महाराष्ट्र देशी असावे

http://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/social-history-of-deccan.jpg

     अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुस-यांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं अंगण तपासायला गेले. ख्रिश्चन मिशनरी आणि वसाहतींमधले उच्च अधिकारी यांनी 'एम्पायर'च्या गरजेपोटी जगभरातल्या संस्कृतींचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या उत्क्रांतीच्या मॅपवर स्वत:ला सर्वात 'प्रगत' समजणा-या गो-या, युरोपीयन साहेबांनी या शास्त्राचा पाया रचला. या पहिल्या फळीतल्या रिस्ले ते एल्विन या पिढ्यांनंतर भारतात भारतीय अंगणाचा अभ्यास करणारे अँथ्रॉपोलिजिस्ट आले. धुर्ये, इरावती कर्वे ते अगदी कमला गणेशपर्यंत प्रत्येक भारतीय अँथ्रॉपोलिजिस्टनं स्वत:ची संस्कृती तपासलेली आपल्याला दिसते. यांतली दोन महत्त्वाची नावं म्हणजे दुर्गाबाई भागवत आणि इरावती. आणि या दोघींमध्ये त्यांच्यातील भेदांपलीकडे एक समान दुवा म्हणजे 'मराठी असणे ऊर्फ मराठीनेस' या वास्तवाकडे दोघींची वळलेली नजर.

http://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/social-history-of-deccan.jpghttp://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/Malik-Ambar-2.jpg     इरावती कर्व्यांच्या लेखात भेटणारा भैयाची घोंगडी फेकून दिली तरी त्यातल्या पैशाला हात न लावणारा नफ्फट, तर्कट मराठी माणूस किंवा दुर्गाबाईंच्या नजरेनं टिपल्या जाणा-या मराठीपणाच्या, वारकरी भक्तीच्या, धनगरांच्या बारीक घडणी या दोन्ही वाचणं आणि अभ्यासणं मनोहारी आणि अभ्यासपूर्ण; म्हणून महत्त्वाचं.

     या मराठीपणाकडे नंतर जगभरातून येणा-या अँथ्रॉपोलिजिस्टांची नजर वळली. धुर्ये पिढीनं महाराष्ट्रातले भिल्ल, कातकरी, महादेव, कोळी इत्यादी तमाम आदिवासी गटांना पिंजून काढल्यानंतर प्रादेशिक अस्मितांच्या जातीय गटांच्या घडणीचा अभ्यास त्यानंतरच्या फळीला महत्त्वाचा वाटला.

     गुंथर सोन्थायमरनं केलेला महाराष्ट्रातील धनगरांचा, वारीचा अभ्यास किंवा अँन फेल्डहाऊसनं चक्रधरांच्या महानुभाव पंथाकडून 'मराठीनेस'च्या अभ्यासात मारलेली उडी या गोष्टी ऐंशीच्या दशकात महत्त्वाच्या होत्या. या दोघांनी त्यांच्या गो-या नजरेनं 'मराठीनेस' सोलला. त्यात अँन फेल्डहाऊसनं केवळ अँथ्रॉपोलिजी नव्हे तर 'रिलिजिस स्टडीज'ची अभ्यासपूर्ण लेन्स वापरून महाराष्ट्र देशी राहणा-या देव-देवतांची, नद्यांची, जत्रांची चिकित्सा केली. मराठी असण्याचा सांस्कृतिक धर्म तिने तपासाला. Encyclopedia of Religion मध्ये अँन फेल्डहाऊसनं लिहिलेली मराठी संस्कृतीची एन्ट्री यासाठी वाचायला हवी.

     माझ्या अँकॅडमिक प्रवासातले दोन योगायोग मला कायम महत्त्वाचे वाटले आहेत. पहिला जेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमधली लेक्चर्स बुडवून मी एशियाटिकला वाचत बसायचे तेव्हा माझी दुर्गाबाई भागवतांशी ओळख झाली आणि दोन-तीन भेटींत त्यांनी मला 'तू अँथ्रॉपोलॉजी हा विषय का घेत नाहीस?' असा प्रश्न केला. विविध ज्ञानशाखांतून फिरत असताना 'अँथ्रॉपोलॉजी' ही अत्यंत वसाहतवादी ज्ञानशाखा माझ्या विचारांच्या केंद्रस्थानी राहिली, कारण तो दुर्गाबाईंचा प्रश्न. या विद्याशाखेताला वसाहतवाद सोलून त्यापलीकडे काय करता येईल या प्रश्नानं मला कायम ग्रासलं आणि माझा अभ्यास चालू राहिला.

     दुसरी बरी गोष्ट म्हणजे अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत मी अँन फेल्डहाऊसची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला आणि मग टिपिकल दुस-या टाईपच्या अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासकासारखं स्वत:चं बॅकयार्ड उस्कटायला घेतलं. 'मराठी असण्याचं माझं अंगण' हाच मग माझा अभ्यास- विषय झाला.

     अँन फेल्डहाऊसनं ६० नंतरच्या 'रोमॅटिक इंडिया' लेन्समधून मराठीपणाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. माझा अभ्यास ९२ च्या दंगलीनंतर मुंबईतल्या उद्विग्न मराठीपणाच्या मोमेंटवर  सुरू झाला होता. अँनच्या हाताखाली मी जो ग्रॅज्युएट थिसिस लिहिला त्याचं शीर्षक आहे 'लँग्वेज अँण्ड रिलीजन इन महाराष्ट्र'. ९२-९३च्या दंगली नंतर 'मराठी असणं आणि हिंदू असणं' या दोन्हीतली दरी संपून 'मराठी माणूस = हिंदू माणूस' हे जे नवं समीकरण झालं त्याचा उद्वेग माझ्या मनाच्या तळाशी होता. मी माझ्या मराठी अंगणाकडे काहीशा डाव्या रागानं बघत होते. अँनच्या अँरिझोनामधल्या 'रिलिजस स्टडीज' या डिपार्टमेंटने  मात्र मला माझ्या मुंबईतल्या इंटुक सर्किटला आवश्यक 'डाव्या-आवेशा'पासून थोडं दूर जायला जागा दिली. 'मराठीनेस तपासण्यासाठी' तत्कालीन समाजात उपलब्ध rhetoric दूर जायला ती जागा माझ्या उपयोगाला आली.

     अँन फेल्डहाऊसमुळे माझी 'मराठीपणाचा इतिहास' तपासणा-या विविध विचारवंतांशी ओळख झाली. त्यांतला डॉ. रिचर्ड इटन यांच्यासोबतचा सेमिनार मला कायम आठवतो. आमच्या डिपार्टमेंटला डॉ. इटन यांनी एक पेपर वाचला होता. त्याचा विषय होता मलिक अंबर. आदिलशहाच्या आईने लहानग्या आदिलशहाला मलिक अंबरच्या मांडीवर दिले आणि त्याने आदिलशाही राबवली हा चौथीच्या पुस्तकातला उल्लेख मला आठवत होता. पण डॉ. इटन यांनी या मलिक अंबरचं सारं राजकीय आणि ऐतिहासिक चरित्र समोर मांडलं.

     मलिक अंबर हा मूळचा अँबिसिनियाचा, आफ्रिकन. या अँबिसेनियन्सना आपल्याकडे 'हबशी' म्हणतात. (हैदराबादेत एक हबशीकुडा पण आहे.) तिथून त्याला पकडून इराकला आणला आणि त्याचं धर्मांतर करून नाव ठेवलं मलिक अंबर. त्या काळात वेगवेगळे मुजाहुद्दीन म्हणजे पगारी लढाऊ सैनिक विकत घ्यायची पध्दत होती. तशा गुलाम-मुजाहुद्दीनांच्या बाजारातून आदिलशहाच्या आईनं मलिक अंबरला विकत घेऊन महाराष्ट्रात आणला.

     डॉ. इटनच्या भाषणात, त्यांनं महाराष्ट्रातली चौथाई सरदेशमुखीची महसुली पध्दत मलिक अंबरनं त्याच्या आफ्रिकन संस्कृतीतून उसनी आणून महाराष्ट्रात कशी रुजवली यावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. महाराष्ट्रातली महसूल पध्दत, इथले गड-किल्ले यांची रचना या सा-यांत मलिक अंबरचं योगदान मोठं आहे. आदिलशहाच्या अधिपत्याखाली महसुली युनिट म्हणून 'महाराष्ट्र' प्रथम एकत्र झाला. 'मराठी असण्याच्या' प्रक्रियेत एक अँबिसेनिअन दृष्टी अशी मिसळून गेली आहे.

     'मराठी' असण्याचा इतिहास शोधताना जगभरातून आलेल्या अशा अनेक गोष्टी भेटत गेल्या. कधी, डॉ. अशोक केळकरांच्या पर्सो मराठीच्या अभ्यासात मराठीतले उझबेकी-तुर्की शब्द सापडले. कधी, 'तमिळ-मराठी' शब्दकोशात इडली ऊर्फ इडरीच्या मराठी जन्माची कथा मिळाली. कधी, पोस्ट-होयसाळ राजांच्या इतिहासातून वाहत आलेला कानडी उच्चभ्रूपणा मराठी शब्दांत भेटला. वेरूळ-अजिंठ्याच्या निर्मितीच्या वेळी बिहारमधून आलेले बौध्द-जैन कारागिर-मेडिटेटर्स यांनी ही मराठी भूमी आपली मानून निर्माण केलेली साडेसातशे लेणी पाहून महाराष्ट्रातल्या स्थलांतराकडे नव्या नजरेनं पाहण्याची सवय लागली. बौध्द वास्तुकलेतून वाहत आलेलं 'तोरण' मराठी दारांवर चढताना संस्कृती किती विविध परंपरांचा संगम पोटात सामावून घेते हे बघून मन भरून आलं.

     मला अभ्यास करायचा होता भाषा आणि धर्म या दोन गोष्टी अस्मितेच्या प्रांतात कशा वापरल्या जातात त्याचा. आणि भाषिक अस्मितेचा इतिहास तपासताना  भाषा ही कशी अनेक संस्कृतींच्या सरमिसळीतून घडत जाणारी, हवेशीर, खुली, एका भाषेतून दुस-या भाषेत जाणं अवघड न करणारा नात्यांचा ताणाबाणा   आहे, या वास्तवाचा परिचय व्हायला लागला.

     भाषेला अस्मितेशी जोडणारी आधुनिक नाळ म्हणजे मातृभाषेची संकल्पना.  मराठीपणाच्या अभ्यासातली एक पायरी मला अशीच आठवते. ती म्हणजे सुमती रामस्वामी यांच्या तमिळ भाषेच्या अभ्यासादरम्यान भेटलेला एक रेफरन्स. 'मातृभाषा' हा विचारच कसा आधुनिक आहे याची मीमांसा त्यात डॉ. रामस्वामी यांनी केली आहे. भाषेचा राजकीय इतिहास कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. सुमती रामस्वामी यांचं 'पॅशन्स ऑफ द टंग' हे पुस्तक आहे. मातृभाषा आणि त्याला जोडून अस्मितेचं राजकारण हा सारा जर्मन भाषाशास्त्रज्ञांचा भाषेकडे बघण्याचा 'आधुनिक' विचार आहे. मातृभाषा ही संकल्पना आणि त्याला जोडून अस्मितेचे लढे हा आधुनिकतेचा परिपाक आहे असा रामस्वामी  याचं म्हणणं आहे. मूळ संस्कृती ही बहुतेकदा बहुभाषिक असते याबद्दल त्यांनी विवेचन केलं आहे. या बहुभाषिकतेचा, बहुकेंद्री अस्मितांचा विसर आपल्याला पडतो ते केवळ भयाचं राजकारण आहे. 'पॅशन्स ऑफ द टंग' तमिळ भाषेच्या दर्भात हे विवेचन करते.

     मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म यांचं अंगण पिंजून काढताना या अंगणात आलेले कित्येक वैश्विक शब्द, विचारप्रवाह, भाषा भेटत गेल्या. त्या तशाच भेटल्या जेव्हा इतर संस्कृतींचे अभ्यासक भेटले. त्या कुणी मराठी खोपा घातलेल्या अफगाण बायका पोस्ट-पानिपत अफगाणिस्तानात कशा फोटोमध्ये बंदिस्त झाल्या त्याची गोष्ट सांगितली. तर कुणी खानखोज्यांसारख्या मराठी असण्याच्या मेक्सिकन खुणांचा  परिचय करून दिला.

     भयापोटी माणूस संकुचित विचार करतो हे माझं हायपोथिसिस मी गेली कित्येक वर्षे तपासत आहे. अँथ्रॉपोलॉजी, रिलिजस स्टडीज आणि माध्यमांच्या अभ्यासात या भाषेत आणि पर्यायानं संस्कृतीत विणलेले विविध संस्कृतींचे सरमिसळ पदर डोळ्यांना दिसू लागले आहेत.

     संस्कृतीचा अभ्यास करताना अनेक सामाजिक शास्त्रज्ञ एक शब्द वापरतात -पालिमसेस्ट- म्हणजे काय? तर भूर्जपत्र. कसं भूर्जपत्रं? तर ज्या भूर्जपत्रावर एक निरोप लिहून झाला, की त्याला पांढरा रंग देऊन त्यावर दुसरा निरोप लिहिता येतो असं- इतिहासाच्या खुणा जपणारं भूर्जपत्र.  आणि जर जाणकार हातांनी हा पालिमसेस्ट सोलला तर त्या खाली दडलेले अनेक निरोप वाचता येतात… निदान निरोपांचे अनेक थर इथं अस्तित्वात आहेत याचं भान येतं. अँथ्रॉपोलॉजित संस्कृतीचं स्वरूप या पालिमसेस्टसारखं बहुपदरी मानलंय.

     मराठी असण्याबद्दल माझ्या असलेल्या प्रेमाचा परिपाक म्हणून असेल मला सेना-मनसे जेव्हा मराठी असण्याबद्दल बोलतात तेव्हा अंगावर काटा येतो. (अर्थात असाच काटा राष्ट्रवादीच्या पोस्टरवर 'भाषा हे साधन संपर्काचे नाही-संघर्षाचे' हे वाक्य बघितल्यावरही येतो.) कारण या राजकीय पक्षांना भाषेला  राबवायचं  आहे, वाढवायचं नाही.

     बहुकेंद्री असणं हा भाषिक संस्कृतीचा मूळ धर्म आहे. तो भयापोटी नाकारून चालणारं संकुचित राजकारण चुकीचं वाटतं. या राजकीय पक्षांना मुंबईतलं मराठी मायनॉरिटीचं राजकारण कळतं, त्याचबरोबर जागतिकीकरणात डावलल्या गेलेल्या त्रस्त मराठी तरूण मुलांचं भयग्रस्त मन समजतं. मात्र त्यांना ज्ञानोबांनी सांगितलेला 'मराठी' असण्याचा पसायदान अर्थ लागण्याची सुतराम शक्यता नाही. तो अर्थ फार पुढची गोष्ट झाली पण त्यांना मूलभूत मानवी हक्क जपत लोकशाहीवादी राजकारण कसा करायचं हे पण समजून घ्यायचं नाही.

     ख-या अर्थानं मराठी असणं म्हणजे आपल्या भूमीत रुजायला पोषक अशी मूलद्रव्यं सर्व संस्कृतींतून घेणं, त्यासाठी खुली धारणा बाळगणं आणि त्या खुलेपणामध्ये अनेकांना सामावून घेणं– अशा रोबस्ट मराठीपणाच्या राजकारणाची मी वाट पाहतेय. कोंज्या अस्मितेच्या राजकारणाची नाही!

ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : ९३२०२३३४६७
इमेल – dnyanada_d@yahoo.com

About Post Author