महाकाली

0
52
(6)

     महाकाली हे आदिशक्‍ती महामायेचे एक रूप असून ती परात्‍पर महाकालीची संहारक शक्‍ती आहे. आदिशक्‍तीच्‍या तमःप्रधान रौद्ररूपाला महाकाली असे म्‍हणतात. ती दुष्‍टांचा संहार करण्‍यासाठी प्रकट होते. मधु-कैटभ या दैत्‍यांचा नाश करण्‍यासाठी ती अवतरली, असा उल्‍लेख देवी भागवतात आढळतो. शाक्‍त संप्रदायात महाकाली या नावाने देवीची उपासना केली जाते.

     महाकालीचे रूप भयानक आहे. तिच्‍या मुखातून रक्‍त गळत असते व तिचे सुळे बाहेर आलेले असतात. तिचे केस ज्‍वालेसारखे दिसतात आणि तिच्‍या गळ्यात नररूंडमाला असते. तिला चार हात असून त्‍यांत संहारक शस्‍त्रे असतात. ‘कृष्‍णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद आणि खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्‍यादी आयुधे धारण करणारी’ अशाप्रकारे श्रीविद्यार्णवतंत्रात तिच्‍या रूपाचे वर्णन केलेले आहे. महाकालीचे रूप उग्र असले तरी ती आपल्‍या भक्‍तांना वरदायिनी होते आणि त्‍यांचे संरक्षण करते, असे मानले जाते.

     दक्षिण भारतातील गावागावात महाकालीची मंदिरे दृष्‍टीस पडतात. ती दक्षिणेकडील ग्रामदेवता समजली जाते. ती कोपीष्‍ट असून तिच्‍या कोपामुळे पटकी हा रोग उद्भवतो अशी समजूत आहे. दक्षिणेकडे पौष मासात महाकालीची जत्रा भरते. ती सोळा दिवस चालते. जत्रेच्‍या पहिल्‍या दिवशी देवीला एक सोन्‍याची बांगडी भरतात. नवव्‍या दिवशी ती उतरवून देवीच्‍या भांडारात ठेवतात. दहा दिवस तिला वेगवेगळ्या वाहनांवर बसवले जाते. अकराव्‍या दिवशी देवीचा रथ निघतो. त्‍या वेळी तिला पशुबळी दिला जातो.

     जैन संप्रदायात याक्षिणी ही सुमतिनाथाची सेविका आहे. जैन धर्मातील श्‍वेतांबर पंथीयांमते ती सुवर्णकांतीची, कमलासना व चर्तुर्भुज असून वरदमुद्रा, मातुलिंग, पाश व अंकुश धारण करते. दिगंबर पंथाचे लोक तिला ‘पुरूषदत्‍ता’ म्‍हणतात. ती चक्र-वज्र-फल व वरदमुद्रा धारण करणारी व गजवाहना आहे. ही जैनांची विद्यादेवीही आहे. ती आपल्‍या उपासकांना समाधी प्राप्‍त करून देते, असे म्‍हटले जाते.

संदर्भ – भारतीय संस्‍कृती कोष, खंड सातवा  

किरण क्षीरसागर, मोबाइल – 9029557767,

इमेल –  thinkm2010@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleमहालक्ष्मी
Next articleमुंबईकरांच्या ‘टॉप टेन’ समस्या
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767