माझे चिंतन – ग.प्र. प्रधान

0
88
maze_chintan_g.p.pradhan

मानवी जीवनात सुख आणि दुःख हे प्रकाश व छायेसारखे असते. सुख मिळाले, की मनुष्याला जीवन प्रकाशमान झाल्यासारखे वाटते. त्या उलट, दुःख भोगण्यास लागले, की जीवनावर दुर्दैवाचे सावट पडले आहे असे वाटू लागते. काही सुखे शारीरिक असतात. सुग्रास जेवणाने भूक भागली, की मनुष्याला शारीरिक सुख मिळते. गरम पांघरूणामुळे थंडीमध्ये जी ऊब मिळते ती सुखद वाटते. हवेतील उष्णतेमुळे अस्वस्थ वाटत असताना, आकस्मिक येणारी वाऱ्याची झुळूक किंवा पावसाची सर यांच्यामुळे मानवी शरीर सुखावते. सुगंधी फूल, सुरेल संगीत, निसर्गाचे सौंदर्य, बालकाचे निरागस हास्य, तरुण स्त्रीचे विभ्रम हे सारे सुखदायी असतात. काही सुखे बौद्धिक असतात, बुद्धीच्या दर्ज्याप्रमाणे सुख देणारे अनुभवही वेगवेगळे असतात. काही जणांना ललित साहित्य वाचून आनंद होतो, तर काहींचे मन विचारप्रधान ग्रंथांमध्ये रमते. शास्त्रज्ञांना संशोधनामध्ये आनंद मिळतो, तर तत्त्वज्ञांना तत्त्वचिंतनामध्ये. काही सुखे मानसिक असतात. प्रिय व्यक्ती भेटली, की आनंद होतो. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यश मिळाले, की त्या व्यक्तीला, परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला, की विद्यार्थ्याला किंवा नफा झाला, तर व्यापाऱ्याला स्वाभाविकपणे आनंद होतो.

मी आतापर्यंत ज्या सुखांचा उल्लेख केला, ती सर्व सुखे आत्मकेंद्रित आहेत. परंतु दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होणे हा अनुभव उदात्त असतो. आईला मुलाच्या यशामुळे आनंद होतो, परोपकारी माणसाला भुकेल्या गरीब माणसाला जेवण्यास घालण्यातून आनंद मिळतो. काही सुखांचे स्वरूप अगदी वेगळे असते. परमेश्वरावर उत्कट श्रद्धा असलेल्या भक्ताला निरपेक्ष भक्ती करण्यात आनंद वाटतो. 

सुखांप्रमाणे दु:खेही शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक असतात. उपासमार, मारहाण होत असताना, हजारो माणसे विव्हल होतात. अपेक्षेप्रमाणे शास्त्रातील कूट प्रश्न सुटला नाही, तर शास्त्रज्ञ निराश होतात. प्रिय व्यक्तीशी ताटातूट झाली, तर माणसे कमालीची दुःखी होतात. ही झाली आत्मकेंद्रित दुःखाची उदाहरणे. दुसऱ्याच्या दुःखांमुळे दु:खी होणे हा अनुभव सर्वांनाच येतो असे नाही. पण मुलाच्या दु:खामुळे आईचे मन तडफडते. दुसऱ्यावर होणारा अन्याय काही ध्येयवादी व्यक्तींना असह्य वाटतो आणि तो अन्याय दूर करण्यासाठी ते स्वत:चा प्राणही पणाला लावतात. काही दु:खांचे स्वरूप वेगळे असते. परमेश्वर भेटावा म्हणून उग्र तपश्चर्या करणाऱ्या भक्ताला साक्षात्कार झाला नाही, तर त्याच्या मनाला कमालीचे वैफल्य वाटू लागते.

काही सुखदु:खांचे स्वरूप सामाजिक असते. देश पारतंत्र्यात असताना, सगळ्यांनाच थोडेफार दुःख होते. परंतु काहीजण मातृभूमीचा अपमान सहन न झाल्यामुळे बंड करून उठतात, तर काहीजण ती अवहेलना दुबळेपणाने सोसतात. भारत देशाच्या क्रिकेट टीमचा विजय झाला, की सर्व भारतीय जनता आनंदित होते. अशा आनंदाचेही स्वरूप उदात्त असते. माणूस पहिल्यांदा चंद्रावर उतरला, त्या वेळी जगातील सर्वांना आनंद व अभिमान वाटला. त्या वेळी कोणाच्याही मनात वंश, देश, भाषा, धर्म यांचा विचार आला नाही. सुखी वा दुःखी होणे या मुख्यत: मनाच्या अवस्था असतात. पण सर्वांचे मन सारखे नसते. संवेदनाशील व्यक्ती काही अनुभवांमुळे दु:खी होतात, पण त्याच अनुभवातून जाताना निबर मनाच्या माणसांना विशेष काही वाटत नाही. काही संयमशील व्यक्ती तीव्र दुःख शांतपणे सोसतात आणि अपार यश मिळाले, तरी बेभान होत नाहीत. g.p.pradhan_शेवटी सुखी होणे किंवा दु:खी होणे हे (मुख्यतः) ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असते.

त्या घटनेला आता बराच काळ लोटला आहे. मी माझ्या कुटुंबीयांना बद्रिनारायणाच्या दर्शनाला घेऊन 1959 साली गेलो, तेव्हा मला पहिल्यांदा हिमालयाचे दर्शन घडले. त्या वेळी बद्रिनारायणाच्या देवळापर्यंत जाण्यासाठी, पिपळकुट्टी या ठिकाणापासून अठरा मैल चालत जावे लागत असे. एका बाजूला अलकनंदा नदी, दुसरीकडे हिमालयाच्या पायथ्याशी असलेले डोंगर आणि त्या दोहोंमध्ये रस्ता; अशा वाटेने चालत जाणे हा आगळाच अनुभव होता. वाटेत सराईमध्ये मुक्काम करावा लागे. पहाटे जाग आल्यामुळे, पांडुकेश्वरजवळच्या सराईतून बाहेर आलो, तेव्हा मला समोरचे हिमशिखर सूर्यकिरणांमुळे झळाळून गेलेले दिसले. मी हिमालयाच्या त्या दर्शनाने स्तिमित झालो, त्या नगाधिराजासमोर आदराने नतमस्तक झालो. मला कालिदासाने लिहिलेल्या ‘अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा। हिमालयो नाम नगाधिराजा।’ 
या ओळी आठवल्या आणि कालिदासाने हिमालयाला देवतात्मा का म्हटले, ते उमगले.

मी हिमालयाची वेगवेगळी रूपे पाहिली आहेत. बद्रिनारायणाच्या परिसरातील दिसणारा सौम्य हिमालय, मनालीमध्ये दिसणारा देखणा हिमालय, कौसानीमध्ये पहाटे सूर्यकिरणात तळपणारी हिमशिखरे, नेपाळमध्ये गेलो असताना, गौरीशंकर या अत्युच्च शिखराचे झालेले अस्फुट दर्शन, दार्जिलिंगजवळ कांचनगंगा या शिखराचे अद्भुत दर्शन, हाजीपीर खिंडीतून दिसणारे हिमालयाचे रौद्र स्वरूप… ही त्या नगाधिराजाची विविध रूपे पाहताना मला निसर्गाची भव्यता म्हणजे काय ते समजले आणि माझ्या अहंकाराला सुरूंगच लागला.

अलाहाबादला पाहिलेला गंगा-यमुनेचा संगम, पाटण्याजवळ ऐन पावसाळ्यात पाहिलेले गंगेचे विशाल पात्र, आसाममध्ये गुवाहटीला झालेले ब्रह्मपुत्रेच्या उग्र रूपाचे दर्शन, गंगा-ब्रह्मपुत्रेचा संगम झाल्यानंतर; पुढे, बांगलादेशात गोआलंदा या गावाजवळ मेघना या नव्या नावाने क्षितिजापर्यंत पसरलेल्या गंगा-ब्रह्मपुत्रा या लोकमातांची रूपे पाहून माझ्या मनाला अनिर्वचनीय आनंद लाभला. महाराष्ट्रात आंबोळी घाटात ऐन पावसाळ्यात दिसलेले पावसाचे रौद्र स्वरूप, श्रावणामध्ये श्रीवर्धनला पाहिलेले बालकवींच्या कवितेतील क्षणात येईल सरसर शिरवे, क्षणात पिवळे ऊन पडे’ हे सुंदर दृश्य, कविवर्य बोरकर यांच्या गावात गणपती उत्सवात येणाऱ्या पावसाच्या सरीवर सरी- हे सारे अनुभवल्यावर कादंबरीकार र.वा.दिघे यांनी पावसाला ‘पाणकळा’ का म्हटले ते उमगले.

रात्रीच्या वेळी मोटारीतून नागपूरहून जबलपूरला जाताना, शिवनीजवळच्या किर्र जंगलात, अचानक दिसलेला वाघ पाहून माझे मन आणि शरीरही थरारून गेले होते. त्याच्या उलट, वद्य चतुर्थीच्या पहाटे नवेगाव बांध येथील विशाल जलाशयाभोवती फिरत असताना, पक्ष्यांचे अननुभूत कूजन ऐकून, माझे मन आनंदाने पुलकित झाले. मी मध्य प्रदेशात गुणा या गावाजवळ मोरांचा थवा आणि एका मोराचे पिसारा उभारून चाललेले नृत्य पाहून मुग्ध झालो. भिगवणहून इंदापूरकडे जाताना, भीमा नदीच्या जलाशयाजवळ सैबेरियातून आलेल्या (पाहुण्यांचा) फ्लेमिंगोंचा प्रचंड थवा पाहून माझे मन हरखून गेले. स्वतःला विसरून सुंदर परिसराशी एकरूप झाल्यावरच, निसर्गाच्या आणि मानवी नात्यातील जिव्हाळ्याचा उत्कट अनुभव येतो; माणूस आनंदात चिंब भिजून जातो आणि वृक्षवल्ली व वनचरांचा सोयराच होऊन जातो.

हसणे ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काही माणसे इतरांना हसतात, एखादा माणूस पाय घसरून पडला, की त्यांना हसू येते. उथळ मनाची माणसे तशी हसतात. काही जण मात्र इतरांच्या समवेत हसतात. एखादा वक्ता बहारीचा विनोद करतो, तेव्हा सभागृहातील सर्व श्रोते खळखळून हसतात; ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. काही माणसांना इतरांबद्दल तुच्छता वाटते आणि ते कुत्सितपणे हसतात. जोनाथन स्विफ्ट हा इंगजी लेखक इतरांच्या व्यंगांबद्दल कमालीच्या उपरोधिकपणे लिहून त्यांची मने दुखवत असे. तो स्वत:च्या लेखनातील विनोदाबद्दल म्हणत असे, ‘माझा विनोद म्हणजे चाबकाचा फटकारा असतो. माझ्या उपरोधिक लेखनामुळे लोकांना ते किती क्षुद्र आहेत हे समजते. मी त्यांच्या मर्मावर आघात केल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येते.” स्विफ्टच्या विनोदामागे त्याचा अहंकार असे. मला दुसऱ्यांना दुखावणारा तसा अहंकारमूलक विनोद मुळी आवडत नाही.

काही माणसांच्या जीवनात अपार दु:ख असते, त्या दु:खाचा विसर पडावा म्हणून ते विनोदाने हसतात. चार्ल्स लॅम्ब या लेखकाच्या बहिणीला वेड लागले आणि त्या वेडाच्या भरात तिने तिच्या आईचा खून केला. त्या भीषण दुःखाचे सावट मनावर पडले असतानाही, लॅम्बने विनोदी लेखन केले. तो ते कसे करू शकला असे त्याला त्याच्या एका मित्राने विचारले, तेव्हा चार्ल्स लॅम्ब म्हणाला, ‘मला रडू येऊ नये म्हणून मी विनोद करून हसतो.’ मात्र लॅम्बच्या विनोदी लेखनालाही त्याच्या दु:खाची किनार होतीच. त्याच्या लेखनात हास्य आणि अश्रू मिसळलेले आहेत, म्हणून त्याच्या विनोदाला इंद्रधनुष्यी विनोद (रेनबो ह्यूमर) असे म्हणतात. लो. g.p._pradhanटिळक यांच्यावर 1908 साली राजद्रोहाचा खटला न्यायालयात चालू होता. त्या खटल्यात साक्षी-पुरावे, दोन्ही बाजूंची भाषणे झाल्यानंतर, न्यायाधीश असलेल्या दावर यांनी जो समारोप केला, त्यावरून टिळकांना दीर्घ मुदतीची शिक्षा होणार हे उघड झाले. त्यानंतर, न्यायदान मंडळातील पंच- ज्यूरी- निर्णय घेण्यासाठी चेंबरमध्ये गेले आणि कामकाज काही वेळेसाठी स्थगित झाले. दावर यांच्या समारोपाच्या कठोर भाषणामुळे कोर्टात आलेले दादासाहेब खापर्डे, तात्यासाहेब केळकर आदी टिळक यांचे मित्र अतिशय चिंतातूर झाले. त्याच वेळी आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन, लो.टिळक खापर्डे यांना म्हणाले, “दादासाहेब, आज ‘काळ्या पाण्याचा बेत दिसतोय. चला आपण चहा घेऊ या. कदाचित, आपण एकत्र घेतलेला हा शेवटचाच चहा असेल” असे म्हणून लोकमान्य टिळक मनमोकळेपणे हसले. त्यांचे हसणे ऐकून केळकर, खापर्डे, खालिडकर आदी मंडळी स्तिमित झाली. मी लो. टिळक यांच्या त्या हसण्यासंबंधी त्यांच्या चरित्रात लिहिले आहे, ‘इतरांच्या डोळ्याला पाणी येऊ नये म्हणून लोकमान्य हसले.’ ते हसणे केवळ अद्वितीय होते.

काही लेखकांचा विनोद ‘सूचक’ असतो. असा विनोद वाचताना, वाचक स्मितहास्य करतो. त्या उलट, आचार्य अत्रे यांनी केलेले बेछूट विनोद ऐकून, श्रोत्यांची हसताना मुरकुंडी वळत असे.

थोड्या व्यक्तीच स्वतःच्या व्यंगावर, अगर स्वत:च्या फजितीवर विनोद करू शकतात, मनमोकळेपणाने हसू शकतात; त्याला फार मोठे मन लागते. इतरांना हसणारे अहंकारी वृत्तीचे अनेकजण असतात. इतरांबरोबर हसून सर्वांच्या आनंदात सहभागी होणारे, खेळकर स्वभावाचेही बरेच जण असतात. काही वेळा स्वत:शीच हसणाऱ्या काही प्रगल्भ व्यक्तीही असतात. मात्र स्वत:बद्दल विनोद करून, इतरांना हसवणारे अगदी थोडे जण असतात.

हसणे हा जीवनातील आनंदाचा आविष्कार आहे. एकमेकांना भेटून आनंद झाला म्हणजे त्या दोन व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद स्मितहास्याने व्यक्त होतो. लहान मुलांचे निरागस हास्य सर्वांना आनंद देते. हास्य हा मानवी भावजीवनाचा अलंकार आहे.

मला 1942 साली स्वातंत्र्यलढ्यात भाग घेता आला आणि साने गुरुजी यांच्या समवेत येरवड्याला कारावासात राहता आले हे मी माझे परमभाग्य मानतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना तयार केली, ती घटना समितीने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय जनतेला अर्पण केली. त्या राज्यघटनेनुसार भारतातील एकवीस वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि भारतात लोकशाहीची प्रस्थापना करण्यात आली. त्या वेळी आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले होते, “आपल्या राज्यघटनेने लोकशाही राज्यपद्धतीची प्रस्थापना केली असली, तरी त्या लोकशाहीस जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान नाही, तोपर्यंत ही लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही.” आपणाला हे मान्य केले पाहिजे, की भारताच्या स्वातंत्र्याचा आज हीरक महोत्सव साजरा करत असतानाही, सामाजिक आणि आर्थिक समतेची प्रस्थापना करण्याची बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलेलो नाही. आज एकीकडे तथाकथित उच्चवर्णीयांचे सर्व क्षेत्रांत वर्चस्व आहे आणि त्याच वेळी भारतातील कोट्यवधी दलित, आदिवासी, भटक्या आणि विमुक्त जमाती प्राथमिक शिक्षणापासून वंचित असून, उपेक्षितांचे जिणे जगत आहेत. एकीकडे भारतातील उद्योगपती, काही राजकीय नेते आणि बहुराष्ट्रीय कंपन्याशी हातमिळवणी करणा_pradhan_peechरे भांडवलदार यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे; आणि दुसरीकडे कोट्यवधी लोक दारिद्यरेषेखालचे दीनवाणे जीवन जगत आहेत. ती सामाजिक आणि आर्थिक विषमता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे भारताबद्दलचे स्वप्न साकार होणार नाही.

जगातील अमेरिकेसारखी धनाढ्य राष्ट्रे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या हातांत जगातील अर्थसत्तेची सर्व सूत्रे गेली असून, भारतासारख्या विकसनशील देशांचे ते जबरदस्त आर्थिक शोषण करत आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या मगरमिठीमुळे, भारताचे आर्थिक स्वातंत्र्य नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज जगात आणि भारतातही राजसत्तेवर अर्थसत्तेने मात केली असून, भारतात समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होणे अनेकांना अशक्यप्राय वाटू लागले आहे.

असे असले तरी भारतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे काम करणारे अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांचे गट आणि समतेशी बांधिलकी मानणाऱ्या संस्था, संघटना विषमतेविरुद्ध तीव्र संघर्ष करत आहेत आणि ग्रामीण भागात भरीव विधायक कार्यही करत आहेत.

विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही भारताला लांच्छनास्पद घटना आहे. शेतकरी उत्पादन करत असलेल्या धान्याला, भाजीपाल्याला, फळ-फळावळीला किफायतशीर भाव मिळाल्याशिवाय ती परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना आणि अन्य पुरोगामी विचारांचे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि ध्येयवादी कार्यकर्त्यांचे गट यांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतातील राजकीय व सामाजिक जीवनाला ग्रासलेल्या भ्रष्टाचाराचेही निर्मूलन होणे आवश्यक आहे. महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीमध्ये काळानुरूप बदल करून; ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर; तसेच, देशभरातील असंघटित कामगार यांना स्वाभिमानाचे व स्वाश्रयी जीवन जगता यावे यासाठी प्रत्येक नागरिकाने नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. 

-(कै) ग. प्र. प्रधान 
(साप्ताहिक ‘साधना’वरून उदृत संपादित-संस्कारित)

छायाचित्र साभार – आकाशवाणी निर्मिती पुणे

About Post Author