मागेल त्याला शेततळे! बीडमधील क्रांती

1
56

बीड जिल्ह्याची पावसाची सरासरी सहाशेसहासष्ट मिलिमीटर आहे. अनेकदा, पर्जन्यमान त्यापेक्षा कमी होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी, पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या निम्माही टप्पा सलग काही वर्षें गाठला नव्हता. पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यावरील दुष्काळी संकट गडद झाले व त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा; तसेच, प्राणिजगतासमोर प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव, बिंदुसरा यांसारखे एकशेचाळीसहून अधिक सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. शेततळी तयार करून, पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून त्यावर पीक घेणे जिल्ह्यात गरजेचे होते. त्यामुळेच बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना महत्त्वाची समजून राबवली गेली. योजनेला यश फार छान मिळाले. शेतकऱ्यांनी 2018 साली उत्तम पिके घेतली. ते हजारांऐवजी लक्ष लक्ष रुपयांच्या गोष्टी बोलू लागले. पण पाऊस 2018 च्या पावसाळ्यात अजिबात पडला नाही. त्यामुळे सहा हजारांहून अधिक शेततळी कोरडी पडली आहेत. परंतु शेततळ्यांचे काम होऊन गेले हे खरेच आहे.

परंतु शेतकऱ्यांचा त्या योजनेस प्रतिसाद नाही असे सांगत ती योजना 2015 मध्ये व्यवस्थित राबवली गेली नाही. तळ्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे त्यावेळी फार कमी मानले गेले. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा उपयोग मत्स्यउत्पादनासाठी करण्याची अभिनव कल्पनादेखील त्यात असून जिल्ह्यातील या योजनेचा आढावा घेऊन जिल्ह्यात अधिक कामांची अपेक्षा अनुस्युत होती. तेव्हा मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी बीडमध्ये येऊन त्या योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्याला साडेसहा हजार शेततळी उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जेमतेम एक हजार तीनशे शेततळ्यांचे काम सुरू झाले होते. बीड या आमच्या तालुक्यात तर केवळ सत्तर शेततळी मंजूर करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील संबधित अधिकारी, कर्मचारी यांना धारेवर धरले आणि योजनेला गती देण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असा फंडा भापकर यांनी सुचवला व ती मात्रा मात्र अचूक लागू पडली.

त्यांनी एक कृषी सहाय्यक दररोज एक शेततळ्याचे काम पूर्ण करील अशी सूचना केली. तसेच, त्यांनी चाळीस शेततळी पूर्ण करणाऱ्या कृषी सहाय्यकांचा सत्कारही केला होता. जिल्हाधिकारी देवेन्द्रसिंह यांनीही भापकर यांचा पुढाकार नेमका टिपला व पुऱ्या यंत्रणेला कामाला लावले.

‘मागेल त्याला शेततळे’ कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात साडेसहा हजार शेततळी उभारायची होती. त्यासाठी पंधरा हजार नऊशेपंचवीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यांपैकी चौदा हजार दोनशेचार शेतकरी ‘मागेल त्याला शेततळी’ योजनेस पात्र ठरले. शेततळी करण्यास तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अकरा हजार पाचशेचौतीस एवढी होती. त्यातील दहा हजार सहाशे शेतकऱ्यांना त्यांनी (तालुकास्तरीय समितीने) शेततळी करण्यास मंजुरी दिली. त्याच प्रकारे दहा हजार दोनशेएकोणसत्तर शेतकऱ्यांना शेततळी खोदण्यास कार्यारंभ आदेश देण्यात आले. एक हजार बहात्तर शेतकऱ्यांना शेततळी खोदण्यास आखणीही करून देण्यात आली आणि सद्यस्थितीत त्यातील सहा हजार तीनशे शेततळी खोदून पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात एकूण सहा हजार पाचशेचौऱ्याऐंशी तळी होतील. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा चौऱ्याऐंशी तळी जिल्ह्यात जास्त होत आहेत!

जिल्ह्यात सर्वाधिक बीड तालुक्यात एक हजार शेततळी पूर्ण झाली आहेत. त्या पाठोपाठ आष्टीत नऊशेएकावन्न शेततळी, केज तालुक्यात नऊशेचाळीस, गेवराई  तालुक्यात आठशेपन्नास, अंबाजोगाईमध्ये पाचशेऐंशी, पाटोद्यात पाचशेपन्नास, शिरूर तालुक्यात पाचशेदहा, परळीत तीनशेपन्नास, धारूरमध्ये तीनशेदोन, माजलगावमध्ये दोनशेएकावन्न, वडवणी तालुक्यात दोनशेपन्नास शेततळी पूर्ण झाली आहेत. योजना2015 साली रखडली, तिला गती 2016-17 मध्ये मिळाली. तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी शेतकऱ्यांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत उल्लेखनीय काम केले. त्यातही विकास दगडू सोनवतीकर या कृषी सहाय्यकाने केलेले काम ठळक उठून दिसणारे आहे. सोनवतीकर यांच्याकडे लिंबागणेश, पिंपरणी, महाजनवाडी, पोखरी, बेलगाव, सोमनाथवाडी, मसेवाडी, मुळूकवाडी अशा नऊ गावांची जबाबदारी आहे. त्यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबात झालेला असल्याने व त्यांना बीड जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्याच्या दिशा व दशाही माहीत असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजनेची अंमलबजावणी नीट कशी करता येईल असा विचार केला.

सोनवतीकर यांनी शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना नीट समजावून सांगितली. त्यांनी शेतकऱ्याला या योजनेतून शेततळे खंदून घेता येईल व त्यानंतर अस्तरीकरण इतर योजनेतून बारमाही पाणी शिवारात उपलब्ध होईल अशी आशा त्यांच्या मनी जागी केली. त्या भागातील अनेक कुटुंबे शेतीत बारमाही पाणी उपलब्ध नसल्याने ऊसतोडीच्या कामाला जात होती. त्यांना गावात ठेवण्याचे काम या योजनेतून साधले गेले. महत्त्वाची अडचण होती, की शेतकऱ्यांनी पन्नास हजाराचे अनुदान मिळेपर्यंत शेततळे खोदण्यासाठी लागणारे पैसे आणायचे कोठून? मात्र शेतकऱ्यांच्या त्या अडचणीवर मात करण्यात सोनवतीकर यांच्या प्रयत्नांस यश आले. त्यांनी त्याच भागात असणाऱ्या जेसीबी, पोकलेन मशीन चालक-मालक यांची भेट घेतली व त्यांना ज्या काळात इतर कामे नसतील त्या काळात त्यांनी शेतकऱ्यांची शेततळी खोदून द्यावी व शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम आल्यावर ती शेतकऱ्याकडून घ्यावी अशी योजना मांडली. त्यासाठी जेसीबी मालक राजी झाले. जेसीबीला काम मिळाले आणि शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातील पैसे सुरूवातीला खर्च न करता शेततळी खोदकाम करता आले! बाबासाहेब हिंदोळे या शेतकऱ्याचे पहिले शेततळे 6 जुलै 2017 रोजी खोदण्यास सुरुवात झाली. विकास सोनवतीकर यांना एका वर्षात केवळ तीस शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट दिलेले असताना उद्दिष्टाच्या दहापट तळी त्या एकट्या कृषी सहाय्यकाने त्याच्या अधिकार क्षेत्रातील नऊ गावांत खोदून घेतली. तब्बल तीनशे शेततळी! एका गावात तर दहा शेतकऱ्यांची एका खाली एक अशी दहा साखळी शेततळी सलग तयार करण्यात आली आहेत. त्यातील अनेक शेततळ्यांना अस्तरीकरण म्हणजेच कपडा टाकण्यात आला व त्यात पाणी साठवून शेतीपिकाला देण्यातही आले! सोनवतीकर सांगतात, की जिल्हा कृषी अधीक्षक मारुती चपळे, रमेश भाताने, विष्णू मिसाळ, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी वारंवार त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली म्हणून हे काम होऊ शकले. शेतकरी त्या भागात पूर्वी बाजरी, तूर, उडीद, मूग, कापूस यांसारखी पिके घेत होता. मात्र शेततळ्यांमुळे भाजीपाला, फुलशेती, रेशीमशेती, फळबाग होऊ लागली. ऊसतोड मजुरांच्या शेतात पाणी उपलब्ध झाले, त्यामुळे त्यांचे स्थलांतर काही प्रमाणात थांबले याचा आनंद मोठा असल्याचे सोनवतीकर सांगतात.

योजनेतील एका शेततळ्यात पंधरा लाख लीटरहून अधिक पाणी एकावेळी साठते. अशी एका तालुक्यात, म्हणजे सुमारे शंभर गावांत तीनशे शेततळी! विचार करा, कोट्यवधी लीटर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवून ते पिके उत्पादन घेण्याच्या कामी आणले गेले! प्रत्येक शेततळ्यास पन्नास हजार रुपये खर्च प्रमाणे एक कोटी पन्नास लाख रुपयांची शेततळ्याची कामे सोनवतीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या नऊ गावांत केली आहेत. महाजनवाडी, पोखरी आणि लिंबागणेश या तीन गावांत प्रत्येकी साठ शेततळी खोदण्यात आली आहेत. बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक मारुती चपळे यांनी संगितले, की ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून छोट्या शेतकऱ्याच्या शेतात शाश्वत स्रोत तयार करता येतो हे प्रत्ययास आले. त्यामुळे बीडसारख्या अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील चित्र बदलले. शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे पीकपद्धत बदलली. अपेक्षित उत्पादन गाठणे शेतकऱ्यांना शक्य झाले. बीड, आष्टी या तालुक्यांत त्या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला हे दिसून आले.

महाजनवाडी येथील शेतकरी रणजीत कोरडे यांच्याकडे पाच एकर शेत आहे. त्या शेतात ते वर्षानुवर्षें कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, ज्वारी, हरबरा यांसारखी पिके घेत होते. त्यांना पावसाचा लहरीपणा आणि बारमाही पाण्याची शाश्वती नसल्याने पारंपरिक पिके घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातून जेमतेम उत्पादन निघत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चाले. कोरडे यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून पंचवीस मीटर रुंद आणि पंचवीस मीटर लांब व दहा मीटर खोल शेततळे घेतले. त्यांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरू केला. बारमाही पाणी शेततळ्यामुळे उपलब्ध झाले. त्यामुळे त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन 2018 साली सुरुवातीला अडीच एकरात तुती (रेशीम) लागवड केली. अडीच एकर रेशीम शेती फुलली. पहिल्या वर्षी रेशीम कोषाचे चार लॉट निघाले. कोरडे यांनी कोष विक्री करून साडेचार ते पाचलाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्याच गावातील दुसरे शेतकरी बलभीम भोसले यांच्या वडिलांनी शेतीत कायम नापिकी, दुष्काळ, शेतमालाला भाव न मिळणे यामुळे निराश होऊन आत्महत्या केली होती. मात्र वडिलांच्या आत्महत्येनंतर डगमगून न जाता त्यांच्या मुलाने साडेचार एकर शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. त्यांनी 2018 साली साडेसत्तावीस मीटर लांब, साडेसत्तावीस मीटर रुंद आणि दहा मीटर खोल शेततळे दसऱ्याच्या दरम्यान खंदले, त्याला कुंपण केले व दिवाळीपूर्वी शेततळ्यास (प्लॅस्टिक) अस्तरीकरण करून घेतले. भोसले यांनी शेततळ्यात पाणी भरण्यास सुरुवात दिवाळीत केली. त्या पाण्याच्या रूपाने लक्ष्मीच त्यांच्या शेत-शिवारात आली! त्यांनी शेततळ्याचे पाणी उपलब्ध झाल्यावर खरबुजाचे पीक घेतले. त्याचे उत्पादन  चांगले झाले. त्याला भावही चांगला मिळाला. त्यानंतर 2018 साली ऐन मे महिन्यात टमाट्याची लागवड केली असल्याचे बलभीम भोसले यांनी सांगितले. 2018 साली टमाट्याबरोबर एक एकर हिरवी मिरचीही त्यांच्या वावरात शेततळ्यातील पाण्यावर, वाऱ्यावर डोलत आहे.

टीप –
लेखक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, की सलग दोन वर्षांच्या अवर्षणानंतर 2017 साली उत्तम पाऊस झाला व त्यामुळे शेततळ्यांचा उपयोग फारच चांगला झाल्याचे दिसून आले. परंतु 2018 च्या पावसाळ्याच्या हंगामात पाऊस अजिबात म्हणजे अजिबात झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळी स्थिती आहे. सर्व शेततळी कोरडी आहेत आणि शेतकऱ्यांची घरे उदास आहेत!

– अतुल कुलकर्णी, बीड, 9422633300,atulniy.kulkarni@gmail.com

(जलसंवाद, ऑगस्ट 2018 वरून उद्धृत)

 

About Post Author

1 COMMENT

  1. चांगल्या सरकारी योजना…
    चांगल्या सरकारी योजना चांगल्या अधिकार्यांच्या सहकार्याने राबवल्या गेल्या तर असा चांगला परिणाम दिसतो. शेततळ्यातील पाणी कायम राहून ते कधीच कोरडे होणार नाही यावर उपाय शोधायला हवा

Comments are closed.