महिलांचे भावविश्व उलगडणारे बचतगट

_MahilaBhavvishva_UlgadnareBachatgat_1.jpg

आर्थिक सक्षमीकरण ही बचतगटामागील संकल्पना… पण चित्र असे दिसते, की त्याच बचतगटांनी कळत-नकळत ग्रामीण भागातील महिलांचे हळवे भावविश्व खुलवले आहे! ती प्रक्रिया सूक्ष्म आणि सुप्तपणे होत असली तरी तिचे परिणाम बचतगटातील महिलांच्या शब्दांत सांगायचे तर…

होतो कसे आम्ही झालो कसे
होतो कसे आम्ही झालो कसे
जेव्हा बचतगटात आलो…
गावातील भांडण सोडून दिलं
एकत्र राहणं सुरू केलं
जेव्हा बचतगटात आलो…
सावकाराला भिणं सोडून दिलं
कर्ज काढणं सोडून दिलं
जेव्हा बचतगटात आलो…
होतो कसे आम्ही झालो कसे
होतो कसे आम्ही झालो कसे
जेव्हा बचतगटात आलो…

बचतगटांची चळवळ गेल्या दोन दशकांत भारतात, विशेषत: ग्रामीण भागात फोफावली आहे. घरे सावरण्यासाठी बायकांना धडपड करावी लागतच होती. बचतगटांनी तशा धडपड करणाऱ्या बायांना योग्य मार्ग दाखवला. बचतगटांचे कार्य आणि त्याचे परिणाम बँका, पतपेढ्या, सोसायट्या यांच्यापेक्षा वेगळे आहेत. दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गट सुरू करायचा, प्रत्येकीने महिन्याला ठरावीक रक्कम भरायची आणि गटातील एखाद्या मंहिलेला कर्ज हवे असेल तर ते त्याच पैशांतून द्यायचे. त्यावर गटाने ठरवलेले अत्यल्प व्याज आकारायचे… व्याजस्वरूपात मिळणारा तो पैसा बचतगटाचा; म्हणजेच बचतगटातील सर्व महिलांचा फायदा. बचतगटाचे गणित हे साधेसोपे वाटते, पण त्याने ग्रामीण महिलांच्या जीवनात क्रांती निर्माण केली आहे!

बचतगटाची संकल्पना ही डॉ. महंम्मद युनूस यांनी बांगला देशात चालवलेल्या ग्रामीण बँकेच्या प्रयोगावर आधारलेली आहे. बचतीची सवय लोकांमध्ये रुजवणे हे ग्रामीण बँकेचे महत्त्वाचे तत्त्व. त्याशिवाय भूमिहीन आणि गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे आणि कर्जवाटप करणे, दारिद्रयनिर्मूलन, महिलांचा सामाजिक स्तर उंचावणे, आरोग्य-संरक्षण, साक्षरताप्रसार ही ग्रामीण बँकेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. भारतातील बचतगटांचे स्वरूप काही प्रमाणात तसेच आहे. सुरुवातीला, भारतात काही सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या माध्यमातून स्वयंसहायता गट किंवा कर्ज व्यवस्थापन गट चालवले जात होते. ‘नाबार्ड’ने बचतगट मोठ्या प्रमाणावर 1991-92 मध्ये सुरू केले. भारतीय रिझर्व्ह बँकेने बचतगटांची खाती बँकेत सुरू करण्यासंबंधी परवानगी 1993 मध्ये दिली. बचतगट चळवळींची रुजवात गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये चांगली झाली. चळवळीचा प्रसार अन्य राज्यांमध्ये सुरू आहे. बचतगटाच्या कार्याशी ‘नाबार्ड’शी संलग्न पाचशेसाठ बँका, ‘माविम’सारख्या शासकीय संस्था, प्रशासकीय आस्थापने आणि तीन हजारांहूनही अधिक बिगरशासकीय संस्था जोडल्या गेल्या आहेत. बचतगटाची संकल्पना ही स्त्री-पुरुष अशा दोघांसाठी आहे. मात्र तिचा विकास होताना महिला तिच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत.

महिलांना बचतगटातून मिळणारे कर्ज त्यांच्या स्वत:च्या हक्काचे वाटते. त्यावरील व्याजदर दोन ते तीन टक्क्यांपर्यंत असतो. तो बचतगटातील महिलाच ठरवतात. शिवाय, कर्जदाराला रक्कम परत करताना काही अडचण आली तरी गटातील महिला ते समजुतीने घेऊ शकतात.

भारतातील बचतगट प्रामुख्याने बिगरशासकीय संस्थांद्वारे चालवले जातात. त्यांना बँकांकडून अर्थसाहाय्य मिळते. काही महिला एकत्र येऊन स्वत:चा बचतगट तयार करतात. सर्व मिळून त्याचे नियम तयार करणे, महिन्याचा हिशोब ठेवणे या गोष्टी करतात. गटातील एकीची प्रमुख म्हणून निवड करतात. काही सामाजिक संस्था स्वत: बचतगट न चालवता अशा स्वयंनिर्मित बचतगटांना मार्गदर्शन करतात, त्यांच्यासाठी उद्योग प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम आदी उपक्रम राबवले जातात; अन्य महिलांना बचतगट तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतात. काही संस्था आणि व्यक्ती वेगळ्या प्रकारे बचतगटांच्या उपक्रमात सहभागी होतात. जळगावमधील दीपिका चांदोरकर या बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देतात. त्यांच्या कार्याचे स्वरूप बचतगटातील महिलांच्या कार्यशाळा घेणे. त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवणे, विक्रीबाबत मार्गदर्शन करणे असे आहे.

बचतगट चालवताना प्राथमिक उद्देश नेहमी आर्थिक विकासाचा असतो. तो केवळ बचत करून पूर्ण होणे शक्य नाही. महिलांना त्यांच्या स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी आवश्यकता असते ती अर्थार्जनाच्या पर्यायाची. तसे पर्याय उपलब्ध करून देताना त्या महिलांचे शिक्षण, आर्थिक अवस्था, त्या परिसराची भौगोलिक परिस्थिती, लोकजीवन, प्रमुख व्यवसाय, उद्योग अशा अनेक प्राथमिक गोष्टींचा विचार करावा लागतो. एकदा पैसा हातात आला, की घर सावरण्याचे बळ येते आणि संसारातील छोट्या-छोट्या तक्रारींनी हैराण झालेल्या महिला मोठ्या संकटाचा सामना करण्यास तयार होऊ शकतात. सोलापूरमधील ‘उद्योगवर्धिनी’च्या नावातच संस्थेच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट होते. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. ‘चादरी विणणे’ आणि ‘विड्या वळणे’ हे सोलापुरातील प्रमुख उद्योग. त्यामुळे बहुतांश वस्ती ही मजुरांची. प्रत्येकाचे पोट हातावर. संपूर्ण कुटुंबाच्या पोटाला घालायचे म्हणजे दिव्यच! त्यात पुरुषांमध्ये व्यसनाधीनता. तशा परिस्थितीत घरातील महिलांनी पुढे येऊन कुटुंब सावरले पाहिजे, ही मानसिकता चंद्रिकाभाभींनी म्हणजेच चंद्रिका चौहान यांनी रुजवली. त्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणले. त्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. ‘उद्योगवर्धिनी’चे तेथील शिवराय मठात काम चालते. ‘उद्योगवर्धिनी’तर्फे चालवले जाणारे प्रमुख उद्योग म्हणजे चादरी, कापडी पिशव्या, बटवे तयार करणे आणि दुसरा उद्योग म्हणजे ‘अन्नपूर्णा’. ‘अन्नपूर्णा’च्या माध्यमातून एकटे राहणाऱ्या वृद्धांना किंवा वृद्ध दांपत्यांना जेवणाचे डबे तयार करून पोचवले जातात. शाळांमध्ये पोषक आहार दिला जातो. शिवाय, तेथे कडक भाकरी, मिरचीचा ठेचा आणि अन्य उन्हाळी पदार्थ तयार करून विकले जातात. त्या कामात बचतगटाच्या महिलांना सामावून घेतले जाते. त्यांना त्या सगळ्याचे प्रशिक्षण तर दिले जातेच; शिवाय, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. मी तेथे गेले तेव्हा खाली मान घालून त्यांच्या कामात मग्न असलेल्या त्या महिलांना पाहिले तेव्हा त्या माझ्याशी धड बोलू शकतील का? असे मनात वाटून गेले. मात्र एकेक जणी त्यांचा अनुभव सांगू लागल्या तेव्हा त्यांना थांबवणे मुश्कील झाले!

अलका सुनील कोरे… शिक्षण दहावीपर्यंत. नवऱ्याचे शिक्षण एम.ए. पर्यंत, पण नोकरी नाही. नवऱ्याला नोकरी नसल्यामुळे घरात कटकटी असायच्या, सासरच्यांशी भांडणतंटे होत असत. सध्या त्या ‘अन्नपूर्णा’च्या कामात आहेत. “आम्ही सहा महिला ‘अन्नपूर्णा’चे काम करतो. येथून पाच किलोमीटर असलेल्या शेडगी गावातून मी चालत येत असे. अगदी भित्री होते. माझे आयुष्य चार भिंतींच्या आत होते. आता, मी सायकलवरून येते. ते पाहून शेजारच्या लोकांना आश्चर्य वाटते. घरातल्यांच्या मनातही माझ्याविषयी आदर निर्माण झाला आहे. येथे आल्यापासून चार लोकांमध्ये कसे वागायचे, मोठ्यांशी कसे बोलायचे ते समजू लागले. एके ठिकाणी जेवणाची ऑर्डर घेऊन जायचो; ते इंग्रजीतून बोलायचे. ‘इसमे मस्टर्ड मत डालो’ अशा सूचना करायचे. आम्हाला ते कळत नसे. भाभींनी आमच्यासाठी हिंदी-इंग्रजी संभाषणाचे वर्ग सुरू केले.”

कानडी भाषिक अनिता सुरुवातीला सोलापुरात आली तर तिला मराठी धड बोलताही येत नव्हते. लिंगायत समाजाची विशेषता असलेली कडक भाकरी बनवण्यात तिचा हातखंडा होता. त्याचा उपयोग तिला ‘अन्नपूर्णा’मध्ये काम करताना झाला. तिने बचतगटातून दोन टक्क्यांनी कर्ज घेऊन अनेक गृहोपयोगी वस्तू घरात आणल्या. नवऱ्याची कंपनी खूप लांब अंतरावर. त्याला घरापासून एवढ्या दूर रोज पायपीट करावी लागते ते पाहून तिला वाईट वाटायचे. बचतगटातून कर्ज घेऊन तिने त्याला स्कूटर घेऊन दिली. अलका गायकवाड नवऱ्याच्या व्यसनाधीनतेमुळे सोलापुरात आईकडे येऊन राहिली होती. ती माहेरी येऊन तिच्या मुलांचा व तिच्या आईचा सांभाळ करते. अलका म्हणाली, “आता एकच जिद्द आहे. मुलांना खूप शिकवायचं. मुलीला डॉक्टर बनवायचं आहे. विशेष करून मला फोर व्हिलर शिकण्याचं स्वप्न आहे. नुसते शिकायचेेच नाही तर स्वत:ची गाडीही घ्यायची आहे. महिलांची ट्रिप घेऊन कुठे गेलो तरी पुरुषांची गरज आहे असं वाटलं नाही पाहिजे. स्त्री आहे म्हणून नमून राहणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या बरोबरीनं चालायचं आहे.” चंद्रिकाताई सांगतात, “आमच्या बचतगटांची मीटिंग दर महिन्याच्या 25 तारखेला असते. गटातील भांडणं, नवरा-बायकोची भांडणं सगळ्याची चर्चा त्याच दिवशी होते. तो दिवस खास बचतगटाच्या महिलांकरता राखून ठेवलेला असतो. त्यांच्यापैकी कोणाला वैयक्तिक बोलायचं असेल, ते वैयक्तिक बोलतात. त्यांना फक्त आमच्या शब्दांचाच आधार आहे. त्यांना उद्योगधंदा देण्याच्या दृष्टीने आमच्या कामाचं स्वरूप आतापर्यंत होतं…”

अनेक महिलांसाठी बचतगटाचे महिन्याचे पंचवीस-पन्नास रुपये भरणे हीदेखील मोठी गोष्ट असते. बचतगटासाठी पैसे देताना पुरुषाची कुरकुर ऐकावी लागते किंवा मग रोजचे चार-दोन रुपये बाजूला काढून त्यातून बचतगटाचे पैसे भरावे लागतात. कधी कधी, तेवढेही शक्य होत नाही. बाकी राहिली तर पुढील वेळी त्याचा दंड भरावा लागतो. पैसे वेळेवर न भरल्यास, गटाच्या मीटिंगला उपस्थित न राहिल्यास, कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास दंडाची ठरलेली रक्कम भरावी लागते. गटातील चार-पाच महिलांना एकाच वेळी कर्जाची गरज असेल तर कोणाला अधिक गरज आहे ते समजून घेऊन कर्ज देण्याकरता प्राधान्यक्रम ठरवला जातो. त्यासाठी गटातील महिलांमध्ये समजूतदारपणा व परस्परांविषयी विश्वास असण्याची आवश्यकता असते. बचतगटातील महिलांना जे प्रशिक्षण मिळते, त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास होतो. बचतगट महिलांना भावनिक व मानसिक उभारीही देतात. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करतात. त्यातूनच काही महिला इतरांसाठी आदर्श बनतात. त्या गटाचे नेतृत्व करतात. त्यांना त्यांच्या त्यांच्या गावातील लोकांमध्ये मानाचे स्थान असते. तो आदर, विश्वास त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने कमावलेला असतो.

पुण्याच्या श्रीरामनगर, खेडशिवापूर येथील ‘सिद्धांत बचतगटा’च्या आशा गोगावले यांच्यावर  नवरा आणि वडील यांच्या मृत्यूनंतर वृद्ध आई आणि छोट्या लेकराची जबाबदारी आली. त्यांना बचतगटाची सोबत मिळाली. त्यांनी बचतगटाला पंचवीस रुपयांपासून सुरुवात केली. बचतगटाच्या कामासाठी आणि मीटिंगसाठी अनेकदा उशिरापर्यंत घराबाहेर थांबावे लागायचे. त्या दारिद्र्यरेषेखालील गट असलेल्या ‘सिद्धांत बचतगटा’च्या अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या बचतगटासाठी युरिया ब्रिगेडचा कारखाना सुरू केला. त्यासाठी गावची जमीन मिळाली पाहिजे हे गावातील लोकांना समजावले. त्या प्रकल्पाद्वारे हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. बचतगटातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. त्या प्रकल्पासाठी आशातार्इंच्या बचतगटाला पुरस्कारही प्राप्त झाले. मात्र तेवढ्यावर न थांबता आशातार्इ आणि बचतगटातील अन्य महिला यांचे लक्ष्य व्यवसाय अधिक वाढवून महिलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे हे आहे. त्यांच्या आईला, तरुण मुलांना आणि गावाला त्यांचा अभिमान वाटतो. आशाताई ग्रामसभा घेतात, गावात कोणाचे भांडण झाले तर ते मिटवण्यात पुढाकार घेतात.

पुण्याची ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्था बचतगटांना मार्गदर्शन करते. त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे भरवते. ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या सुवर्णा गोखले म्हणाल्या, “बचतगटातील महिलांना जास्तीत जास्त प्रशिक्षण मिळाले पाहिजे. आम्ही त्यांच्या सहली काढतो. कारण त्या महिला क्वचितच एकट्या घराबाहेर पडतात. सहलींसाठी आम्ही त्यांना देवस्थानांना नेतो. मात्र कोठेही नेले तरी आजुबाजूच्या परिसरातील बचतगटांचे कार्य दाखवून आणतो. बचतगटाच्या निमित्ताने उच्चनीच भेदही नाहीसा होऊन स्त्रियांच्यात एकता निर्माण होते. बचतगटांचा सामाजिक जडणघडणीतील तो एक फायदा आहे.”

सांगोल्याच्या डॉ. संजीवनी केळकर यांच्या ‘माता बालक प्रतिष्ठान’तर्फे चालवल्या जाणाऱ्या बचतगटांमध्ये महिलांचे नेतृत्व घडवण्यासाठी गटप्रमुख, गटसचिव, सगुणा-संघटिका अशा जबाबदाऱ्या देण्यात येतात. जयश्री सांगवे संघटक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे शिक्षण सहावीपर्यंत. त्यांनी बँक लिंकेज करतानाचा एक अनुभव सांगितला. “डीसीसी बँकेचा ताळेबंद करताना त्यात चूक राहिली होती. मी गटसचिवांबरोबर मॅनेजरांकडे गेले. त्यांना ताळेबंदातील चूक दाखवली आणि आमच्या पद्धतीने ताळेबंद करण्यास सांगितला. त्यांनी जो आकडा धरला नव्हता, तो त्यांना दाखवला. त्यांनी मला माझं शिक्षण विचारलं. मी इयत्ता सहावीपर्यंत असे म्हटल्याबरोबर त्यांनी ताळेबंद करणाऱ्या अन्य लोकांना दाखवला. त्यांनी मी केलेला ताळेबंद बरोबर असल्याचे सांगितले. त्यांना आश्चर्य वाटले! आणखी सहा महिन्यांनी ग्रामीण भागातील एका बचतगटाच्या महिलांनी वीस हजार रुपये माझ्याकडे भरायला दिले होते. बँकेत पैसे भरल्यानंतर पावती, चेकबुक सगळं माझ्याकडेच होतं. त्यांना कर्ज देण्यासाठी पैसे लागणार होते. जेव्हा त्या बँकेतून पैसे काढण्यासाठी गेल्या तेव्हा बँकेनं पैसे काढून नेलेलं असल्याचं सांगितलं. चेकबुक, पावती माझ्याकडे असताना पैसे कोण नेणार? मी साहेबांना म्हटलं, की ते पैसे कोणी नेले ते नीट पाहा, नेणाऱ्याचा चेकनंबर काय आहे? चेकबुक माझ्याकडे असताना, भरलेली स्लीप, पासबुक माझ्याकडे असताना, तुम्ही दुसऱ्या कोणाला पैसे दिले कसे? त्यांनी सगळी माहिती तपासल्यानंतर पैसे काढले गेले नसल्याचं लक्षात आलं. त्यांनी चूक कबूल केली. त्यावेळी त्यांना म्हटलं, की तुमची चूक काढायची नसते, पण पैशांचा व्यवहार असल्यामुळे बोलावे लागले. साहेब म्हणाले, “तुमच्या अंगात धाडस आहे याचेच आम्हाला कौतुक वाटते.”

उषा सुरेश दहिवडकर या त्या संस्थेतच काम करणार्याच महिला, वय वर्षे एकोणतीस. फक्त पाचवीपर्यंत शाळा झालेली. लहान वयात लग्न झाले. नवरा अपंग. उषा रानात मजुरीला जायची. बचतगट आणि संस्था यांमुळे तिच्या आयुष्यात झालेले परिवर्तन सांगताना ती म्हणाली, “सहा दिवस काम केल्यानंतर रविवारी आठवड्याचा बाजार आणला, की सर्व पैसे खर्च व्हायचे. त्यामुळे पैसे बचत होत नव्हते. पाल ठोकून राहत होतो. मामेसासूच्या सांगण्यावरून बचतगटात पैसे भरण्यास सुरुवात केली. एकदोनदा पैसे भरल्यानंतर बायका सांगू लागल्या, की २५ डिसेंबरला मोठा मेळावा असतो. त्याला जावं लागतं. मोठा कार्यक्रम असतो. गटसचिवांच्या, प्रमुखांच्या बैठका होतात. मेळाव्याला गेल्यानंतर लक्षात आलं, की लग्न झाल्यानंतर जरी शंभर-शंभर रुपये भरले असते तरी किती फायदा झाला असता! संजीवनी मॅडमना भेटून संस्थेत काम मिळण्याबाबत विचारलं. कारण संस्थेत काम करणाऱ्यांचे अनुभव गोड वाटत होते. मॅडमनी सुरुवातीला पगार कमी असेल म्हणून सांगितलं तरी मी आले. तीन वर्षांत बचतगटातून सवलतीत कर्ज घेऊन घर बांधलं. ते पूर्ण फेडूनही झालं. पाच वर्षांनंतर गट फुटल्यानंतर राहिलेल्या पैशांतून घरात वीजही घेतली.”

संस्थेत १९९५ पासून बचतगट सुरू करण्यात आले. अकलोली कॉलनीतील ‘दास्यभक्ती’ गटाने उद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले. त्यांना बँकेकडून शहाण्णव हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यांनी त्या पैशांतून खुर्च्या आणि भांडी विकत घेतली. ते साहित्य लग्न आणि अन्य समारंभांसाठी भाड्याने द्यायचे. त्यांचे कर्ज दोन वर्षें पूर्ण होण्याच्या आत जवळ जवळ फेडून झाले आहे. अकलोलीत पाच बचतगट आहेत. त्यांचा विभाग तयार करण्यात आला आहे. गावात चांगले रस्ते नव्हते. स्वच्छता नव्हती, आरोग्याच्या समस्या होत्या. बचतगटातील महिलांनी पुढाकार घेऊन ग्राम पंचायतीला गावात सुधारणा करणे भाग पाडले. गावात थंडीतापाची साथ आली होती. प्रत्येक घरात चार-चार, पाच-पाच माणसे तापाने फणफणत असत. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली. आजारी पडल्यामुळे मजुरांना मजुरीला जाता येत नव्हते. सरकारी दवाखान्यातील डॉक्टर केवळ गोळ्या-औषधे देऊन रुग्णांना घरी पाठवत असत. बचतगटातील महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. पत्रकारांना बोलावून त्या समस्येची माहिती दिली. वृत्तपत्रांतून सरकारी दवाखान्याच्या अनागोंदी कारभाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर डॉक्टर आणि अन्य कर्मचारी घाबरले. त्यानंतर डॉक्टर सतत चार दिवस गावात फिरून रुग्णांची तपासणी करत होते. हे उदाहरण प्रातिनिधिक आहे.

अकलोलीतील बचतगटांना प्रोत्साहन लाभले ते ‘प्रसाद चिकित्सा’ या संस्थेतील कार्यकर्त्यांचे. गणेशपुरी येथील ‘प्रसाद चिकित्सा’ ही संस्था प्रामुख्याने वसई परिसरातील आदिवासींसाठी सामाजिक कार्य करते. संस्थेतील दादा-ताई गावागावात जाऊन बचतगटांचे महत्त्व आणि फायदे लोकांना सांगतात. त्यातून नवीन गट सुरू होतात. अकलोली कॉलनी परिसरात पुरुषांचेही बचतगट आहेत. ‘प्रसाद चिकित्सा’चे ‘दादा-ताई’ बचतगटांच्या बैठका घेतात. गटातील बायकाच गटातील आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवतात. अकलोलीचे बचतगट साधारण पाच-सहा वर्षे जुने… मुरलेले आहेत. हसीना शेख म्हणाल्या, “‘प्रसाद चिकित्सा’च्या बचतगटांची सुरुवात २००० साली झाली. सुरुवातीला आमच्याकडे बारा बचतगट होते. आमचे कार्यकर्ते सर्वांना भेटून बचतगट बनवा म्हणून मागे लागत. आता, आमच्याकडे सुमारे तीनशे बचतगट आहेत आणि दर महिन्याला दहा-पंधरा बचतगटांच्या मीटिंगा होतात.” ‘प्रसाद चिकित्सा’ने बचतगटांचे विभाग करण्याची पद्धत सुरू केली. ज्या भागात जास्तीत जास्त गट असतील त्या भागात विभाग केला जातो. विभाग करण्याचा फायदा म्हणजे महिलांना गटाप्रमाणे विभागातूनही म्हणजे दुहेरी कर्ज मिळते. विभागांतर्गत येणारे सर्व बचतगट एकत्र येतात तेव्हा त्यांची शक्ती अधिक वाढते. संघटनेची शक्ती… त्यातून ग्रामविकास अधिक जलदगतीने आणि सुलभतेने होण्याची शक्यता तयार होते.

मोहालीपाड्यातील पाच-सहा बचतगटांची बैठक सुरू होती. सर्व बचतगट दीड-दोन वर्षांचे.

बचतगटातील काही महिला अभ्यास सहलीसाठी राळेगणसिद्धीला गेल्या होत्या, अण्णा हजारे यांच्या संस्थेमार्फत चालणाऱ्या बचतगटांना भेट देण्यासाठी. तेथील बचतगटाची प्रमुख असलेली अशिक्षित महिलाही एखाद्या सुशिक्षित महिलेप्रमाणे बोलत होती, आत्मविश्वासाने व्यक्त होत होती, याचे त्यांना कोण कौतुक वाटत होते! अर्थात बचतगट जेवढे जुने तेवढा अनुभव वाढतो. परिणामी आत्मविश्वासही वाढतो.
मोहालीपाड्यात महिला दिन साजरा झाला. गावातील महिलांनी त्यांच्या स्वत:च्या घरात, परिसरात साफसफाई केली. रांगोळ्या काढल्या. गणेशपुरीतून मोहालीपाड्यात मशाल आणण्यात आली होती. तिचे स्वागत महिलांनी केले. संपूर्ण गावात तिची मिरवणूक निघाली होती. ती मशाल म्हणजे स्त्रीशक्तीचे प्रतीक होते. त्या शक्तीची जाणीव करून देण्याचे कार्य बचतगट करतात. गणेशमंदिरातील कार्यक्रमात महिलांनी गाणी म्हटली, एक नाटक सादर केले. त्या नाटकाचे कथानक… बचतगटाच्या मीटिंगमध्ये महिलेचा नवरा दारू पिऊन येतो आणि मीटिंगमध्ये धिंगाणा घालतो. पुरुषाची भूमिकाही महिलांनीच केली. त्यांना काही तरी वेगळे केल्याचे समाधान मिळाले. पण त्यापूर्वीचे दडपण…! “आम्ही परक्या गावातून आलेल्या… सासरच्या लोकांसमोर नाटक कसे सादर करणार? पण सगळी लाज बाजूला ठेवून नाटक सादर केले. आता यापुढे कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर अशाच प्रकारे सर्व महिला एकत्र येऊन करू.”

स्त्रीच्या सक्षमीकरणातील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे तिच्यातील सुप्त ऊर्मी, क्षमता तिला तिचीच जाणवण्याची. ती ऊर्मी जाणवली, की तिच्याही नकळत ती व्यक्त होऊ लागते. तिला स्वत:ला गाता येते, नाचता येते, अभिनय करता येतो, व्यासपीठावर चार लोकांसमोर बोलता येते, हे तिला जाणवू लागते. बचतगटात महिलांनी एकत्र म्हणण्यासाठी गाणी रचली जातात. काही गाणी महिला स्वत: रचतात, त्यांना चाली लावतात. बहिणाबार्इंच्या काव्यप्रतिभेची प्रेरणा काय होती? रोजच्या संसारातील छोटे छोटे अनुभव… बचतगटातील अनुभव अनेकींची काव्यप्रतिभा जागृत करते. ‘होतो कसे आम्ही, झालो कसे?’ हे लेखात सुरुवातीला दिलेले गीत रचणारी अकलोलीतील उज्ज्वला आंबास. तिने अशी अनेक गीते रचली आहेत, त्यांना चालीही लावल्या. अशा अनेक बहिणाबाई बचतगटांमुळे व्यक्त होऊ लागल्या आहेत. कधी त्या,

“मला घरात बसायचं नाय,
मला महिलांत जायाचं हाय…
पती बंधन नका करू
मनात भीती नका धरू”

असे म्हणत बचतगटात जाण्यासाठी पतिराजांची मनधरणी करतात. तर कधी,

“अरे, बँकेच्या साहेबा, आम्हा कर्ज देशील काय?” असा निर्भीड सवाल बँकेच्या सायबालाच करतात. कधी “कॉलनीतील बाया निघाल्या गं निघाल्या शिकायाला हातात पाट्या घेऊन जातील रात्रीच्या शाळेला” म्हणत शिक्षणाचे महत्त्व सांगतात.

(विवेक, दिवाळी 2010 वरून उद्धृत)

– सपना कदम

About Post Author

1 COMMENT

  1. Namskar Sapna Tai,
    Aapla Ha…

    Namskar Sapna Tai,

    Aapla Ha lekh amhala khup avdla aamchya Bachat Gatan karita yatil mahiti jhup motivational tharel
    aapan Motivetional karyashala karita speech deu shakta ka aamchya Social Iniciativets karita aaplya velet vel kadhun..,mala aaply uttarachi vatasel

    kalave Dhanyawad,

    Vishal Jadhav
    RUNANUBANDH Alandi Pune 9545555962

Comments are closed.