माझं गाव माझं विद्यापीठ

संतोष गावडे हा एकोणतीस वर्षांचा तरूण. आईवडिलांनी थोडीफार शेती आणि बाकी मजुरी करून संतोष आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण केले. संतोषने पुण्यात बी.ए.ला असताना गावातील प्रश्नांबाबत काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्याने पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट २०१० मध्ये तो गावी परतला. त्याच्या गावी परतण्याने त्याचे कुटुंबीय नाराज झाले. मात्र त्याच्या कामाचे वर्तुळ वाढीस लागल्याबरोबर घरच्यानाही त्याच्या कामाचे महत्‍त्‍व पटू लागले. संतोषने ‘निर्माण’मधील त्‍याच्‍या सहकारी मुलीशी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह केला. हे जोडपे ग्रामविकासासाठी कार्य करते. जर गावाचा विकास व्हायचा असेल, तर गावक-यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे संतोष सांगतो. सध्या गावक-यांसाठी रोजगारनिर्मितीच्या  संधी उपलब्धत करून देण्यासाठी संतोष प्रयत्नशील आहे.

संतोष गवळेमी पुणे विद्यापीठात आलो ते, उच्च शिक्षण घेऊन पुण्यातच चांगल्या पगाराची नोकरी करावी म्हणून. मात्र माझ्याबाबत घडलं ते वेगळंच. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतल खरं, पण…

शेवटी, नोकरी न करता मी माझ्या गावी परत जाण्याचा आणि ग्रामविकासा ची कामं करण्याचा निर्णय घेतला. मला अनेक प्रश्न पडले होते. गावात जाऊन कामं कोणती करायची? शिक्षण घेऊन नोकरी न करता गावात परतलो तर लोक काय म्हणतील? ज्या आई-बाबांनी रोजमजुरी करून शिक्षणाला पैसे पुरवले त्यांनी बघितलेल्या स्वप्नांचं, त्यांच्या अपेक्षांचं काय? एक ना अनेक….

पण माझ्या स्वत:च्या प्रश्नांपेक्षा मी ज्या गावात जन्मलो, लहानाचा मोठा झालो त्या गावाच्या समस्यांचं काय? असं मला वाटत होतं. गावात समस्या अनेक होत्या. त्यांचा अनेकांच्या आयुष्याशी थेट संबंध होता. ज्या समस्यांनी गावकर्‍यांचं जगणं असह्य व्हावं अशा समस्यांत गाव अडकलं होतं. त्या समस्या दूर कोण करणार? त्यासाठी आपण स्वत:ला गाडून घेतलं तर काय होईल? आणि तिथं उपयोगी ठरला ‘निर्माण ’चा मूलमंत्र- ‘कर के देखो’! दुसरी बाब म्हणजे आपण शिक्षण घेतो ते कशासाठी? आपलं भलं व्हावं, आई-वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं, आपल्या कुटुंबाला सुखसमृध्दीचं जिणं जगता यावं वगैरे वगैरे. पण मी माझ्या कक्षा अजून थोड्या रुंदावल्या…. माझ्या कुटुंबाप्रमाणे गावाला, समाजाला माझ्यासारख्या शिकलेल्यांची गरज आहे, असा विचार त्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा ठरला. परतीच्या त्या प्रवासात अभय बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ या शिक्षणप्रणालीचा व ‘युनिक फिचर्स ’चा मोठा वाटा आहे. मी त्यांच्या बरोबर फेलो म्हणून पाणीप्रश्ना चा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो. अनेक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांना भेटी दिल्या, आदर्श गावे बघितली. त्यामुळे नेमके प्रश्न कोणते व ते कसे सोडवता येतील यांविषयीची समज येण्यास मदत झाली.

आपल्या रोजच्या जगण्यात आजुबाजूच्या समस्या आपल्या अंगवळणी पडत जातात. पण आम्ही ‘निर्माण’प्रक्रियेत आजुबाजूला डोकावून पाहायला शिकतो. त्यामुळे समस्या जाणवू लागतात. त्या सोडवण्यासाठी आपण धडपडू लागतो आणि तेच माझ्याबाबत घडलं आणि मी पुण्यासारख्या शहरातील नोकरीच्या संधी सोडून माझ्या गावचा रस्ता धरला!

महिला ग्रामस्वच्छता करताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याहून पंचवीस किलोमीटर अंतरावर माझं गाव, मन्‍याळी. गाव दीड हजार लोकवस्तीचं. निसर्गानं भरभरून दिलेल्या जंगलालगत वसलेल्या माझ्या गावाला जाण्यासाठी नीट रस्ता नाही. पिण्याच्या तसंच शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई. बेरोजगारी, व्यसनाधीनता, अनारोग्य अशा समस्यांची साखळीच! शिवाय प्रशासनाचं दुर्लक्ष. गावात जाऊन काय करावं? कोणत्या प्रश्नाला हात घालावा? गावातलं राजकारण, गटबाजी अशा विविध अंगांनी गावाचा अभ्यास सुरुवातीच्या दोन महिन्यांत केला. गाव समजून घेतलं. कोणतं काम हाती घेतल्यानं सर्वांचं सहकार्य मिळेल असा विचार केला आणि शासनानं सुरू केलेली घरपोच धान्य योजना गावात सुरू करण्याचा विचार गावकर्‍यांसमोर मांडला. त्यातून गावात घरपोच धान्य योजना सुरू झाली. तीन महिन्यांच्या धान्याचं वाटप एकदाच पैसे भरून, पूर्ण धान्य चावडीवर आणून, सर्वांसमोर करायचं अशी ही योजना. त्यामुळे काळ्या बाजारात जाणार्‍या धान्याला आळा बसला. कधी नव्हे एवढं धान्य गावात आलं आणि आमदार व तहसीलदार यांच्या हस्ते धान्याचं वाटप गावकर्‍यांना केलं गेलं. करताना अडचणी बर्‍याच आल्या पण महिला बचत गटांनी पैसे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे ते शक्य झालं. त्या निमित्तानं सर्व गट एकत्र आले आणि महिलांची ताकद माझ्या पाठीशी उभी राहिली. महिलांच्या आठवड्यातून दोन मीटिंग, तरुणांसाठी व्हॉलिबॉलचं ग्राऊंड, वाचनालय, विविध कार्यक्रमांचं आयोजन अशा अनेक कृतींतून गाव जोडायला सुरुवात केली. गाव एकत्र येत होतं तसं चार-दोन लोकांचा विरोधही तेवढ्याच जोमानं वाढत होता. कोणतंही काम हाती घेतलं तर विरोधक मंडळी त्यात आडपाय मारण्याचा प्रयत्न करत. पण आम्ही काम थांबवलं नाही. कारण मी एकटा नव्हतो. गाव माझ्या सोबत होतं.

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्यापासून प्रयत्न व्हावेत म्हणून आम्ही गावकर्‍यांनी धान्याबरोबर रॉकेलचा काळा बाजार गावपातळीवर थांबवण्याचा प्रयत्न केला. गावात रॉकेलचं वाटप सुरळीत होत नव्हतं. तरी कुठलीही तक्रार न करता आम्ही रॉकेल विक्रेत्याला चार वेळा विनंती केली, की शासकीय नियमाप्रमाणे रॉकेल देण्यात यावं. ते त्यांनी मान्य केलं नाही. त्यामुळे तहसिलदारास विनंती करून दुसर्‍या किरकोळ विक्रेत्याद्वारे गावात रॉकेलचं वाटप केलं. त्यावेळी तहसीलदार राजेंद्र जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्या सगळ्या प्रक्रियेत गावाला रॉकेल दोन महिने मिळालं नाही; तरीसुद्धा गावकरी या मतावर ठाम होते, की आम्हाला शासकीय दरात व शासकीय नियमानं रॉकेल मिळायला हवं. म्हणजे गावकर्‍यांनी आमच्या गावापुरता भ्रष्टाचार मोडून काढला. त्या दिवसापासून गावकर्‍यांनी भ्रष्टाचारमुक्त गाव असा जणू संकल्पच सोडला. लोकांना रॉकेल, धान्य मिळू लागलं तसं गावात सकारात्मक वारं वाहू लागलं. शिवाय, गावातल्या मीटिंगा, व्याख्यानं, चर्चा यांद्वारे लोकांना ग्रामविकासाची चाहूल लागली.

गावातील महिला आणि पुरूष विहिरीवर श्रमदान करताना लोकांना पाण्याची टंचाई जाणवू लागली. गावातले हातपंप कोरडे पडले होते. लोकांना शेतातल्या विहिरीचं पाणी आणावं लागत होतं. विशेषकरून, महिलांना पाण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागत असे. दिवसभर शेतात राबायचं, सायंकाळी पाण्यासाठी भटकंती करायची. हा प्रश्न सोडवणं ही लोकांची गरज होती. ‘निर्माण’मध्ये शिकलो होतो की ‘आपल्या डोक्यातला किंवा आपल्याला वाटतो म्हणून त्या प्रश्नावर काम करायचं नाही. लोकांची गरज असेल तो प्रश्न हाती घ्यायचा’. पाणीप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं गावात सर्वांची मीटिंग बोलावली. लोकांना पाणीप्रश्नावर काय करता येऊ शकतं असं विचारलं. लोकांच्या मते, गावात विहीर खोदली तर पाणीटंचाई दूर होऊ शकते.

‘मग काय विहीर खोदण्यास सुरुवात करू’ असं जमलेल्या सर्व गावकर्‍यांना मी म्हणालो.

काही म्हणाले हे शासनाचं काम आहे. तर काहीजण हसू लागले. काहींच्या मते, हे कसं शक्य आहे?

मी म्हणालो, ‘सर्व गावानं मनावर घेतलं, कष्ट करण्याची तयारी दाखवली तर हे सहज शक्य होईल. गावातल्या प्रत्येक महिलेनं व पुरुषानं दोन दिवस विहिरीवर श्रमदान करायचं.’

महिला काम करायला तयार झाल्या! काम सुरू झालं. हळुहळू पुरुषही विहिरीवर कामाला येऊ लागले. जसजशी विहीर खोल खोदली जाऊ लागली, तसं लोकही उत्साहानं काम करू लागले. दिवसभर महिला तर रात्री तरुण मुलं काम करत. दीड महिन्यांत विहीर खोदून झाली. विहिरीला मुबलक पाणी लागलं. गावकरी खूष झाले. विहिरीसाठी प्रत्येकजण झटला होता. विहीर प्रत्येकाला आपली वाटत होती. दीड महिन्यात ‘चला श्रमदान करायला’ असा शब्दच प्रचलित झाला.

श्रमदानातून खोदण्यात आलेल्या विहिरीच्‍या लोकार्पण सोहळ्यास डॉ. अभय बंग हजार होते. सोबत आमदार विजयराव खडसे, सरपंच अर्चना काळबांडे आणि संतोष गवळेमाझ्यासाठी आनंदाची बाब म्हणजे विहिरीबरोबर ‘श्रमदान’ ही संकल्पना गावात रुजली. गावकर्‍यांनी दोन लाख रुपयांचं श्रमदान केलं तर ‘निर्माण’च्या मुलांनी विहीर बांधायला दोन लाख रुपयांची मदत केली. विहिरीचा लोकार्पण सोहळा अभय बंग व आमदार विजयराव खडसे यांच्या हस्ते पार पडला. अशा तर्‍हेनं गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. श्रमदान ही संकल्पना गावकर्‍यांच्या मनात रुजली.

दुसरं उदाहरण म्हणजे तरुण मंडळी रात्री गावातल्या विहिरीचं खोदकाम करत. खोदकाम चालू असताना जंगलात आग लागल्याचं तरुणांच्या लक्षात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी, सामदेकर यांना माहिती देताच तेही रात्री अकरा वाजता आमच्या गावात हजर झाले. रात्रीच वीस-पंचवीस जणांचं टोळकं जंगलातील आग विझवण्यासाठी निघालं. रात्रभर जंगल विझवण्याचे प्रयत्न केले, तेव्हा सकाळी-सकाळी आग आटोक्यात आली. आगीनं जंगलाचं होणारं लाखो रुपयांचं नुकसान तरुणांच्या सहकार्यानं टाळता आलं! सामदेकर म्हणाले, ‘लोक स्वत:हून जंगल विझवण्यासाठी तयार झाले ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. लोकांना जंगल आपलं आहे आणि ते वाचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे ही जाणीव गावकर्‍यांत निर्माण झाली. अशी उदाहरणं फार कमी पाहायला मिळतात.”

विहीर पूर्ण झाल्यामुळे लोकांच्या विकासकामाबाबतच्या अपेक्षा वाढू लागल्या. पण आता एक अट घातली. ती म्हणजे प्रत्येकानं ग्रामपंचायतीचा कर भरावा. म्हणजे अजून विकासकामं करता येतील! आणि लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं की पाच दिवसांत साठ टक्के वसुली झाली. ही सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती, कारण गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी कर भरला नव्हता. लोकांचा विश्वास संपादन केला की लोक सहकार्य करतात, कारण प्रत्येकाला विकास हवा असतो.

मन्याळी गावाची पाहणी करताना डॉ. अभय बंग, विजयराव खडसे व संतोष गवळेखेडेगावात शौचालयांबाबत अनास्था असते, तशी माझ्याही गावात होती. मी माझी मदत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आधी शौचालय बांधा. तरच मी मदत करीन अशी अट सहज बोलण्यातून लोकांच्या कानावर टाकत असे. पण उघड्यावर बसण्याची सवय व शौचालय बांधकामासाठी पैसे कुठून आणणार असा लोकांचा प्रश्न होता. शौचालय ही जेव्हा स्वत:च्या व गावाच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे असं लोकांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली तेव्हापासून लोकांनी तेही काम हाती घेतलं व गावात शौचालयांचं बांधकाम सुरू झालं. शौचालय बांधकामासाठी लागणारं विटा, सिमेंट, गिट्टी आदी सर्व साहित्य एकदाच खरेदी केलं आणि सगळ्यांनी ते वाटून घेतलं. त्या निमित्तानं सर्व गावकरी एक झाले. शिवाय, लोकांचा प्रत्येकी खर्चही कमी झाला.

हातभट्टीची दारू हा धंदा मोठ्या प्रमाणात गावात चालू होता. गावात दारू पिणार्‍यांची संख्या बरीच होती. बाजूच्या गावचे लोकसुद्धा दारू पिण्यासाठी गावात येत. जेव्हा-जेव्हा महिलांच्या मीटिंग होत तेव्हा काही महिला दारूचा मुद्दा पोटतिडकीनं मांडत. घरात खायला काहीच नाही या चिंतेनं दिवसभर रानात राब-राब राबायचं आणि रात्री दारूड्या नवर्‍याचा मार खायचा, हे चित्र त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होई. पण दारुबंदीचा मुद्दा तेव्हा हातात घेणं उचित नव्हतं. कारण पुरुष मंडळी विरोधात गेली असती आणि माझी शक्ती विरोध दडपण्यातच पणाला लागली असती. म्हणून तो मुद्दा उशिरा हाती घेतला. त्यात ठाणेदार ज्ञानेश्वर देवकते यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गावात व तांड्यात महिला व पुरूष दारुबंदी समिती तयार केली गेली. समिती गावातल्या दारुड्यांवर व हातभट्टी पाडणार्‍यांवर लक्ष ठेवे. गावात दारू पाडली जात आहे असं कळताच समितीतील सदस्य पोलिसांना कळवत. पोलिस गावात येऊन, शहानिशा करून संबंधित दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करत. समितीतील सदस्यांचा दारुविक्रेत्यावर एवढा वचक निर्माण झाला की गावातील दारू बंद झाली! तांड्यामध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात दारू पिऊन साजरा करण्याची रुढी आहे. काही लोकांना असं वाटलं, की सणाच्या दिवशी हातभट्टीची दारू पाडण्यास व पिण्यास परवानगी देण्यात येईल! पण ठाणेदारानं कल्पना मांडली, की ‘त्या दिवशी दारूऐवजी दुधाचं वाटप केलं तर!’ …. आम्ही ती प्रत्यक्षात आणली व ठाणेदाराच्या हस्ते दुधाचं वाटप केलं. त्यामुळे ‘होळीच्या दिवशी दारू नाही तर कधीच नाही’ असा संदेश गावकर्‍यांत पोचला.

त्याच दरम्यान, एका उद्योगपतीच्या मदतीनं गावात रोपवाटिका तयार केली. त्यामध्ये आम्ही चिंच, रेनट्री, आवळा, गिरीपुष्प, गुलमोहर, हादगा, बांबू, कडुलिंब, जांभूळ आदी प्रकारची पंचवीस हजार रोपं तयार केली. रोपं तालुक्यात मोफत वाटायला सुरुवात केली. लोकांनी त्यासाठीसुद्धा श्रमदान केलं.

धान्य-रॉकेलचा थांबवलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचारमुक्त गाव हा संकल्प, श्रमदानातून गावकर्‍यांनी खोदलेली विहीर, श्रमदानातून तयार केलेले रस्ते, अभय बंग यांची गावाला भेट, ग्रामपंचायतीची करवसुली, रोपवाटिका, शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम यामुळे मन्याळी गाव नावारूपाला आलं. गावास अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी श्रावण हर्डिकर यांनी भेट देऊन गावकर्‍यांचं कौतुक केलं.

मी गावाकडे परत जाण्याचा विचार केला होता तेव्हा गावात काय काय करता येऊ शकेल याचं प्लॅनिंग मनात होतं, त्यापेक्षा जास्त काम मी गावकर्‍यांच्या मदतीनं करू शकलो. गावासाठी काम करताना माझं शिक्षण होत गेलं. मी स्वत: बदलत चाललो आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टिकोन यांसारखी जगण्याची अनेक मूल्यं मी शालेय व विद्यापीठीय शिक्षणात फक्त शिकत आलो होतो. ही मूल्यं माझ्यात रुजवण्याचं काम माझं गाव करत आहे. आणि म्हणूनच मी माझ्या गावाला ‘माझं विद्यापीठ’ मानतो.

संतोष रामदास गवळे
मन्‍याळी, बित्‍तरगाव, तालुका उमरखेड, जिल्‍हा यवतमाळ, पिन – ४४५२०७
९७६७२१९०७३
sgawale05@gmail.com

(लेखातील काही भाग ‘लोकमत’च्‍या ‘ऑक्‍सीजन’ पुरवणीत प्रकाशित झाला होता.)

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.