तर सापडत नाही. नियतीचाच भाग म्हणून योगायोगाचा उल्लेख येथे केला पाहिजे. तुम्ही माझा सन्मान ज्या नाटकासाठी आज येथे करत आहात, त्या नाटकाबद्दल पूर्वी एका समारंभात माझ्यावर जाहीर रीत्या चप्पल फेकण्यात आली होती. ती चप्पल आणि हा सरस्वती सन्मान अशी त्या नाटकाची एकत्रित नियती असली पाहिजे! त्या नाटकाचा जन्मदाता म्हणून मी या दोहोंचा आदर मनापासून करतो. खरे म्हणजे सन्मान मला फार लवकर मिळाला असे काहींना वाटते. ते असे मोठे सन्मान मिळवण्यासाठी जेवढे वयस्क व्हावे लागते तेवढा मी अद्याप झालेलो नाही असे म्हणतात. लेखकाला असे मोठे सन्मान दिले जातात तेव्हा तो निर्मिती करण्याचा थांबून दोन वर्षें गेलेली असताना किंवा निदान त्याचा बहर ओसरून साहित्य-निर्मितीतील शिशिर आणि त्याचा थंड गारठा त्याच्या प्रतिभेत उतरलेला असतो असाही अनुभव आहे. मला तो गारठा अजून जाणवत नाही. लिहिण्यासारखे रोज नवनवे दिसत आणि स्फुरत आहे. पार्किन्सन्स किंवा कॅटरॅक्टसारखी एखादी व्याधी अद्याप न झाल्याने लिहिण्यालाही अजून अडचण वाटत नाही. त्यामुळे मी या सन्मानानंतरही लिहीत राहीन असा धोका आहे; तो येथे नोंदवून ठेवतो.

शेवटी, एक विचार मनाशी आहे, तो बोलून माझे भाषण संपवतो. आमच्या महाराष्ट्रात अनेकांना मराठी भाषेच्या भवितव्याविषयी सध्या फार चिंता लागून राहिली आहे. तंत्रविज्ञानाने निर्माण केलेल्या नव्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे साहित्याचे काय होणार अशीही एक चर्चा आहे. तुमच्या हिंदी भाषेत आणि इतर भारतीय भाषांतही तशीच चिंता चालू आहे काय, ते मला माहीत नाही. मला तशी चिंता, भाषा आणि साहित्य यांविषयीची आत्मीयता इतरांइतकीच असतानाही जाळत नाही. भाषा आणि साहित्य यांच्या मुळाशी माणसातील सर्वकालीन उत्सुकता आणि अभिव्यक्तीची गरज असेल तर या दोन्ही गोष्टी अमर आहेत. जोवर जगण्याची आव्हाने माणसासमोर आहेत तोवर त्याची जाणून घेण्याची उत्सुकता आणि अभिव्यक्तीची गरज राहणार आणि त्या गरजा तो भाषेद्वारेच पुऱ्या करणार. आता हे खरे, की भविष्यात त्याची भाषा कदाचित निराळी किंवा नवीच एखादी असेल! पण त्याने काय बिघडते? महत्त्व माणसातील माणुसपणाला आहे; आणि औत्सुक्य आणि अभिव्यक्ती ही त्या माणुसपणाची दोन महत्त्वाची आणि सुंदर लक्षणे आहेत. ते कोणत्या भाषेत घडून येते याची चिंता कशाला? ते घडत राहिल्याशी कारण.

एकविसावे शतक वेशीवर येऊन उभे आहे. ते जगण्याची अतर्क्य आणि अनपेक्षित आव्हाने घेऊन येणार आहे. मी मावळत्या शतकाचा प्रतिनिधी म्हणून या येत्या शतकातील माणसाची आणि त्याच्या जगण्याची कल्पना करत असतो. माझ्या कालखंडातील माणूस मला चाप्लिनची आणि त्याच्या कसरतींची आठवण देतो, मी तशी या येत्या शतकातील माणसाच्या जगण्याची कल्पना करू लागलो, की मला डिस्नेचा मिकी माउस आठवतो. दृश्य-अदृश्य तमाम शक्ती त्यांची राक्षसी ताकद एकवटून त्याच्या नायनाटाचा विडाच उचलून त्याच्या मागे लागलेल्या किंवा त्याच्यासाठी दबा धरून जागोजाग बसलेल्या असतात. परंतु मिकी माउस मरत नाही. त्याला त्यासाठी कसरतींचा बादशहा अशा चाप्लिनने नम्र व्हावे अशा अतिभन्नाट आणि अकल्पनीय कसरती शिकाव्या लागतात; आणि तो त्या शिकतो. परंतु मिकी माउस राहतो, तो संपत नाही. तो पदोपदी राक्षसी शक्तींच्या गदारोळात मरणाच्या जबड्याशी आणि जबड्यातदेखील पोचतो, पण गिळला जात नाही; चिरडला जाऊन सपाट होतो, पण पुन्हा उठून धावू लागतो. येत्या शतकाची, माणसाच्या भविष्याची चाहूल घेताना, तेव्हाच्या माणसाची अवस्था मला तशी दिसते. त्याला त्याचे अस्तित्व त्याने निर्माण केलेल्या यंत्रणांच्या राक्षसी कर्तुकीपुढे आणि त्यांच्यातीलच काही प्रवृत्तींविरुद्ध टिकवण्यासाठी जीवाची बाजी लावून रोज लढावे लागले असे मला दिसते. अर्थात लेखक द्रष्टा शास्त्रज्ञ नसतो. तो साधा ज्योतिषीदेखील नसतो. तो कसली गणिते मांडून उत्तरे काढत नाही. त्याला वाटते किंवा त्याला जाणवते. तो त्या जाणवण्याने अस्वस्थ होतो. तसा मी आज अस्वस्थ आहे!

– विजय तेंडुलकर

कन्यादान, विजय तेंडुलकर, तिसरी आवृत्ती, 1995 यांमधून उद्धृत

About Post Author