Home माहिती संकलन मोहीम – 2023

माहिती संकलन मोहीम – 2023

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलचा आरंभ करत असताना, ते पोर्टल जगातील देश-प्रदेशांना जागतिकीकरणाच्या लाटेत मॉडेल ठरू शकेल असा विश्वास होता. साहित्य जमा होत गेले तसा कल्पनाविस्तार झाला आणि ‘मॉडेल’ या संकल्पनेवरील विश्वास दृढ होत गेला. परंतु वाचकांच्या ध्यानी ते समग्र चित्र धुसरदेखील उतरेना. स्वाभाविक आहे, कारण माहिती संकलनाचे तालुका हे केंद्र असावे असे आपण म्हणत होतो, तरी साहित्य वेगवेगळ्या जिल्ह्यांतून व वेगवेगळ्या प्रकारांतून ‘विखुरल्या’ स्वरूपात संकलित होत होते. त्याचा ‘इम्पॅक्ट’ होत नव्हता. महाराष्ट्राचे समग्र चित्र रेखाटण्यासाठी पोर्टलवर सव्वा ते दीड लाख बाबी (आर्टिकल्स) असाव्यात असे आपण म्हटले आहे. प्रत्यक्षात चार हजारच लेख जमले आहेत.

तथापी या टप्प्यावर एक चांगली सूचना पुढे आली, की अवघ्या महाराष्ट्राला कवेत पकडण्यासाठी धावण्याऐवजी पाच मॉडेल तालुके वेबपोर्टलवर सादर करावेत. ते माहितीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवावा. एका अर्थाने, त्यांपैकी प्रत्येक तालुक्याचे समग्र चित्र सादर करावे; तो ‘महाराष्ट्राच्या समग्र चित्र’ कल्पनेचा नमुना ठरेल. त्यामधून प्रश्न निर्माण झाला, की तालुक्याचे समग्र चित्र म्हणजे काय? ते चित्र साकार झाले हे कशावरून समजायचे? आणि मग उत्तरे समोर येऊ लागली.

एकतर संबंधित तालुक्याचे भौगोलिक चित्र त्याच्या नकाशातून; तसेच, क्षेत्रफळ वगैरे संख्यात्मक माहितीतून दाखवता येईल. प्रत्येक तालुक्यात शंभर ते सव्वाशे गावे असतात. अपवादात्मक परिस्थितीत ती सव्वादोनशेपर्यंत आहेत. त्या सर्व गावांची नावे, त्यांचे आकारमान अशी भौगोलिक माहिती व त्यास पूरक असे नकाशे देता येऊ शकतील. त्यामध्ये तालुक्यातील रस्ते, नद्या, डोंगर, किल्ले अशी माहितीदेखील निर्देशित असते. यामुळे संबंधित तालुक्याचा भूगोल समजून जाईल.

तथापी तालुक्याचे दर्शन खरे घडायचे ते त्याच्या अंतरंगातून. हे अंतरंग म्हणजे तालुक्याची गुणवैशिष्ट्ये; म्हणजेच, तेथील जनांचे व जनसमूहांचे विशेष ! शेती हा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग असला तरी गेल्या दोनतीन दशकांत मुख्यत: शिक्षणामुळे तालुक्यांचे चित्र पालटले आहे. शाळा-कॉलेजांचे वैभव निर्माण झाले आहे. तेथील माणसे शिक्षित-सुशिक्षित झाली आहेत. त्यातून वेगवेगळे छंद-अभ्यास-उद्योग यांचे धुमारे फुटले आहेत; क्वचित व्यासंगही दिसून येतो. ते सारे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘व्यक्ती’ या माहिती संकलन प्रकारामधून व्यक्त होऊ शकेल. त्याच बरोबर संस्था व संस्कृतिसंचित असे दोन प्रकार माहिती संकलनासाठी आपण निर्माण केले. ‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

प्रत्येक गावातील १. कर्तबगार व छांदिष्ट व्यक्ती, २. उपक्रमशील खासगी व सार्वजनिक संस्था आणि ३. मंदिर-मशिदीपासून वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांपर्यंतचे संस्कृतिसंचित यांची नोंद.

ध्‍येय गाठायचे तर बृहन्‍महाराष्‍ट्रातून अधिकाधिक व्‍यक्‍तींचा सहभाग माहिती स्‍तरावर या प्रकल्‍पात आवश्‍यक ठरतो. आपल्‍यापैकी प्रत्‍येक जण त्‍याच्या गावाबद्दल, तेथे होऊन गेलेल्‍या-असलेल्‍या व्यक्‍तींबद्दल, संस्‍थांबद्दल काही ना काही माहिती देऊ शकतो. त्‍या जोडीला किल्‍ले, लेणी, नद्या, गावात घडलेल्या ऐतिहासिक घटना, दंतकथा, ग्रामदेवता, जत्रा, खाद्यपदार्थ, साहित्‍य, वन्यवैभव, प्राणी आणि पक्षी अशा नानाविध गोष्‍टींबद्दल सांगणेदेखील लोकांना शक्‍य आहे.

या ‘मॉडेल’ तालुकावार मोहिमेत त्या तीन प्रकाराचे आणखी पोटप्रकार विस्तारले आणि ते व्यक्ती या प्रकारात १. क्षेत्रानुसार प्रसिद्धी (कृषी, उद्योग, कला वगैरे),२. लौकिकानुसार प्रसिद्धी, ३. पातळीनुसार प्रसिद्धी (तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, जागतिक आणि सेलिब्रिटी), ४. छांदिष्ट व्यक्ती, ५. समाजसेवी व्यक्ती. संस्था या प्रकारात ६. सार्वजनिक संस्था, ७. खासगी संस्था, ८. नोंदली नसलेली संस्था. संस्कृतिसंचित या प्रकारात ९. यात्रा-जत्रा-मंदिर-मशीद-वास्तू-खाद्यपदार्थ-गावगाथा वगैरे वगैरे…

फलटण (सातारा)

शेवगाव (अहमदनगर)

दापोली (रत्नागिरी)

अचलपूर (अमरावती)

बदनापूर (जालना)