माहुली गडावरील स्वच्छता मोहीम

2
46
carasole-4

टिम दुर्गसखा‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागी स्थिरावण्याचा शाप असतो.’

तसेच काहीसे सह्याद्रीतील गडकोटांचे आहे, डोंगरांचे आहे, घाटमाथ्यांचे आहे, शिखरांचे आहे.

तरी त्यांच्यात आणि झाडांत एक साम्य दिसून येतेच… ते दोन्ही स्वत:ची जागा न सोडतासुद्धा दुसऱ्यांना स्वत:ची ओढ लावून आपल्याजवळ करतात.

मी डिसेंबरअखेरीला एक छायाचित्र फेसबूकवर पाहिले: ‘किल्ले माहुली’ची पुन्हा कचराकुंडी झाली आहे! अन् बाबासाहेबांचे बोल कानात घुमू लागले. “बाळ, तुला दाढी येते तेव्हा तू काय करतोस? ती तू भुईसपाट करून टाकतोस; पण दाढी परत उगवतेच. तो शरीरक्रम आयुष्यभर चालतो. तसंच या कचऱ्याचं आहे. तो परत परत येत राहतो.”

ठाण्यातील ‘दुर्गसखा’ने माहुलीवरील कचरा साफ करण्याची मोहीम अशा परिस्थितीत हाती घेतली!

आम्ही गड्यांनी ठरवले, “२८ फेब्रुवारी रातच्याला निघून १ मार्चला पहाटेच्या पारीला गडावर जायचं अन् गड स्वच्छ करायचा. गडाला गडाचंच रूप पुन्हांदा द्यायचं.”

‘आम्ही’ म्हणजे मी, सुबोध पठारे, नंदन सावंत, अजय दळवी, केतन अलोणी आणि सर्व तरुणांना लाजवतील असे आमचे नवतरुण साथीदार सुभाष कुलकर्णीकाका असे सहा जण मोहिमेस तयार झालो. मी, सुबोध, अजय, सुभाषकाका आणि नंदनदादा, आम्ही सर्वांनी त्या आधी ‘माहुली’ केला होता, पण केतनसाठी तो गड नवा होता. म्हणाला कसे, “घरात बसून ढुंगणावर फोड आणण्यापेक्षा गडावर येऊन काम करणं, हे साऱ्याच दुर्गप्रेमींना आवडत असतं!”

माहुली गड‘किल्ले माहुली’ हे नाव ऐकून काही जण गळपटून जातात. ‘मा’ ‘हु’ आणि ‘लि’ पण नको रे नको अशी अवस्था होऊन जाते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगावजवळ ते दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड आणि पळसगड मिळून ते बळकट ठाणे तयार झाले आहे. गडाच्या उत्तरेला तानसा अन् दक्षिणेला भातसा नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये ‘किल्ले माहुली’ सातशेअठ्ठावन्न मीटर उंचीवर मान ताठ वर करून, दिल्लीच्या मार्गाकडे बघत उभा आहे!

आम्ही रात्री सव्वादोनच्या सुमाराला आसनगाव स्थानक गाठले; तितक्या रात्री आमचे लाडके महेंद्र धीमते सर स्वच्छता अभियानाची सामग्री घेऊन आमची वाट पाहत होते. तीनला दहा मिनिटे असताना गडाच्या पायथ्याशी असलेल्या माहुली गावात पोचलो. आम्ही सारे सामान घेऊन, सरांना निरोप देऊन तीनच्या सुमारास गडाकडे मार्गस्थ झालो. रात्रीच्या टिम-टिमणाऱ्या चांदण्यांत गडाचे सुळके लक्ष वेधून घेत होते. आसनगावमार्गे शिडीच्या वाटेने वर, पठारावर आलो. गडाच्या पायथ्यापासून ते गडमाथ्यापर्यंत गावातील ठाकरे यांचा कुत्रा, ‘काळ्या’ने आम्हाला साथ दिली. काळ्या हे आम्ही त्याचे ठेवलेले नाव. तो काळा कुळकुळीत आहे म्हणून. ठाकरे जेवण-नाश्त्याची सोय करतात, त्यांच्या घराची राखण काळ्या करतोच, पण रात्री कोणी गड चढू लागले तर त्याला सोबतपण करतो. काळ्याच्या संगतीने न्याहरी करून फोटो काढले.

तोपर्यंत सकाळचे पावणेसहा वाजले होते, सूर्यनारायणाचे कोवळे रूप असंख्य चांदण्यांना बाजूला सारून वर येत होते, अन् ‘स्वराज्याच्या अश्वा’ची मान पुन्हा ताठ झाली, त्याच्या धन्याचा गौरव, पराक्रम आणि निष्ठा दाखवण्यासाठी! (माहुली गड सर करताना एक चढण लागते. चढण पार करून माथ्यावर आल्यावर खाली पाहिल्यास चढणीचा भाग घोड्याच्या मानेसारखा दिसतो. म्हणून त्या भागाला घोड्याची मान असे म्हणतात.) माहुली गडावरून घोड्याची मान पाहिली, त्यावर असलेली झाडांची गर्दी, त्यातून वाहणारा वारा अन् त्यामुळे निर्माण झालेला घनन आवाज… जणू स्वराज्याचा ‘अश्व’च खिंकाळत आहे असे वाटले! शिडीच्या वाटेने वर आलो, की तेथून तीन वाटा फुटतात. डावीकडची वाट गडाच्या दक्षिणेस असलेल्या भंडारगड येथे जाते, तर उजवीकडची वाट गडाच्या उत्तरेस असलेल्या पळसगड येथे जाते, अन् टाक्यापासून सरळ गेलेला रस्ता माहुली गुहेकडे जातो, गडाच्या पश्चिम दिशेकडे असलेल्या दरवाज्यापाशी.

गुहेच्या परिसरात पोचलो अन् सगळीकडे घाणच घाण दिसली. जेथे पाण्याचा झरा आहे तेथे पर्यटकांनी प्लेटी अन् प्लास्टिक यांचा खच लावून ठेवलेला होता. समोर झाडाच्या सावलीत शिव-पिंड होती, पण त्या देव्हाऱ्याची अवस्था बिकट झालेली. खाली गुहेपाशी तर पाहवत नव्हते… कचऱ्याचा नुसता ढीग. त्यातच गडाचे माहितीफलक होते. त्यावर सर्व सूचना होत्या, पण गडाचा माहितीफलक ज्यांना वाचूनही कळत नसेल त्यांना काय म्हणावे? शिक्षित की अशिक्षित?

सकाळच्या प्रहरी न्याहरी करून स्वच्छता मोहिमेचे काम हाती घेतले. आम्ही सहाजण… म्हणून प्रत्येकाला कामे वाटून दिली. मी, नंदनदादा, सुबोध यांनी वरचा –  मंदिरापाशीचा परिसर, तसेच पिण्याच्या पाण्याचा परिसर साफ करण्यास घेतला. कुलकर्णीकाकांना खालील दोन गुहा साफ करण्यास सांगितल्या. अजय आणि केतन यांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी जळाऊ लाकूड गोळा करण्यास सांगितले. सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत सर्व वरच्या पिंडीजवळचा भाग, गुहेपाशी जाणाऱ्या पायऱ्यांवरील घाण, सर्व गुहा आणि त्यांतील कचरा, दरवाज्यासमोरील सर्व कचरा पूर्णपणे साफ केला. जो कचरा जळाऊ होता तो जाळला; जो पुरला जाऊ शकतो असा कचरा जमिनीत पुरला. थोडा वेळ शरीराला आराम देऊन संध्याकाळची गडफेरी केली. त्यात आम्हाला भटकलेले तीन जण भेटले… रस्तोगी, कोतवाल आणि अंकुर. ते सायंकाळी सहाच्या दरम्यान परत गड खाली उतरण्याच्या बेतात होते. पण आम्ही त्यांना तसे करण्यात काय धोका आहे, काय काय अडचणी येऊ शकतात ते समजावले. तिघांकडे ना पाण्याचा साठा होता, ना टॉर्च. त्यांना रात्र गडावर काढून सकाळच्या प्रहरी गडफेरी करून खाली उतरण्याचे सुचवले.

राहिलेले काम रात्रीच्या काळोखात पुन्हा सुरू केले. त्यात गुहेपाशीचा गाळ पूर्ण काढून तो दुसऱ्या भागात पायरी रचण्यासाठी वापरला. झऱ्यातून पाणी झिरपून पायऱ्यांवर चिखल होत होता, पाण्याला मार्ग करून दिला. त्यामुळे चिखल न होता, पाणी पायऱ्यांद्वारे दरवाज्याचे पाय धुऊन बाहेर पडेल असे पाहिले. केतन जेवणाच्या तयारीत होता अन् ते तिघे जण त्याला मदत करत होते. दुपारी बनवलेल्या काजू खिचडीची चव जिभेवर फिरतच होती. त्यात केतनने नवीन पदार्थ तयार केला. फोडणीचा भात + फ्राय चिप्स + फ्राय काजू. उत्कृष्ट असे जेवण करून रात्री चांदण्याचे खेळ पाहण्यास कड्यावर जाऊन बसलो.

मोहिमेत करायचे असे ठरवलेले स्वच्छतेचे नव्वद टक्के काम झाले होते. सकाळचा नाश्ता उरकून, राहिलेले काम दहा वाजेपर्यंत संपवून गडफेरीला जाण्याचा बेत आखला. अन् तेवढ्यात ध…र्धा…र्धा…र्धा … असा  आवाज करत गुहेच्या वर असलेले झाड कोलमडून खाली पडले. नशीब … तेव्हा त्या गुहेच्या आवारात कोणी नव्हते. गावातील मुले तो प्रकार घडण्याच्या पंधरा मिनिटे आधी तेथून निघून गेली होती. दहा टक्केच्या कामात आता वर एक ‘शून्य’ वाढला होता! कोलमडलेले झाड तोडून, त्यातून झालेला कचरा, पालापाचोळा परत जमिनीत पुरून, मोडलेल्या पायऱ्या पुन्हा बसवून, अन् वाहत्या पाण्याला पुन्हा दरवाज्याचे पाय धुण्यास ठेवून पुढच्या प्रवासास मार्गस्थ झालो. त्यात त्या तीन मित्रांचे मदतीचे हात मिळाले. ते तिघे मध्यप्रदेश, बिहारमधील…  पण ‘शिवाजी’ या तीन अक्षरांतील जादूने त्यांना आपलेसे करून सोडले. दुपारी बाराच्या ठोक्याला त्या तिघा जणांना गडाच्या खाली जाण्याचा मार्ग दाखवून आम्ही गडाच्या दक्षिण भागात असलेल्या भंडारगडाकडे गेलो.

दोन, तीन किंवा अधिक डोंगर जोडणाऱ्या जलदुभाजक रेषेला ‘धार’ म्हणतात. धारेमुळे दोन खोरी निर्माण होतात. धारेवरील सर्वांत उंचीच्या उथळ भागाला ‘खोगीर’ म्हणतात. मात्र अशाच ठिकाणी असणाऱ्या चिंचोळ्या खोलगट भागाला खिंड म्हणतात. उदाहरणार्थ, खोगीर पाहायची झाल्यास पेबचा किल्ला ऊर्फ विकटगड माथेरान मार्गातून केल्यास दिसून येते;आणि हरिश्चंद्र गडावर लागणारी टोलारखिंड व प्रबळ कलावंतीण करताना दिसणारी प्रबळखिंड किंवा सरस गड चढताना पायऱ्या लागतात, त्यातील ती भेग म्हणजे ‘खिंडी’चे उदाहरण. माहुलीचे दोन खोगिरांमुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. आम्ही माहुली खोगिरीतील वाडे, तलाव, हनुमान मूर्ती, सतिशिळा पाहून भंडारगडाकडे मार्गस्थ झालो. भंडारगडाकडे जाताना तीस फुटी रॉकपॅच लागतो. ROCKPATCH हा डोंगररांगेमधील कातळ भाग. त्यात जाण्यासाठी मार्ग हा ठळक नसतो. त्या भागात चढताना दोन हात आणि दोन पाय यांतील तीन अवयव एका जागी घट्ट आणि त्याची पकड मजबूत करून पुढे सरून कातळकडा पार करायचा असतो. त्यात शरीराचा पूर्ण भर गिर्यारोहकांच्या हातांच्या पकडीवर असतो. पायाने फक्त आपले शरीर हे वर ढकलायचे असते. तो पूर्ण पार करून, वर चढून आल्यावर कल्याण दरवाज्यापाशी एक रस्ता जातो. वाशिंदवरून उत्तरेला सोंडेतून वर येण्यास दुसरा रस्ता आहे. दुर्गप्रेमींनी तो मार्ग प्रस्तरारोहणाचे सामान असेल तरच वापरावा. इंग्रजांनी प्रत्येक किल्ल्यावर जाण्याच्या मार्गावर अडथळे उभारले आहेत. त्याचाच नमुना माहुलीच्या कल्याण दरवाज्यापाशी दिसतो.

आम्ही नवरा, नवरी, अंतरपाट, भटजी, सुई, वजीर या साऱ्या सुळक्यांचे दर्शन घेऊन दुपारी तीनच्या दरम्यान पुन्हा माहुली शिडीपाशी पठारावर येऊन पोचलो. माहुलीच्या शिडी कड्यावर सकाळी फडकणारा भगवा हवेच्या वेगाने खाली पडला होता. त्याला पुन्हा जागेवर बसवण्यासाठी नंदनदादा आणि सुबोध त्या जागी गेले, आम्ही त्याला त्याच्या जागेवर पक्के बसवून खाली मार्गस्थ झालो. स्वराज्याचा भगवा ध्वज पुन्हा एकदा गगनास भिडला होता!

सुभाष कुलकर्णीकाका ‘दुर्गसखा’चे आधारस्तंभ. वय वर्षे सहासष्ट. त्यांनी प्रत्येक दुर्गभ्रमणात न चुकता आम्हाला गेली पाच वर्षे साथ दिली आहे. चुकून कधी ट्रेकचा एसएमएस गेला नाही तर स्वत:हून फोन करून विचारणार, “काय रे …. ट्रेक कधी आहे ? आहे तर कळवलं का नाही?” पण यावेळी त्यांनी कमालच केली होती. मी गडावर त्यांना फोन आलेला ऐकला.

मी:- काय काका? काय झालं? काही प्रॉब्लेम?

सुभाषकाका:- अरे, काही नाही, मुलाचा फोन होता. डॉक्टरकडे जाऊन आला अन् काम झालंय सांगत होता.

मी:- डॉक्टरकडे? का? काय झालं काका?

सुभाषकाका:- अरे, काही नाही … माझं ऑपरेशन होतं शनिवारी, ते मी त्याला मंगळवारी करून घे असं सुचवलं होतं, काल निघताना. तेच तो सांगत होता. काम झालं म्हणून. मी विचार केला होता, की ऑपरेशन होण्याच्या आधी एक ट्रेक करून येऊ, म्हणजे दोन आठवडे बाहेर नाही पडलो तरी काही वाटणार नाही.

मी फक्त त्या काकांकडे पाहत बसलो.

शनिवारचे ऑपरेशन मंगळवारी ढकलून स्वच्छता मोहिमेसाठी तयार झालेल्या काकांना नवतरुण म्हणणे चुकीचे ठरणारच नाही.

चेतन राजगुरू
९६६४९४१३८१
chetaned@gmail.com

Last Updated On – 28th feb 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. खुप खुप चांगला उपक्रम करत
    खुप खुप चांगला उपक्रम करत आहात तुम्ही.तुमची पोस्ट मी डोंबिवली मधील राजे प्रतिष्ठान या ग्रुप ला पाठवतो.
    आम्ही पण दरवर्षी माहुली किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जातो. 28 जून ला डोंबिवली मधील राजे प्रतिष्ठान चे माझे मित्र माहुली येथे श्रमदानासाठी जाणार आहेत.

Comments are closed.