”तू शेकरू पाहिलंस का रे?” मी मित्राला विचारले. ”नाही यार दोन-तीनदा जाऊनही काही उपयोग झाला नाही. त्याबाबतीत मी फार अनलकी आहे.” मोर्चा तोलारखिंडीच्या दिशेने वळवला. अकोलेहून दीड तासात तोलारखिंड गाठली. सकाळची वेळ. कोवळे उन पडलेले. निसर्ग मस्त खुललेला. ताजा टवटवीत अनुभव. कोथळे नामक आदिवासी खेड्यात बाईक उभी केली. वाट तुडवायला सुरुवात केली. एव्हाना जंगल जागे झालेले. पाखरांची किलबिल कानाला-मनाला आनंद देते होती. दूरच्या निर्झारांचे गाणे ऐकू येत होते.
घनदाट म्हणावे असे जंगल. झाडांच्या अगणित फांद्या एकात एक गुंतलेल्या. सूर्यप्रकाशाचे कवडसे तेवढे जमिनीवर येत होते. इतक्यात एका हालचालीची चाहूल लागली. आम्ही जागेवर थबकलो. पाहतो तर वानरांची टोळी झाडांच्या फांद्यांना झोके घेत होती. ज्यासाठी आलो होतो ते शेकरू दिसेना. मित्र उतावळा झाला.
आम्ही पावले हळुवार टाकत तोलारकडे चाललो. माळशेज घाटाच्या दिशेने. माणसाची साधी चाहूलही शेकरूच्या लगेच लक्षात येते. इतका तो संवेदनशील आहे.
इतक्यात एक निराळा आवाज कानावर पडला. जागेवर शांत उभे राहून कानोसा घेतला. एका झाडाच्या टॉपला मोठ्ठ्या खारुताईसारखी आकृती दिसली. मी कॅमेरा घेऊन अटेंशनमध्ये! आनंदभराने मित्र ओरडणार… मी खुणेनेच त्याला शांत केले. नजरेची पापणी लवायच्या आत या फांदीवरुन त्या फांदीवर टुणकन उड्या मारत शेकरू त्यााच्या घरट्यात जाऊन बसले!
शेकरू शेपटीसह मीटरभर लांब असते. तिचे वजन दोन ते अडीच किलोपर्यंत असते. तिचे डोळे गुंजीसारखे लालभडक असतात. चंद्रपूर, गडचिरोली, दांडेली यांसारख्या उष्णता अधिक असलेल्या भागातील शेकरुंच्या कातड्याचा रंग गडद असल्याचे आढळले आहे. तशाच रंगाचे शेकरूू सावंतवाडी येथे आढळले आहेत. विदर्भातील शेकरुंच्या रंगापेक्षा भीमाशंकरच्या शेकरुंच्या शरिराच्या वरच्या बाजूचा रंग गडद असतो. याहीपेक्षा गडद रंगाच्या कातड्याचे शेकरु सावंतवाडीत आढळले आहेत. शेकरूची शेपटी शरीरापेक्षा लांब आणि झुपकेदार असते. तिला तोल सांभाळण्यासाठी शेपटीचा उपयोग होतो. पाठ तपकिरी, पिवळसर-पांढरा गळा, छाती, पोट, तोंडावर रुबाबदार लांब मिशा, लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असल्याने तिला कितीही उंच झाडावर सरसर चढता येते; एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने पळता येते. उंबरे, जांभळे, करवंदे, रानआंबे आणि इतर विविध प्रकारची फळे शेकरूचे खाद्य. फळे नाही मिळाली तर ती झाडांची हिरवी साल कुरतडून खाते. रानफुलांतील मधुररस तिच्या विशेष आवडीचा. फळे खाऊन त्यांच्या विष्ठेतून बियांचे कठीण कवच निघून गेल्याने तशा बिया लवकर रुजतात. त्यांची रोपटी वेगाने वाढून झाडे होतात. शेकरू जंगलवाढीसाठी मदत करते.
भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या सात उपजाती आढळतात. पैकी ‘राटूफा इंडिका’ (RATUFA INDICA) ही उपजात फक्त महाराष्ट्रात आढळते. शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुस-या झाडावर सहज झेप घेणारी शेकरू पंधरा ते वीस फुटांची लांब उडी मारू शकते. शेकरू डहाळी व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते. घरटे बारीक फांद्यांवर बांधलेले असते, जेथे अवजड परभक्षी पोचू शकत नाही. शेकरू एकाच झाडावर सहा ते आठ घरटी बांधतात. सतत घरटी बदलत राहिल्याने शेकरू सहजासहजी शत्रूच्या हाती लागत नाही!
पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा १९९५ चे शेकरू हे शुभंकर होते. कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव आणि वन्यजीव अभ्यासक डॉ. रेने बोर्जिस यांनी एकत्रितपणे शेकरू प्राण्यावर केलेल्या लेखनाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
– भाऊ चासकर
सिंधुदूर्ग जिल्ह्यातही शेकरू
सिंधुदूर्ग जिल्ह्यातही शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळते. ब-याचदा नारळाच्या झाडावर असते. शेकराला नारळ फार आवडतात. त्याचे दात अणकुचीदार असतात त्यामुळे ते अख्खा नारळ फोडून सहज खाऊ शकते. इथे अनेकदा शेकराची शिकारही करतात व त्याचे मटण खायला म्हणे खूप चविष्ट असते.
Comments are closed.