माघी गणेशाच्या नावाने…

4
74

     माघी गणेश चतुर्थीची संध्याकाळ अस्वस्थ करून गेली. माझ्या घराजवळ चेंबूर नाक्यावर अग्निशामक दलाचे केंद्र आहे. त्याच्या मोठ्या आवारात गणपतीचे एक छोटे देऊळ आहे. ते गेल्या दोन-तीन दशकांत झकास भरभराटले आहे. त्या बरोबर देवळात सुधारणाही छान घडवून आणल्या गेल्या आहेत. सर्वत्र संगमरवर आहे; त्यामुळे ते स्वच्छ, पांढरेधोप असते. कोणाही माणसाला तेथील बाकांवर पाच मिनिटे विसावावेसे वाटते. मुंबईचा बकालपणा तेवढाच नजरेआड होतो.

     गणेश चतुर्थीनिमित्त देवळात सर्वत्र दिव्यांचा झगमगाट होता – स्वागताच्या कमानी लागल्या होत्या. एरवी, आगीच्या बंबाचे ठिकाण, म्हणून देवळात जायला छोटे गेट ठेवलेले असते, ते चतुर्थीला सताड उघडे होते. मला मोठ्या देवस्थानात प्रवेश करावा तसे अग्निशामक दलाच्या केंद्रात शिरताना वाटले. आतमध्ये, दूर आतमध्ये आगीचे तीन-चार बंब उभे होते. पुढील प्रांगणात देवदर्शनासाठी लांबलचक रांग, रांगेत उभ्या भक्तांची व्यवस्था लावण्यासाठी केंद्राच्या जवानांची आणि अधिका-यांची लगबग…  तेथेच नोटिसबोर्डावर गणपतीच्या महाप्रसादासाठी अधिका-यांसच्या नावाने आमंत्रण!

     आगीच्या बंबांचे ठिकाण म्हणजे ते सरकारी कार्यालय – तेथे सरकारी कर्मचारी. ते सर्व भारतीय प्रजासत्ताकाच्या घटनेच्या प्रतिज्ञेने बांधलेले म्हणून सेक्युलर! निधार्मिक, धर्मनिरपेक्ष की सर्वधर्मसमभावाचे पाईक. परंतु सर्व कर्मचारी अहमहमिकेने श्रीगणेशाची आणि भाविकभक्तांची सेवा करण्यात गुंतले होते!

     मला ही गोष्ट सहा-सात वर्षांपूर्वी, प्रथम जाचली तेव्हा मी माझ्यासारख्याच, मला विचारी-चिंतनशील वाटणा-याष व्यक्तींशी बोललो, परंतु त्यांना तो प्रश्न तेवढा गंभीर जाणवला नव्हता. गणपतीची गर्दी, विशेषत: दर मंगळवारी व संकष्टीला वाढत गेली. त्यात बंबखान्याभोवती फुले-नारळ विकणा-यांच्या टप-या, चहाच्या गाड्या तयार झाल्या. त्यामधून समोरच्या मुंबई -पुणे रस्त्यावर त्या त्या दिवशी वाहतुकीचा प्रश्न वाढे. पादचा-यांसाठी तर आधीच चिंचोळी असलेली  वाट आणखी आक्रसली.

     अग्निशामक गणपतीचा लौकिक व आर्थिक भरभराट वाढत आहे असे म्हटल्यावर तेथे शंभर-सव्वाशे मीटर अंतरावर झाडाखाली आणखी एक गणपती प्रकट झाला व त्याच्यासाठी गणेश चतुर्थीला मंडप उभा राहिला. त्या झाडाखाली गणपतीचे स्थान असेलही, पण ते कधी लक्षात आले नव्हते. मी त्या परिसरात वीस-बावीस वर्षे राहतोय, नाक्याच्या या बाजूला गणपती, पलीकडल्या बाजूला मारुती आणि गणपतीच्या अलीकडे अंबादेवी. गणपती आणि मारुती, दोन्ही ठिकाणी गर्दीची स्पर्धा जाणवे, परंतु त्या प्रत्येक देवतेचे भाविकभक्त वेगवेगळे आहेत. त्यामध्ये हा  पिंपळेश्वराचा नवा गणपती ‘प्रकटला’ आहे. एका छोट्या त्रिज्येच्या वर्तुळात चार देवळे. दरम्यान, पंचमीला कुंभारवाडा शिव जयंती मंडळाने आणखी एका गणपतीची तेथेच, सरस्वतीबागेत प्रतिष्ठापना केलेली दिसली. तो पाचवा देव. पण देव-देवस्थाने यांची चलती हा वेगळाच सामाजिक प्रश्न आहे. ‘युनिक फीचर्स’च्या ‘देवाच्या नावानं…’ या, चार महिन्यांपूर्वी  प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्याचा तलास लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘देऊळ’ या मराठी चित्रपटाने मंदिराचे अर्थकारण उपहासाने उघड केले, परंतु सुलक्षणा महाजन सारख्या पंडितांनी त्या सिनेमानंतर देऊळ हे विकासाचे मॉडेल होऊ शकते अशी मांडणी केली. अर्थात त्यांना नियोजन अभिप्रेत असते. ते अशा ठिकाणी अजिबात नसते. शिवाय, विकास कोणाचा हा प्रश्न तेथेही असतो.

     इतर तीन (आता चार) देवळांबद्दल अस्वस्थ असायचो ते सामाजिक कारणांनी, परंतु अग्निशामक दलाच्या केंद्रातील गणेशमंदिराने वैचारिक गाभ्यालाच हात घातला होता. त्यानंतर पुण्याच्या कोथरुडातील यशवंत नाट्यमंदिरानजीकचे मोठे महापालिका उद्यान आठवले. तेथे सकाळ-संध्याकाळ फिरायला-विसावायला नागरिक येतात. मी एका सकाळी तेथे गेलो, तर हास्यक्लब जोरात चाललेला होता. तेथेच उद्यानाच्या आवारात एक छोटे देऊळ. उद्यानात येणारा प्रत्येक माणूस येता -जाताना देवाला नमस्कार करणारच! त्याची देखभाल महापालिकेचे कर्मचारी करत होते.

     त्याहून कळसाची बेचैनी आली ती रोहा (रायगड जिल्हा) येथील तहसीलदारांच्या कचेरीत. कचेरी एका टेकडीवर वसली आहे. कचेरी बरीच जुनी आहे. बैठ्या इमारती चहुबाजूंनी आहेत आणि मध्यवर्ती आहे ते गणेशाचे रीतसर देऊळ. गावागावांत सध्या जमीन खरेदीविक्रीचे मोठमोठे व्यवहार होत असतात. त्यांना सरकारी नोंद करावी लागते. रोह्यात ती तहसीलदार करतो, या गणेशाच्या साक्षीने. सरकारी कार्यालयात गणेशमंदिर! यापेक्षा सेक्युलर प्रजासत्ताकात मोठा खोटेपणा तो काय असावा?

     घटनेशी प्रतारणा करून सुरू झालेला हा भोंदुपणा भारतामध्ये सारे व सार्वजनिक व्यक्िलय गत  व सार्वजनिक जीवन व्यापून उरला आहे. त्यामुळे भारतीय नागरिक कोणतीही गोष्ट खपवून घेऊ शकतो. सत्यप्रियता, सचोटी, निष्ठा, प्रामाणिकपणा अशी जुनी मूल्ये अथवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, कार्यक्षमता अशी नवी मूल्ये…  भारतीय नागरिकाला फसवी वाटतात, कारण त्याच्या भूमीतील तत्त्वज्ञानामधून त्याच्या अंगांगी खोटेपणा भिनला आहे. तो स्वत:लाच फसवत असतो तर तो शेजा-या्चा किंवा त्याहून मोठ्या समुदायाचा (परार्थ, परमार्थ अथवा आधुनिक भाषेत नागरी) विचार कसा करू शकणार? स्वत:शी प्रामाणिक असणे हे आधुनिक जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य मानले जाते. त्यातून परस्पर विश्वास तयार होतो. तो कोणत्याही व्यवहाराचा पहिला आधार असतो. त्याची प्रचिती पाश्चात्य जगात ठायी ठायी .येते, भारतात  त्याच ठिकाणी फसवणूक!  स्वत:ला जसे वाटते, स्वत: जसा विचार करतो तसे वर्तन अभिप्रेतच नाही!

     ‘खुपते तेथे गुप्ते’ मध्ये निखिल रत्नपारखीचा रस्त्यात थुंकण्याविरुद्धचा सात्त्विक संताप उसळून आला. त्याचे कौतुक वाटले. मग मनात आले, की रस्त्यात, बसमधून, वाहनातून थुंकू नये असे वाटणारी माणसे ठिकठिकाणी दिसतात, तशी पत्रे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होतात. अनेक माणसे प्रत्यक्ष निषेधदेखील करतात, परंतु समाजात परिणाम शून्य. असे का? पुलंनी तर ‘थुंकणे हा भारतीय माणसाचा चाळा आहे’ असे म्हणून त्यास एका अर्थी समर्थनच दिले आहे!

     विंदा करंदीकरांनी सेनापती बापटांची गोष्ट सांगून ठेवली आहे. करंदीकर साता-या’ला लेक्चरर  होते. बापट वक्तें म्हणून गावात आले होते. करंदीकरांवर त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी होती. बापट वस्तीला उतरले होते त्या घरी करंदीकर सकाळी पोचले तर बापट रस्ता झाडत होते. करंदीकर म्हणाले, “अहो, राहू द्या! तुम्ही कशाला? म्युनि‍सिपालिटीवाले झाडतील.” बापट म्हणाले, “मी कोठे दुस-यांचे अंगण झाडत आहे? माझ्या देशाचा एक कोपरा साफ करत आहे!”

     देशाची घटना बनली ती त्या ‘राष्ट्रीय’ वातावरणात. त्या आधी देशात धर्माचा प्रभाव होता. राजे, संस्थानिक अथवा ब्रिटिश सरकार…  व्यवस्थापनापुरते (कारभारापुरते)जबाबदार होते, बाकी असे त्यांचा त्यांचा स्वार्थ. स्वतंत्र भारताच्या कारभारात धर्मप्रभाव ठेवला नाही. बापटांच्या काळातले ते ‘राष्ट्र’ लोपले व वातावरण ‘ग्लोबल’ झाले. बापटांचीच मुले-नातवंडे अमेरिका-कॅनडात सुखाने राहत आहेत. मात्र लोकशाही प्रजासत्ताकात घटनेची सूत्रे राबवणारी कारभारयंत्रणा निर्माण होऊ शकली नाही. नुसते जनहितकर कायदे व नियम बनत गेले. पाश्चिमात्यांचा भांडवलवाद, पूर्व युरोपातील मार्क्सवाद असे मिश्रण इतिहासक्रमात तयार झाले. त्यामध्ये बरीच रस्सीखेच देखील असते. त्यातच तंत्रज्ञान नावाची आणखी एक रंगरूपगंधमूल्यविहीन प्रबळ प्रेरणा अंगावर आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात, व्यक्ती व संस्था यांच्या विचार-वर्तनात विसंगती क्षणोक्षणी जाणवते व राज्यकारभारात अराजक!  धर्म ही व्यक्तिगत बाब म्हणायचे आणि ती सार्वजनिक जीवनात बिनदिक्कत आणायची अशी विसंगती तयार होते. त्यामधून समाजच स्वत:ला सावरू शकेल. पण त्याकरता प्रश्नाच्या मुळाला भिडावे लागेल. ते मूळ आहे जीवनशैलीत, जीवनरीतीत. भारत परंपरा सोडू शकत नाही व आधुनिक जीवन स्वीकारू शकत नाही. किपलिंगचे इस्ट आणि वेस्ट कधी मिळू शकतील का? ते सांगता येत नाही. तोपर्यंत गणेशाच्या वा तशा अन्य परंपरांच्या नावाने त्रासच होणार आहे.

दिनकर गांगल
मोबाइल – ९८६७११८५१७
इमेल – thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleमल्टिनॅशनल वॉर
Next articleदेवाच्या नावानं…
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS

 1. I agree 100 %. Gods ( we have
  I agree 100 %. Gods ( we have millions) and goddesses being exploited by cunning people. Temples and surroundings are mostly dirty ( forget the dictum :cleanliness is next to godliness). Everybody wants statues of gods, godmen, new temples ( though we have more than enough of them)the bigger the better. Revenues of temples increasing day by day, so politicians and crooks take over.
  kahi upay nahi. Pahave ani swasth basave.
  Kashinath bhave

 2. आपल्या संपादकीयातले “त्यातच
  आपल्या संपादकीयातले “त्यातच तंत्रज्ञान नावाची आणखी एक रंगरूपगंधमूल्यविहीन प्रबळ प्रेरणा अंगावर आली आहे”
  हे वाक्य मला आवडले. शिक्षणात utilitarian हे अंग आणि सांस्कृतिक हे अंग अशी दोन्ही अंगे असतात. मॅकॉले च्या वेळी (1835) utilitarian आणि oriental अशा दोन्ही पद्धतींचा विचार झाला होता. मुंबईचे गव्हर्नर एलफिन्स्टन, दुसर्या बाजीरावाचे स्थान खालसा करणारा मेजर माल्कॉम, आणखी एक ब्रिटिश आधिकारी मनरो आणि त्याअगोदारचे विलियम जोन्स, Hastings, इत्यादी लोकांना पौर्वात्य संस्कृतीचे भलतेच आकर्षण निर्माण झाले होते. पण मॅकॉलेचा utilitarian फड जिंकला आणि सरकारी भाषा फार्सी गेली आणि इंग्रजी आली. हे बरोबरच झाले कारण आगगाडी, तारायन्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री इत्यादी समजण्यासाठी हे शिक्षण आवश्यक होते. त्यासाठी आणि राज्यकारभारात सामील होण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यक होते. राजकीय कल्पना पण इंग्रजी भाषेतूनच व्यक्त होऊ शकत होत्या. पौर्वात्य शिक्षणाचा दर्जा तर फार पूर्वीपासून खालावला होता. ते शिक्षण बंद केले हे बरेच झाले.
  आजही इंटरनेट, सॉफ्टवेअर, आणि इतर तांत्रिक कसब येण्यासाठी आणि मिळकत वाढवण्यासाठी तंत्रज्ञान शिक्षण आवश्यक आहे. लोकांनी सदैव गरीबच रहायचे का?
  हा utilitarian शिक्षणाचा भाग झाला.
  पण शिक्षणाचे जे दुसरे अंग आहे त्यासाठी पण इंग्रजीची गरज आहे. आपल्यालाच नाही फ्रेंच, रशियन, जर्मन यांना पण भासते. कोणत्याही क्षेत्रात उच्च पातळीवर संशोधन करायला त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींशी संपर्क साधावा लागतो. त्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही.
  भारतीय, भाषा, साहित्य, संगीत, कला, नष्ट होऊ द्यायच्या नसतील तर आर्थिक प्रगतीला पर्याय नाही.
  रंगरूपगंधमूल्यविहीन प्रबळ प्रेरणा असायला तर पाहिजेत पण त्या अंगावर मात्र येऊ नयेत ही खरी requirement आहे. हे असे होण्यासाठी मुल नवव्या वर्गात जाईपर्यंत त्याचे व्यक्तिमत्व robust झालेले असायला पाहिजे. हे प्रश्न प्राथमिक शिक्षणातच निकालात काढायला पाहिजेत. आठ ते पंधरा वयोगटातील मुले मानसिक दृष्ट्या प्रगल्भ झालेली असतात. यांचे शिक्षण आज विनामुल्य आणि compulsory आहे. त्यांना शाळेत कसे आणायचे आणि कसे टिकवायचे हा प्रशासनिक चॅलेंज आहे. पण त्यांना कसे शिकवायचे हा मुद्दा शिक्षण खाते विचारत घेत नाही. Not performance but personality is the objective of primary education. म्हणूनच पास/नापास, चढाओढ, हे मुद्दे प्राथमिक शिक्षणात नगण्य असतात. सर्वच पास. भाषा, भूगोल, विज्ञानरुची, नागरिकत्व हे विषय जर आठवी मध्ये संपले नाहीत तर पुढे कधीच नीटपणे शिकले जाणार नाहीत. मग रंगरूपगंधमूल्यविहीन प्रबळ प्रेरणांना आवरणे कठीण जाईल. — वसंत केळकर

Comments are closed.