माहोल पुलोत्सवाचा!

0
80

पुणे, रत्नागिरी, गोरेगाव(मुंबई) अशा अनेक ठिकाणी पुलं च्या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. माहोल पुलोत्सवाचा आहे. पुलंचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस, पुण्यात 2000साली ‘आशय सांस्कृतिक’तर्फे पुलं हयात असताना आठ दिवसांचा पहिला महोत्सव झाला. पुलंचे व्यक्तिमत्त्व बहुविध. त्यांचे सारे कलाकौशल्य प्रकार त्यामधून व्यक्त झाले. पुलं स्वत: हजर आणि महोत्सवामागे प्रेरणा सुनीताबाईंची. त्यामुळे तो महोत्सव जगभरच्या मराठी माणसांत पोचला. मग ती वहिवाट झाली. नामवंतांना त्या महोत्सवाशी जोडले जाणे प्रतिष्ठेचे वाटू लागले. तो महोत्सव गावोगावी पसरला. दरम्यान पुलंचे निधन झाले. सुनीताबाईंनी पुलंचे सारे साहित्य कॉपीराईट फ्री केले. आरंभी, पुलोत्सवामागे ‘आशय’चीच प्रेरणा होती. परंतु आता गावोगाव त्यासाठी ठेकेदार बनले आहेत. पुलोत्सव हे स्पॉन्सर्स मिळवण्याचे हुकमी साधन आहे. टेलिव्हिजन वाहिन्यांमुळे नवे स्टार भरपूर बनले आहेत. त्यांना तरुणाई पुरस्कार, ज्येष्ठ पुरस्कार असे कोणत्या तरी उपाधीचे पुरस्कार द्यायचे. त्यानिमित्ताने स्टार्स येतात, मंडपात मिरवतात, ठरलेल्या गोष्टी सांगतात. खरीखोटी स्तुती करतात, सारे काही छान छान असते. प्रेक्षक-श्रोतेही त्यात आनंदाने सामील होतात. काही वेळा, कुठचातरी कार्यक्रम कुठच्यातरी वाहिनीवर ‘लाइव्ह’ म्हणून दाखवला जातो.

दोन-तीन दिवसांचा महोत्सव भरवायचा तर तीन ते पाच लाख रुपये खर्च येतो. त्या काळातले पुलंच नव्हे तर सुधीर फडके , ग.दि.माडगूळकर, राजा परांजपे असे अनेक ‘महापुरुष’ आहेत, ज्यांच्याबद्दल जनतेत आकर्षण निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे जी गोष्ट 2000 सालापर्यंत औत्सुक्याने घडली तिचा आता व्यवसाय क्वचित, धंदाही झाला आहे. त्यामध्ये ‘सारेगमप’सारख्या नव्या कार्यक्रमांची भर पडत असते. त्यांतील गायक-गायिका टीव्हीवरचा शो गावोगावी चैतन्यमय करू शकतात. गावोगावच्या लोकांना क्वचित अनुभवायला मिळणारे ते क्षण ‘फार फार’ (माध्यमानीच आणलेली विशेषणांची ही बरसात व पुरावृत्ती) मोलाचे वाटतात. कलावंत पूर्वी हलाखीत जगत व दारिद्र्यात मरत. परंतु आता नव्या करमणुकीच्या व्यवसायामुळे कलावंतांची घरे धनधान्यांनी भरलेली व त्यांचे जीवन सुखचैनीने समृद्ध आहे. ते त्यांना व त्यांच्या ठेकेदार संस्थांना लखलाभ होवो. प्रेक्षक-श्रोत्यांनाही त्यामधून ‘खूप खूप खूप’ आनंद मिळो.

मुद्दा वेगळाच आहे. जो समाज करमणुकीची सांस्कृतिकता सहजपणे अशा मौजेने स्वीकारतो, तो समाज स्थायी सांस्कृतिकता कशी जपतो? ठाणे-डोंबिवलीचे सुधीर बढे यांच्या मुख्य प्रयत्नांमधून डोंबिवली ग्रंथसंग्रहालय चैतन्यमय रीत्या चालवले जाते. त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा संचच तयार झालेला आहे. त्यांनी संग्रहालयात अनेक अभिनव कल्पना राबवल्या आहेत. वाचनालय तरुणांपर्यंत नेण्यासाठी त्यांचे काही उपक्रम आहेत. त्यापुढे जाऊन त्यांनी ‘गावोगावी ग्रंथालय मित्र मंडळे’ असा प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेले काम मोठे आहे.

ते एकच प्रश्न विचारतात. सुधीर फडक्यांची, गदिमांची गाणी तीन तास ऐकण्यासाठी दीड-दोन लाख रुपये खर्च केले जातात. पुलंचा महोत्सव भरवण्यासाठी तीन ते दहा लाख रुपये खर्च केले जातात. त्यातला काही वाटा, किंवा खरेतर समाजाने अशा एखाद्या कार्यक्रमाचा खर्च स्थायी स्वरूपाच्या सांस्कृतिक गोष्टीसाठी, संस्थात्मक कार्यासाठी द्यायला काय हरकत आहे?

हल्‍ली प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या किंवा महत्‍त्‍वाच्‍या गावी वर्षातून दहापासून तीसपर्यंतच्‍या संख्‍येने करमणूकीचे सांस्‍कृतिक कार्यक्रम होतात. त्‍यावर कोटी-कोटी रूपये खर्च होतात. त्‍यापैकी काही ग्रंथसंग्रहालये, संशोधन संस्‍था, अभ्‍यासकेंद्रे यांच्‍या वाट्याला आले तर त्‍यामधून स्‍थायी स्‍वरूपाचे सांस्‍कृतिक कार्य केल्‍याचे ‘पुण्‍य’ समाजाला लाभेल.

संपर्क : दिनकर गांगल इमेल : thinkm2010@gmail.com 

 

Last Updated On – 16th Nov 2016

 

About Post Author

Previous articleश्री.पु. आणि पुलं
Next articleमाझं गाव माझं विद्यापीठ
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.